इक्विटी म्युच्युअल फंडातील काही उपप्रकारांची माहिती आपण घेतली, कोणत्या उपप्रकारातील फंड आपल्या कामाचे आहेत तेही बघितले. आता आणखी दोन उपप्रकारांची माहिती घेऊ, ज्यांचा गुंतवणुकीसाठी विचार करता येईल. त्यापैकी एक, डिव्हीडंड यील्ड फंड. या उपप्रकारात काही निकषांवर आधारित मुख्यत: जास्त लाभांश देणार्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली जाते. या कंपन्या जो लाभांश देतात तो कमवायचा व त्याचे वाटप म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांना करायचे हा मुख्य उद्देश असतो. कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढून फंडाचे मूल्य वाढावे हा उद्देश दुय्यम असतो. असे असले तरी हे फंड लाभांश देतील व किती प्रमाणात देतील याची हमी नसते. आपल्या पोर्टफोलिओला स्थिरता देणे व लाभांशातून मुदतठेवीवरील व्याजासारखे उत्पन्न मिळवणे असा हेतू असतो. कोल इंडिया, आयओसी, गेल अशा काही सरकारी कंपन्या, आयटीसी, वेदांता वगैरे इतर काही कंपन्या जास्त लांभाश देतात, अशा कंपन्यांचे शेअर हा फंड घेतो. याशिवाय इतरही कंपन्यांचे शेअर घेतोच. बचावात्मक रणनिती म्हणूनही या फंडात गुंतवणूक केली जाते.
‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम’ म्हणजे इएलएसएस हा इक्विटी म्युच्युअल फंडाचाच एक उपप्रकार आहे. याचा उपयोग आयकर बचतीसाठी केला जातो. या फंडामध्ये जी गुंतवणूक केली जाते त्या रकमेला आयकराच्या सेक्शन ८०-सी खाली वजावट मिळते. या फंडातील गुंतवणुकीला तीन वर्षाचा लॉक-इन कालावधी असतो, गुंतवणूक केल्यापासून तीन वर्षांच्या आत पैसे काढता येत नाहीत. करबचतीसाठी हे एक उत्तम साधन आहे. सेक्शन ८०-सीचा फायदा मिळवण्यासाठी १,५०,००० रुपये ही गुंतवणुकीची मर्यादा आहे, त्यातच या फंडात केलेल्या गुंतवणुकीचा समावेश होतो. इतर करबचतीच्या साधनांच्या तुलनेत याचा लॉक-इन काळ सर्वात कमी आहे, परतावा जास्त आहे. आयकर वाचवण्यासाठी यात अवश्य प्राधान्याने गुंतवणूक करावी. सुरुवातीची तीन वर्षे यात गुंतवणूक केली तर चौथ्या वर्षी पहिल्या वर्षी केलेली गुंतवणूक काढून घेऊन पुन्हा त्या वर्षासाठी या फंडात गुंतवणूक करून करबचतीचा लाभ घेऊ शकतो. लाभांश पर्याय स्वीकारला तर हे फंड सहसा जानेवारी ते मार्च दरम्यान मोठी रक्कम लाभांश म्हणून देतात. गुंतवणूकदार तीच रक्कम करबचतीचा फायदा मिळवण्यासाठी या फंडात नव्याने गुंतवणूक करण्यासाठी वापरतात. या फंडातील गुंतवणुकीचे विमोचन केल्यावर जो भांडवली नफा होतो त्यावर १० टक्के कॅपिटल गेन-भांडवली कर देय होतो परंतु एका आर्थिक वर्षात एक लाख रुपयांच्या वर जो भांडवली नफा आहे त्यावरच तो देय होतो. आयकर वाचवण्यासाठी इएलएसएस उपप्रकारातील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास सुरुवात केलेली नसेल तर अवश्य करावी. कर बचतीसह मूल्यवृद्धीचाही लाभ मिळेल. या प्रकारातील कॅनेरा रोबेको इक्विटी टॅक्स सेव्हर या फंडाने ५ वर्षांच्या कालावधीत वार्षिक सरासरी १४.४६ टक्के या दराने लाभ दिलेला आहे हे उदाहरण म्हणून देत आहे. दीर्घ काळात किती लाभ झाला ते जाणण्यासाठी एचएफडीसी इक्विटी टॅक्स सेव्हर फंडाचे उदाहरण घेऊ. ह्या फंडाची सुरवात २ एप्रिल १९९६ला झाली. तेव्हा यात १ लाख रुपये गुंतवले असते तर १७ जून २०२२ला त्याचे मूल्य होते ६७ लाख ७७ हजार.
