“चाकवलीच्या मंडळाचे कार्यकर्ते थोडे भडक माथ्याचेच आहेत, साहेब. या उत्सवाच्या काळात ते जरा जास्तच आक्रमक असतात. त्या परिसरात काही झालं, तर आपल्यालाच पुढे त्रास होऊ शकतो.“ तावडे अनुभवी असल्यामुळे पोलीस स्टेशनला नव्यानेच आलेल्या वर्मा साहेबांना त्यांनी सगळी सविस्तर माहिती दिली. इन्स्पेक्टर वर्मांनाही सणासुदीच्या काळात काही गैरप्रकार घडायला नको होते. दोन वर्षांनी होणार्या गणेशोत्सवात कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा असणार, याची कल्पना होतीच. मात्र गणेशोत्सव सुरळीत पार पडावा, त्यात कुठलीच अडचण येऊ नये, यासाठी वर्मा आग्रही होते.
– – –
“चाकवली नाका पोलीस स्टेशनमध्ये सकाळची गडबड सुरू होती. कंट्रोल रूममधून आलेले निरोप नोंदवून घेणं, गणपतीच्या सुट्यांच्या ड्युट्या लावून देणं, कुठे जास्त बंदोबस्त लागणार आहे, त्याची व्यवस्था करणं, पोलीस कस्टडी संपत असलेल्या आरोपींना कोर्टात हजर करण्यासाठी पाठवणं, अशा सगळ्या कामांचं नियोजन सुरू होतं. तेवढ्यात पोलिस स्टेशनचा फोन खणखणला.
“नमस्कार, चाकवली नाका पोलीस स्टेशन, मी हवालदार जगदीश तावडे बोलतोय. आपण कोण बोलताय?“ तावडेंनी नेहमीच्या पद्धतीने फोनवर प्रतिसाद दिला.
“साहेब, एक खबर आहे. `चाकवलीचा बाप्पा गणेशोत्सव मंडळा`वर नजर ठेवा. मंडळाचे कार्यकर्ते या वेळच्या उत्सवात राडा करणार आहेत. हत्यारं पण गोळा केली जातायंत. दोनचार दिवसांत काहीतरी मोठं कांड होणारेय,“ पलीकडच्या माणसानं खबर दिली, तसे तावडे अलर्ट झाले. आधी त्यांना वाटलं कुणीतरी चेष्टाच करत असेल. खोट्या धमक्या देणारे, चुकीची माहिती देणारे, अफवा पसरवणारे असे कितीतरी कॉल्स घेण्याचा त्यांना अनुभव होता. काहींना नुसतं मनोरंजन करायचं असतं, काही जणांची मानसिक विकृती असते, तर काहींना केवळ त्रास द्यायचा असतो, हे सगळं त्यांना माहीत होतं. अशा कॉल्सना किती गांभीर्याने घ्यायचं, याचीही कल्पना होती. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी उडवून लावायचा प्रयत्न केला, पण पलीकडून खबर देणारा माणूस वारंवार चाकवलीचा बाप्पा मंडळाचा उल्लेख करायला लागला, तेव्हा मात्र तावडे थोडे गंभीर झाला. या मंडळाचा लौकिक त्यांना माहीत होता. दोन वर्षांपूर्वीच मंडळाशी संबंधित असलेल्या काही कार्यकर्त्यांची दुसर्या मंडळाच्या कार्यकर्त्यांशी जोरदार धुमश्चक्री झाली होती. प्राणघातक हल्ले झाले होते. खटलेही भरले गेले होते, जखमींना महिनाभर हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं होतं. ज्या मंडळाशी या मंडळाची दुश्मनी होती, त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी हे कार्यकर्ते काहीही करू शकतात, याची पोलिसांना कल्पना होती.
तावडेंनी पलीकडच्या माणसाचं नाव विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यात काही तथ्य नाही, याची त्यांनाही कल्पना होती. पुन्हा गरज लागली तर आणखी काही खबर देईन, असं सांगून त्याने फोन ठेवून दिला. इन्स्पेक्टर वर्मांना याची तातडीने खबर द्यायला हवी होती.
“चाकवलीच्या मंडळाचे हे कार्यकर्ते थोडे भडक माथ्याचेच आहेत, साहेब. इतर वेळी त्यांचा काही त्रास नसतो, पण उत्सवाच्या काळात ते जरा जास्तच आक्रमक असतात. हा गणपतीही प्रसिद्ध आहे आणि तिथे गर्दीही मोठी असते. त्या परिसरात काही झालं, तर आपल्यालाच पुढे त्रास होऊ शकतो,“ तावडे अनुभवी असल्यामुळे पोलीस स्टेशनला नव्यानेच आलेल्या वर्मा साहेबांना त्यांनी सगळी सविस्तर माहिती दिली.
