पुनित बालन स्टुडिओज निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला, या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार, संगीतकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. हा सिनेमा १० फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
या चित्रपटात अमेय वाघ हा वर्सोवा कोळीवाड्यातल्या जगदीश उर्फ जग्गूच्या भूमिकेत आहे, तर वैदेही परशुरामी ही अमेरिकेतल्या चितळ्यांच्या जुलिएटच्या भन्नाट भूमिकेत आहे. या चित्रपटात रसिकांना नयनरम्य देवभूमी उत्तराखंडची सफर घडणार आहे. समाजातल्या दोन वेगवेगळ्या घटकांतून आलेल्या या जग्गू आणि जुलिएटची प्रेमकथा हटके पद्धतीने या चित्रपटात सांगण्यात आली आहे.
दिग्दर्शक आणि छायाचित्रकार महेश लिमये म्हणाले, हा सिनेमा माझ्यासाठी एक इमोशनल कलरफुल जॉयराइड आहे. ट्रॅव्हल सिनेमाचा अनुभव देणारा हा चित्रपट नक्कीच लक्षवेधी ठरेल. गंगा नदीचं मनोहारी दृश्य आणि तिचा खळाळता प्रवाह यामुळे चित्रपटाला वेगळी उंची प्राप्त झाली आहे.
संगीतकार अजय गोगावले म्हणाले, असा युथफुल शहरी सिनेमा आमच्याकडे आला नव्हता. निर्माते आम्हाला लावणी, पारंपरिक, ग्रामीण बाजाची गाणी संगीतबद्ध करायला सांगतात, इथे मात्र टीन एज मुलांना आवडेल असं संगीत करायला मिळालं. अतुल गोगावले म्हणाले, गाणी तयार व्हायच्या आधी अजय अतुल म्युझिकल असं पोस्टरवर लिहितात तेव्हा जे दडपण येतं ते सांगता येत नाही, त्या जबाबदारीतून ते संगीत अधिकाधिक चागलं होईल, यासाठी भरपूर काम करावं लागतं. आम्ही ते केलं आहे.
समीर चौगुले म्हणाले, गेली अनेक वर्ष माझा प्रवास दहिसर ते मिरा रोड होत होता. या सिनेमाच्या निमित्ताने मी उत्तराखंडमध्ये गेलो. मला महेश लिमये यांच्यासोबत काम करायची इच्छा होती. ती पूर्ण झाली. हृषिकेश जोशी, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, समीर चौगुले, राया अभ्यंकर, अविनाश नारकर अशा जबरदस्त कलाकारांची फौज चित्रपटात आहे.