राजस्थानमधील जयपूर शहराच्या मध्यभागात असणार्या झालाना परिसराची एक ओळख म्हणजे तिथला बिबट्यांचा वावर. तिथे बिबटे खूप मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र, तिथे मनुष्य आणि बिबट्या यांच्यात कधीच संघर्ष होत नाही, तिथे बिबट्याने माणसावर हल्ला केल्याच्या घटना होत नाहीत. हे सारे कशामुळे होते, याचा नेमका फॉर्म्युला काय आहे, हा झालाना पॅटर्न कसा आहे, हे जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न. हे मॉडेल महाराष्ट्राबरोबरच देशाच्या अन्य भागांतही राबवले गेले तर मनुष्य आणि वन्यप्राणी यांच्यात यापुढे वाढण्याची शक्यता असलेला संघर्ष कमी करण्यासाठी काही उपयोग होऊ शकतो.
—-
काही दिवसापूर्वीची गोष्ट… पुण्यातील हडपसरजवळच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या परिसरात सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका व्यक्तीवर बिबट्याने अचानक हल्ला केला, त्यात तो जखमी झाला…. या भागात अचानक बिबट्या कसा आला, यामुळे या परिसरात काही प्रमाणात घबराट पसरली होती, वनविभागाने बिबट्याला शोधून पकडले आणि काही काळाने पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले…
गेल्याच आठवड्यात कराडमध्ये उसाच्या शेतात लपलेल्या बिबट्याने लहान मुलावर हल्ला केला, त्यात मुलाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात बिबट्याने माणसांवर हल्ले केल्याच्या अनेक घटना कानावर येत असतात. त्यामुळे गावांबरोबरचे शहरांमध्ये, जंगलांच्या जवळ राहणार्या मंडळींना बिबट्याची भीती सतावू लागली आहे. भविष्यात बिबट्याचा शहरी परिसरातला वावर वाढत गेला, तर त्यांच्या हल्ल्यांचे संकट गहिरे होऊ शकते.
अशा काळात महाराष्ट्राला झालानाची गोष्ट माहिती असायला हवी… ती कदाचित आपल्याला मार्गदर्शकही ठरेल.
राजस्थानमधील जयपूर शहराच्या मध्यभागात असणार्या झालाना परिसराची एक ओळख म्हणजे तिथला बिबट्यांचा वावर. तिथे बिबटे खूप मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र, तिथे मनुष्य आणि बिबट्या यांच्यात कधीच संघर्ष होत नाही, तिथे बिबट्याने माणसावर हल्ला केल्याच्या घटना होत नाहीत. हे सारे कशामुळे होते, याचा नेमका फॉर्म्युला काय आहे, हा झालाना
पॅटर्न कसा आहे, हे जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न. हे मॉडेल महाराष्ट्राबरोबरच देशाच्या अन्य भागांतही राबवले गेले तर मनुष्य आणि वन्यप्राणी यांच्यात यापुढे वाढण्याची शक्यता असलेला संघर्ष कमी करण्यासाठी काही उपयोग होऊ शकतो.
झालाना पॅटर्न काय आहे?
जयपूरच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबटे आहेत, हे सर्व माणसांवर हल्ले न करता त्यांच्याबरोबर राहतात. बिबट्यांमुळे या भागातील पर्यावरणाचे संवर्धन अगदी चांगल्या प्रकारे होत आहे. त्यांच्यामुळे या भागात जंगलात घुसून अवैध वृक्षतोड होत नाही. इथली निसर्गसंपदा सदा हरित असते. उन्हाळ्यात जयपूरच्या परिसरात उन्हाचा पारा ४७ अंशापर्यंत गेलेला असतो. मात्र, या परिसरात तो ४२ ते ४४ अंशापर्यंतच असतो. हे कशामुळे तर तिथे असणार्या गर्द वनराईमुळे. भटकी कुत्री हे इथल्या बिबट्यांचे मुख्य खाद्य आहे. आतापर्यंत या भागातील सुमारे ४३ टक्के भटकी कुत्री इथल्या बिबट्यांची फस्त केली आहेत. आजूबाजूच्या भागातील कुत्री इथे येत असतात, त्यामुळे बिबट्यांना ते खाद्य अगदी सहजपणे उपलब्ध होत आहे.
या परिसरात मुळात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे इथे कुत्रा चावल्यानंतर होणार्या रेबीज रोगाचे प्रमाण फारच कमी आहे. बिबट्यामुळे या भागातील इकोसिस्टिम चांगली राहण्यास मदत मिळत आहे. सरकारकडून रेबीज प्रतिबंधक लास देण्यासाठी दरवर्षी होणार्या २५ ते ३० लाख रुपये खर्चाची बचत होते आहे, असे निरीक्षण अनेक वर्षांपासून बिबट्याचे अभ्यासक स्वप्नील कुंभोजकर नोंदवतात.
इथल्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये गुजर समाज मोठ्या प्रमाणात राहतो. त्यांच्याकडील जनावरे, म्हणजे गाई-म्हशी मरण पावल्यावर त्यांची विल्हेवाट लावणारी यंत्रणा महापालिकेकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे ही मंडळी जनावरे मृत पावली की ती जंगलाच्या सीमेवर आणून टाकतात, त्यामुळे बिबट्यांना सहजपणे त्यांचे खाद्य मिळते, या कारणांमुळे या परिसरात बिबट्या आणि मनुष्य यांच्यामध्ये संघर्ष होताना दिसत नाही.
