‘ताज हॉटेलकडे बघताना, त्या दिवशी मन आनंदाने भरून आलं होतं. ताज ग्रूपमधील हॉटेलची विंडो ब्लाइंड्स आणि डेकॉरची मोठी ऑर्डर मी त्या दिवशी पूर्ण केली होती. अंतर्गत सजावट या व्यवसायात उतरलो तेव्हापासून मनात इच्छा होती की ‘ताज’ला माझ्या दुकानातील ‘साज’ चढवता यावा. ते स्वप्न २००४ ला पूर्ण झालं. खोजेमा चित्तलवाला या आर्किटेक्टनी आमच्यावर विश्वास ठेवून ताज ग्रूपच्या वेलिंग्टन हॉटेलचं, चार लाखाचं काम आम्हाला दिलं. १२०० फुटांच्या जिम एरियात खिडक्यांना रोलर ब्लाइंड लावायचे होते. ताजचं काम मिळतंय, या उत्साहात लगेच कामाला लागलो. ताबडतोब जाऊन मेजरमेंट घेतले. साडेअकरा फुटाचा सिंगल ब्लाइंड बनवायचा होता. आम्ही तो बनवला, पण तो रोल टॅक्सीतून घेऊन गेलो, तेव्हा लक्षात आलं की हा लिफ्टमध्ये जाऊ शकत नाही आणि जिन्याने देखील वर चढवणं अशक्य आहे. आता करायचं काय? विचार केल्यावर कल्पना सुचली की वरच्या मजल्यावरून दोर सोडू, रोलर त्या रश्शीला बांधून वर खेचू. रोलर न तुटता वर आल्यावर जिवात जीव आला. वेळ न दवडता ब्लाइंड्स लटकवण्यासाठी सीलिंगला ड्रिल मशीनने होल मारायला सुरुवात केली. ड्रिल मारल्यावर हातात भुसा आला तेव्हा पोटात गोळाच आला. याचा अर्थ सीलिंगला पीओपी केलं होतं. पुन्हा नवीन अडचण, रोलर ब्लाइंडचं वजन चाळीस किलो होतं आणि ते पेलायला सीलिंग फर्म हवं. मोठं काम मिळाल्याच्या अतिउत्साहात मेजरमेंट घेताना पीओपी केलेल्या छताकडे पाहिलंच नव्हतं. त्यामुळे ही अडचण उद्भवली होती. थोडा वेळ शांत राहिलो आणि उपाय शोधून काढला. रावळ प्लग एका विशिष्ट पद्धतीने फिट करून त्यावर ब्लाइंड टांगून ते काम पूर्ण केलं. आम्ही केलेलं काम त्यांना आवडलं. त्यानंतर संपूर्ण बिल्डिंगच काम आम्हाला मिळालं. या अनुभवानंतर मात्र आम्ही प्रत्येक काम घेण्याआधी प्रॉपर सर्व्हे करू लागलो. महत्वाची शिकवण ताजच्या कामाने मिळाली. तसं प्रत्येकच काम तुम्हाला काही ना काही शिकवतच असतं.’
ताज ग्रूप, ग्रँड हयात हॉटेल, आयआयटी (पवई), पायोनियर, बालमोहन शाळा, जेएसडब्लू, बीएससी सेन्सेक्स (शेअर मार्केट) अशा अनेक नामवंत व्यावसायिकांसोबत काम केलेले, दादरच्या मध्यवर्ती बाजारपेठेमधील ‘साज स्टुडिओ‘ या शोरूमचे मालक संतोष विसपुते मला त्यांचा पंचवीस वर्षीय व्यावसायिक प्रवास उलगडून सांगत होते. ते म्हणाले, ‘मला व्यावसायिक पार्श्वभूमी नव्हती. वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते. दहावीनंतर माटुंग्याच्या गुरुनानक खालसा कॉलेजमध्ये सायन्सला अॅडमिशन घेतलं. ९३ साली बारावीची परीक्षा दिल्यावर सुट्टीत, मी माझे मामा दत्ता बागुल यांच्याकडे कामाला लागलो. मामा वॉल पेपर, कार्पेट लावण्याचे काम करायचे. माझा मोठा भाऊ यशवंत त्यांच्याकडे आधीच कामाला होता. मामा सांगतील ते काम आम्ही करायचो. साइटवर सामान सोडणं, देखरेख करणे किंवा मार्केटवरून काही सामान आणणं ही कामं मी करायचो. मामा म्हणत,’तुम्ही शिकली सवरली पोरं, तुमचं इंग्रजी चांगलं, तुम्ही मार्केटिंग करा. नवीन आर्किटेक्टस्, इंटेरियर डेकोरेटर्सना भेटा.’ ते सांगतील ते काम मी शिक्षण सांभाळून करत होतो. घरचं काम असल्याने रमत गमत व्यवसायशिक्षण सुरू होतं. मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना मोठ्या भावाने वॉलपेपर्सचा वेगळा व्यवसाय सुरू केला. मी भावाकडे नोकरी सुरू केली.
