□ जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना आम्ही विमानात बसवून आणलं – मिंधे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांचे बेताल वक्तव्य.
■ म्हस्के यांचे बेताल वक्तव्य ही द्विरुक्ती झाली. म्हस्के यांचे वक्तव्य असं म्हटलं असतं तरी ते बेताल असणार, हे कोणीही सांगेल. प्रसंग काय, आपण करतो काय, बोलतो काय, त्यातून साधतो काय, याचा पाचपोच असता, तर ते खोके गँगमध्ये गेले असते का?
□ आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय, उर्दूसुद्धा शिकवली पाहिजे -मिंधे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मांडले अजब तर्कट.
■ काहीही करून चर्चेत राहायचे, हाच एक उद्योग असल्यावर असल्या पाचकळ कल्पना सुचल्या नाहीत तरच नवल! कधीतरी कोणते तरी अतिरेकी स्वाहिली भाषेत संदेश पाठवू शकतात, असं यांना सांगितलं तर ते ती भाषाही पहिलीपासून शिकवा म्हणून आग्रह धरायला कमी करायचे नाहीत.
□ इथे एकही सुरक्षा रक्षक नव्हता, हे कसले सरकार? – पर्यटकांनी केंद्रीय मंत्र्यांना सुनावले.
■ स्वतंत्र भारताच्या इतिहासातला हा पहिला असा हल्ला असेल जिथे लोक केंद्र सरकारला, गृहमंत्र्यांना, पंतप्रधानांना जबाबदार धरण्याऐवजी दहशतवाद्यांशी कसलाच संबंध नसलेल्यांना दोषी धरून ‘न्याय’ सुनावत सुटले आहेत. संपूर्ण समाजाचं झाँबीमध्ये रूपांतर करणं हेच देशद्रोह्यांचं उद्दिष्ट असेल तर ते सुफळ संपूर्ण झालेलं आहे.
□ मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकर्यांची कोट्यवधींची जमीन हडपली – शेतकर्यांच्या वकिलाचा पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप.
■ मंत्री आहेत ते. जपून बोला. सत्तेत आहोत म्हणजे देशाचे मालक, राजे वगैरे आहोत, अशी यांची समजूत अलीकडे भक्तगणांत रूपांतरित झालेलया जनतेनेच स्वेच्छेने करून दिली. राजा कायद्याच्या पलीकडे असतो नेहमी, हे आता लक्षात ठेवा.
□ मुंबईतील हजारो रिक्षा-टॅक्सींची मीटर रिकॅलिब्रेशनकडे पाठ.
■ रोजचा धंदा बुडवून रांगा लावण्यापेक्षा आहे त्या मीटरमध्ये नेऊन, दरपत्रक दाखवून पैसे घेणं सोयीचं पडत असेल. हातावरचं पोट असलेल्यांच्या बाबतीत यंत्रणा राबवताना काही कल्पकता दाखवावी, असं सरकारी यंत्रणेला कधी वाटेल? गोरगरीबांबद्दल सहानुभाव असेल तेव्हा.
□ परवानगीशिवाय ऑफिस सोडले तर निलंबित करणार – मंत्री बावनकुळे यांच्या आदेशाने खळबळ.
■ सगळे गाद्यागिरद्या आणि कुटुंबियांना घेऊनच ऑफिसला येत चला, परवानगी नाहीच मिळाली तर काय करणार?
□ लष्कराच्या जमिनीवर बेकायदा बांधकामे कशी? – हायकोर्टाचा कल्याण-डोंबिवली महापालिकेला सवाल.
■ लष्कराच्या जमिनीचा अपवाद कशाला? आपलं यान चंद्रावर पोहोचू द्या. तिथेही काही बेकायदा बांधकामं दिसतील. त्यात तज्ज्ञता आहे आपली. दिसली जमीन की घे कब्जात आणि कर बांधकाम.
□ बिहारच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बिहारसाठी १३,५०० कोटींच्या योजनांची पंतप्रधानांकडून घोषणा.
■ गेल्या वेळच्या अशाच मोठमोठ्या घोषणांचं काय झालं हा प्रश्न बिहारच्या जनतेला पडूच नये, इतका मोठा मुद्दा आता पहलगाम हल्ल्यामुळे मिळाला आहे. तिकडे हल्ल्यात बळी पडलेल्यांना आदरांजली वाहण्याऐवजी, संतप्त नातेवाईकांना भेटण्याच्या ऐवजी पंतप्रधान बिहारमधून इंग्लिश भाषेत पाकिस्तानला दरडावतात, मग नितीश कुमारांबरोबर हास्यविनोद करतात, त्यातून त्यांचा प्राधान्यक्रम काय आहे, हे कळून जातं.
□ पाच महिने उलटूनही विलेपार्ल्यातील स्वच्छतागृहाचे काम अर्धवट; पालिकेच्या संथ कारभारावर पार्लेकर नाराज.
■ पार्ल्यात किंवा राज्यात किंवा देशात कुठे आणि कोणतं सरकारी काम वेगवान गतीने होतंय? स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरसेवकांच्या माध्यमातून सरकारवर, प्रशासनावर अंकुश राहायचा. तो कधीच आपण स्वहस्ते, स्वेच्छेने एका लुटारू टोळीच्या हातात दिला आहे. आता ओरडून काय फायदा?
□ धक्कादायक… ठाणे पालिकेचे गावदेवी मार्वेâटच बेकायदा; दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
■ बेकायदा असेल आणि गरजेचे असेल तर ते कायदेशीरही करता येईल आणि सुरक्षितही बनवता येईल. इच्छाशक्ती हवी.
□ मुंबई विमानतळावरील शिवाजी महाराजांचा पुतळा केंद्र सरकारने ठरवला ‘अडथळा’!
■ त्यांच्या ज्या पाताळयंत्री योजना आहेत त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आदर्श राजवट हा ‘अडथळा’च आहे. ज्यांची संस्कृती आत्मसात करण्यासाठी आपल्याकडचे भक्तगण जीव पाखडत असतात, त्यांची महाराजांविषयीची दुर्भावना एकदा जाणून घेतली तर खरा कावा लक्षात येईल.
□ आधी पुनर्वसनाची हमी द्या, नंतरच एलफिन्स्टन ब्रिज तोडा – प्रभादेवीचे शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरले.
■ बेजबाबदार, मनमानी कारभाराला कधीतरी जनता वैतागणारच ना!
□ देशात दुखवटा असताना सत्ताधारी नेते सोहळ्यांमध्ये रमले; अजितदादा गटाकडून रथयात्रेचा शुभारंभ, तर भाजपवाल्यांचा सत्कार समारंभ.
■ काहीही झालं तरी त्यातून एका समुदायाबद्दल द्वेष पसरवायचा, हे त्यांचं काम रस्त्यावरचे त्यांचे मठ्ठ भक्त करतायत, त्यांना काय गरज आहे हे करण्याची? त्यांना काही गांभीर्य आहे का, असा प्रश्न जनतेने विचारायला ते काँग्रेसवाले थोडेच आहेत?
□ मिंध्यांनी लाटले सरकारचे श्रेय; कश्मीरमधील पर्यटकांना सरकारी खर्चाने परत आणले.
■ आयत्या पिठावर रेघोट्या ओढून पिठाचा डबा माझाच, असं सांगण्याची त्यांची जुनीच परंपरा आहे की!