आपल्या सैन्यातल्या सर्वोत्तम धनुर्धराला राज्यातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धर घोषित करण्याचा राजाचा मनोदय होता. तो त्याने धनुर्धराला सांगितला. धनुर्धर खूष झाला. पण, राजाचा द्वारपाल हसू दाबतोय, हे त्याच्या लक्षात आलं.
धनुर्धर म्हणाला, महाराज, घाई नको. तशी द्वाही फिरवल्यानंतर कोणी आव्हानवीर समोर येणार असेल तर आताच निकाल लागलेला बरा.
धनुर्धराने द्वारपालाला हसण्याचं कारण विचारलं. द्वारपाल म्हणाला, अमुक गावात एक लाकूडतोड्या आहे. तो तुझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर आहे.
धनुर्धर लाकूडतोड्याकडे गेला. त्याची धनुर्विद्या पाहून चकितही झाला आणि निराशही झाला. ज्याच्या हातात कोणतीही वस्तू, अगदी छोटी काटकीही एखाद्या तीरासारखी बनून जाते, अशा या श्रेष्ठ धनुर्धराकडून शिक्षण घेतल्याशिवाय आपण श्रेष्ठ ठरणार नाही, हे त्याच्या लक्षात आलं. त्याने तीन वर्षं लाकूडतोड्याला गुरू मानून त्याची सगळी विद्या आत्मसात केली. आता त्याला परतीचे वेध लागले. पण, एक अडचण होती. राजाने त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर घोषित केलं असतं तरी आपण क्रमांक दोनचे धनुर्धर आहोत, हे त्याचं त्याला माहिती होतंच. यावर एकच उपाय होता. गुरूचा खात्मा.
एकदा गुरू लाकडाची मोळी घेऊन जंगलातून येत असताना धनुर्धराने झाडाआड लपून त्याच्यावर बाण सोडला. गुरूने झपकन मोळीतून एक काटकी काढून चपळाईने त्या बाणावर फेकली आणि तो बाण उलट दिशेला जाऊन धनुर्धराच्या खांद्यात रूतला. गुरूने धावत येऊन बाण काढला आणि तो म्हणाला, मी तुला सगळं काही शिकवलं होतं, पण हे एक शिकवलं नव्हतं. कारण, गुरूला शिष्यापासून सावध राहावं लागतंच. शिष्यच घात करतात गुरूचा. आता मी शेवटचं अस्त्रही तुझ्या भात्यात टाकलंय. आता मी तुझ्याच काय, कोणाच्याही आड येणार नाही. आजपासून मी फक्त लाकूडतोड्या आहे, धनुर्विद्या मी सोडली. तू राजाकडे जा, स्वत:ला सर्वश्रेष्ठ घोषित करवून घे. फक्त एक लक्षात ठेव. माझा गुरू अजून हयात आहे. मला तुझा बाण रोखण्यासाठी काटकी तरी टाकावी लागली, त्याला त्याचीही गरज नाही.
धनुर्धर मटकन् खाली बसला.
गुरूचाही गुरू!
माझ्याकडून शिकायला तुला तीन वर्षं पुरली, त्याच्याकडून शिकायला ३० जन्म पुरायचे नाहीत, एवढं लक्षात ठेव, असं सांगून गुरू निघून गेला.
धनुर्धर आता गुरूच्या गुरूचा शोध घेऊ लागला. अखेर एका पर्वताच्या शिखराजवळ कंबरेतून पार वाकलेला आणि वठलेल्या खोडासारखा सुकलेला म्हातारा त्याला भेटला. त्याला धनुर्धराने मनोदय सांगितल्यावर म्हातार्याने विचारलं, धनुर्विद्या शिकायला धनुष्य घेऊन आलायस म्हणजे बराच मागे आहेस. तुझा नेम अचूक लागतो का?
धनुर्धर गर्वाने म्हणाला, म्हणजे काय? माझे १०० पैकी १०० नेम बरोबर लागतात.
म्हातारा म्हणाला, ही टक्केवारीची बालिश भाषा सांगू नकोस. माझ्याबरोबर चल.
दोघे एका दरीपाशी आले. कड्यावरचा एक दगड आडवा दरीत घुसला होता. फुटभराची पाय ठेवायला जागा, तिन्ही बाजूंना विक्राळ खाई. म्हातारा सहजतेने चालत गेला आणि टोकाशी जाऊन दगडाच्या किनार्यावर पाय तिरपे रोवून उभा राहिला आणि धनुर्धराला म्हणाला, ये, माझ्याशेजारी उभा राहा आणि लाव अचूक नेम.
धनुर्धर म्हणाला, तिथे येण्याच्या कल्पनेनेही माझे हातपाय कापायला लागले आहेत. तिथे येऊन नेम कसला लावतोय मी.
म्हातारा म्हणाला, हातपाय कापतात म्हणजे अंतर्मन कापतंय… कसला धनुर्धर म्हणायचास मग तू?
…यावेळी कोणताही मूर्खपणा न करता धनुर्धर खाली मान घालून उलट्या पायी परत निघाला… न जाणो, या म्हातार्याचाही गुरू हयात असायचा!