इन्स्पेक्टर वर्मांनाही सणासुदीच्या काळात काही गैरप्रकार घडायला नको होते. कोरोना संकटामुळे दोन वर्षांनी होणार्या गणेशोत्सवात कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा असणार, याची कल्पना होतीच. मात्र गणेशोत्सव सुरळीत पार पडावा, त्यात कुठलीच अडचण येऊ नये, यासाठी वर्मा आग्रही होते. त्यातून अचानक ही खबर मिळाल्यामुळे त्यांना जास्त काळजी घेण्याची गरज वाटू लागली. एकदा चाकवली मंडळाला भेट द्यावी, कार्यकर्त्यांचा अंदाज घ्यावा, असंही त्यांना वाटलं.
दुसर्याच दिवशी त्यांनी मंडळाला भेट दिली. गणपतीचा मांडव घालून झाला होता. देखाव्याची तयारीही जोरात होती. यंदा कुठला देखावा करणार, याचा अंदाज येत होता. अचानक पोलिस आलेले पाहून मंडळाचे कार्यकर्तेही घोळका करून गोळा झाले.
“साहेब, आज इकडे? कुणाची काही कंप्लेंट आलेय का?“ मंडळाच्या एका ज्येष्ठ पदाधिकार्यानं विचारलं.
“कंप्लेंट येऊ नये, म्हणून आम्हाला आधीपासूनच काळजी घ्यावी लागते, भाऊ!“ वर्मांनीही त्यांच्या स्टाईलमध्ये ऐकवलं. पदाधिकार्यांशी चर्चा केली, बर्याच गोष्टी विचारल्या. अर्थात, पोलिस असे अचानक येऊन चौकशी करताहेत, हे कार्यकर्त्यांना आवडलं नव्हतंच. पोलिसांचे प्रश्न वाढू लागले, त्यांचा तिथला मुक्कामही लांबला, तशी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरू लागली. तशी वेळ आलीच, तर पोलिसांशीही वाद घालायला मागेपुढे पाहायचं नाही, अशी तयारीच मंडळानं केलेली दिसत होती.
“ह्या कार्यकर्त्यांवर काय काय गुन्हे होते, तावडे?“ वर्मांनी तावडेंना बाजूला घेऊन विचारलं. “वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे होते, साहेब. अगदी डीजेचा आवाज जास्त ठेवल्यापासून मिरवणुकीत इतर मंडळांशी हुज्जत घातली, दमदाटी केली, वर्गणीसाठी काही लोकांवर जबरदस्ती केली वगैरे.“ तावडेंनी सगळा इतिहास सांगितला, तसा वर्मांचा चेहरा आणखी गंभीर झाला.
म्हणजे आज आलेला निनावी फोन हलक्यात घेऊन चालणार नाही. या कार्यकर्त्यांशी दुसर्या मंडळांशी झालेली झटापट, मारामारीपर्यंत गेलेलं प्रकरण आणि आयत्यावेळी कुणीतरी मध्यस्थी केल्यामुळे अनर्थ टळण्याच्या घटनाही वर्मांच्या कानावर आलेल्या होत्या. त्यामुळे कुठल्यातरी जुन्या भांडणाचा सूड घेण्यासाठी कार्यकर्ते काहीतरी वेडंवाकडं करतील, ही शक्यता नाकारता येत नव्हती. वर्मांनी सगळ्या टीमला अलर्ट केलं.
“हे बघा, आपल्याकडे आलेली खबर खरी की खोटी माहीत नाही, पण रिस्क घेऊन चालणार नाही. सणाच्या काळात कुठलाही वाईट प्रकार नको आहे. या मंडळावर, कार्यकर्त्यांच्या हालचालीवर जरा नजर ठेवा. सिव्हिल ड्रेसमध्ये अधूनमधून इकडे चक्कर मारा. कान आणि डोळे उघडे ठेवा, कसलाही संशय आला, तरी लगेच मला रिपोर्ट करा,“ वगैरे सूचना त्यांनी टीमला दिल्या आणि स्वतः इतर नियोजनाच्या कामाला लागले.
एकच दिवस मध्ये गेला असेल, पुन्हा पोलीस स्टेशनचा फोन खणखणला आणि याच मंडळाविषयी सावध राहण्याचा इशारा त्या माणसाने दिला. या कार्यकर्त्यांविषयी जो इशारा दिला जात होता, त्यात तथ्य नक्कीच होतं. कारण या कार्यकर्त्यांनी आधीही तशा प्रकारचे संशयास्पद व्यवहार केले होते. फोन करणारा माणूस कार्यकर्ते आणि मंडळाविषयीचे तपशील अगदी योग्य देत होता. पोलिसांनी मंडळात जाऊन जी माहिती घेतली, जे चेहरे जोखले, त्यांच्याशी मिळतंजुळतं असंच हे वर्णन होतं.
