एक विचारायचं आहे, अगदी जेन्युईन प्रश्न, संकष्टीच्या शुभेच्छा हा काय प्रकार आहे?
म्हणजे आतापर्यंत दिवाळी, दसरा, पाडवा यांच्या शुभेच्छा समजण्याजोग्या होत्या. पण आजकाल संकष्टी, अंगारकी, शिवरात्र, माघी, मार्गशीष वैभव लक्ष्मी, यांच्या शुभेच्छा मोबाइलमधून कोसळू लागल्यात. हे कमी की काय म्हणून शुभ सकाळ, शुभ दुपार, शुभ रात्री आणि त्याला अनुसरून उगवता सूर्य, पक्षी, चहा, चहाचे कप, बिस्किट, ब्रेड चंद्र, तारे, निळी रात्र, फुलं यांचे फोटो किंवा चित्रं आहेतच.
गुड मॉर्निंग आणि गुड नाइट यांचं शुभ सकाळ आणि शुभ रात्री असे भाषांतर नक्की कोणी केलं? मुख्य म्हणजे भारतात शुभ सकाळ हा प्रकारच नाही. गावखेड्यात चूल सारवून, कचरा काढून आणि शहरात दुधाच्या पिशव्या कापून, वॉशिंग मशीन लावून, कुकरच्या शिट्ट्यांनी सकाळ होते. आणि उद्याची कामं आठवता, आठवता रात्र!! त्यात उन्हाळा असेल आणि नेमकी वीज गेली तर बोलायची सोय नाही. अशा ठिकाणी शुभ रात्र कसली बोडक्याची!!
आजवर ‘राम राम’ किंवा ‘जय राम जी की’ इथपर्यंत भारतीयांची शुभेच्छा देण्याची वृत्ती मर्यादित होती. आता मात्र ती सर्वव्यापी झालेली आहे. पावसाळा आला की हौशी कवी जोरात किंचितकाव्यं प्रसवू लागतात. मृदगंध, काजवे, तृषार्त धरती, हिरवे गवत, रिमझिम सरी असे शब्द घेऊन, त्या मीटरमध्ये कविता बसवल्या जातात. पाऊस थोडा जुना झाला की भजी, वडे, चहा, रम अशी खाद्यपेय चंगळ असणारे मेसेज येतात. श्रावणात हॅप्पी श्रावण… अरे, क्रम चुकला, त्याच्या आधी आषाढसरी, वटसावित्री यांचे मेसेज. मग हळूहळू गटारी येते. मग ती कशी साजरी करायची आणि शुभ गटारी!! मधूनच कोणी संस्कृती रक्षक, ‘आपला’ सण गटारी नाही तर दिव्याची अमावस्या हा आहे हे ठणकावून सांगतात… कोण ‘आपण’? या दोन घोट घेऊन मटण चापायला.
ज्येष्ठ-आषाढापासून सुरू झालेली ही फॅक्टरी अखंड चालू राहते. यातच मग मध्ये मध्ये संकष्टी, अंगारकी, शिवरात्री वगैरे आणि हो गुड मॉर्निंग, गुड नाइट हा अंग्रेजी माल पण कायम ओतला जात असतोच… आता फक्त शुभ जेवण बघायचं बाकी आहे.
अर्थात यामुळे एक मात्र झालंय की तमाम ज्येष्ठ आणि सेमी ज्येष्ठ (मी रिकामटेकडे म्हणत नाहीये) नागरिकांना मस्त टाइमपास मिळालाय. असे मेसेज स्वतःच्या नावानिशी धडाधड ढकलून, दुसर्याचा इनबॉक्स तुडुंब करण्याचे काम अनेक जण प्रामाणिकपणे करतात.
