या पोलिसाच्या हातात दंडुका असायला हवा. फार तर बंदूक किंवा शिट्टी तरी असावी. मग गजरा आला कोठून? त्याने बायकोसाठी घेतला असावा तर तो पुडीत व्यवस्थित बांधून घेईल. कुणाला तरी देण्याच्या खुषीत त्याने दोन हात मागे ठेवून सावध पवित्रा घेतलेला. मी पटापट दोन चार फोटो घेतले आणि धूम ठोकली. फोटो घेतला खरा पण त्याखाली लिहायचे काय? कोणते हेडिंग द्यायचे. अनेक सुविचार मनात घोळत राहिले… `महिलांना सुगंधी संरक्षण’.
– – –
जनतेच्या रक्षणासाठी दिवसरात्र इमाने इतबारे जागता पहारा ठेवणार्या पोलिस मित्रांशी लोक मात्र फारसा जवळचा संबंध ठेवतांना दिसत नाहीत. त्याच्याशी मैत्री नको आणि दुष्मनीही नको अशी सर्वसाधारण भावना! थोड्याथोडक्या चुकांना पोलिस शिक्षा करतो, दंड ठोकतो, म्हणून तो अप्रिय होतो बापडा.
जवळपासही नकोसे वाटणार्या अशा कर्तव्यकठोर पोलिसांचा लोकांशी घनिष्ठ संबंध आला तो कोरोनाच्या संक्रमण काळात.
लॉकडाऊन असताना विनाकारण गरज नसताना रस्त्यावर फिरणार्या नागरिकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्या. वारंवार सूचना देऊनही जे कायद्याचे उलंघन करत होते त्यांना फटकावले. आपल्यापैकी अनेकांना त्यावेळी पोलिसांचा थोडाफार तीर्थप्रसाद मिळालाच.
पण मला असे नेहमीच वाटत आले आहे की पोलिसही माणूसच आहे ना! मग तोही अनेकदा चुकत असेल आणि बेशिस्तीने वागत असेल पण त्यावेळी त्याना फटके कोण देणार! जाब कोण विचारणार! त्यांची तक्रार करावी तर ठोस साक्षी पुरावे असतील तर ठीक. तो निलंबित होईल पण त्यातही तुम्ही चुका केल्यात तर गेलात सरळ आत दगडी फोडायला बोंबलत.
ऑन ड्युटी गणवेष घालून पोलिसही कसे बेशिस्तीने वागतात, त्यांच्या शोधार्थ मी बाहेर पडलो तेव्हा योगायोगाने अनेक गमतीदार फोटो टिपण्याचे भाग्य लाभले. ते इतके की त्यांच्या फोटोमुळे खूप नावलैकिक मिळाला. पुरस्कार मिळाले आणि जास्त पगाराच्या नोकरीची ऑफर्सही आली.
जगात दुसर्या स्थानावर असणार्या आपल्या पोलिसांनी ड्युटीवर असताना येडेगबाळ्यासारखे राहू नये असे कुणाला नाही वाटणार? एक पोलिस निरीक्षक पूर्ण पोलिस अधिकार्याच्या गणवेषात बंदोबस्तासाठी उभा आहे आणि त्याच्या पायात स्लिपर आहे, हे कसे वाटते. म्हणजे सिनेमात दिसणारा पोलीस तरी बरा वाटावा.
वसई तहसीलदार कचेरीवर एक मोर्चा गेला होता. मोठा पोलीस फौजफाटा ठेवून मोर्चा अडविण्यात आला होता. मोर्चाला सामोरे गेलेला तो अधिकारी स्लिपर घालून उभा. मी त्याचा सुंदर फोटो टिपून छापला वृत्तपत्रात. वरिष्ठ अधिकार्यांनी त्या फोटोची दखल घेतली आणि त्याला विचारणा केली. त्यावर पायाला जखम झाली असल्यामुळे बूट घालू शकलो नाही असे कारण त्याने दिले.
उल्हासनगर येथे मतदान केंद्रावर बंदोबस्ताच्या ड्युटीवर असलेला पोलीस नेमून दिलेले काम सोडून मतदारांच्या बोटाला शाई लावण्याचे कर्तव्य बजावत होता. शाई लावण्यासाठी जबाबदार अधिकारी असताना हे अधिक काम करायला या पोलिसाला कुणी सांगितले होते? हा दुर्मिळ फोटोही वृत्तपत्राने ठळक छापला.
