कुलकर्ण्यांना ज्योक कळला नाही. पण ते ख्या ख्या करून हसले. भाईंचे विनोद, भाषणे निरागस, मार्मिक, लोटपोट हसविणारे असत. त्यात कोठेही अश्लीलता, द्वयर्थ, द्वेष वा कुजकटपणा नसे. मग तो सिनेमा असो वा नाटक, एकपात्री असो वा भाषण. त्यांच्या समकालीन कलावंतांशी त्यांची मनापासून दोस्ती होती. संगीतातले पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, गानसूर्य वसंतराव देशपांडे, मल्लिकार्जुन मन्सूर असोत वा सर्वश्री गदिमा, तात्यासाहेब शिरवाडकर, पु. भा. भावे, व्यंकटेश माडगूळकर, वसंतराव कानेटकर, वसंतराव बापट आणि अनेक. मित्रांच्या मैफिलींत ते मनापासून रमत.
—-
अंदाजे १९७० साली गावकरी दिवाळी अंकासाठी लेखकांवर रंगीत व्यंगचित्रे काढायला सांगितली गेली होती. त्यात पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, गदिमा, दत्तो वामन पोतदार, वि. आ. बुवा आणि आचार्य अत्रे या दिग्गजांवर मी व्यंगचित्रं काढली होती. त्या वर्षी वेगवेगळ्या कारणांनी ही चित्रे प्रचंड गाजली.
पुलंनी अंदाजे ६७ साली लिखाण थांबविले आहे असे जाहीर केले. पुणेकरांना ती पर्वणीच होती. पुलंना छोट्या-मोठ्या उद्घाटन, प्रकाशन सोहळ्यांच्या अध्यक्षपदाची निमंत्रणं येऊ लागली. कारण पु.ल. म्हटले की ख्या.. ख्या करून हसायची चकटफू सोय. त्यावर मी चित्र काढले. त्यात पुलंच्या गळ्यात पाच पंचवीस हार, माळा वेगवेगळ्या संस्थांनी घातलेल्या व ते म्हणताहेत, ‘पुलं म्हणे आता उरलो हार-तुर्यांपुरता!
वाचकांना व पुलंना ते चित्र खूप भावले. त्या काळी मोजके व दर्जेदार दिवाळी अंक निघत. पुलंनी दादासाहेब पोतनीस यांना पत्र लिहिले, ‘सोनारांनी माझे कान उत्तम टोचलेत, माझ्या वतीने त्यांना शाबासकी द्यावी. लिखाण पुन्हा सुरू करतो!
त्याच वर्षी नाशिकला सायखेडकर नाट्यगृहाचे उद्घाटन पुलंच्या हस्ते झाले. दुपारी त्यांना भेटावे म्हणून मी आणि मित्र जयंत देशमुख त्या वेळचे प्रसिद्ध आर्किटेक्ट ग. ज. म्हात्रे याच्या अवंती बंगल्याकडे निघालो, भाई तेथे उतरल्याचे समजले होते. मात्र गेटवरच्या वॉचमनने आम्हाला अडवले.
आम्ही झेंगट घालत बसलो. पु. ल. देशपांडे आमचे नातेवाईक आहेत वगैरे ठोकत होतो. भाई बंगल्याच्या ओसरीवरच आरामखुर्चीत बसलेले होते. अरे, वॉचमन येऊ दे त्यांना आत, भाईंनी आवाज दिला. वाकून नमस्कार करीत मी म्हटले, मी ज्ञानेश… त्यांनी पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, बस! तेथे आणखी दोन तीन स्थितप्रज्ञ गंभीर चेहरा करून बसलेले होते.
भाईचं खूप काही मी वाचलेलं. त्यात बडबड्या. गप्पांचं पान मस्त रंगलं. भाईंनी खूप हसवलं. स्थितप्रज्ञांना बहुदा तो पोरकटपणा वाटत होता. गप्पा मारता मारता त्यांनी एक किस्सा सांगितला. इंदूरला एका प्रतिष्ठिताकडे गाण्याचा कार्यक्रम होता. टांग्यानेच ते हॉलवर गेले. गायक बहुदा कुमार गंधर्व होते. हार्मोनियमवर भाई होते. हॉलमध्ये अत्यंत प्रतिष्ठित इंदूरकर होते. गाणे सुरू झाले, चांगले रंगत होते, पण महाप्रतिष्ठित व नटून थटून आलेल्या त्यांच्या बायका हे लोक समेवर येईनात, दाद देणे दूरच. भाईंची अस्वस्थता वाढली होती. मात्र हॉलबाहेर पायर्यांवर बसलेली व्यक्ती वाहवा… बढिया… अशी मनापासून दाद देत होता. भाईंनी त्याला आवाज दिला व म्हटले, अरे ओ भाईसाब, आप आगे आकर बैठो ना!
कुमार व भाईंना हॉलवर सोडणारा तो टांगेवाला होता.
हात जोडून म्हणाला, ना ना साहब, ये तो रईसों की महफिल है.. यावर भाई म्हणाले, आज आप भी तो संगीत के रईस हो.
