प्रेमात माणूस कोणत्याही वयात पडू शकतो, पण एका ठराविक वयात तो सारखा घसरून पडत असतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर कोणाला पाहून हृदयाची घंटी वाजेल हे सांगता येत नाही. घंटी वाजली की आधी मैत्री होते, समोरून पॉजिटिव्ह सिग्नल मिळायला लागतात. पण तिला ‘आय लव्ह यू’ अशी मागणी घातल्यावर ‘मी कधी तुला या नजरेनं पाहिलं नाही’ असं ती म्हणाली तर मात्र प्रेमात पडलेल्या मुलाच्या पायाखालची जमीन सरकते. हाच अनुभव मुलीला देखील येऊ शकतो. या प्रेमभंगातून सावरायला त्यांना एक सहानुभूतीचा खांदा लागतो. हा खांदा बनण्याची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकाने कधीतरी उचललेली आहे. तरुण वयातील हाच अनुभव ताजा करणारा ‘बांबू’ हा सिनेमा आहे.
ही गोष्ट आहे चिंतामणी भस्मे आणि झुळूक यांच्यातील प्रेमाची, कॉलेजमध्ये चिंत्याचा खांदा हा प्रेमात ब्रेकअप मिळालेल्या तरुणींचा हक्काचा थांबा आहे. त्यांना खांदा देता देता त्याला मुलगी आवडायला लागते, पण ‘मी तुला त्या नजरेने कधी पाहिलेच नाही’ असं सगळ्या मुली चिंत्याला सांगतात, शेवटी चिंत्याच्या जीवनात प्रेमाची झुळूक येते. त्यांचं प्रेम फुलू लागतं. फ्रेंड असलेली गर्ल फ्रेंड करा, एक ऑप्शन नेहमी हातात असू द्या, असं स्टेपनीचे तत्वज्ञान सांगणारा चिंत्याचा मित्र मदन या प्रेमी जोड्यात गैरसमजाचे बाण मारायला येतो. पुढे काय होतं, ते कळण्यासाठी हा सिनेमा पाहायला हवा.
वयात आलेल्या मुलांना आणि गतजीवनातील प्रेमाच्या आठवणी जागवणार्या पालकांना डोळ्यासमोर ठेवून ही कथा लिहिलेली आहे. पौगंडावस्थेतून तरुणपणाचा प्रवास मांडणार्या ‘बॉईज’ या सिनेमांचे तीन भाग यशस्वी झाल्यावर दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांना आपल्या सिनेमाचा प्रेक्षकवर्ग कोणता आहे हे कळलं आहे. त्याच तरुण वयातील प्रेक्षकांना साद घालणारी प्रेमाची गोष्ट ते इथे मांडतात. कॉलेजमध्ये फुलणारे प्रेम ही नेहमीच्या पठडीतील गोष्ट असली तरी या सिनेमाला वेगळी ट्रीटमेंट देण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. चित्रपटाच्या कथेचा जीव छोटा असल्यामुळे काही ठिकाणी प्रसंगांची पुनरावृत्ती घडते, सिनेमा रेंगाळतो. आजोबा मुलाच्या आणि नातवाच्या नकळत गोष्टींची पुस्तकं लिहितात, चिंत्याचे वडील अंत्यविधीचे सामान विकतात तर झुळूकचे वडील पूजेचे साहित्य, असे अनेक प्रासंगिक विनोद सिनेमात जागोजागी दिसतात. अशाच प्रसंगनिष्ठ विनोद, शाब्दिक विनोद आणि कोट्यांच्या माध्यमातून सिनेमा पुढे सरकतो.
‘ज्या दिवशी आपल्याला प्रेमाचे बांबू लागतात, तेव्हा दोन फोन बिझी असतात एक गर्लफ्रेंडचा आणि दुसरा आपल्या बेस्ट फ्रेंडचा,’ असे अंबर हडप यांचे चटकदार संवाद चित्रपटातील वातावरण हलकं फुलकं ठेवतात. तांत्रिकदृष्ट्या आणि निर्मितीमूल्यांनी सिनेमा देखणा आहे. समीर सप्तीसकर याचं संगीत पाय थिरकायला लावणारे आहे. रोहित राऊत आणि ज्ञानदा पवार यांनी गायलेले ‘मी तुला त्या नजरेने पहिलं नाही’ हे गाणं लक्षात राहतं.
अभिनय बेर्डे यांनी तारुण्याच्या उंबरठ्यावर स्वप्नात रमणार्या मुलाची भूमिका छान रंगवली आहे, तर अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने झुळूकचं आकर्षक दिसणं, हसणं छान कॅरी केलं आहे. पार्थ भालेराव यांनी स्टाईलबाज अभिनयाने सिनेमात रंगत आणली आहे. आजोबा शिवाजी साटम आणि बाबा अतुल काळे यांनी धमाल उडवली आहे. हास्यजत्रामधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे समीर चौगुले इथे लहान भूमिकेतही आपली छाप सोडतात. स्नेहल शिदम यांनी साकारलेली फ्रेंड ‘दम-दार‘ आहे. तेजस्विनी पंडित यांचे काही क्षणांसाठी होणारे ग्लॅमरस दर्शन डोळ्यांना सुखावणारे आहे.
तरुणाईला १४ फेब्रुवारी या प्रेमाच्या दिवसाचे वेध लागले आहेत. या प्रेमाच्या मौसममध्ये प्रेमाची गोष्ट मनोरंजक पद्धतीने सांगणारा हा सिनेमा तरूण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.