बीएससी झाल्यावर अमेरिकन रेमेडीज या कंपनीत एमआरसाठी (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) पहिला इंटरव्यू दिला. पास झाल्यावर मला दीड महिना ट्रेनिंगसाठी चेन्नईला पाठवलं गेलं. देशभरातून ३०० मुलं आली होती. ट्रेनिंग संपल्यावर मुंबईत आलो. डॉक्टरांची भेट घेऊन आमच्या कंपनीच्या औषधांची विक्री कशी वाढेल हे पाहणं माझं काम होतं. या कामासाठी कॉलेजच्या आजूबाजूचा एरिया मिळाला. माझं कॉलेज पूर्ण झालं होतं, पण सुटलं नव्हतं. काम संपलं की संध्याकाळी राजेश कुचिक, संतोष तातुसकर, अमोल देवरुखकर असे अनेक मित्र रोज कॉलेजच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारायचो, सुखदुःखं सांगायचो. एमआरच्या कामात मन रमत नव्हतं. मामाकडे आणि भावाकडे नोकरीत फ्रीडम होता. सतत टार्गेट्सचे प्रेशर किंवा चुकीच्या पद्धतीचं बॉसिंग नव्हतं. पण एमआर असणं आणि टार्गेट पूर्ण करणं समानार्थी होतं. एक वर्षात नोकरी सोडली. नंतर चार महिने हातात काहीच काम नव्हतं. पण पुन्हा मेडिकल फील्डमध्ये जायचं नाही हे मात्र पक्कं ठरलं होतं. मित्र संतोषने एक दिवस विचारलं की तू कार्पेट्स, वॉलपेपर याच फील्डमध्ये का काम नाही करत? मी म्हणालो, मला मामा आणि मोठ्या भावासोबत कॉम्पिटिशन नाही करायची. तो म्हणाला, ‘माझ्या ओळखीची वॉलफ्लेक्स बनवणारी कंपनी आहे. त्यांना फ्रीलान्स मार्केटिंग करणारा माणूस हवा आहे. हे काम तू करशील का?’ वॉलफ्लेक्स म्हणजे एखादी भिंत दमट असेल तर त्या भिंतीवर कलरफुल रेती चढवली जाते, जेणेकरून त्या भिंतीला ओलसरपणा राहात नाही आणि वेगळा लुक येतो. हा प्रकार तेव्हा मार्केटमध्ये नवीन होता, त्यामुळे लोकांना त्यात उत्सुकता होती. आवडीच्या क्षेत्रातील काम मिळत असल्याने मला हुरूप आला.
त्या कंपनीचे सॅम्पल्स घेऊन लगेच कामाला सुरुवात केली. कोणाला जाऊन भेटलं, तर ऑर्डर मिळू शकतील हे या क्षेत्रातील पूर्वानुभवावरून मला माहिती होतं. मी काही आर्किटेक्ट्स आणि इंटरियर डेकोरेटर्सना भेटलो. फारशा ऑर्डर्स मिळाल्या नाहीत, पण एक गोष्ट लक्षात आली की हे काम फक्त माझे मामा किंवा मोठा भाऊच करत नाहीयेत, हे मार्केट खूप मोठं आहे आणि इथे प्रत्येकाला काम आहे. तेव्हा ठरवलं की याच क्षेत्रात काम करायचं.