भाईंची खोच हॉलमधल्या ‘रसिकां’ना समजली. मग मात्र त्यांच्या माना डोलू लागल्या. वाहवा उमटू लागली.
एकदा माझं पुण्याला जाणं झालं. जयंत रानडे नावाच्या मित्राबरोबर भाईंच्या घरी गेलो. नाशिकचा प्रसिद्ध चिवडा बरोबर नेला होता. नाशिकच्या गंगेवर बसून बकाणे भरत भेळभत्ता खाण्यात काही और मजा आहे असे त्यांनी एका लेखात लिहिले होते. चिवड्याचे स्वागत उत्तम झाले. सुनीताबाईंना आवाज देत म्हणाले, अहो, तुमचा आवडता नाशिकचा चिवडा हा व्यंगचित्रकार ज्ञानेश घेऊन आलाय बघा! बाई माफक हसल्या. त्यांच्या कडकपणाबद्दल ऐकून होतो. घाबरतच खुर्चीवर बसलो. बाईंनी डिशमध्ये भाईंसाठी चिवडा आणि आम्हाला सफरचंदाचे काप दिले. ओघाओघात मी म्हणालो, ‘आवाज’च्या पाटकरांना तुमच्यावरची एक चित्रमाला दिली होती, पण ते म्हणाले, चित्रमाला छान आहे, पण भाईंना नाही आवडणार! त्यावर भाई म्हणाले, पाटकरांना कशी आवडणार, त्यात तुझी चावट बाई नसेल ना! एकाच वेळी त्यांनी पाटकरांना व मला हसत चिमटा काढला. गप्पा रंगत होत्याच, मात्र आमचा एक डोळा स्वयंपाकघराच्या दाराशी उभ्या असलेल्या सुनीताबाईंकडे होता. आम्ही उठू, उठू म्हटलं की भाई म्हणायचे, अरे बसा रे जाले.
शेवटी सुनीताबाई म्हणाल्या, भाई, चार दिवसांपासून पत्र टाकायची राहिलीत ना? आम्ही तटकन् उठलो.
‘असं म्हणतेस. दे बरं टाकून येतो.’ सुनीताबाईंनी दिलेली पत्रं घेऊन आम्ही तिघे खाली उतरलो. जरा हायसे वाटले. गप्पांच्या नादात एक-दोन पत्रपेट्या मागे पडल्या. चक्कर मारून आम्ही पुन्हा भाईंच्या घराजवळ पोचलो. ‘अरेच्चा घर आले की… पत्रं तर हातातच राहिलीत! मी म्हणालो, ‘भाई, समोर पेटी आहे. माझ्याकडे द्या. मी टाकतो. आम्ही आता निघतो. भाई म्हणाले, पुन्हा आलास तर भेट आणि आठवणीने चिवडा आण बरं का… मिश्कील हसत त्यांनी बाय केले.
त्या काळात मी अत्यंत सुंदर अक्षरात आवडत्या लेखकांना पत्र लिहीत असे. एका पत्रात त्यांना लिहिले, भाई तुमची प्रतिभा, अष्टपैलू पण दिलखुलास विनोद, उत्तुंग व्यक्तिमत्त्व पाहताना डोक्यावरची टोपी खाली पडते. त्यावर एक ओळीच्या पत्रात त्यांनी लिहिले, ‘नि:शब्द करणार्या तुझ्या पत्रास काय उत्तर देऊ?’
माझ्या थोरल्या भावाने दशरथने एक नाटक लिहिले होते. त्यावर काही मित्रांनी टीका केली होती. त्यांनी भाईंना सहज कळविले. भाईंनी त्यास लिहिले, ‘अरे मनावर घ्यायचं नसतं. तुझा भाऊ ज्ञानेश चित्रांतून अनेकांच्या टोप्या उडवित असतोच ना?’
अनेक चाहते त्यांना भेटावयास घरी येत. त्यांचेच विनोद व पुस्तकातलेच जोक्स सांगत हलता हलायचे नाहीत. तसेच एक कुलकर्णी आले, तास दीड तास झाला तरी बोअर करीत राहिले. भाईंनी कंटाळून कोट-टोपीतल्या कुलकर्णींना विचारले, कोठून आला आपण?
‘अक्कलकोटवरून!’
कुलकर्णींनी सांगितले, ‘बरोबर फक्त कोट आणलेला दिसतो.’
भाईंनी हसत टोकले.
कुलकर्ण्यांना ज्योक कळला नाही. पण ते ख्या ख्या करून हसले.
भाईंचे विनोद, भाषणे निरागस, मार्मिक, लोटपोट हसविणारे असत. त्यात कोठेही अश्लीलता, द्वयर्थ, द्वेष वा कुजकटपणा नसे. मग तो सिनेमा असो वा नाटक, एकपात्री असो वा भाषण. त्यांच्या समकालीन कलावंतांशी त्यांची मनापासून दोस्ती होती. संगीतातले पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, गानसूर्य वसंतराव देशपांडे, मल्लिकार्जुन मन्सूर असोत वा सर्वश्री गदिमा, तात्यासाहेब शिरवाडकर, पु. भा. भावे, व्यंकटेश माडगूळकर, वसंतराव कानेटकर, वसंतराव बापट आणि अनेक.
