`नको करू तू बंद खिडकी’ या गाण्यानं एकेकाळी आम्हाला झपाटून टाकलं होतं. शाळकरी वयात होतो मी तेव्हा, `अखेर जमलं’ हा तो चित्रपट आणि बेबी शकुंतला आणि सूर्यकांत हे नायिका आणि नायक. एका चाळीत घडणारी गोष्ट. खालच्या मजल्यावरच्या खोलीत चार टवाळखोर मित्र. सूर्यकांत, शरद तळवलकर, जगदीश पेंढारकर आणि राजा गोसावी! शरद तळवलकर आणि राजा गोसावी यांचं रुपेरी पडद्यावर मला घडलेलं पहिलं दर्शन! त्या क्षणापासून मी या दोन महाभागांच्या प्रेमातच पडलो, ती `प्रेमगाठ’ आजही तशीच आणि तितकीच घट्ट आहे. अति मुलायम सहज अभिनयाने आणि उत्स्फूर्तपणे बांधलेली रेशीमगाठच ती. या चित्रपटातील गीतंही अतिशय सुमधुर होती.
`जगाला नाही रे मंजूर राया आपली प्रीती.’ कथा, पटकथा, संवाद, गीतरचना, मधुसूदन कालेलकर आणि संगीत दिग्दर्शक शंकरराव कुलकर्णी, होय हेच ते शंकरराव कुलकर्णी ज्यांनी वारणानगर आणि इतर गावी शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना तबला, सतार, बासरी, संवादिनी अशी विविध वाद्यं शिकवून संगीतप्रेमाची नाही तर जीवनाकडे कलात्मक दृष्टीने पाहण्याची शिकवण दिली आणि जीवन समृद्ध करण्याची अतिशय मोलाची कामगिरी केली.
त्यानंतर राजा गोसावी यांचा अगदी छोटा रोल असलेली `चिमणी पाखरं’ चित्रपटातील भूमिका बघितली. चाळीतील बिर्हाडामधील एक जोडपं. कजाग बायको आणि दुबळा नवरा. राजा गोसावींनी परातीत पीठ मळताना हताश होऊन कपाळावर हात मारलेला आणि पीठभरला चेहरा आजही डोळ्यासमोर तरळतो.
राजा गोसावी यांचे खर्या अर्थाने नाव चमकले, ते `गजराज चित्र’च्या `लाखाची गोष्ट’ या चित्रपटामुळे! राजाभाऊ परांजपे यांनी या फाटक्या, किरकोळ अंगाच्या पण विलक्षण बोलक्या डोळ्यांच्या राजा गोसावीची निवड केली ती `राम’ नावाच्या कवीच्या भूमिकेसाठी. `शाम’ आणि `राम’ एक चित्रकार दुसरा कवी! दोघेही दरिद्रीनारायण! दोघेही अत्यंत भावुक संवेदनशील. त्यातील `श्याम’ पडतो एका लक्षाधीश बापाच्या मुलीच्या प्रेमात. तिकडे रामची वेगळीच कथा. `राम’ असतो एका भिक्षाधीश नाटक कंपनीच्या मालकाच्या सालस मुलीच्या प्रेमात. तो लक्षाधीश बाप श्यामला एक विचित्र अट घालतो. एक लाख रुपये ठराविक मुदतीत खर्च दाखवायचे, तर माझी मुलगी तुला देतो. सहजपणे शक्य असलेली गोष्ट करू आणि पोरगी पटवू ही श्यामची भावना पण घडते भलतेच. पैशाकडे पैसा धावतो या न्यायाने यांच्या अंगावर पैसा धो… धो कोसळतो आणि श्यामचा गळा घोटू पाहतो. अशी ही `लाखाची गोष्ट!’ कथा गदिमा, पटकथा, संवाद, गीतरचना आणि लक्षाधीश बापाच्या भूमिकेत प्रत्यक्ष गदिमा! संगीत- सुधीर फडके, गायक -आशा भोसले, सुधीर फडके संकलन- राजा ठाकूर, कॅमेरामन- बाळ बापट आणि कलाकार होते राजा परांजपे, राजा गोसावी, चित्रा, रेखा, इंदिरा चिटणीस.
