मनोज जरांगे-पाटील
कोण विश्वास ठेवेल यांच्यावर
कसा तोंडाला आणला फेस
टंगळ-मंगळ करीत होते
नाही झाला बाका केस
विराट केले शक्तिप्रदर्शन
दाखवता तो असली इंगा
नाक धरून आले शरण
धावत-पळत घालत पिंगा
नाक दाबले की तोंड उघडते
असतं सर्वांना माहीत
आम्ही फक्त तेच केलं
आले दौडत रात्री घाईत
—– —– —–
निवडणूक आयोग
अचूक मुहूर्त नेमका साधून
‘त्या’ तारखेचा फुटला पेपर
१६ एप्रिलपासून नंतर
लोकसभेचा होईल गजर
लोकसभा निवडणुकीची
त्यांना आहे इतकी घाई
वाहत्या गंगेत हात धुवून
टपले गाठण्या ती पुण्याई
आम्ही कितीही म्हणत असलो
आयोग आमचाही स्वतंत्र
वरून दट्ट्या बसता त्यांच्या
पाळू आज्ञा हेच तंत्र
—– —– —–
ईडीवाले
कोण म्हणतो निरपराध्यांवर
अन्यायाने लावतो ईडी
त्यांनी आज्ञा दिल्यावरती
सुटते आमची सुसाट गाडी
संशयाने नका पाहू
आम्ही फक्त त्यांचे नोकर
त्यांनी इशारा केल्यावरती
आम्ही देतो तत्पर ठोकर
त्यांनी लावा म्हणता लगेच
आम्ही फक्त लावतो काडी
दुसरे बदनाम करता करता
बदनाम झाली स्वत: ईडी
—– —– —–
सत्ताधारी
आम्ही म्हणू ते भ्रष्टाचारी
हात धुवून लागू पाठी
जे जे आले ‘सदाचारी’
वॉशिंग मशीन त्यांच्यासाठी
त्यांना धुवून स्वच्छ करू
भ्रष्टाचाराचे पुसू डाग
स्नान पवित्र होणार त्यांचे
नाही होणार भागंभाग
दडवायाची पापे ज्यांची
आमच्या पार्टीमध्ये या
खा, प्या, करा मौजमजा
आपण सारे खेळूया
—– —– —–
जनता
गॅस, पेट्रोल झाले महाग
जनतेला कुणी नाही वाली
दिवसेंदिवस वाढती भाव
असह्य झाली ही महागाई
कधी होईल आपले भले
शेतकरी पाही वाट
शेतमालाची नाही कदर
मनात आहे भीती दाट
डोळे लावून बसले सारे
कधी येतील अच्छे दिन
पंधरा लाखाचे व्याज मोजा
कित्ती वाढले बघा वाकून