मुंबईत म्युझियमजवळच्या जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी स्कूटर उभी करण्यासाठी आसपास जागा नसल्यामुळे मी रस्ता ओलांडून पलीकडे जुन्या सचिवालयाच्या दगडी इमारतीजवळ स्कूटर उभी केली. शेजारी दरवाज्याबाहेर बंदूकधारी पोलिसांचा खडा पहारा होता. त्यामुळे स्कूटर चोरीस जाण्याची भीती नव्हती. पोलिसाने काही हरकत घेऊ नये म्हणून मी त्याच्याशी स्मितहास्य केले. तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. त्याची ब्रह्मानंदी टाळी लागली होती. ओठ लालचुटूक झाले होते. मी निरखून पाहिले. एक गाल बटाटावड्यासारखा फुगलेला. तोंड न उघडता तो पान चघळत होता. भिंतीवर ‘येथे कोणीही थुंकू नये’ असे इशारेवजा लिहिलेले. पहार्यावर असणार्या पोलिसाने नेमून दिलेली जागा सोडून इतरत्र फिरायचे नसते हे मला ठाऊक होते. मग हा पोलिस पान थुंकायला जाणार कुठे?
मी कॅमेरा तयार ठेवला. बराच वेळ मी तिष्ठत उभा. तो आता थुंकेल मग थुंकेल; पण पठ्ठ्या पान चघळतच राहिला. माझ्या अपेक्षेप्रमाणे तो क्षण आला आणि येथे कोणी थुंकू नये असे लिहिलेल्या भिंतीवर पोलीस दादा थुंकला आणि मी त्याचा फोटो टिपला. पुढे त्या पोलिसाचे काय झाले माहित नाही, पण परवाच आठवण आली म्हणून बर्याच वर्षांनी मी त्या ठिकाणी भेट दिली. भिंतीवरची अक्षरे अजूनही ठळक दिसत होती. पण पोलिसाची जागा बदलण्यात आली. तो समोर नव्याने बांधलेल्या चौकीत बंदूक घेऊन उभा असतो.
`रेल्वे पटरी पार करना अपराध है।’
`पुल का उपयोग कीजिए’
`रेल्वे रूळ ओलांडणे धोक्याचे आहे. त्याने जीव जाऊ शकतो.’
रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी अनेक ठिकाणी असे फलक लावलेले असतात. तरीही रोज लोक बिनदिक्कतपणे रुळावरून प्रवास करतात. अनेकदा पोलीस त्यांना पकडतात आणि दंड आकारून सोडून देतात. जे पोलिसांच्या हाती लागत नाहीत, ते दुर्दैवाने दैवाच्या फेर्यात सापडतात.
कायद्याचे रक्षण करणार्या पोलिसांनी कायदा पायदळी तुडवू नये अशी अपेक्षा असताना नालासोपारा रेल्वे स्थानकाजवळ गणवेषधारी पोलिस स्टेनगन घेऊन चक्क रुळावरून चालताना मी कॅमेर्यात टिपला. बोरिवली रेल्वे स्थानकात शेकटाच्या शेंगांचा जुडगा खांद्यावर घेऊन चोख पोलीस बंदोबस्त ठेवणारा पोलीस मी पाहिला. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? मी प्रथम त्याचा फोटो घेतला मग चौकशी केली. बाहेरगावहून भाजीपाला घेऊन येणार्या गरीब भाजीवाल्याकडून हे पोलीस नित्यनियमाने हप्ता घेतात. जे पैसे देऊ शकतात त्यांच्याकडून पैसे किंवा जे पैसे देऊ शकत नाहीत त्याच्या टोपलीतून दुधी भोपळा, शेंगा, केळी, चिकू काढून घ्यायचे. त्यांची हाव संपता संपत नाही. तुम्हाला आजही बोरिवलीत हा प्रकार पाहता येईल.
बोरिवली रेल्वे स्थानकात अलिकडे नव्याने फेरबदल केले आहेत. पंचवीस वर्षापूर्वी फलाट क्रमांक एकवर लेडीज डब्याजवळ नेहमी एक दोन प्रेते झाकून ठेवलेली दिसत. महिला प्रवासी ते दृश्य पाहून फार घाबरून जात. दिवसभर ती प्रेते तेथेच पडलेली असत. एक दिवस त्या प्रेताचा मी फोटो काढला आणि रेल्वे पोलिसाने मला पकडला. पोलिसांच्या परवानगीशिवाय फोटो काढलाच कसा? त्याने मला पोलिस चौकीत नेले आणि माझे भरपूर बौद्धिक घेतले. तुम्ही हा फोटो पेपरात छापणार, मग पोलिस झोपले होते काय म्हणणार आणि आमच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावणार. फक्त एक रुग्णवाहिका प्रत्येक रेल्वे स्थानकातील प्रेत उचलत बोरिवलीपर्यंत येण्यास पूर्ण दिवस जातो. चौकी दहा बाय पंधरा फुटाच्या आकाराची असल्यामुळे इथे पोलिसांना बसायला जागा नाही, तर प्रेते कुठे ठेवणार असे म्हणून त्याने वर बोट करून दाखवले.
`तुम्ही विचारा ही बोचकी बांधून ठेवलीत त्यात काय आहे.’