बाबा रिटायर झाल्यावर आम्ही कल्याणला शिफ्ट झालो. मी तिथे स्वतःच्या व्यवसायासाठी मार्केटिंग करू लागलो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वडिलांकडून अडीच हजार रुपये मदत घेऊन त्या पैशातून बिल बुक आणि व्हिजिटिंग कार्ड बनवले. मार्केटिंगसाठी वॉलपेपर, कार्पेट्स, ब्लाइंड्स (प्लास्टिकचे रोलिंग पडदे) यांचे सॅम्पल्स विकत घेतले. यलो पेजेसमधून कल्याणमधील आर्किटेक्ट्सची नावं, पत्ते घेऊन त्यांना कॉल करायला, भेटायला सुरुवात केली. अर्थात कोणीही माझ्यासाठी पायघड्या पसरून वाट पाहत नव्हतं. सुरुवातीला खूप नकार पचवले. सगळे सांगायचे, सॅम्पल ठेवून जा, काम असेल तर फोन करतो. रोज प्रयत्न करत होतो. आपण एखादं प्रॉडक्ट घेऊन एखाद्या ऑफिसमध्ये नुसता रट्टा मारून गेलो तर समोरचा विश्वास ठेवत नाही. आपल्या दिसण्या-बोलण्यावरून ज्ञान आणि अनुभवाचा अंदाज घेतला जातो. त्या क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभव आपल्याला असल्याची खात्री पटली, तरच समोरचा माणूस विश्वास ठेवून काम देतो. सोळाव्या दिवशी एका आर्किटेक्टच्या केबिनमधील मागच्या ब्लाइंड्सकडे हात दाखवून ते म्हणाले, ‘हे खराब झाले आहेत, हे दुरुस्त करून देशील का?’ मी लगेच हो म्हणून स्वतःच ते ब्लाइंड्स उतरवले आणि घरी घेऊन आलो. ते बदलून स्वच्छ करून, केबिनमध्ये पुन्हा नेऊन बसवले. या कामातून मला चारशे रुपयांची पहिली कमाई मिळाली. कामाचं बिल बनवताना कंपनीचं नाव काय ठेवावं याचा विचार केला. सजावटीला पारंपरिक शब्द आहे ‘साजशृंगार’. त्यातील शृंगार हे नाव मोठ्या भावाकडे होतं म्हणून मी आमच्या व्यवसायासाठी नाव निवडलं ‘साज’.
सुरुवातीच्या काळात नवीन क्लायंट जोडण्यासाठी मी नरीमन पॉइंटच्या कोणत्याही इमारतीत लिफ्टने टॉप फ्लोअरला जायचो आणि जिन्याने एकेक मजला खाली येऊन जिथे काम सुरू आहे, अशा ऑफिसेसमध्ये व्हिजिटिंग कार्ड सोडून यायचो. मदत करायला मित्रही सोबत असायचे. एकदा मित्र राजेश कुचिक म्हणाला, मलाही तुझ्या धंद्यात सहभागी व्हायचं आहे. काही तुरळक ऑर्डर वगळता हाताशी फार काम नव्हतं. त्याला म्हटलं, दोघांनी मिळून धंद्यासाठी भरपूर मेहनत करू. बाकी जे होईल ते होईल. आम्ही पार्टनर म्हणून एकत्र कामाला सुरुवात केली.
