दिल्लीत दहा वर्षांपूर्वी मी आणि माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या आताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या निवासस्थानी भेटलो होतो, ते खरं म्हणजे आम्हाला सुका मेवा खायची हुक्की आली होती म्हणून. तेव्हा केंद्रात भाजपची सत्ता नव्हती, पण, आम्ही पक्षाचे एकनिष्ठ सदस्य होतो. आम्हाला राजकारणात वगैरे रस नव्हता, पण पक्षातल्या कुणाला कोणी त्रास देत असेल किंवा धमक्या देत असेल तर त्याला तो बेसावध असताना चोपायचा किंवा त्याचा गेम करायची धमकी द्यायची, या कामासाठी आम्ही पक्षात फेमस होतो. नितीन गडकरींना हे माहीत होतं की नाही हे ठाऊक नाही, पण कधी बाहेर भेटले तरी नावानं हाक मारून पाठीवर थापही मारायचे, खुशाली विचारायचे. सिनेमापासून मुंबईतील राडेबाजीबद्दल कोणत्याही विषयावर बिनधास्त बोलायचे. त्यामुळे इतर नेत्यांची वाटते तशी त्यांची भीती कधीच वाटली नाही. त्यामुळे अगदी हक्काने आम्ही दोघे सकाळी त्यांच्या निवासस्थानी गेलो.
ते समोरच कोचावर बसले होते. समोरच्या मोठ्या टीपॉयवर बदाम, अक्रोड, अंजीर, काजू, मनुका आणि बर्याच प्रकारच्या सुक्या मेव्याच्या डिश होत्या. अगदी काठोकाठ भरलेल्या. गडकरींनी विचारलं, काही काम होतं की सहज आलात? आपल्याशी जवळीकीने वागणार्या या माणसाशी खोटं कशाला बोलायचं? म्हणून बिनधास्त बोललो, वाटलं, आज गडकरी साहेबांकडे सुका मेवा खायला जावं म्हणून आलो. यावर ते जोराजोरात हसले आणि म्हणाले, भरपूर खा. आतही चिक्कार स्टॉक आहे. वाटल्यास घरी न्यायलाही देतो. मलाही कंपनी मिळाली खायला. बुद्धी ताजीतवानी म्हणजे कायम अगदी प्रâेश राहायची असेल तर सुक्या मेव्याला पर्याय नाही. त्यातून तुम्ही मी विचारल्यावर खरं बोललात. अशी माणसं मला आवडतात. मनात असेल ते स्पष्ट बोलावं माणसानं. लाजू नये अगर कसलीही भीडभाड बाळगू नये. लपवाछपवी करणं, सडेतोड बोलायला घाबरणं अशा गोष्टी नाही आवडत मला. एखादी गोष्ट मला पटली नाही किंवा माझ्या मनाप्रमाणे झाली नाही तर मी पटकन रिअॅक्ट होतो. त्यामुळे काही आपलीच माणसं दुखावतात. पण मी ते कधी मनावर घेत नाही. झुरळ झटकल्यासारखं झटकून टाकतो. मी सत्य तेच सांगितलं, याचं मनाला मिळणारं समाधान आगळंच असतं.
– तुमची गोष्ट वेगळी आहे हो. आमच्यासारख्या भायगिरी करणार्या कार्यकर्त्यांना खोटं बोलल्याशिवाय पर्यायच नसतो. नाहीतर जगता येणार नाही आम्हाला.
– खोटं इतरांच्या भल्यासाठी असेल तर ठीक आहे. नेहमी दुसर्यांच्या भल्याचा विचार करा. ज्यामुळे सामान्य माणसाचं, गरीबांचं हित साधणार असेल, त्यात कोणी आडवे येत असेल तर गप्प राहू नका. त्याला सरळ करा. मग ते तुमचे नेते असतील तरी चालेल. फार तर काय होईल, तुम्हाला वाळीत टाकतील, साइडट्रॅक करतील, तुम्हाला वरच्या पदावर जाण्यापासून रोखतील. पण जनता तुमच्या मागे असेल. ती तुम्हाला कधीच एकटे पडू देणार नाही.