भारतात गिधाडे कमी झाली आहेत. पूर्वी मेलेली जनावरे खाण्याचे काम ती करायची. आता या भागात ते काम हे बिबटे करत असल्याचे दिसत आहे. थोडक्यात सांगायचे तर बिबट्यांना त्याच्या अधिवासापासून ते खाद्यापर्यंत सर्व काही या ठिकाणी उपलब्ध आहे, त्यामुळे इथे माणसांबरोबर त्यांचा संघर्ष होताना दिसत नाही. याबाबत इथे अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे.
झालानामध्ये गावकर्यांच्या मदतीने सरकारी यंत्रणा, निसर्गप्रेमी मंडळी यांच्या माध्यमातून राबवण्यात येणारे हे मॉडेल भारतातील अन्य ठिकाणी राबवले गेले तर बिबट्यांबरोबरच वाघासारख्या प्राण्यांबरोबर होत असलेला संघर्षही काही प्रमाणात कमी होऊ शकेल, असे कुंभोजकर आवर्जून सांगतात.
बिबट्या आणि माणसाचा संघर्ष नेमका आहे कसा?
भारतामध्ये बिबटे सर्वदूर पसरलेले आहेत, त्यांचा वावर अगदी खेड्यापाड्यापासून ते शहरे, मनुष्यवस्तीच्या जवळ दिसून आलेला आहे. बिबट्याला कोणत्याही इको सिस्टिममध्ये टाकले तरी तो तिथे अगदी चटकन जुळवून घेतो. त्यामुळेच त्याचा आणि मानवाचा संघर्ष अधिक आहे. कान्हा, बांधवगड या परिसरात वाघांचा वावर अधिक आहे. त्या ठिकाणी वाघ बिबट्याला आपल्या अधिवासात राहू देत नाही, त्यामुळे त्यांचा वावर जंगलाच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात असतो. जिथे दाट मनुष्यवस्ती आहे, शेती आहे, त्याठिकाणी बिबट्याचा माणसाशी होणारा संपर्क अगदी अपरिहार्य आहे, असे कुंभोजकर सांगतात. बिबट्या आणि माणूस यांच्यामधील संपर्काचे प्रमाण हे वाघ आणि सिंह यांच्यापेक्षा अधिक आहे. बिबट्याचे खाद्य हे खास करून कुत्री, मांजरे, डुकरे, गाईम्हशींची वासरे हे आहे. बर्याचदा त्याला हे खाद्य मिळाले नाही की तो खाद्याच्या शोधात मनुष्यवस्तीत येतो आणि लहान मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा माणसावर बिबट्याचा हल्ला होतो तेव्हा माणसाकडून त्याला प्रतिकार होत नाही, बर्याचदा त्याला पळून जाणे देखील कठीण होते. त्याला लहान मुलांवर हल्ला करणे सोपे जाते.
अशी आहे महाराष्ट्रातील स्थिती…
महाराष्ट्रात प्रामुख्याने ठाणे, बोरिवली, जुन्नर, ताडोबा या परिसरात बिबट्या मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यापैकी बोरिवली आणि जुन्नर या परिसराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात मनुष्यवस्ती आहे. बोरिवलीच्या आजूबाजूच्या मनुष्यवस्तीच्या भागात हे बिबटे हिंडत असतात. काही वेळेला माणसावर हल्ल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. महाराष्ट्राच्या वन विभागाने बोरिवलीच्या परिसरात बिबट्यांवर चांगले काम केले आहे, त्यामुळे या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात माणसे मरण्याचे प्रमाण काही वर्षांमध्ये कमी झाल्याचे निरीक्षण कुंभोजकर नोंदवतात. जुन्नरमधली परिस्थिती या उलट आहे, या भागात जंगलच नाही, त्यामुळे बिबट्यांची राहण्याची जागा कोणती असेल तर ती म्हणजे उसाचे शेत. त्यामुळे या भागातील बिबट्यांना ‘शुगरकेन लेपर्ड’ असे संबोधले जाते. इथल्या वातावरणामुळे त्याच्या अधिवासात बदल झालेले आहेत, त्यामुळे त्यांची वागणूक बदललेली दिसते. तरस हा प्राणी बिबट्याचे बछडे मारतो, त्यामुळे बिबट्याला खूप सुरक्षित जागा लागते. ज्याठिकाणी माणसांचा वावर असतो किंवा कोणतीतरी रस्त्याची कामे अन्य उपक्रम सुरु असतात, त्याठिकाणी जर बिबट्याचा वावर असेल तर तर बछड्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा माणसांबरोबर संघर्ष होतो.
शहरे सरकत आहेत जंगलाकडे…
वन्यप्राणी शहराकडे येत आहेत, असे बरेचदा बोलले जाते. पण त्यात काही तथ्य नाही. कारण म्हणजे आपल्याकडे लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. शहरे प्राण्यांच्या हद्दीत शिरत आहेत, त्यामुळे त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत चालले आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर मनुष्य आणि इतर प्राण्यांमध्ये संघर्षही अटळ आहे आणि बुद्धीबरोबरच सर्व प्रकारची ताकद लाभलेल्या माणसासमोर प्राण्यांची हारही निश्चित आहे. हा संघर्ष कमी झाला नाही तर जंगलांच्या सीमेवरची माणसं आपले उपाय योजून प्राण्यांना क्रूरपणे ठार मारतात, हे दिसून आले आहे. एकीकडे प्राण्यांच्या हद्दीत आक्रमण करायचे आणि त्यांनाच आक्रमक ठरवायचे, हे करण्याऐवजी झालानामध्ये केले आहेत तसे परस्परांसोबत राहण्याचे उपाय योजणे अधिक श्रेयस्कर ठरेल. बिबट्यांना त्यांचे अन्न उपलब्ध करून दिले, तर ते मानवी वस्त्यांवर हल्ले करणार नाहीत. उलट त्यांच्यामुळे परिसर सुरक्षितच राहील.