– ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर
खेळ मांडियेला वाळवंटी घाई।
नाचती वैष्णव भाई रे।
क्रोध अभिमान केला पावटणी ।
एकएका लागतील पायी रे ।।१।।
नाचती आनंदकल्लोळी।
पवित्र गाणे नामावळी।
कळिकाळावरी घातलीसे कास।
एक एकाहूनी बळी रे ।।२।।
गोपीचंदनउटी तुळशीच्या माळा।
हार मिरवती गळा।
टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव।
अनुपम्य सुखसोहळा रे ।।३।।
लुब्धली नादी लागली समाधी।
मूढ जन नर नारी लोका।
पंडित ज्ञानी योगी महानुभाव।
एकचि सिद्धसाधका रे ।।४।।
वर्णाभिमान विसरली याति।
एकएका लोटांगण जाती।
निर्मळ चित्ते। जाली नवनीते।
पाषाणा पाझर फुटती रे ।।५।।
होतो जयजयकार गर्जत अंबर।
मातले हे वैष्णववीर रे।
तुका म्हणे सोपी केली पायवाट।
उतरावया भवसागर रे ।।६।।
प्रत्येक भक्ताला त्याचा देव श्रेष्ठच वाटतो. त्या देवाचं तीर्थक्षेत्रही श्रेष्ठच वाटतं. त्यातून तीर्थमाहात्म्य सांगण्याची चढाओढच लागते. तीर्थमाहात्म्यांच्या पोथ्या लिहिल्या जातात. त्या पोथ्यांमधून सामान्य भाविकांना भुरळ पाडणारी आमिषे दाखवली जातात. ती पापनाशापासून पुण्यप्राप्तीपर्यंत अनेक प्रकारची असतात. आपल्या तीर्थाच्या श्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवण्यासाठी ‘प्रचितीच्या कहाण्या’ दूरदूरवर पोचवल्या जातात. त्या सांगून तीर्थाचा महिमा वाढवण्यात अनेकजण तरबेज असतात. वारकरी संतांनी गायलेला पंढरपूरचा महिमा मात्र या जातकुळीतला नाही. संतांनी विशिष्ट तात्विक भूमिकेतून पंढरपूरचा महिमा सांगितला आहे. ती समजून घेतली असता संतांच्या तत्वबोधाचं उज्ज्वल स्वरूपही दिसतं.
पंढरपूरला संतांचा वारसा आहे. त्यामुळे पंढरपुरात प्रेम आहे. समता आहे. खळालाही रोकडे पाझर इथेच फुटतात.
‘उठाउठी जाय अभिमान।
सांगा ऐसे स्थळ कोण।।’
असा प्रश्न तुकोबाराय विचारतात. त्याचं उत्तरही लगेच तुकोबाराय देतात. ‘ते या पंढरीस घडे। खळा पाझर रोकडे।।’ असं म्हणत अभिमान घालवण्यासाठीच तुकोबाराय पंढरपुरात जायला सांगतात. इतर तीर्थांच्या ठिकाणी विद्येचा अभिमान चढतो. त्याचबरोबर तीर्थयात्रा केल्याचाही अभिमान चढतो. ‘करिता तीर्थाटन अहंकाराची प्राप्ती वो’ असं निळोबाराय याच भूमिकेतून म्हणतात. पंढरपुरात मात्र अहंकार संपून जातो असं तुकोबाराय सांगतात. भारतात सर्वाधिक घातक अभिमान हा जातवर्णाचा अभिमान असतो. आपली सामाजिक रचना जात आणि वर्णाधिष्ठित आहे. त्यात विषमता आहे. त्यामुळेच आपल्या सामाजिक रचनेत जातीचा अभिमान हाच मोठा अडसर आहे. तो अडसर पंढरपुरात नाही.
‘अठरापगड याती सकळही वैष्णव।
नाही दुजाभाव पंढरीसी।।’
असा पंढरपुरात समतेचा भक्तीव्यवहार आहे. इथे जातीच्या आधारावर कोणताही दुजाभाव केला जात नाही. जातभावनेवर मात करण्याचे काही प्रयोग पंढरपुरात होतात. त्यातला पहिला प्रयोग म्हणजे एकमेकांच्या पाया पडणं. पाया पडताना जातीचा विचार करायचा नाही. मानवी उच्चनीच भेदभाव न करता नमस्कार करण्याचा हा प्रयोग संतांनी केलेला आहे. या जातमुक्तीच्या प्रयोगांची प्रयोगशाळा म्हणजे पंढरपूरचं वाळवंट. वाळवंटातल्या या प्रयोगाचं शब्दचित्र तुकोबारायांनी वरच्या अभंगात उभं केलेलं आहे. या प्रयोगाला तुकोबारायांनी खेळाची उपमा दिली आहे.