आणि हो, यात स्फूर्तीदायक संदेश देणारे महाभाग राहिले. म्हणजे मोटिवेशनल मेसेजेस. असे मेसेजेस ढकलण्यात आनंद घेणार्या माणसांचा एक स्वतंत्र सुभा असतो. आयुष्य कसे जगावे? अडचणींवर कशी मात करावी? निराशा कशी दूर करावी? यश कसे मिळवावे? यांचे जंगी संदेश हे क्यूट अंकल-आंटी पूर्ण निर्व्याज भावनेने, निरपेक्षपणे पुढे पिटाळतात. यांचे आयुष्य जणू यशाची चढती कमान आहे, असे वाटावे इतपत त्यांचा आवेश असतो. काही टॉप सीडेड खेळाडू त्यामध्ये रतन टाटा, बिल गेट्स, झुक्या अशी नावं टाकून मेसेजला वजनदार करतात. जणू रात्री रतन टाटांनी यांना विचारून तो संदेश लिहिलाय. परत हा मेसेज या माणसाचा नाही हे बोलायचे सोय नाही. हे लोक अशी भलावण करतात की झुक्याने जर ऐकलं, तर स्वतः इथे येऊन यांना प्रेमालिंगन देवून त्यांच्या नावाने एक डेडिकेटेड फेसबुक पेज उघडेल. सध्या ऋषी सूनक आणि मस्क्या फेवरेट आहेत. गावखात्यात नाना पाटेकर, प्रकाश आमटे, विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने काहीही रेटता येतं आणि हळहळ्या हुळहुळ्यांना कुठल्याही चार भावुक ओळी गुलजार किंवा गालिब यांच्या नावावर खपवून देता येतात.
थोर विनोदी लेखक पु. ल. देशपांडे यांनी माझे काही शत्रू, या लेखात अजब नमुने अजरामर करून ठेवले आहेत. आत्ता जर पु. ल. असते, तर त्यांना या शत्रुपक्षात भरपूर भर घालता आली असती. कारण सध्या हे गुड मॉर्निंग गुड नाईट आणि शुभ संकष्टी मेसेज पाठवणारे फॉरवर्डवीर अनेक जणांचे गुप्त शत्रू झालेले आहेत. दिवाळी-पाडवा एकवेळ समजू शकतो हो, पण चक्क सर्वपित्री अमावस्या आणि पितृपक्ष!! या दिवसांना सुद्धा भावविभोर मेसेज फिरत असतात. च्यामारी, त्या पितरांना जिवंत असेपर्यंत प्रेम प्रत्यक्षात मिळाले असेल की नाही माहित नाही…
…अर्थात या सर्वात काही वाईट हेतू नसतो. अजब वाटते ते भारतीय लोकांच्या कल्पकतेचे आणि उद्यमशीलतेचे. फिरंग्यांच्या अनेक गोष्टी त्यांनी पूर्ण भारतीय केल्यात. इतके की त्याचे मूळ विदेशी आहे हेच आपण विसरून गेलोय. अनेक काका, मामा, मावशी, आत्या, आतोबा, आजोबा यांना सकाळचा बिनपगारी उद्योग मस्त मिळालेला आहे. गार्डनमधला योगा आणि लाफ्टर क्लब आटपला की यांची संदेशाची देवाणघेवाण सुरू होते. अर्थात देवाण जास्त, घेवाण कमी. फॅमिली ग्रुप बघा, पालकांच्या धाकामुळे त्यात असणार्या अनेक तरुण कारट्यांचा निम्मा वेळ हे असले मेसेज डिलीट करण्यात जातो आणि एकमेकांच्या आई-वडिलांना खाजगीत चिडवण्यात. आणि कोणी जर असे मेसेज पाठवू नका हे सांगितले तर, सात्विक संतापाने, यात वाईट काय आहे हे सांगा? कोणाला काय त्रास झाला? शिव्या दिल्या का? अश्लील काही आहे? का इथपासून सुरुवात करून हे ढकलकर अखंड लढत राहतात. इतिश्री होते ताr समोरच्याने फोन बंद करण्यात. तोपर्यंत कौटुंबिक व्हॉट्सअप वॉरचा युद्धविराम होत नाही. तसे आपण भारतीय खंदे लढवय्ये. एकवेळ रशिया-युक्रेन तह करतील पण इथे युद्ध अमुचे सुरूच राहते.
मी माझ्या अनेक गुप्त शत्रूंचे नंबर या अशा गुड मॉर्निंग हौशी लोकांना देवून सुप्त सूड उगवलाय. अर्थात माझा नंबर पण दिला गेला असणार म्हणा.
घ्या लेको, होऊ दे डेटा खर्च, व्हॉट्सअप आहे घरचं!!!