‘यदा कदाचित’, ‘अंदाज आपला आपला’, ‘माझिया भाऊजींना रीत कळेना’ अशी धमाल नाटके देणारे लेखक, दिग्दर्शक संतोष पवार आता ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ हे आणखी एक धमाल विनोदी कौटुंबिक नाटक घेऊन आले आहेत. नावावरूनच हे नाटक घराघरात छोट्या छोट्या बाबतीत घडणार्या विनोदावर बेतले आहे हे लक्षात येते. विनोदवीर सागर कारंडे याने यात नेहमीच्या स्टाईलने काम केलेलं असून त्याच्या वाक्यावाक्याला प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उडतात.
सागर कारंडे म्हणाला, संतोष पवारांसोबत मी फार वर्षांनी पुन्हा काम करतोय. रंगभूमीवर माझी सुरुवातच त्यांच्या नाटकापासून झाली होती. त्यानंतर करीयरच्या सुरुवातीची पाच ते सहा नाटके मी सलग त्यांच्यासोबत केली आहेत. आता हे नाटक करतोय. गॅप पडलाय हे नक्की, पण त्यांच्या कामाची पद्धत माहीत असल्यामुळे आणि आमचं ट्युनिंग जमलेलंच असल्यामुळे मध्ये काही वर्षे गेलीयेत असं वाटतच नाही. माझी ग्रास्पिंग पॉवर काय आहे हे तेही जाणून आहेत, त्यामुळे अगदी कमी दिवसांत आम्ही हे नाटक बसवू शकलो.
अजिंक्य दाते याने या नाटकात तिघा भावांमधला सर्वात धाकट्या भावाची भूमिका केलीये. तो म्हणाला, नाटक खूप धमाल आहे. आम्हाला रिहर्सल करतानाच मजा येत होती, तर प्रेक्षक हे नाटक सलग बघतील तेव्हा त्यांना किती गंमत येणार आहे याची कल्पना करा. संतोष सरांसोबत काम करायची माझी खूप इच्छा होती. ती या नाटकामुळे पूर्ण झाली. या नाटकात आम्हाला सर्वांनाच खूप अॅलर्ट राहावं लागतंय. त्यामुळेही खरं तर धमाल येतेय, असंही तो म्हणाला.
हे नाटक करताना कलाकारांना जराही इकडे तिकडे बघायला किंवा दुसरा काही विचार करायलाही उसंत मिळणं कठीणच आहे. कारण मुळात संतोष पवारांचं नाटक म्हणजे त्यात स्पीड असणारच ना… तसाच तो आहे. एका फॅमिलीचा सीन संपतानाच बाजूला दुसर्या फॅमिलीचा सीन लगेच सुरू होतो. एका कुटुंबात सागर कारंडे मोठा भाऊ झालाय, तर अमोघ चंदन मधला भाऊ वठवतोय, आणि अजिंक्य दाते धाकटा भाऊ बनलाय. अमोघ म्हणाला, संतोष पवार यांच्या नाटकात काम करायची माझीही प्रचंड इच्छा होती. त्यांच्या ‘यदा कदाचित’ नाटकाची मी अक्षरश: पारायणं केली आहेत. तेव्हापासूनच ठरवलं होतं की संतोष सरांसोबत काम करायचंच. ते स्वप्न या नाटकामुळे पूर्ण झालं. सागरदादा, शलाकाताई, रमेशदादा, सिद्धीताई, आम्ही सगळेजण रिहर्सलमध्ये खूप मजा करतो, असं तो म्हणाला.
रमेश वाणी यांनी दुसर्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून काम केलंय. ते म्हणाले, संतोषसोबत मीही बर्याच वर्षांनी काम करतोय. माझंही सागरसारखंच आहे. संतोषसोबतच माझ्याही कारकीर्दीची सुरुवात झाली. ‘यदा कदाचित’मधून. ते नाटक इतकं गाजलं की त्याचे अडीच तीन हजार प्रयोग झाले. त्या नाटकामुळे संतोषचं टायमिंग, त्याच्या गोष्टी, त्याचं दिग्दर्शन हे सगळंच मला परिचित आहे. म्हणून त्याच्यासोबत काम करताना खूप मजा येते. संतोषबरोबर काम करणं म्हणजे कलाकारासाठी एक वर्कशॉप असतं. एक व्यायामशाळा असते. करीयरमध्ये स्लोपणा आला की संतोषबरोबर काम करायचं. म्हणजे करीयरला पुन्हा स्पीड येतो. कलाकारांसाठी म्हणून संतोषची नाटकं गरजेची आहेत.
दिग्दर्शक संतोष पवार म्हणाले, हे नाटक दोन फॅमिलींवर बेतलेलं आहे. हे फॅमिली मेंबर्स एकाहून एक नमुने आहेत. एकाला कळत नाही दुसरा काय बोलतोय, दुसर्याला कळत नाही तिसर्याला काय बोलायचंय, अशी ती गंमतजंमत आहे. या सगळ्या वल्ली जेव्हा एकत्र येतात तेव्हा जी धमाल होते ती या नाटकातून अनुभवायला मिळेल. या नाटकात कुठेही शाब्दिक विनोद तुम्हाला दिसणार नाहीत. एकेका प्रसंगावरून निर्माण झालेले विनोद ठासून भरले आहेत. सहसा नाटकात कलाकारांना दुसर्या कलाकाराच्या वाक्यावर प्रतिसाद म्हणून आपलं वाक्य बोलायचं असतं. पण या नाटकात सागरच्या व्यक्तिरेखेची गोची अशी आहे की त्याला स्वत:चं वेगळंच काहीतरी बोलायचं आहे. कारण त्याला समोरचा माणूस काय बोलतोय ते ऐकूच येत नाही, असे कथानक आहे. यातून नाटकात खूपच धमाल उडते.
निर्माते गोपाळ अलगेरी आणि सुनीता अहिरे यांच्या वेद प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या या नाटकात शलाका पवार, सायली देशमुख, सिद्धीरुपा करमरकर यांच्याही भूमिका पाहायला मिळतात. हे नाटक नुकतेच म्हणजे १९ फेब्रुवारीलाच रंगमंचावर आले आहे.