प्रबोधनकारांच्या घरी दादरमधले अनेक लोक रोज तक्रारी घेऊन येत. त्यातून ते सामाजिक कामांत गुरफटत गेले. दादर स्टुडंट्स युनियन, सोशल सर्विस लीग, इंडियन ऑकल्ट इन्स्टिट्यूट अशा संस्थांच्या कामाशी ते जोडले गेले.
– – –
सरकारी नोकरीमुळे प्रबोधनकारांच्या संसाराचं गाडं रुळावर आलं होतं. वाचन, लिखाण आणि संगीतासारख्या छंदांमध्ये ते रंगून गेले होते. त्याचबरोबर नव्याने उभ्या राहणार्या दादरमध्ये ते अनेकांसाठी आधारही बनले होते. अन्याय पाहिला की त्याची तड लावण्याची सवय लहानपणापासून होतीच. हाती लेखणी होती आणि सोबतीला तोडफोड वाणीही होती. त्यामुळे कुणावरही काही संकट आलं, अडचण आली, काही माहिती हवी असली, सल्ला हवा असेल किंवा एखाद्या विषयावर चर्चा करायची असेल, तरी दादरमधले समाजाच्या वेगवेगळ्या थरांतले लोक प्रबोधनकारांच्या मिरांडा चाळीतल्या घरी येत असे. `माझी जागा म्हणजे सार्वजनिक तक्रारींचं पोष्ट ऑफीस,` असं त्यांनी या सगळ्याचं वर्णन केलंय.
प्रबोधनकारांच्या घरी चालणार्या चर्चा ऐकायलाही तरूण विद्यार्थी गोळा होत. त्यात त्यांना विष्णू विठ्ठल ओक भेटला. प्रबोधनकारांच्या शब्दामुळे त्याचं सेंट झेवियर कॉलेजात अॅडमिशन झालं होतं. त्यामुळे तो प्रबोधनकारांशी जोडला गेला. कुठे अन्याय होत असेल तर तो त्यावर उपाय शोधून प्रबोधनकारांकडे सल्ल्यासाठी यायचा आणि दोघे मिळून अन्यायाचं निवारण करत.
पहिल्या महायुद्धात इंग्रजांनी भारतात सैन्याची भर्ती सुरू केली होती. त्याचं लोण दादरमध्येही पोचलं होतं. पोलीस तरुणांना फूस लावून किंवा धमकावून सैन्यात भर्तीसाठी घेऊन जात. त्यासाठी आता कीर्तिकर मार्केट आहे तिथे ताडीची दारू बनवण्याच्या डिस्टिलरीत छावणीही उभारली होती. एक दिवस गिरण्यांमधून काम संपवून घरी येणारी पंचवीसेक माणसंच पोलिसांनी सैन्यभर्तीसाठी फितवून नेली. त्यामुळे दादरमध्ये हाहाकार उडाला. कारण तेव्हा दादर अगदीच छोटंसं होतं. अनेकजण प्रबोधनकारांच्या घरी तक्रारी घेऊन आले. प्रबोधनकारांनी पोलीस ठाण्यात जाऊन जाबही विचारला. पण सकाळी कुलाब्याच्या रिक्रुटिंग कॅम्पमध्ये चौकशी करण्याच्या सल्ल्याशिवाय काही हाती लागलं नाही.
तिकडे विष्णू ओक संध्याकाळी सहापासून या गायब झालेल्या माणसांची माहिती मिळवत फिरत होता. त्याने सगळ्यांची संपूर्ण माहिती एकत्र करून प्रबोधनकारांना दिली. त्यांनी त्याचा एक सविस्तर रिपोर्ट बनवला. ओकने तो रिपोर्ट `बॉम्बे क्रॉनिकल` या प्रसिद्ध वृत्तपत्रात छापायला दिला. तिथे तो रातोरात जसाच्या तसा छापून आला. सकाळी मुंबईभर खळबळ माजली.
कॉलेजात असताना ओकाने कालिदासाचं ‘ऋतुसंहार’ नाटक पहिल्या वर्षाच्या सिलॅबसमधून काढून टाकण्यासाठीही मोहीम चालवली होती. त्यातली कामोद्दीपक वर्णनं मुलंमुली एकत्र शिकत असताना त्यांच्यावर अनिष्ट परिणाम घडवतात, असं त्याचं म्हणणं होतं. तशी मागणी करणारं पत्रंही त्यांनी प्रबोधनकारांकडून टाइप करून घेतलं आणि क्रॉनिकलमध्ये छापून आणलं. त्यावर त्यात तीनचार महिने चर्चा रंगली. पण परीक्षा तोंडावर आल्यामुळे आता सिलॅबस बदलता येणार नाही, असं सांगून युनिव्हर्सिटीने ती मागणी धुडकावून लावली.