ध्येय, साधने, प्रक्रिया आणि निष्कर्ष अशा प्रयोग लिहिण्याच्या पायर्या आहेत. या प्रकारे शाळा कॉलेजातली मुलं प्रयोग लिहितात. तुकोबारायांनी अगदी त्याच प्रकारे जातमुक्तीच्या प्रयोगाचं वर्णन केलेलं आहे. ‘अनुपम्य सुखसोहळा’ हे या प्रयोगाचं ध्येय असल्याचं तुकोबाराय सांगतात. या प्रयोगाची साधने म्हणजे गोपीचंदनाची उटी, तुळशीमाळ, टाळ आणि मृदुंग. ती घेऊन वाळवंटाच्या प्रयोगशाळेत या प्रयोगाला सुरुवात करायची आहे. त्यातली पहिली पायरी म्हणजे वारकरी होणं. वारकरी झाला की गळ्यात तुळशीची माळ आलीच. कपाळावर गोपीचंदनाचा टिळाही आलाच. या वारकर्यांच्या बाह्य खुणा जितक्या महत्त्वाच्या तितक्यातच अंतरंगाच्या खुणाही महत्त्वाच्या आहेत. अंतरंग आनंदाने भारावून जायला हवं. आनंदाने बेहोश होऊन नाचायला हवं. नाचताना देवाच्या पवित्र नामोच्चाराची गाणी म्हणजे संतांचे अभंग गायला हवेत. शेवटी प्रयोगातली निष्कर्ष काढण्याची अखेरची पायरी येते. ही पायरी म्हणजे एकमेकांच्या पाया पडणं. त्यापुढे जाऊन एकमेकांना लोटांगण घालणं. यावेळी वारकरी होण्याची खरी कसोटी लागते. प्रयोगाच्या यशापयशाचं मोजमाप करण्याची ही पायरी असते. वर्णाभिमान विसरुन जातीचं भान न ठेवता एकमेकांच्या पाया पडणं. या अखेरच्या पायरीत ज्याला यश आलं त्यानं हा खेळ जिंकलाच असं समजा.
तुकोबाराय हळुवारपणे उलगडा करत जातात. वर्णाभिमान विसरुन एकमेकांच्या पाया पडणं ही तशी छोटी कृती आहे. पण त्या कृतीतच फार मोठं सामर्थ्य आहे, बंडखोरी आहे. भारतीय सामाजिक रचनेत पाया पडण्याचे काही नियम आहेत. ते जातीवर आधारलेले आहेत. वरच्या जातीतल्या लोकांनी खालच्या जातीतल्या लोकांच्या पाया पडायचं नाही असा नियम आहे. वरच्या जातीतला माणूस कितीही कर्तृत्वहीन, आचरणभ्रष्ट, अनीतीमान आणि वयानेही लहान असला तरी पूज्य मानून त्याच्या पाया पडण्याचा कठोर दंडक खालच्या जातीतल्या लोकांवर होता. याउलट खालच्या जातीतला माणूस वयाने, ज्ञानाने आणि कर्तृत्वाने कितीही थोर असला तरी त्याला वरच्या जातीतल्या माणसाने नमस्कार करु नये असा नियम होता. या नियमांचे दाखले धर्मशास्त्राच्या पानापानावर नोंदवले गेले आहेत.
