‘भारती एअरटेल’ने दोन दिवसांपूर्वी भाववाढ केल्यानंतर, काल ‘वोडाफोन-आयडिया’नेदेखील आपल्या विविध कॉल व डेटा योजनांवरील दरांत २० टक्के ते २५ टक्के भाववाढ केली आहे. ‘जिओ’देखील येत्या काही दिवसांत भाववाढ जाहीर करेल असे संकेत आहेत…
—-
खरे तर मार्केट इकॉनॉमीची व्याख्या आहे, त्यात उत्पादक/विक्रेते हे वस्तुमाल सेवांच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि कमीत कमी किंमत आकारण्यासाठी, एकमेकांशी स्पर्धा करतील, असे अनुस्यूत आहे.
त्यातून नागरिक/ग्राहकांचा फायदा होतो, म्हणून समाजाने त्याला मान्यता द्यावी असे सांगितले जाते.
पण, एकाचवेळी वरकरणी एकमेकांचे स्पर्धक आहोत असे सांगणारे, जणू काही आपापसात ठरवून एकाचवेळी भाव वाढवत असतील तर?
हा काय निव्वळ योगायोग म्हणायचा? मग, ‘कार्टेल’ची लक्षणे काय वेगळी असतात का?
—-
पुन्हा एकदा सुनील मित्तल, बिर्ला, अंबानी कसे रक्तपिपासू (व्हॅम्पायर स्टेट) आहेत, एकत्र येऊन लोकांना फसवतात, अशी शाळकरी व्यक्तिकेंद्री मांडणी करू नका, सिस्टीमकेंद्री विचार करूया!
व्यक्तीमध्ये नाही, देशाच्या राजकीय-आर्थिक सिस्टीममध्ये वेगाने होणार्या पुनर्रचनेत/बदलात याची मुळे आहेत.
दूरसंचार क्षेत्रात ऑलिगोपोली/मूठभर उप्तादकांच्या हातात सारे क्षेत्र केंद्रित होणे, हा तो मूलभूत बदल आहे.
हे फक्त दूरसंचार नाही; ईकॉमर्स, औषध निर्माण, सिमेंट, धातू, टॅक्सी, विमानतळ, बँका, विमा, अशा अनेक क्षेत्रात प्रचंड कन्सॉलिडेशन सुरु आहे. मर्जर्स अँड अक्विजीशन होत आहेत…
…आणि त्याला लागणारे अब्जावधी रुपयांचे भांडवल जागतिक वित्त भांडवल पुरवत आहे.
—-
परस्परांशी खरीखुरी, लुटुलुटीची नाही. स्पर्धा करणारे अनेक उत्पादक असणारी, ही क्लासिकल औद्योगिक भांडवलशाही नाही, ही मक्तेदार-वित्त (मोनोपॉली-फायनान्स) ची जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाही आहे.
अर्थव्यवस्थेत मक्तेदारी नसावी, ही मांडणी तर, खुद्द भांडवली विचारवंत करतात. मक्तेदारी नसावी यासाठी ‘एमआरटीपी’सारखे कायदे होते. आजचे कॉम्पिटिशन कमिशन दंतहीन आहे.
—-
या डाव्यांचे हे नेहमीचेच म्हणून, नाके मुरडणार्या गरीब/निम्नवर्गीय भांडवलशाहीच्या समर्थकांना आवाहन… मी तुम्हाला वैचारिक कन्व्हर्ट करू शकतो या भ्रमातून लिहीत नाही.
पण, तुम्ही ज्या प्रणालीची पाठराखण करता, त्या प्रणालीत काय मूलभूत बदल होत आहेत, त्याचा तुमच्याशी, तुमच्या भावी पिढ्यांशी काय संबंध आहे, याचा कृपया अभ्यास करावा !!!