आता असे फंड बघू ज्यांचा नवीन गुंतवणूकदारांनी सुरुवातीला तरी विचार करण्याची आवश्यकता नाही, परंतु माहिती असावी व कोणते फंड टाळावेत हे समजण्यासाठी ही माहिती घेऊ. त्यातील एक उपप्रकार आहे फोकस्ड फंड. म्युच्युअल फंड ५०-६० किंवा त्याहीपेक्षा जास्त कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे विविधीकरणाचा फायदा मिळतो, जोखीम कमी होते. याउलट फोकस्ड फंड हा जास्तीत जास्त ३० कंपन्यांच्या शेअरमध्येच गुंतवणूक करतो. ही संकेंद्रित (कॉन्सन्ट्रेटेड) गुंतवणूक असते. रिसर्च करून चांगली कामगिरी करतील असेच शेअर निवडायचे व जास्त लाभ मिळवायचा असे तत्व यात असते. ह्यात फंड मॅनेजरची निवड योग्य राहिली तर जास्त फायदा होतो, निवड चुकली किंवा काही कारणाने निवडलेल्या कंपन्यांपैकी काहींच्या शेअरचे भाव खाली आले तर कमी फायदा होतो. अशा प्रकारातील फंडाची निवड करताना त्या फंडाने कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांची कामगिरी कशी राहील याचा अभ्यास हवा. सगळ्यांना हे शक्य नसल्याने हे फंड सहसा टाळले जातात. जास्त जोखीम जास्त लाभ ह्या प्रकारातील हा फंड आहे. यांनी काहीवेळा चांगली कामगिरीही केलेली आहे. जोखीम घेण्याची वृत्ती असेल तर याचा विचार करावा.
सेक्टर फंड व थीमॅटिक फंड असेही दोन उपप्रकार आहेत. सेक्टर फंड म्हणजे एका विशिष्ट क्षेत्रात काम करणार्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारा फंड, उदा. पॉवर सेक्टर फंड म्हणजे पॉवर सेक्टरमध्ये काम करणार्या टाटा पॉवर, अडाणी पॉवर, एनटीपीसी, इत्यादी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारा फंड. तसेच एसबीआय इन्फ्रास्ट्रक्चर फंड हा पायाभूत सुविधा क्षेत्रात काम करणार्या लार्सन अॅन्ड टुब्रो, अम्बुजा सिमेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट्स इत्यादी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो. असे आणखीही काही इन्प्रâास्ट्रक्चर फंड आहेत. बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड हा सेक्टर फंडाचाच एक महत्वाचा प्रकार आहे. एखाद्या बँकेचा शेअर घेण्याऐवजी यात गुंतवणूक केली तर अनेक बँकांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा मिळतो, जणू एका फुलाऐवजी एक गुच्छ.
थीमॅटिक फंड हा सेक्टर फंडाचा एक व्यापक प्रकार आहे, उदा. फार्मा सेक्टर फंड म्हटले तर त्यात सिपला, ल्युपिन, सन फार्मास्युटिकल अशा फार्मास्युटिकल कंपन्या येतील, परंतु फार्मा अँड हेल्थकेअर फंड म्हटले तर त्यात फार्मा कंपन्यांबरोबरच हॉस्पिटल कंपन्या, पॅथॉलॉजी लॅब उदा. अपोलो हॉस्पिटल, मेट्रोपोलिस इत्यादी यांचे शेअरसुद्धा तो घेऊ शकतो. सेक्टरऐवजी थीम निवडून त्यात गुंतवणूक करणारा फंड ह्यामुळे फंड मॅनेजरला कंपन्या निवडण्यासाठी जास्त वाव मिळतो.