या चित्रपटाच्या संकलकांची मी या ठिकाणी आवर्जून विशेष उल्लेख करतो आहे. मी अनेकांकडून ऐकलेली गोष्ट अशी की `लाखाची गोष्ट’ हा चित्रपट तयार झाला. पुण्यातल्या `भानुविलास’मध्ये काही नेमक्या आणि चित्रपटांशी संबंधित लोकांसमोर रात्री १२नंतर त्यांचा एक खास शो केला गेला. आणि कोणाच्याही चेहर्यावरची रेष हालेना, कशालाही दाद नाही, हशा नाही, सारे उदास वातावरण! हा चित्रपट डब्यात जाणार याची सर्वांना खात्री वाटू लागली. अशा वेळी पुढे सरसावले संकलक राजा ठाकूर. १८-२० तास एकत्र बसून त्यांनी पुन्हा जोडाजोड केली आणि मग झळकला `लाखाची गोष्ट’ हा राजा गोसावी यांच्या कलाजीवनाला विलक्षण उभारी देणारा चित्रपट! (चित्रपटमाध्यमामध्ये संकलक किती महत्त्वाचा असतो याचे हे आदर्श उदाहरण! चित्रीकरणाच्या वेळी तुम्ही कितीही शॉट घ्या. पण ते कुठे जोडायचे, कुठे तोडायचे, कथानकाच्या ओघ अखंड कसा राहील, कुठेही साखळी तुटता कामा नये, कात्री कशी आणि कुठे चालवायची हे सारे कौशल्य असते संकलकाचे. व्ही. शांताराम, राज कपूर, सत्यजित राय हे दिग्दर्शक उत्तम संकलक होते. राजा ठाकूर हे पुढे स्वतंत्रपणे दिग्दर्शन करणारे अतिशय उत्तम संकलक होते. त्यांच्या चित्रपट कारकीर्दीविषयी मी पुढे लिहीनच, पण येथे त्यांच्या संकलनकौशल्याला सलाम करण्याची संधी मी सोडत नाही.
(हे झालं थोडं विषयांतर. पण पुन्हा वळतो राजा गोसावींकडे.) राजा गोसावींचा सहज सुंदर अभिनय, कनिष्ठ मध्यमवर्गातील शोभावे असे व्यक्तिमत्व. विलक्षण, बोलका चेहरा आणि लवचिकपणा. शब्दफेक, टायमिंग आणि अभिनयाचे अनेक बारकावे या `रामनाथ’ या `श्याम’ चित्रकाराच्या मित्राच्या भूमिकेत लेखकाने बारीकसारीक तपशीलसह लिहिले आहेत. त्या सर्व छटा बारीकसारीक तपशीलांसह रुपेरी पडद्यावर साकारणे हे खरोखर `शिवधनुष्य’ पेलण्याइतकेच दिव्य काम. राजाभाऊंना तसा चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा अनुभवही `लाखाची गोष्ट’च्या वेळी फारसा नाही, तरीही मासा जसा पाण्यात पाहेतो, कोकिळा जशी सहज पंचम लावते. त्यासाठी त्यांना आटापिटा करावा करावा लागत नाही, अगदी त्याच रीतीने राजाभाऊंनी ही भूमिका साकारली आहे.
अभिनयाची मला उपजतच आवड असल्यामुळे हिंदी, मराठी, इंग्रजी चित्रपट मी आवर्जून बघतो. निळूभाऊ फुलेंच्या सांगण्यावरून बंगाली चित्रपटही बघू लागलो. शालेय वयापासून जडलेलं हे व्यसन आजही तितकेच टिकून आहे, वाढले आहे म्हणा ना! बालवयापासून ते आजपर्यंत मी `लाखाची गोष्ट’ बघतोच आहे आणि प्रत्येक वेळी नवीन काहीतरी गवसतेच आहे.
`माझा होशील का?’ हे आपले गीत आपली प्रिया आकाशवाणीवर गात असताना हॉटेलमधील रेडिओवर अत्यंत आनंदी उत्साही मूडमध्ये एन्जॉय करणारा राम…
वसंत काली वनी दिनांती
एकच पुसते तुझे एकांती
एकांती कर कोमल माझा
हात घेशील का?
माझा होशील का?
सांग तू माझा होशील का?
त्यावर बागेतील दृश्यात रेखा आणि राजा गोसावी यांच्या अत्यंत संयत प्रणयदृश्याची कमाल, अत्यंत मृदुल असे गीताचे शब्द, त्याला तितकीच समर्पक चाल, तितकेच मुलायमपणे गीतगायन आणि दृश्यस्वरूपात रुपेरी पडद्यावर यांची मांडणी. सारे सारे अत्यंत प्रभावीपणे एकरूप झाले आहे.
त्यांच्या अगदी उलट स्थिती ‘ऐकशील का रे माझे अर्थहीन गीत, दूर-दूर जाते धरून उरी तुझी प्रीत’ या गाण्याची. आकाशवाणीवरच गाणारी हताश निराश प्रेयसी आणि मोठ्या रेडिओवर उदास भकास अवस्थेत गोठलेल्या चेहर्याने आणि नजरेने पापणीची किंचितही हालचाल न करता आपलेच गीत ऐकणारा राम! ही दोन्ही गीते मी जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा माझा होशील का, हे गीत ऐकत असताना मी हवेत अलगद तरंगत असतो. तर `ऐकशील का रे माझे’ श्रवण करताना माझ्या तनामनाला तनमनाच्या बेड्या पडलेल्या असतात.