एखादा अंत्यज (आजच्या भाषेत दलित) कितीही ज्ञानी असला तरी त्याची ब्राह्मणाबरोबर पूजा केली जाऊ शकत नव्हती. ‘अंत्यज ज्ञाता बरवा। परि नेऊन काय करावा। ब्राह्मणसन्निध पूजावा। हे तो न घडे की।।’ असं रामदास स्वामी दासबोधात म्हणतात. तसा एक प्रसंग लीळाचरित्रात आहे. एक चर्मकार जातीतला माणूस चक्रधर स्वामींच्या प्रभावात येतो. त्यांची सर्वत्र पूजा होऊ लागते. एकदा अंबाजोगाईत अशीच त्यांची पूजा होत होती. त्यावेळी त्यांच्या जातीतले लोक तिथे आले होते. त्यांनी त्या माणसाची जात चर्मकार असल्याचं सांगितलं. पूजा करणारे लोक चिडले. एका दलिताची पूजा घडली म्हणून ते संतापले. जगदेव आणि विझळदेव नावाच्या अधिकार्यांकडे तक्रार झाली. धर्मशास्त्राच्या पोथ्या पाहून निकाल दिला गेला. निकालात चुन्याच्या कळीत बसवून पखालीने पाणी ओतून भाजून मारण्याचा आदेश दिला गेला. त्या आदेशाची अंमलबजावणीही झाली. धर्मशास्त्राच्या पोथ्यांतले जातीय विषमतेवर आधारलेले हे नियम असे काटेकोरपणे पाळले जात होते. त्या काळात पाया पडण्याचे जातमुक्तीचे प्रयोग संतांनी घडवून आणले. ते निश्चितच क्रांतिकारक पाऊल होतं.
तेराव्या शतकापासून अगदी एकोणीसाव्या शतकापर्यंत सामाजिक समतेचे प्रयोग पंढरपूरच्या वाळवंटात होत होते. परिसा भागवत सुरुवातीला वर्णाभिमानी होते. त्यावेळी ते नामदेवरायांना म्हणाले होते, ‘परसा वदे नामयासी। तुझे पूर्वज माझे चरणापाशी। जरी तू हरिदास जालासी। तरी याती हीनची।।’ अर्थात पुढे ते स्वत:च नामदेवरायांच्या पायी लागले. त्यांना गुरू मानलं. नामदेवरायांची आरती लिहिली. त्या काळात परिसा भागवत आणि अनंतभट अभ्यंग असे काही समतावादी ब्राह्मण संत बहुजन संतांना नमस्कार करत असणारच. सवर्ण बहुजन संत दलित संतांनाही नमस्कार करत होतेच. तुकाराम महाराजांच्या चरित्रात तर हा मुद्दा फारच गाजला. तुकोबारायांच्या विरोधात जवळपास तीनवेळा तक्रारी झालेल्या दिसतात. या तिन्ही वेळा पाया पडण्याचा मुद्दाही होताच. तुकोबारायांच्या कीर्तनात वर्णाभिमान विसरुन लोक एकमेकांच्या पाया पडतात अशी तक्रार दोन संन्याशांनी केलेली होती. त्याचबरोबर रामेश्वर भटांनीही तुकोबाराय ब्राह्मणांकडून पाया पडून घेतात हा मुद्दा त्यांच्या तक्रारीत नमूद केला होता. मंबाजीनेही हीच गोष्ट आप्पाजी गोसावी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत सांगितली होती. ती तक्रार बहिणाबाईंच्या शब्दात वाचली तर हे प्रकरण नीटपणे कळेल. बहिणाबाई म्हणतात,
आपाजी गोसावी पुण्यात रहात।
जो अति विख्यात राजयोगी ।।१।।
तयाप्रती पत्र मंबाजी पाठवी।
तुकोबा गोसावी शूद्र वाणी ।।२।।
कथा करीतसे देऊळी सर्वदा।
द्विज त्याच्या पदा लागताती ।।३।।
रामेश्वर भट्ट अतियोगी थोर।
तेही नमस्कार त्यांसी करिती ।।४।।
आम्हासी अन्याय हाची थोर वाटे।
होत असे खोटे वेदवाक्य ।।५।।
तुकोबाराय शूद्र वाणी असून द्विज (ब्राह्मण) त्यांच्या पाया पडतात हे मंबाजीला सहन होत नव्हतं. त्यात रामेश्वर भटांसारखा अतियोगी त्यांना नमस्कार करतो याचा तर प्रचंड जळफळाट होता. द्विज लोक स्वेच्छेने तुकोबारायांच्या पाया पडत होते. पण त्यामुळे मंबाजीला त्याच्यावर अन्याय झाला असं वाटत होतं. ‘आम्हासी अन्याय हाची थोर वाटे’ असं तो म्हणाला. तुकोबाराय कोणा उच्चवर्णीयाला त्यांच्या पाया पडण्याची सक्ती करत नसतानाही हा प्रकार मंबाजीला अन्यायकारक वाटत होता. कारण, उच्चवर्णीय लोकांनी तुकोबारायांच्या पाया पडण्याने वेदवाक्य खोटं ठरत होतं असा मंबाजीचा दावा होता. ‘होत असे खोटे वेदवाक्य’ असं तो म्हणत होता. वेदानेच धर्मशास्त्रांमधून वरच्या जातीतल्या व्यक्तीने खालच्या जातीतल्या व्यक्तीला नमस्कार करायचा नाही, असा दंडक घालून ठेवला आहे. तो वारकर्यांच्या या पाया पडण्याच्या जातमुक्तीच्या प्रयोगामुळे मोडला जात होता. त्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे अशा मंबाजीच्या चोराच्या उलट्या बोंबा सुरू होत्या. संतांनी त्याला अर्थातच भीक घातली नाही.
