विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांची क्रिकेट कारकीर्द अस्ताकडे वाटचाल करते आहे. या दोघांच्या कारकीर्दीपुढे जेव्हा निवृत्तीचा पूर्णविराम लागेल, तेव्हा त्यांच्या खात्यावर धावा, विक्रम आणि यश यांची अमाप पुंजी असेल; पण आदर असेल का? सध्या चालू असलेल्या ऑस्ट्रेलिया दौर्यात दोघांचा धावांचा आलेख एकीकडे खालावला आहे. पण या दोघांची एकंदर मैदानावरील वर्तणूकसुद्धा टीकेच्या लक्ष्यस्थानी आहे.
– – –
चक्रव्यूहात अडकून नामशेष झाला तो अभिमन्यू. पण ते भेदणार्या बिलंदरांचे दोन चित्रपट गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेत आणि चर्चेतही आहेत. एक म्हणजे ‘सिकंदर का मुकद्दर’ आणि दुसरा ‘लकी भास्कर’. आयुष्यात आलेल्या असंख्य अडचणींवर मात करून संघर्षाने उभे राहता येते, याचा परिपाठ देणारे हे दोन चित्रपट. या दोन्ही चित्रपटांचे शेवट सकारात्मक. म्हणजे नायकांचे जीवन सफल संपूर्ण होते. पण विश्लेषात्मक दृष्टीने पाहिल्यास या चित्रपटांतून दिला जाणारा धडा हा नैतिकतेऐवजी अनैतिकतेकडे वाटचाल करतो. कारण दोन्ही नायकांना मिळालेले यश हे प्रामाणिक मार्गांनी मुळीच नसते, तर लबाडीचे असते. त्यामुळे हे दोन्ही चित्रपट प्रेरणादायी चित्रपट म्हणू शकत नाही. जे चित्रपटांचे तेच क्रिकेटचेही. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांची क्रिकेट कारकीर्द अस्ताकडे वाटचाल करते आहे. या दोघांच्या कारकीर्दीपुढे जेव्हा निवृत्तीचा पूर्णविराम लागेल, तेव्हा त्यांच्या खात्यावर धावा, विक्रम आणि यश यांची अमाप पुंजी असेल; पण आदर असेल का?
मेलबर्नवरील चौथ्या कसोटीत विराटने १९ वर्षीय सॅम कॉन्स्टासला दिलेला धक्का असो, वा यशस्वी जैस्वालच्या धावचीत प्रकरणातील निष्काळजीपणा. कॉन्स्टासबाबतच्या कृत्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी ‘कोहली इज अ वाइल्ड डॉग’ (रानटी कुत्रा) अशा आरोळ्या देत त्याला हिणवले. त्यावेळी संतापलेला विराट प्रेक्षकांशी हुज्जत घालण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले. तसे विराट आणि रोहित दोघेही धावांसाठी झगडत आहेत. रोहितच्या नेतृत्वक्षमतेपुढेही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. त्यामुळे मालिकेचा शेवट अनुकूल न झाल्यास लक्ष्यस्थानी रोहित-विराट ही जोडगोळीच असणार. क्रम बदलूनही रोहितचा धावांचा दुष्काळ संपलेला नाही, तर विराटच्या बॅटचा वसंतोत्सव अमावास्या-पूर्णिमेलाच पाहायला मिळतो. पण मूल्यात्मक दृष्ट्या दोन्ही क्रिकेटपटूंची प्रतिमा फारशी चांगली नाही.
‘‘स्वप्नपूर्तीसाठी कोणतेही शॉर्टकट्स स्वीकारू नकोस. प्रथम चांगला माणूस बन, मग क्रिकेटपटू, डॉक्टर किंवा वकील हो,’’ असा सल्ला मला वडील रमेश तेंडुलकर यांनी दिल्याचे सचिन सांगतो. त्यांच्या विचारांचा सन्मान सचिनने राखल्याचेही त्याच्या कारकीर्दीतून दिसून येते. क्रिकेटचा सदिच्छादूत म्हणून ओळख निर्माण करणार्या सचिनला म्हणूनच एमसीसी म्हणजेच मेरिलेबोन क्रिकेट क्लबने आजीवन सदस्यत्व देऊन सन्मानित केले आहे. सुनील गावस्कर यांनाही तोच आदर मिळतो. १९८१मध्ये मेलबर्नवरच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत पंचांनी चुकीचा पायचीत दिल्याच्या निषेधार्थ त्यांनी मैदान सोडून माघारी परतण्याची तयारी केली होती. अगदी मैदानावरील साथीदार चेतन चौहानलाही त्यांनी सोबत येण्याचे निर्देश दिले. पण संघ व्यवस्थापकांच्या मध्यस्थीमुळे हे प्रकरण निवळले. मात्र, गावस्करांच्या त्या ‘सविनय कायदेभंगा’च्या कृतीची चाहत्यांनी पाठराखणही केली होती.