– गडकरी साहेब, नुकतेच आम्ही दोघे संपूर्ण देशाचा दौरा करून आलो. लोक सध्याच्या सरकारला कंटाळले आहेत. आपल्या पक्षाला सत्तेवर यायचा चान्स असल्याचा आमचा अंदाज आहे. आपल्या पक्षाने त्याचा फायदा उठवला पाहिजे. काँग्रेस सरकारविरुद्ध प्रचंड असंतोष जनतेच्या मनात आहे. महागाईला लोक कंटाळले आहेत. जनतेला गोरगरीबांचं भलं करणारं, त्यांची महागाईपासून सुटका करणारं, हक्काचं सरकार हवं आहे. २०१४ची निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने पक्षाचे सर्व नेते कामाला लागले आहेत. मोदींनी पक्षात जान आणली आहे. हा नेता जनतेला उज्वल भवितव्याची स्वप्नं दाखवत आहे. काँग्रेसने केलेल्या पापांचे वाभाडे काढत आहे. भाषणातून लोकांवर स्वत:ची आणि पक्षाच्या विचारांची मोहिनी टाकणारा दुसरा प्रभावी नेता पक्षाला वाजपेयी यांच्यानंतर मिळाला नव्हता. आपण नक्कीच या निवडणुका जिंकू. त्यांची भाषणातील आश्वासने पाहा. गरिबीचा संपूर्ण नायनाट करू, भाववाढ एकदम कमी करू, सगळीकडे स्वस्ताईच स्वस्ताई होईल, प्रत्येकाच्या खिशात पंधरा लाख रुपये पडतील. स्वत:लाच त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट केलं आहे. गडकरी साहेब, भाजप सत्तेवर आला तर ही स्वप्नं नक्की प्रत्यक्षात येतील ना?
– काय असतं, टोक्या आणि पोक्या, तुम्ही राजकारणात अजून कच्चे लिंबू आहात. काही आश्वासनं ही निवडणुकीचे जुमले असतात. मते मिळवण्यासाठी ती लोकांच्या तोंडावर फेकावी लागतात. भाषणबाजीने लोकांना संमोहित म्हणजे हिप्नोटाइज करावं लागतं. निवडणुका जिंकण्यासाठी खोटी आश्वासनं देऊ नयेत या मताचा मी आहे. पक्षातील कोणताही नेता पक्षापेक्षा मोठा नसतो, असं मला वाटतं. मोदींना पंतप्रधान व्हावंसं वाटत असेल तर त्यात चूक नाही. पण भाजप म्हणजे मोदी नव्हेत हे लक्षात घ्या. आमचे राजनाथ सिंह जेव्हा भाजपाचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी ‘अब की बार, भाजप सरकार’ अशी पोस्टर्स छापली होती. मात्र मोदींनी त्यात बदल करून ‘अब की बार, मोदी सरकार’ असं केलं होतं. यावरून काय ते समजा. मी त्याबद्दल पक्षाध्यक्षांकडे नाराजी व्यक्तही केली होती. तेव्हापासून मी नावडत्या गटात गेलो. पण तुम्हाला म्हणून सांगतो, हा माणूस जसा दिसतो तसा नाही. उद्या भाजप सरकार केंद्रात येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यात स्ांघाच्या रेट्यामुळे माझ्याकडे महत्त्वाचे कॅबिनेट खाते येणार हेही स्पष्ट आहे. त्यानंतर माझ्या मार्गात अडथळे निर्माण केले जाणार हे मी आताच सांगतो. तरीही मी या सार्यांना पुरून उरेन. शिवसेना-भाजप युतीच्या महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून माझ्या खात्याने जे महामार्ग, पूल, रस्ते बांधले, त्या कामाचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही कौतुक केले. ते मला गडकरी नव्हे, पूलकरी म्हणत. कामात एका पैशाचाही भ्रष्टाचार होणार नाही, याची मी डोळ्यांत तेल घालून काळजी घेतली. उद्या केंद्रात भाजपचं सरकार आल्यावर माझ्याकडे तेच बांधकाम, दळणवळण खातं सोपवलं जाईल आणि तिथेही मी माझ्या मनासारखी नेत्रदीपक कामगिरी करीन. तेच अनेकांच्या डोळ्यात खुपेल. नंतर पाच वर्षांनी वा त्यानंतरही येणार्या सरकारमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत माझं नाव नसावं म्हणून पद्धतशीरपणे माझे पंख छाटले जातील. पण मला त्याची पर्वा नाही. बघा, माझी भविष्यवाणी खरी होते की नाही! हा सुक्या मेव्याचा परिणाम!!