त्यानंतर त्याने प्रबोधनकारांकडून ‘ऋतुसंहार’मधल्या निवडक कवितांचं इंग्रजी भाषांतर करून घेतलं आणि वर दहा रुपयेही घेतले. ते घेऊन तो युनिव्हर्सिटीच्या सिंडिकेट सभेत गेला. तेव्हा सर नारायण चंदावरकर कुलगुरू होते. त्यांना त्याने अनुवादित कवितांचे कागद दिले. सोबत पत्रातून विनंती केली की या कविता सभेत वाचून दाखवव्यात आणि त्याचा मेहनताना म्हणून दहा रुपये घ्यावेत. चंदावरकरांनी त्याच्या धाडसाचं कौतुक केलं. दहा रुपये परत देऊन पुढच्या वर्षापासून ‘ऋतुसंहार’ सिलॅबसमधून काढण्याची घोषणा केली.
याशिवाय विद्यार्थ्यांसाठी सवलतीचे रेल्वे पास प्रत्येक रेल्वे स्टेशनवर मिळावेत म्हणूनही विष्णू ओकने असाच पत्रव्यवहार करून यश मिळवलं. कुर्ल्याच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर कोळशांच्या जागी लाद्या लावण्यासाठीही त्याने असाच पिच्छा पुरवला. अशा समाजसेवेसाठी त्याने इतर मित्रांबरोबर `दादर स्टुडंट्स युनियन` नावाची संस्था सुरू केली. त्यांनी प्लेग आणि इन्फ्लुएंझाच्या साथीत लोकांना मदत केली. या संस्थेला प्रबोधनकारांचंच मार्गदर्शन असायचं. पुढच्या शिक्षणासाठी ओक पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि नंतर थेट अमेरिकेत गेला. तो तिथेच स्थायिक झाला. त्या प्रवासात प्रबोधकारांनी त्याला खूप मदत केली.
पुढे अमेरिकेत असताना त्याने एक पत्र प्रबोधनकारांना पाठवलं होतं. अमेरिकेतल्या महासत्ता बनण्याच्या प्रक्रियेचं वर्णन करणारं ते पत्र `पाक्षिक प्रबोधन`च्या अंकात संपादकीय म्हणून छापलं होतं. त्याच्याविषयी प्रबोधनकार लिहितात, `प्रसिद्धीपराङ्मुख राहून पडेल ते श्रमसाहस अपेक्षा उपेक्षांचे आघात सहन करत ध्येय गाठणारा एक हिंमती मर्हाठा तरुण म्हणून विष्णू ओक माझ्या हृदयात चिरंजीव झालेला आहे.` प्रबोधनकारांना ब्राह्मणद्वेष्टे म्हणणार्यांना त्यांचं विष्णू ओकांसारख्या अनेक ब्राह्मणांशी असलेलं मैत्र गप्प बसवतं.
याच काळात गिरणगावात स्थापन झालेल्या एका समाजसेवी संस्थेच्या स्थापनेची त्यांनी आवर्जून नोंद घेतली आहे. आजही कार्यरत असलेल्या या संस्थेचं नाव आहे, परळची सोशल सर्विस लीग. दामोदर हॉल, शाळा, कॉलेज, लायब्ररी, व्यायामशाळा, महिलांना कौशल्यं शिकवणारी संस्था असा या संस्थेचा मोठा पसारा आहे. गिरणगावाच्या विकासात या संस्थेचं योगदान मोठंच आहे. त्याची स्थापना प्रबोधनकारांच्या डोळ्यादेखत झाली होती.
त्या काळात शिमग्याच्या उत्सवात अत्यंत गलिच्छ, बीभत्स आणि अश्लील प्रकार उत्सवाच्या नावाखाली रस्तोरस्ती होत असत. सनातनी मंडळी त्याकडे धार्मिक म्हणून दुर्लक्ष करत. पण सुशिक्षित तरुणांना त्याची किळस वाटायची. त्याला पर्याय देण्यासाठी १९११च्या शिमग्यात डॉ. सर भालचंद्र भाटवडेकरांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी होलिका संमेलनं आयोजित करण्यात आली. त्याला गिरणगावातून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यात कीर्तनं, व्याख्यानं, नकला, नाटकं आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आली.
