□ लोकशाही वाचवण्यासाठी भाजपविरुद्ध एकत्र येणे ही काळाची गरज – शरद पवार.
■ नुसतं एकत्र येऊन चालणार नाही, किमान १० वर्षे एकत्र राहणंही गरजेचं आहे…
□ बारसू ग्रामस्थांवर अत्याचार करणार्याच पोलिसांवर कारवाई करा- शिवसेनेची पोलीस महासंचालकांकडे मागणी.
■ प्रकल्प रेटणार्या राज्याच्या गृहमंत्र्यांचे खाते असे काही करील?
□ मुंबईत नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा.
■ म्हणजे नाले या वर्षीही पहिल्याच पावसात तुंबणारच… परंपराच आहे तशी!
□ मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच लोक निघाले घरी; रत्नागिरीत ‘शासन आपल्या दारी’चा फज्जा.
■ लोकांना टीव्हीवरून आधीच्या भाषणांचा पूर्वानुभव आहेच की! सरकार दारी आले म्हणून ते स्वत:च्या कानांना ‘शासन’ कशाला देतील?
□ नोट नव्हे, जनता आता पंतप्रधानच बदलणार- नाना पटोले.
■ एवढेच म्हणू नका नाना, सरकार बदलणार, असे म्हणा! भाजपाला आता वेगळ्या पंतप्रधानाच्या नेतृत्त्वाखाली तिसरी संधी द्यायची कशाला?
□ बारावीच्या परीक्षेत सलग दुसर्याच वर्षी मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल.
■ सगळ्यात महागडी कॉलेजेस आणि क्लासेस पण याच विभागात असतील ना?
□ डिजिटल युगातही रोख व्यवहाराला पसंती; एटीएममधून पैसे काढण्याचे प्रमाण २३५ टक्क्यांनी वाढले.
■ सायबर गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण आणि हजार-दोन हजारांच्या फसवणुकींच्या तक्रारीही नोंदवून घेण्यात पोलीस करत असलेली चालढकल, बँकांची असहकाराची भूमिका यामुळे डिजिटल पेमेंटवर सामान्यजनांचा विश्वास राहील तरी कसा?
□ भाजप आमदारांनी केला ठाण्यातील नालेसफाईचा पर्दाफाश; मिंध्यांचा पाहणी दौरा ठरला फार्स.
■ अरे, राज्य लांब राहिलं, एकमेकांना तरी सांभाळून घ्या… जनता नंतर खाट टाकणारच आहे तुम्हा सर्वांची, आत्ताच का टाकताय एकमेकांच्या खाटा?
□ भाजप नगरसेवकाच्या भावाचा कल्याणमध्ये स्टॅम्पपेपर घोटाळा.
■ म्हणजे काय? आपल्या भावाची एवढी वट आहे तर फायदा घ्यायला नको का काही?
□ कमळाबाईशी धुसफूस; मिंधे गटाची घुसमट.
■ असंगाशी संग आणि प्राणांशी गाठ.
□ शिंदे गट म्हणजे पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा- संजय राऊत.
■ कोंबड्या अंडी तरी देतात राऊत साहेब! या सगळ्या खुडुक कोंबड्या.
□ मुंबईत महिला असुरक्षित; चार महिन्यांत अत्याचाराच्या १९७७ घटना.
■ देशाच्या राजधानीत ऑलिंपिक पदके जिंकून आणणार्या महिला कुस्तीपटूंवर आंदोलनाची वेळ येते, तरी अत्याचारकर्त्यावर काही कारवाई होत नाही, चौकशी होत नाही; त्यामुळे देशभरात काय संदेश जात असेल?
□ जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार; हवामान विभागाचा अंदाज.
■ या खात्याचा अंदाज म्हणजे छत्र्या घेऊनच बाहेर पडलं पाहिजे…
□ काँग्रेसने नरेंद्र मोदींना घेरले; नऊ वर्षे, नऊ प्रश्न.
■ फक्त नऊ प्रश्न? शोधायला जाल तर नऊ हजार प्रश्न सापडतील… उत्तर एकाचंही मिळणार नाही.
□ माथेरानमधील ई-रिक्षांवर लालफितीची ‘धूळ’.
■ म्हणजे प्रदूषणच की!
□ ३४ वर्षांत जेएनपीए तुपाशी, तर उरणचे प्रकल्पग्रस्त उपाशी.
■ हीच भीती असते, म्हणून सगळ्या प्रकल्पांना विरोध करतात लोक सरसकट!
□ घोषणा काँक्रीट रस्त्याची; बनवले निकृष्ट डांबरी रस्ते- मिधेंच्या खासदाराचे डोंबिवलीकरांना झूठे वादे.
■ नागरी सुविधांपेक्षा काल्पनिक धर्मसंकटं आणि धर्मकार्यं महत्त्वाची मानणार्या नागरिकांना वेगळं काय मिळणार?
□ मानवी मेंदूत बसवणार चिप; मस्कच्या कंपनीला अमेरिकेची मान्यता.
■ आता ती बसवण्यासाठी भक्तांना आधी मेंदू मिळवावा लागणार कुठून तरी!