छोट्या गुंतवणूकदारांनी सेक्टर फंड व थीमॅटिक फंड स्पष्टपणे टाळावेत. या फंडांमध्ये जोखीम खूपच जास्त असते. कधी कधी पूर्ण सेक्टर काही कारणांमुळे गोत्यात येतो व त्या सेक्टरमधील अनेक कंपन्यांच्या शेअरचे भावसुद्धा खाली येतात. पॉवर सेक्टरची साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वी अशी गत झाली होती. त्यांनी सुरुवातीला खूप चांगला फायदा दिला, परंतु पॉवर सेक्टरमध्ये खूप अडचणी निदर्शनाला आल्यावर या सेक्टरमधील कंपन्यांचे भाव खाली आले व या पॉवर सेक्टर फंडातील गुंतवणूकदारांना तोटा झाला. फार्मा सेक्टरच्या कंपन्यांचे भावही मध्यंतरी काही वर्षे वाढ न होता स्थिर राहात होते. सेक्टरची जोखीम, त्याचे तेजीमंदीचे चक्र, त्यातील घडामोडींवर लक्ष ठेवणे हे शक्य आहे का याचा आधी विचार करावा. हे फंड कधी खरेदी करतो व कधी विकतो हेही महत्वाचे ठरते. त्या सेक्टरमध्ये मंदी असेल तर घेऊन ठेवणे व काही वर्षांनी तेजी येईल तेव्हा नफा कमावणे ही रणनिती सोपी नाही. वर एसबीआय इन्प्रâास्ट्रक्चर फंडाचा उल्लेख केला. ह्या फंडाने मागील १० वर्षात सरासरी वार्षिक १२.७४ टक्के परतावा दिलेला आहे. इतर फंडांच्या तुलनेत हा खूप जास्त नाही तर जास्त जोखीम का घ्यायची? तेव्हा हे फंड टाळावेत.
आतापर्यंत इक्विटी म्युच्युअल फंडाचे जे उपप्रकार बघितले त्यात ठरलेल्या मँडेटनुसार म्हणजे आखून दिलेल्या चौकटीत फंड मॅनेजर कोणत्या कंपन्यांचे शेअर निवडतो यानुसार त्या फंडाची कामगिरी असते व त्यानुसार परतावा मिळतो. उदा. एखादा लार्ज कॅप म्युच्युअल फंड घेतला तर त्याचा फंड मॅनेजर नियमाप्रमाणे मार्केट कॅपिटलायझेशननुसार पहिल्या १०० कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतो. त्याने ५० कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली व दुसर्या फंड मॅनेजरने इतर ५० कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर कंपन्यांची कामगिरी जशी असेल तसा हे फंड परतावा देतील. शिवाय चांगली कामगिरी करणार्या कंपन्यांचे जास्त शेअर घेतले तर जास्त फायदा मिळेल म्हणजे कोणत्या कंपन्यांचे शेअर किती प्रमाणात घेतले आहेत हेही महत्वाचे आहे. त्यामुळे एकाच उपप्रकारातील, पण वेगवेगळ्या एएमसीचे फंड जो परतावा देतात त्यात तफावत असते. वेगवेगळ्या लार्ज कॅप म्युच्युअल फंडांनी ५ वर्षात सरासरीने किती वार्षिक रिटर्न दिले याची तुलना केली तर किमान ७.७० टक्के ते कमाल १३.८९ टक्के व या दरम्यान असे रिटर्न दिलेले आहेत. त्यामुळे आपण कोणता फंड निवडतो हेही महत्वाचे आहे.
अशा प्रकारे ज्या फंडाचे व्यवस्थापन होते त्याला ‘अॅक्टीव्हली मॅनेज्ड फंड’ म्हणतात. फंड मॅनेजर सक्रीय राहून कोणते शेअर घ्यायचे, किती प्रमाणात घ्यायचे हे ठरवतो. नंतरही कंपन्यांची कामगिरी, बदललेली परिस्थिती, मिळत असलेल्या संधी इत्यादींचा विचार करून नव्या शेअरमध्ये गुंतवणूक करत असतो, काही काढून टाकत असतो. बहुतेक म्युच्युअल फंड हे अॅक्टीव्हली मॅनेज्ड फंड असतात. म्युच्युअल फंडांच्या कामगिरीची म्हणजे त्यांनी दिलेल्या रिटर्नची तुलना करताना ती एकाच उपप्रकारातील फंडांची केली जाते. लार्ज कॅप फंड व स्मॉल कॅप फंड यांची तुलना केली जात नाही कारण दोघांमधली जोखीमही वेगळी आहे. तसेच फंडांच्या कामगिरीचा महत्वाचा निकष आहे त्या फंडाच्या बेंचमार्क इंडेक्सपेक्षा त्याने जास्त रिटर्न दिलेले आहेत की नाहीत.