रेल्वे अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या अंगावर सापडणार्या वस्तू पंचनामा करून कोर्ट कचेरीच्या कामासाठी बोचक्यात बांधून ठेवल्या आहेत. आमच्या डोक्यावर ही टांगती तलवार आहे म्हणा. कोर्टाचा आदेश येईपर्यंत त्याची विल्हेवाट लावता येत नाही. इथे उजेड नाही पंख्याला वारा नाही असे म्हणून बरेच रडगाणे गाऊन दाखवले. मला त्याची कीव आली. त्याने सांगितलेले सर्व मी ‘नवशक्ती’ दैनिकात फोटोसह प्रसिद्ध केले.
रेल्वे प्रशासनाने त्या बातमीची दखल घेऊन काही दिवसानंतर फलाट क्रमांक एकवर पोलीस चौकीसाठी पोलिसांना प्रशस्त जागा दिली. एका प्रेताच्या फोटोमुळे त्रस्त पोलिसांना दिलासा मिळाला, याचा आनंद झाला. माझ्या फोटोमुळे लोकांचे कल्याण व्हावे, समाजात सुधारणा व्हावी असा माझा नेहमीच प्रयत्न असतो.
चांगला फोटो मिळावा म्हणून दिवसभर वणवण फिरावे तर एकही फोटो मिळत नाही. आणि रजेच्या दिवसांत कॅमेरा सोबत नसतो तेव्हा अचानक डोळ्यासमोर महत्त्वपूर्ण घटना घडते आणि मी हतबलतेने पाहात राहातो. असा अनेकदा अनुभव आला. त्यानंतर कुठेही बाहेर जाताना मी कॅमेरा हमखास आठवणीने सोबत ठेवतो. ऑफिसला सुट्टी असताना अंधेरीला जाण्यासाठी मी चर्नीरोड स्टेशनमध्ये लोकल पकडतो. सुदैवाने खिडकी मिळते. या आनंदात सवयीप्रमाणे बाहेर डोकावून टकामका बघत राहतो. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात लोकल येऊन थांबते. तेव्हा फलाट क्रमांक दोनवर चर्चगेटकडे जाणार्या लोकलची वाट पाहात असणार्या महिला दिसतात. त्यांच्याकडे पाहात एक पोलीस हातात मोगर्याचा गजरा घेवून उभा असतो. मी एक दोन सेकंदात निर्णय घेतो आणि चालत्या लोकलमधून उडी घेतो.
या पोलिसाच्या हातात दंडुका असायला हवा. फार तर बंदूक किंवा शिट्टी तरी असावी. मग गजरा आला कोठून? त्याने बायकोसाठी घेतला असावा तर तो पुडीत व्यवस्थित बांधून घेईल. कुणाला तरी देण्याच्या खुषीत त्याने दोन हात मागे ठेवून सावध पवित्रा घेतलेला. मी पटापट दोन चार फोटो घेतले आणि धूम ठोकली. फोटो घेतला खरा पण त्याखाली लिहायचे काय? कोणते हेडिंग द्यायचे. अनेक सुविचार मनात घोळत राहिले…
`महिलांना सुगंधी संरक्षण’
सुट्टी असतानाही मी ऑफिसात गेलो. सहसंपादक भाऊ जोशींना फोटो दाखवला. त्यांनी पहिल्या पानावर घेण्याचे ठरवले. दुसर्या दिवशी ‘नवशक्ती’मध्ये तो फोटो प्रसिद्ध झाला आणि अनेकांनी फोन करून फोटो आवडल्याचे कळवले. पोलिसांच्या दक्षता मासिकाचे संपादक अरविंद पटवर्धन यांनी पोलिस रेकॉर्डसाठी तो फोटो माझ्याकडून मागवून घेतला. ‘लोकसत्ता’चे संपादक माधव गडकरी यांनी त्यांचे सचिव संजय डहाळे यांना एक पत्र टाइप करायला सांगून ते मला पाठवले. त्यात पोलिसाचा फोटो सुंदर असून माझ्या संग्रहासाठी त्याची एक प्रत मिळावी अशी विनंती केली. फोटो देण्यासाठी मी ‘लोकसत्ता’च्या ऑफिसमध्ये गेलो, तेव्हा गडकरी साहेबांनी उपस्थित सर्व पत्रकारांशी माझी ओळख करून दिली. त्यावेळचे ‘इंडियन एक्सप्रेस’चे जनरल मॅनेजर रंगनाथन यांच्याकडे गडकरी मला घेऊन गेले आणि असा तरुण मुलगा ‘लोकसत्ता’साठी मला हवा असे त्यांना सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघाने सर्वोत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकाराचा पुरस्कार घोषित करून मला सन्मानित केले. महिलांना सुगंधी संरक्षण देणार्या त्या पोलिसाच्या फोटोने मला खूप नावलौकिक मिळवून दिला त्याबद्दल त्या पोलिसाचे मनापासून आभार!