पुढे हाच प्रकार कचेश्वर भट ब्रह्मे यांच्या बाबतीत झाला. ते तुकोबारायांच्या चाहते होते. ते वारकरी कीर्तन करत असत. वारकरी कीर्तनात जातीपातीचा विचार न करता आलिंगन देण्याची पद्धत होती. कचेश्वर भटही कीर्तनात सर्वांना नमस्कार करत. ते पाहून काही सनातन्यांनी ‘हा लघुवर्णातल्या लोकांना अलिंगन देतो’ अशी तक्रार त्यांच्या वडिलांकडे केली. ‘भलत्यासी कैसे करितो नमन। देतो अलिंगन लघुवर्णा।।’ ही त्या सनातन्यांची तक्रार होती. या तक्रारीला वैतागून वडिलांनी कचेश्वरांना घराबाहेर हाकलून दिलं.
पाया पडण्याची कृती वरवर छोटी वाटत असली तरी तिचा आशय फार मोठा होता. संतकाळात पाया पडणं तर सोडाच, पण नमस्कारच्या वेळी केल्या जाणार्या अभिवादनातही जातिभेद होता. बहुजन लोक एकमेकांना ‘राम राम’ म्हणत. ब्राह्मण लोक मात्र ‘राम राम’ न म्हणता परस्परांना ‘नमस्कार’ म्हणत तर ब्राह्मणेतरांना ‘आशीर्वाद’ म्हणत असत. ही गोष्ट लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी नोंदवली आहे. त्या काळात दलित लोक सवर्णांना जोहार म्हणत तर सवर्ण लोक दलितांना प्रति नमस्कार करत नसत. या फरकातून श्रेष्ठ-कनिष्ठतेचा आणि भेदभावाचा विचार रुजवायचा होता. आज या बाबी आपल्याला अचंबित करणार्या वाटतात. मुकुंदराव पाटील यांनी एक सविस्तर लेख लिहून या अभिवादनाच्या जातनिहाय फरकाचे सांस्कृतिक राजकारण उलगडले आहे. मुकुंदराव हे सत्यशोधक पत्रकार होते. ‘राम राम तुकाराम आणि नमस्कार’ या शीर्षकाचा एक लेख १९१३ साली त्यांनी लिहिला होता. मुकुंदराव लिहितात, ‘रामाच्या नावाने वर्षासने घ्यावयाची. रामाच्या नावाने घर वजा देवळे बांधून घ्यावयाची, रामाच्या नावाने धनधान्य गोळा करावयाचे, रामाच्या नावाने भजन करुन आपल्या मतलबाच्या जाहिरातीचा प्रसार करायचा आणि त्याच्या नावाने ‘राम राम’ म्हणण्याचे टाळावयाचे. खरे पाहिले असता यात नवल वाटण्यासारखे काही नाही. कारण असा भेदभाव ठेवणे ही अनेकांपैकी एक ब्राह्मणी खुबी आहे. दुसरे काय? शूद्रांनी शूद्रास ‘राम राम’ करावा व ब्राह्मणांनी ब्राह्मणास नमस्कार करावा, हा ब्राह्मणी कायदा आहे. राम राम व नमस्कार या भिन्न प्रणामांनी मनुष्याची उन्नती किंवा अवनती होते अशातला प्रकार जरी नसला; तरी पण असा भेदभाव ठेवीत गेल्याने, स्वत:च्या उन्नतीस व इतरांच्या अवनतीस टेका बसतो, हे अत्यंत गूढ तत्व ब्रह्मदेवाने ब्राह्मणास फार प्राचीन काळी उपदेशिले असावे असे, ग्रंथावरुन दिसते.’ या सामाजिक पार्श्वभूमीवर वारकरी संतांनी सुरू केलेला एकमेकांच्या पाया पडण्याचा प्रयोग सामाजिक समतेसाठी महत्त्वाचा होता हे सहजपणे लक्षात येईल.