“एक झिपर्या, घार्या डोळ्यांचा कार्यकर्ता आहे. तो लई डेंजर आहे. गेल्या वेळी एकाचा कोथळाच बाहेर काढला असता. बाकीचे मध्ये पडले, म्हणून वाचला,“ अशा प्रकारच्या वर्णनाने तर वर्माही थक्क झाले होते. कारण त्या विशिष्ट माणसाला भेटल्यानंतर वर्मांनाही त्याच्या डोळ्यात निराळीच झाक दिसली होती. त्याच्यावर जास्त लक्ष ठेवायला त्यांनी सांगितलं होतं. एक गोष्ट नक्की होती, की जो माणूस खबर देत होता, त्याला या मंडळाबद्दल सगळी माहिती होती. पोलिसांच्या हालचालींचीही कल्पना होती. पोलिसांना मदत करण्याचा त्याचा उद्देश होता. वर्मांनी त्याबद्दल पुढे ठोस असं काहीच ठरवलं नव्हतं. आणखी एकच दिवस मध्ये गेला आणि एका सामाजिक संस्थेचं शिष्टमंडळ पोलीस स्टेशनला आलं. शिष्टमंडळातले तिघेही पदाधिकारी सुशिक्षित, सुसंस्कृत दिसत होते. चाकवलीचा बाप्पा गणेशोत्सव मंडळाबद्दलच त्यांची तक्रार होती. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी किरकोळ कारणावरून बाचाबाची केली, चाकू दाखवला, अशी त्यांची तक्रार होती. घटना दोन वर्षांपूर्वीची असली, तरी यावेळी तसं काही घडू नये, असं त्यांना मनापासून वाटत होतं. या मंडळामध्ये यंदा काहीतरी राडा होईल, अशी भीती या शिष्टमंडळानेही व्यक्त केली, तेव्हा वर्मांना जरा काळजीच वाटली.
“तुमच्यापर्यंत जी खबर आलेय, तिच्याकडे दुर्लक्ष करू नका, साहेब. हे कार्यकर्ते दिसतात त्याच्यापेक्षाही जास्त धोकादायक आहेत. मुख्य म्हणजे त्या भागात राहणार्या लोकांचीही त्यांना साथ आहे. घराघरातून पाठिंबा आहे. त्यामुळे यावेळी काहीतरी खरंच राडा होणारेय. सगळं वातावरण बिघडू शकतं, साहेब. कायदा आणि सुव्यवस्था राखायची जबाबदारी आता तुमची आहे,“ असं या पदाधिकार्यांनी वर्मांना सांगितलं. त्या भागातला बंदोबस्त वाढवण्याची विनंतीही केली. वर्मांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतील, पोलीस जबाबदारी पार पाडतील, काळजी करू नका, असं आश्वासन दिलं आणि त्यांना पाठवून दिलं. मात्र ते गेल्यावर वर्मा एकटेच बराच वेळ विचार करत राहिले. बहुतेक त्यांच्या बोलण्याचा साहेबांवर परिणाम झाला असावा, आता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काही कांड करायचा प्रयत्न केला, तर त्यांचं काही खरं नाही, असंच सहकारी पोलिसांना वाटलं. गणपतीच्या काळात आपण घरी कधी येऊ, किती दिवस ड्यूटीवरच राहावं लागेल याची काही गॅरेंटी नाही, असं पोलिस कर्मचार्यांनी घरी कळवून टाकलं.
दुसर्या दिवशी मंडळाच्या परिसरात नजर ठेवण्यासाठी कुणाला पाठवायचं म्हणून विचारायला तावडे वर्मांकडे गेले, तेव्हा वर्मा थोडे गडबडीत होते. त्यांना काही मेडिकल टेस्ट्स करायच्या होत्या. त्यासाठी ते त्यांच्याच कार्यक्षेत्रात असलेल्या आरोग्यसेतू हॉस्पिटलमध्ये जाणार होते. तावडेंनी सगळी माहिती दिली आणि वर्मांनी पटकन होकार दिला. फोन करतो, कधीही निघावं लागेल, त्यासाठी तयार राहा, असं सांगून वर्मा निघून गेले. त्यांनी असं का सांगितलं, हे मात्र तावडेंना कळलं नाही.
चाकवलीचा बाप्पा मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी नजर ठेवली होती खरी, पण त्यातून अजूनतरी फारसं काही हाती लागलं नव्हतं. पोलिसांची ड्यूटी मात्र निष्कारण वाढली होती. काहीजण अधूनमधून सिव्हिल ड्रेसमध्ये मंडळाच्या परिसरात चक्कर मारत होते, लोकांना हटकत होते. हवी ती माहिती काही मिळत नव्हती, म्हणून निराश होत होते. अशात एक दिवशी अचानक वर्मांनी सकाळी मीटिंग बोलावली.