राजा गोसावींनी आपल्या दीर्घ कारकीर्दीत अबोली, महात्मा, बोलविता धनी, सौभाग्य (१९५३), शुभमंगल बेबी (१९५४), पुनवेची रात, गंगेचा घोडं न्हालं (१९५५) आंधळा मारतो एक डोळा, जगावेगळी गोष्ट (१९५६), गाठ पडली ठका ठका (१९५६), `आलिया भोगासी, देवघर, झालं गेलं विसरून जा (१९५७), दोन घडीचा डाव (१९५८), अवघाची संसार (१९६६), पैशाचा पाऊस (१९६०), वरदक्षिणा भाग्यलक्ष्मी (१९६२) वाट चुकलेले नवरे (१९६४), कामापुरता मामा (१९६५), येथे शहाणे राहतात (१९६८), या सख्यांनो या (१९७५) इत्यादी अनेक विनोदी सामाजिक विविध विषयांवरील चित्रपटात भूमिका केल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वसंत पिक्चर्सचे निर्माते शरदचंद्र गुण्ये यांच्या राजा गोसावीची गोष्ट या चित्रपटात राजा गोसावींनी तिहेरी भूमिका रंगविल्या होत्या. यात त्यांनी रंगविलेली मध्यमवर्गीय शहरी नायकाची भूमिका रसिकांना अतिशय आवडली. राजा गोसावींची लोकप्रियता त्यावेळी किती कळसाला पोहोचली होती याचे हे एकच उदाहरण पुरेसे बोलके आहे. ‘बाप माझा ब्रह्मचारी’ (१९६२) या चित्रपटात त्यांनी नायिका होत्या जयश्री गडकर. वेडा बाळ आणि नितीन राजहंस या अगदी भिन्न घाटणीच्या भूमिका साकारल्या. चाकोरीबाहेरचा विषय, अभिनयातील विविध छटा आणि मुद्रेवरील क्षणार्धात बदलणारे भाव या अनेक कारणामुळे त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना अतिशय आवडली. हा चित्रपटही खूपच चालला. ‘काका मला वाचवा’ (१९६६) या चित्रपटात त्यांनी परदेशी राहणार्या काकांची संपत्ती उकळण्यासाठी मित्राच्या बोलण्यावर भरवसा ठेवून केलेल्या खोटेपणा आणि एका प्रामाणिक प्रियकराची भूमिका असा विरोधाभास साकारला. `असला नवरा नको गं बाई’ (१९७६) या चित्रपटात त्यांनी ग्रामीण ढंगांचे इरसाल पात्र रंगविले.
छोट्या छोट्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका राजा गोसावी लक्षवेधी करीत असत. याचे काही नमुनेच बघा ना! `देवघर’ या नावाचा (१९५६) चित्रपट, त्यातील रेकत बोलणार्या आणि खरडत-रखडत चालणार्या कारकुनाची भूमिका ती केवढी. पण आपल्या नजाकतीनं राजा गोसावी यांनी सादर केली आहे. त्याप्रमाणे राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेला `मी तुळस तुझ्या अंगणी’ या चित्रपट तमाशातील नायिकेवर (हंसा) जिवापाड प्रेम करणारा तिच्याच तमाशातील एक साधा कलाकार.
राजा गोसावीच्या अगदी वेगळ्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटाबद्दल सांगायला हवं. त्यात त्यांनी केलेल्या, नाटक अंगात भिनलेल्या मामाचं वर्णन करावं लागेल. या भूमिकेत पोशाख, आवाज, अभिनय या सर्वच बाबतीत राजाभाऊ सर्वस्वी वेगळे आहेत. त्याप्रमाणे चिमण्यांची शाळा ‘ऊठ मराठ्या ऊठ’ या चित्रपटात `रंगुबाई, गंगुबाई, हात चला चालू दे’ हे ग्रामीण गीत त्या ढंगात, त्या रंगात पेश करताना राजाभाऊंची अदाकारी.
या रुपेरी पडद्यावरील राजाच्या भूमिकांचा आढावा घेताना त्यांच्या रंगभूमीवरील कारर्कीदीकडे लक्ष न देणे म्हणजे त्यांच्यावर आणि जिवंत जागत्या अभिनयक्षेत्रावर अन्यायच केल्यासारखे होईल. मी तो अपराध करणार नाही.