पण रोहित-विराटची स्थिती तशी नाही. मैदानावर क्षेत्ररक्षण करताना शिवीगाळ करीत सहकार्यांना खडसावणार्या आणि क्षेत्ररक्षण करताना सुस्तावलेल्या रोहितच्या अनेक चित्रफीती समाजमाध्यमांवर चर्चेत असतात. वर्षभरापूर्वी रोहितने भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकून दिला, तर अंतिम सामन्यात विराटने अद्वितीय खेळी साकारली. त्यावेळी दोघांच्या कामगिरीचे देशभरात कौतुकही झाले. त्या घटनेच्या आठ महिने आधी एकदिवसीय विश्वचषकाचे हुकलेले जेतेपद सहानुभूती निर्माण करणारे ठरले होते. मागील ‘आयपीएल’ हंगामाच्या वेळी रोहितचे नेतृत्व काढून ते हार्दिक पंड्याला दिल्यामुळे मुंबई इंडियन्सवर क्रिकेटरसिकांनी रोष प्रकट केला होता. नेतृत्वक्षम रोहितवर झालेला अन्याय न रुचलेल्या काही चाहत्यांनी हार्दिकवर निशाणा साधण्याची कोणतीही संधी सोडली नव्हती. समाजमाध्यमावरही हार्दिक आणि मुंबई इंडियन्सचे चाहते झगडल्याचे दिसून आले. पण आता रोहितच्या नेतृत्वाचा कणखरपणा आणि फलंदाजीची नजाकत प्रेक्षकांच्या नजरेतून उतरली का?
भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आप्रिâका आणि न्यूझीलंड या ‘सेना’ राष्ट्रांमध्ये एके काळी दबून खेळायचे. सौरव गांगुलीने कर्णधारपदाच्या कारकीर्दीत भारतीय क्रिकेटला आत्मनिर्भर केले. लॉर्ड्सवर टी-शर्ट काढून फडकावत केलेला विजयोत्सव हे त्या आक्रमकतेचे प्रतीक. त्यानंतर कोट सापडत नसल्याचे कारण देत स्टीव्ह वॉ यालाही त्याने मालिकेआधीच्या छायाचित्रणासाठी तिष्ठत ठेवले होते.
विराटने गांगुलीच्या पुढील काही पायर्या गाठल्या. डिवचणे ही ऑस्ट्रेलियाची मैदानी रणनीती. गेल्या अनेक दशकांमधील भारताचे असंख्य मैदानी वाद हे ऑस्ट्रेलियाविरुद्धच प्रामुख्याने झाल्याचे स्पष्ट होते. परंतु ऑस्ट्रेलिया असो, वा अन्य कोणताही प्रतिस्पर्धी असो, विराट डिवचण्यासाठी सदैव उत्सुक असतो. २०१२च्या ऑस्ट्रेलिया दौर्यात त्याने आपल्याविरोधात घोषणा देणार्या सिडनीच्या चाहत्यांना रागाच्या भरात मधले बोट दाखवले होते. वय आणि अनुभवातून येणारी परिपक्वता विराटमध्ये कधीच दिसली नाही. बर्याच प्रसंगांमध्ये भान हरपलेला किंवा नियंत्रण गमावलेला विराट प्रत्ययास आला.