बेंचमार्क इंडेक्स म्हणजे काय ते बघू. प्रत्येक फंडाला त्याच्या कामगिरीची तुलना करण्यासाठी एक बेंचमार्क इंडेक्स म्हणजे संदर्भ निर्देशांक असतो. उदा. निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड हा एक मिड कॅप फंड आहे. याचा बेंचमार्क इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्स. सेबीच्या नियमाप्रमाणे मार्केट कॅपिटलायझेशननुसार १०१ ते २५० क्रमांकांच्या कंपन्या ह्या मिड कॅप कंपन्या आहेत, त्यांचे वेगवेगळे वेटेज आहे, परंतु मिड कॅप म्युच्युअल फंड यातील सगळेच शेअर खरेदी करत नाही व त्या व्हेटेजनुसारही करत नाही. तेव्हा फंड मॅनेजरने निवड केलेल्या शेअरची कामगिरी मिड कॅप इंडेक्सच्या तुलनेत चांगली झाली तर तो फंड इंडेक्सने दिलेल्या रिटर्नपेक्षा जास्त रिटर्न मिळवेल नाहीतर इंडेक्सपेक्षा कमी रिटर्न मिळवेल. बेंचमार्क इंडेक्सपेक्षा सातत्याने कमी रिटर्न मिळवणारा फंड असेल तर त्याची कारणे जाणून घेऊन त्याचे विमोचन करणे (विकून टाकणे) व दुसर्या चांगल्या फंडात गुंतवणूक करणे योग्य असते.
वेगवेगळ्या उपप्रकारातील म्युच्युअल फंड असतात, त्यांचे त्यानुसार वेगवेगळे बेंचमार्क इंडेक्स असतात, उदा. एस अॅन्ड पी बीएसई ५००, निफ्टी स्मॉल कॅप २५० इत्यादी. असे अनेक इंडेक्स हे त्या त्या फंडाची कामगिरी जोखण्यासाठी वापरले जातात. पण याचबरोबर फक्त ह्या इंडेक्सबरोबर तुलना न करता जास्त अचुकतेसाठी त्या इंडेक्सना टिआरआय हे शेपूट जोडून त्यांच्याबरोबर तुलना केली जाते. उदा. वर दिलेल्या निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड ह्या मिड कॅप फंडाचा बेंचमार्क इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप १५०, पण तुलनेसाठी व जास्त अचुकतेसाठी ‘निफ्टी मिडकॅप १५० टिआरआय’ हा बेंचमार्क वापरला जातो. हे टिआरआय म्हणजे काय ते बघू. निफ्टी मिड कॅप १५० या निर्देशांकात ज्या कंपन्यांचा समावेश आहे त्यांच्या शेअरच्या भावानुसार त्या इंडेक्सचे त्या दिवसाचे मूल्य किती आहे ते ठरते. मात्र म्युच्युअल फंडाचे मूल्य (एनएव्ही) व त्याने दिलेले रिटर्न ठरवताना फंडाने ज्या कंपन्यांमध्ये गुतंवणूक केलेली आहे त्यांचे भाव विचारात घेतले जातातच त्याचबरोबर त्यां कंपन्यांनी दिलेला व फंडात जमा झालेला लाभांशही विचारात घेतला जातो, फंडाच्या मूल्यात त्याचा समावेश असतोच व त्याचा लाभ गुंतवणूकदारांनाच होणार असतो. म्हणजे म्युच्युअल फंडासाठी शेअरचे भाव अधिक लाभांश तर निर्देशांकासाठी फक्त शेअरचे भाव ही तुलना उचित होणार नाही. ही त्रुटी दूर करण्यासाठी ‘निफ्टी मिड कॅप १५० टिआरआय (टोटल रिटर्न इंडेक्स) असा बेंचमार्क वापरला जातो. यात निर्देशांकात समावेश असलेल्या कंपन्यांनी जो लाभांश दिला आहे तोही विचारात घेतला जातो. याचा अर्थ फंड मॅनेजरांना यापेक्षा जास्त रिटर्न मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही म्युच्युअल फंडांचा बेंचमार्क इंडेक्स बघितला तर प्रत्येकवेळी त्याला पुढे टिआरआय जोडलेले आढळेल.
इथे इंडेक्स ही संकल्पना लक्षात घेतली. ह्या इंडेक्सवर आधारितही म्युच्युअल फंड असतात त्याची माहिती पुढील लेखात बघू.