२८ मार्च १९२५ रोजी राजाराम शंकर गोसावी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली या खेडेगावी झाला शिक्षण जेमतेम मराठी चार इयत्ता; बालपणापासून नकला, मेळे, गाणी आणि नाटके यांची ओढ गंगाधरपंत लोंढे यांच्यात राजाराम संगीत मंडळींमध्ये भावबंधन नाटकात त्यांना रखवालदाराची भूमिका मिळाली. मास्टर विनायक यांच्या प्रफुल पिक्चर्स या कंपनीत पडेल ती कामे आणि घरगडी अशी हलकी कामे. नंतर दामूअण्णा मालवणकर यांच्या `प्रभाकर नाट्यमंदिर’मध्ये `प्रॉम्टर’चे काम. प्रॉम्टरला अथपासून इतिपर्यंत सर्व नाटक मुखोद्गत असावेच लागते. त्यात तो प्रॉम्टर राजा गोसावीसारखा नाट्यवेडाने भारावलेला असेल तर सोन्याला सुगंधूच! रंगभूमीवर पुढे अनेक भूमिका गाजवताना राजा गोसावी यांना त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे वठवलेल्या `प्रॉम्टर’ या भूमिकेचा प्रचंड फायदा झाला. ‘उधार उसनवार’ (भीमराव वाघमारे), ‘एकच प्याला’ (तळीराम), ‘करायला गेलो एक’ (हरिभाऊ हर्षे), ‘कवडीचुंबक’ (पंपूशेठ), ‘घरोघरी हीच बोंब’ (दाजीबा), ‘डार्लिंग डार्लिंग’ (प्रभाकर), ‘तुझे आहे तुजपाशी’ (श्याम), ‘भ्रमाचा भोपळा’ (जाफराबादचा जहांगीरदार). ‘पुण्यप्रभाव’ (सुदाम, कंकण, नुपूर), ‘प्रेमसंन्यास’ (गोकुळ), ‘भावबंधन’ (रखवालदार, कामण्णा, धुंडीराज) ‘याला जीवन असे नाव’ (नाथा), ‘लग्नाची बेडी’ (अवधूत, गोकर्ण), ‘संशयकल्लोळ’ (भादव्या, फाल्गुनराव) इत्यादी नाटकांत त्यांनी अनेक विविध भूमिका साकारल्या. ‘नटसम्राट’ (गणपत बेलवलकर) करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण तो त्यांना नाही साधला. त्यांच्या प्रकृतीला साजेसे, हासू आणि आसूचे घट्ट नाते विणणारे स्वतंत्र पठडीचे नाटक त्यांनी केले असते तर कदाचित ते यशस्वीही ठरू शकले असते. ‘सौजन्याची ऐशी तैशी’ (लेखक वसंत सबनीस) यात नाना बेरके हे त्यांनी रंगवलेले पात्र अतिशय गाजले.
स्वत:ची ‘रंगश्री’ या नावाची नाट्यसंस्थाही त्यांनी सुरू केली आणि गावोगावी अनेक नाटकांचे प्रयोग केले. त्यांचे बंधू बाळ गोसावी, धाकटी वहिनी दमयंती गोसावी, कन्या शमा देशपांडे, दुसरे बंधू रघुनाथ गोसावी असा सर्व गोसावी परिवार कलाक्षेत्राशी संबंधित आहे.
१९९५ साली अहमदनगर येथे झालेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही राजा गोसावी यांनी भूषविले. नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार प्रदान करून नाट्य परिषदेने राजा गोसावी यांचा उचित असा सन्मानही केला. ‘लाखाची गोष्ट’ (१९५२) आणि ‘अवघाची संसार’ (१९६०) हे दोन चित्रपट माझ्यासमोर सतत येत असतात. ‘लाखाची गोष्ट’मध्ये राजा परांजपे आणि राजा गोसावी ही मित्रांची जोडी तर ‘अवघाची संसार’मध्ये राजा गोसावी आणि शरद तळवळकर. एक महिन्याच्या आत एक लाख रुपये खर्च करून दाखवा हे तिकडे तर इकडे प्रेयसीच्या इतर बहिणींची लग्नं लावून देण्याची जबाबदारी यांनी उचललेली.सदासतेज, उत्स्फूर्त, टवटवीत, स्वाभाविक अभिनयाने राजा गोसावी यांनी या भूमिका उत्कृष्टपणे केल्या आणि राजा परांजपे यांनी आपली केलेली निवड किती यथार्थ योग्य होती हे कर्तृत्त्वानेच सिद्ध केले.
‘प्रयागी मरण, नित्य काशी विश्वेश्वरा तुझे स्मरण’ हे आपण नित्य जपत असतो. राजा गोसावी यांनी अखेरचा श्वास घेतला तोही रंगमंचावर… श्री नटेश्वराच्या पवित्र मंदिरात… दिनांक होता २८ फेब्रुवारी १९९८. नटेश्वराच्या चरणी एक पुष्प विसावले.