त्यातून समाजसेवेची आवड निर्माण झालेल्या तरुणांचा एक संघ आपोआप तयार झाला. त्यांचं एक संमेलन ११ मार्च १९११ला सर नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेत भरलं. न्या. चंदावरकर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू असल्याचा उल्लेख वर आला आहेच. ते प्रार्थना समाजाचे अध्यक्ष आणि भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक सदस्यही होते. भारतीय संस्कृतीचे विद्वान अभ्यासक म्हणूनही ते ओळखले जात. शिवाय ते हायकोर्टात न्यायाधीशही होते. राणीने त्यांना सर किताबाने नावाजले होते. त्यांच्याविषयी इथे आवर्जून सांगायचं यासाठी कारण त्यांनी या संमेलनात केलेलं मार्गदर्शन त्यांचं दूरदर्शीपण अधोरेखित करणार होतं.
वर्षातून एकदा एकत्र येण्याऐवजी वेगवेगळ्या क्षेत्रांत समाजसेवेचं काम करण्यासाठी कायमस्वरूपी संघटना उभारावी, असा आदेश चंदावरकरांनी या संमेलनात दिला. त्यातून `सोशल सर्विस लीग`ची स्थापना झाली. आजार्यांच्या शुश्रूषेपासून पाळणाघरांपर्यंत आणि पतपेढ्यांपासून रात्रशाळेपर्यंत लीगच्या अनेक उपक्रमांची नोंद प्रबोधनकारांनी केली आहे. गिरणगावातील जनतेच्या आजच्या सर्वांगीण जागृतीचा पाया लीगनेच घातलेला आहे, हे नमूद करणे इतिहासाला भाग पडेल, असंही ते आवर्जून नोंदवतात. पण तेव्हा मराठी वृत्तपत्रांत जहालांचं प्राबल्य असल्यामुळे लीगच्या कामांना प्रसिद्ध मिळत नसे, असंही ते नोंदवतात.
वर्षाचे ३६५ दिवस फक्त समाजसेवेसाठी दिलेले पूर्णवेळ आजीव सभासद म्हणून लीगच्या कामात स्वतःला वाहून घेतलेले अनेक तरूण प्रबोधनकारांचे मित्र होते. त्यांच्यापैकी `शारदाश्रमवासी` पुरुषोत्तम गोपाळ काणेकर आणि पुरुषोत्तम गोविंद नाईक यांच्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला आहे. लीगच्या समाजसेवेच्या उपक्रमांत प्रबोधनकारांनी भाग घेतला होता. शिवाय होलिका संमेलनात ते सक्रिय असत. त्यात आठवडाभर त्यांची व्याख्यानं होत. शिवाय त्याचं मित्र बाबूराव बेंद्रे आणि श्रीधर देवरूखकर यांचे हिप्नॉटिझमचे प्रयोगही होत.
हिप्नॉटिझमविषयी सांगताना प्रबोधनकार एक गोष्ट नोंदवतात, ती आजच्या काळात महत्त्वाची ठरते आहे, `बाबूराव बेंद्रे मूळचाच अध्यात्मवादी. हिप्नॉटिझमच्या व्यासंगाने तो त्या क्षेत्रात चांगलाच गुंतलेला असे. तो अध्यात्मवादी आणि मी? पक्का नास्तिक! पण ही प्रकृतिभिन्नता आमच्या स्नेहधर्मात कधीच आडवी आली नाही.` बेंद्रे देवरूखकरांनी दादरमध्येच इंडियन ऑकल्ट इन्स्टिट्यूट सुरू करून अनेक विद्यार्थ्यांना हिप्नॉटिझम शिकवलं. त्यांनी हिप्नॉटिझमच्या मदतीने अनेक आजारी माणसांना बरं केलं. त्यासाठीच बाबूराव बेंद्रेंनी पुढे होमियोपथीच्या परीक्षा दिल्या. त्यांनी प्लेगच्या एका रोग्याला फक्त पाण्याचे डोस देऊन पूर्ण बरं केल्याचं प्रबोधनकारांनी पाहिलं. त्याविषयी बेंद्रेंचं म्हणणं होतं, `डॉक्टर वैद्य जर आपली प्रबळ इच्छाशक्ती निष्ठेने मिसळत जातील, तर एकही रोगी दगावणार नाही.` ते स्वतः बेंद्रेंच्या या प्रयोगांचे पाठीराखे होतेच पण स्वतः पेशंटही होते.
उतारवयातही प्रबोधनकार होमियोपथीचेच उपचार घेत असं श्रीकांतजींनी त्यांच्या आत्मचरित्रात नोंदवलं आहे. स्वतः श्रीकांतजींचा होमियोपथीचा उत्तम अभ्यास होता. त्याच्या आधारे ते परिचितांना औषधंही देत. वारसा असाही सुरू राहतो.