मित्रांच्या मैफिलींत ते मनापासून रमत.
महेश मांजरेकरांनी दोन भागांत ‘भाई’ हा अप्रतिम सिनेमा काढला. यात भाईंच्या बहुरूपी व्यक्तिमत्त्वाची अनेक रूपे दाखविली होती. याआधी कुणा लेखकावर व्यावसायिक फिल्म आली असेल असे वाटत नाही.
अनेक लोक त्यांच्या नावावर विनोद खपवतात. कारण ते ओंगळ नसतात.
त्यांचा एक विनोद नेहमी सांगितला जातो.
एका चाहत्याने सांगितले, ‘भाई, माझा एक मित्र रोज तुमच्या व ज्ञानेश्वरांच्या फोटोंची पूजा करतो. तसबिरी शेजारी शेजारीच ठेवलेल्या आहेत.’
त्यावर भाई म्हणाले, ‘त्याला म्हणावं, माझी फोटो फ्रेम लगेच तेथून काढून टाक, नाही तर लोकांना वाटेल, ज्ञानेश्वरांनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदविले तोच हा असणार!
जाता जाता एक सांगायचे राहिले. भाई अत्यंत सहृदय होते. मन पारदर्शक होते. म्हणून ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील माणसे जिवंत वाटतात.
यावर भाईंना एकदा छेडले असता ते म्हणाले होते, ज्ञानेश्वर, तुकारामांचा मला खूप राग येतो. त्यांनी ओव्या, अभंगांतून आमच्यावर खूप संस्कार केले, अंधारलेले मनाचे कोपरे उजळून टाकले. त्यामुळे गरीब असहाय्य कुणी दिसले की मन अस्वस्थ होते. त्यांनी एक प्रसंग सांगितला. सत्तर, ऐंशीच्या दशकात ताजसारख्या फाइव्ह स्टार हॉटेलात फक्त श्रीमंतांचीच मिरासदारी होती. तेथून जाताना लांबूनच हेच ते ताज हॉटेल असं आपण सोबतच्या माणसाला सांगायचो. मात्र एकदा एका श्रीमंत मित्रामुळे ताजमध्ये जायचा योग आला. वेगवेगळ्या डिशमधील पाच पन्नास पदार्थ पाहून अचंबा वाटला.
मोठमोठ्या भांड्यात चिकन रस्सा, मटण मसाला, तळलेले फिश, तंदुरी चिकन, रायते, वेगवेगळे बेकरी आयटम, चारपाच प्रकारचे आइस्क्रीम तेसुद्धा अनलिमिटेड, आपल्या हातांनीच हवे ते घ्यायचे ते ही हवे तितके. सोबतीला हॉट ड्रिंक्स. त्या दिवशी कळलं, स्वर्गसुख म्हणजे काय… चांगला चापून जेवलो. शॅम्पेनही डोक्यात उतरली होती. सुगंधी बडीशेप तोंडात टाकत टूथपिकने दात कोरत श्रीमंत दोस्ताबरोबर खाली उतरून रस्त्यावर आलो न आलो तोच भिकार्याची चार पाच पोरं सायेबे शेटे पैसा द्या ना म्हणत वाडगी घेऊन आमच्यापुढे येऊन उभी राहिली. ऐ चल भागे कुत्ते कहीं के! मित्राने त्यांना फटकारले. ती गयावया करणारी पोरं पाहून माझी झिंग मात्र जागीच जिरली. पापलेट पोटात कलमलू लागला. श्रीमंतांवर असल्या केविलवाण्या दृश्यांचा परिणाम होत नाही, आपल्याला होतो. कारण ज्ञानोबा तुकोबांनी उजळविलेले हे मनाचे कोपरे.
नांदेडच्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष पुलं होते. ह्या संमेलनात आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडे एका व्यासपीठावर आले होते. त्यावेळेस मराठवाड्यातल्या रस्त्यांची अवस्था फारच बिकट होती. रस्त्यावर असणारे खड्डे, प्रचंड धूळ यामुळे अत्रे त्रासलेले होते. भाषणात त्यांनी राज्यकर्त्यांवर तोंडसुख घेतले. अत्रे म्हणाले, ‘काय हे मराठवाड्यातले रस्ते आणि काय ही धूळ! या धुळीनेच मी हैराण झालो आहे!’
पुलं भाषणासाठी उभे राहिले. अत्र्यांच्या या भाषणाचा संदर्भ घेत म्हणाले, ‘ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली, त्यांना या धुळीची इतकी भीती का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज अशी भली मोठी माणसे होऊन गेली आहेत. ही धूळ अंगावर घेत असताना या माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे, असे वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही, अशी बाई शोधून सापडणार नाही, अशा मराठवाड्यात अत्रेसाहेब आपण आहात.’
लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
सभाशास्त्राचा नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ‘मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो आहे.’