व्यासमुनींनी महाभारत लिहिण्यासाठी लेखनिक शोधला, तो होता श्री गणपती. गणरायांनी त्यांना अट घातली की मध्ये अजिबात विश्रांती न घेता ही कथा सांगणार असाल, तरच मी ही कामगिरी स्वीकारेन. हे आव्हान महर्षि व्यासांनीही स्वीकारलं आणि एकटाकी महाभारत उतरवून दिलं… तेही सलग तीन वर्षं… इथे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुखांच्या कुंचल्यातून उतरलेल्या मुखपृष्ठावरील चित्रात एक अस्वस्थ युवक गणरायांना सांगतो आहे की मी आंदोलन करीन… अन्याय सहन करणार नाही… त्याला श्री गजानन सांगतात की नुसतं व्यासपीठ गाजवू नकोस, व्यास बन, मी तुझ्यासाठी पुन्हा महाभारत लिहीन… आज या देशात, या राज्यात युवक अस्वस्थ आहेत… त्यांचं भवितव्य नेमकं काय आहे, याची दिशा कळत नाही… देशाची दिशा चुकली आहे, महाराष्ट्रात गद्दारी झाली आहे, हे त्यालाही दिसते आहे, पण तो संभ्रमित आहे… श्री गणरायांनी तेव्हाच्या तरुणांना दिलेला सल्लाच आजही लागू पडतो… ऊठ युवका, ऊठ, नुसतं सोशल मीडियाचं पोकळ व्यासपीठ गाजवत बसू नकोस… नव्या युगाचं नवं महाभारत स्वत:च्या कृतीतून घडवायला घे! आजही गणराय लेखनिक बनून त्यात तुला साथ देतील.