इंदिरा गांधी या काँग्रेसच्या नेत्या आणि देशाच्या पंतप्रधान. त्यांनी १९७५ साली देशावर लादलेल्या आणीबाणीला पाठिंबा देणार्या मोजक्या राजकीय नेत्यांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश होता. आणीबाणी आली नसती तर देशात अराजक माजलं असतं, या इंदिराजींच्या मताशी ते सहमत होते. आणीबाणीत व्यक्तिस्वातंत्र्याचा, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच झाला आणि अमर्याद अधिकार यंत्रणेला हुकुमशाही मग्रुरीकडे नेणारे ठरले, त्यात संजय गांधी यांच्या अति आक्रमक उपक्रमांची भर पडली. परंतु, आणीबाणीचे वेगळे मूल्यमापन केले पाहिजे, असे आता अनेक राजकीय अभ्यासक मानतात. आणीबाणीचा काळ वगळता एरवी बाळासाहेबांनी कायम इंदिरा गांधींना विरोधच केला, त्यांच्यावर प्रखर टीका केली, तशी व्यंगचित्रंही रेखाटली. इंदिरा गांधी यांचा काँग्रेस पक्ष देशात सत्तेवर होता, त्यामुळे अन्य सर्व पक्ष त्यांचे विरोधकच होते, वर्तमानपत्रांनीही विरोधी पक्षाची भूमिका बजावणंच अपेक्षित होतं. तशी ती बाळासाहेबांनी बजावली. पण, म्हणून इंदिरा गांधींच्या खुनानंतर त्यांना व्यंगचित्ररूप आदरांजली वाहताना बाळासाहेबांनी हात आखडता घेतला नाही. त्यांनी रेखाटलेलं हे मुखपृष्ठ एक क्लासिक व्यंगचित्र आहे… विझलेल्या पणतीच्या धुरातून साकारलेला इंदिराजींचा चेहरा… किती लाजवाब आणि हृद्य मांडणी आहे ही… हा उमदेपणा आज देशाच्या माजी पंतप्रधानावर अंत्यसंस्कार करण्यासाठी राजघाट उपलब्ध करून न देणार्या क्षुद्र, खुज्या मनोवृत्तीच्या नेत्यांच्या तुलनेत किती मोठा आहे.