“आज रात्रीच आपल्याला रेड करायची आहे. सगळ्यांनी अलर्ट राहायचं. रात्रभर जागावं लागेल. काय झोपायचं ते आत्ताच झोपून घ्या. नंतर संधी नाही. एक चूकसुद्धा आपल्याला महागात पडू शकते,“ त्यांनी सांगितलं आणि सगळे सज्ज झाले.
रात्री अकरा वाजता पोलिसांची टीम रेडसाठी सज्ज झाली. वर्मांनी इशारा केला आणि दोन गाड्यांमधून टीम सुसाट निघाली. मागे एक मोठी तुकडी काही अंतर ठेवून येत होती, फक्त त्यांना प्रत्यक्ष कारवाईत सहभागी न होता बॅक अप द्यायचा होता, हालचालींवर बारीक नजर ठेवायची होती. आज रात्रीच काहीतरी अघटित घडणार होतं, तेच वर्मांना अडवायचं होतं. निघतानाच त्यांनी गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि पुढच्या मोहिमेला सुरुवात केली.
दोन्ही गाड्या थांबल्या आणि आडबाजूला उभ्या करण्यात आल्या. वर्मांनी टीमला सूचना केल्या आणि टीम तडक
हॉस्पिटलमध्ये घुसली. कुठे कुठे जायचं, कुणाला ताब्यात घ्यायचं, याच्या सूचनाही स्पष्ट होत्या. काही क्षणांत टीमने ऑपरेशन थिएटरच्या बाजूचा एक स्पेशल वॉर्ड काढला. तिथे पाच-सहा वर्षांच्या पाच मुलांना बांधून ठेवलेलं होतं. तिथून हलवण्यासाठी दोन गुंड तयार होते. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. जवळपास आठ ते दहा नवजात अर्भकंही एका खोलीत ठेवण्यात आली होती आणि त्यांनाही तिथून दुसरीकडे हलवण्याची जय्यत तयारी झाली होती.
हॉस्पिटलचे इनचार्ज डॉक्टर देशपांडे, त्यांचे सहकारी डॉक्टर भिंगारदिवे, एक वॉर्डबॉय, दोन नर्स, अशा सगळ्यांना समोर बघून वर्मा नाही म्हटलं तरी हलले होते.
`या हॉस्पिटलमधून छोट्या बाळांना गायब केलं जातं, नंतर विकलं जातं किंवा वाईट धंद्याला लावलं जातं, थोड्या मोठ्या मुलांच्या बाबतीतही हेच प्रकार चालतात,` ही खबर कानावर आली होती. यावेळी गुन्हेगारांना धडा शिकवायचा होता. मात्र अचानक दुसर्याच ठिकाणी बंदोबस्त वाढवावा लागला आणि ही मोहीम लांबणीवर पडली. त्यावेळी मला सुचलं, की ज्या ठिकाणी धोका आहे, हे सांगितलं जातंय, तीच फसवणूक तर नसेल? मग त्या दृष्टीनं शोधत गेलो आणि अनेक लिंक्स जुळत गेल्या.
“पण मग त्या गणेश मंडळातल्या राड्याचं काय?“ तावडेनं विचारलं.
“तावडे, ही माणसं गणरायाची पूजा, आराधना करतात. ती फारतर कुरघोड्या करायला बघतील, मारामार्या करतील, एकमेकांवर गुरगुरतील. पण असं विघातक कार्य करणार नाहीत, याबद्दल खात्री होती. म्हणूनच त्यांच्याविरुद्ध सारखं कोण तक्रारी करतंय याचा शोध घेतला आणि ह्यांचं नाव सापडलं. मेडिकल टेस्टच्या बहाण्याने मी हॉस्पिटलमध्ये आलो, माणसांना खोदून काढलं, तेव्हा इथले गैरप्रकार समजले. तसंही सातत्याने एकाच मंडळाविरुद्ध येणारी तक्रार, शिष्टमंडळानं येऊन त्याच एका मंडळाचं नाव घेणं, हे सगळं विचित्र होतंच. शेवटी त्यांची वेळ आज भरली. त्यांनाही कुणकुण लागली होतीच, म्हणूनच आज सगळी आवराआवरी चालली होती. पण देवानं बुद्धी दिली आणि सगळा खेळ बदलून गेला,“ वर्मांनी सांगितलं आणि त्यांच्या सिक्रेट मिशनची कहाणीही उलगडली. विघ्नहर्त्याचा प्रसादही आज सगळ्यांना जास्त गोड लागत होता.