महेंद्रसिंह धोनीकडून कर्णधारपद विराटकडे आपसूकच चालून आले. या कालावधीत विराटचे आक्रमक नेतृत्व हे काही निर्णयांतून दिसून आले. त्याच्या या ‘विराटलीला’ कौतुकास्पद की घृणास्पद? योग्य की अयोग्य? यातही दोन गट पडतील. एक गट हा जशास तसे उत्तर दिले म्हणून कौतुक करणारा. सहनशीलतेचा गांधीमार्ग कशासाठी जपावा, हे मांडणारा. तर दुसरा त्यांच्यासारखेच तुम्हीही वागल्यास तुमच्यात आणि त्यांच्यात फरक तो काय उरणार, हे व्यक्त करणारा. यात आणखी तिसरा गटही आहे, तो म्हणजे जशास तसे उत्तर नक्की द्यावे; पण मैदानावर स्वत:हून गैरकृत्य का करावे, असं विचारणारा.
‘न्यूयॉर्क टाइम्स’चे प्रख्यात क्रिकेट लेखक ह्यू रिचर्ड्स यांनी लिहिलेले की, ‘‘विराटचा आत्मविश्वास आणि दृढता ही भारताच्या माजी क्रिकेटपटूंपेक्षा वेगळी आहे. भारताच्या माजी क्रिकेटपटूंची अतिविनयशीलता आणि मितभाषीपणा ही ओळख होती; पण विराटची प्रतिकारात्मक वृत्ती ही मैदानावर आणि मैदानाबाहेरही दिसून येते.’’
विराट आणि रोहित यांच्या कामगिरीची तुलना केल्यास रोहितचे भवितव्य या मालिकेअंती ठरण्याची दाट शक्यता आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना किंवा वैयक्तिक कामगिरी या दोनपैकी एक सकारात्मक कृतीच त्याला वाचवू शकेल. रोहितने मागील आठ कसोटी सामन्यांच्या १४ डावांत ११.६९च्या सरासरीने १५५ धावा केल्या आहेत. रोहित आता कसोटी क्रिकेटला साजेशी फलंदाजी करत नसल्याचे ही आकडेवारी सिद्ध करीत आहे. २०१९च्या मध्यावर रोहित कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला उतरू लागला. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ताज्या मालिकेत त्याचे हे स्थानही डळमळीत झाले आहे. गेल्या वर्षभरात रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान मार्याचा सामना करणेही जड जात असल्याचे आकडेवारी सांगते.
ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीतील ३९ डावांत त्याने वेगवान गोलंदाजांपुढे १२५३ काढताना ५६.९५ सरासरी राखली, तर २२ वेळा तो शिकार ठरला. पण ऑक्टोबर २०२३पासूनच्या २५ डावांत त्याने १८.५०च्या सरासरीने फक्त ४६७ धावा केल्या आणि तो १६ वेळा बाद झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत नेतृत्व आणि फलंदाजी हे दोन्ही वेशीवर टांगले गेले. आपण नेमके कुठे चुकतोय? याचे उत्तर रोहितला अद्याप सापडलेले नाही. गावस्कर यांनी रोहित सिडनी कसोटीत स्वत:ला वगळणार की मालिकेअखेरपर्यंत निवृत्तीचा निर्णय लांबवणार, असा थेट प्रश्नच उपस्थित केला आहे. दुसरीकडे, विराटची कामगिरीसुद्धा फारशी समाधानकारक नाही. न्यूझीलंडविरुद्ध सहा डावांत त्याने जेमतेम ९३ धावा केल्या होत्या. तर सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सहा डावांत त्याने १६२ धावा केल्या आहेत. पहिल्या कसोटीमधील शतक वगळता तोही छाप पाडू शकलेला नाही.
ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर विराटचे गैरवर्तन आणि रोहितच्या कामगिरीचे ढासळलेपण दिसून येत असताना तिथे माजी विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनवर जागतिक जलद (रॅपिड) आणि अतिजलद (ब्लिट्झ) बुद्धिबळ स्पर्धेत अपात्र ठरण्याची नामुष्की ओढवली. आंतरराष्ट्रीय स्तरावर इतके वर्ष खेळण्याचा अनुभव असलेला हा बुद्धिबळपटू नियम माहीत असतानाही जीन्स घालून कसा काय सामन्यांना जातो? रोहित-विराटचा हा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरू शकतो, हे जवळपास निश्चित झाले आहे. परंतु अस्ताला चाललेल्या कारकीर्दीत असभ्य वर्तन करून अनादरणीय क्रिकेटपटू म्हणूनच क्रिकेटजगताला निरोप द्यायचा की त्यात सुधारणा करून आदर्शवाद जपायचा, हे या द्वयीने ठरवायला हवे.