राजेश कुचिक म्हणाले, ‘सर्वसाधारणपणे मराठी माणूस धंद्यात पडत नाही. मी मात्र ठरवूनच धंद्यात पडलो. शिक्षण पूर्ण केल्यावर मी शालेय क्लासेस चालवायचो. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून मी इंटेरियरचा कोर्स केला होता. त्यामुळे संतोषसोबत कामासाठी फिरताना मलाही त्यात रुची निर्माण झाली. तरूण वयातल्या रिस्क घ्यायच्या जोशात क्लासेस बंद करून याच धंद्यात उडी मारली.’ काही दिवस घरून काम केल्यावर दादर मार्केटमध्ये बॉब्सन मेन्स वेअर या टेलरिंग दुकानाचा पत्ता आम्ही व्यवसायासाठी घेतला. काही महिन्यानंतर राजेश गंधेकर त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. मराठी माणूस मराठी माणसाला मदत करत नाही, अशी समजूत आहे. पण संतोष तातुसकर आणि राजेश गंधेकर या दोन्ही मराठी मित्रांनी माझ्याकडून एकही रुपया घेतला नाही. राजेशने तर त्याच्या ऑफिसमधली एक टेबल स्पेस जागा मला मोफत दिली. कामासाठी पैसे कमी पडले तर तो म्हणायचा, माझ्याकडून पैसे घेऊन जा, ऑर्डर पूर्ण कर आणि पैसे आल्यावर मला परत कर.
सुरुवातीला आम्हाला फारसा अनुभव नसताना, आमच्यावर विश्वास ठेवून उदय मांद्रेकर, प्रकाश फडणीस, खोजेमा चित्तलवाला या आर्किटेक्ट्सनी कामं दिली, अनेक रेफरन्स दिले. यांच्यामुळेच आमच्या कंपनीचा पाया भक्कम झाला. आर्किटेक्ट मांद्रेकर सरांकडे तेव्हा रबाळे आणि अंबरनाथ एमआयडीसी इंडस्ट्रियल एरियात औषधांची फॅक्टरी बनवण्याचे काम होतं. त्यांनी आम्हाला फ्लोरिंगची कामं दिली. पैसे वाचवण्यासाठी आम्ही टेम्पो न करता, मुंबईहून सामान घेऊन बाईकने साईटवर जायचो. मेजरमेंट घेणे, माल पोहचवणे, कारागिराकडून काम पूर्ण करून घेणे अशी हेल्परपासून मालकापर्यंतची सगळी कामं केली. इन्स्टॉलेशन करणारे करागीर काम सागितलं की चढ्या आवाजात बोलायचे, ‘आज काम पूर्ण होणार नाही, माल खालून वर आणणे हे आमचं काम नाही.’ अशावेळी शंभर किलोचे कार्पेट रोल आम्ही खांद्यावर उचलून चार माळे चढवले. रबाळे आणि अंबरनाथची साइट आली की काम संपायला रात्री बारा आणि एक वाजणार, हे आम्ही गृहीत धरूनच चालायचो. साधं शंभर फुटाचं काम करायला आम्हाला दोन रात्री लागायच्या. अनुभव नसतो तेव्हा कारागीर सांगतील तेच ऐकावं लागतं. आज अनुभव गाठीशी असताना ज्या त्या कामासाठी बेस्ट कारागीर निवडून त्याच्याकडून आम्ही ते करून घेतो. त्यामुळे आज हजार फुटाची साइट एका दिवसात तयार करण्याची आमची तयारी आहे. इतक्या वर्षात सर्वोत्तम काम करणारी माणसं निवडून अमोल देवरुखकर, आदेश ईडेकर, विजय घरवे, शैलेश घरवे, आकाश मांजरेकर अशी आमची टीम तयार झाली आहे.
आम्ही मराठी मुलानांच प्राधान्य देतो. कितीही मोठं काम असलं तरी एकदा समजावल्यानंतर ही माणसं ते पूर्ण करून येतात. त्याचा फॉलोअप घ्यायचीही गरज नसते. अक्रमुल्ला खान या बुजुर्ग कारागीराला तर आमच्या व्यावसायिक वयाच्या दुप्पट अनुभव आहे. साइट सर्वे करून हे काम होणार नाही, असं मुल्लाजींनी सांगितलं तर आम्ही सरळ ग्राहकाला अडचण सांगतो आणि त्यावर उपाय शोधून पुढे जातो. कारागीरांच्या अनुभवावर आमची भिस्त असते.
फॅक्टरीत फ्लोरिंगवर केमिकल सांडू शकतं, ट्रॉलीवरून सामानाची ये-जा होते या बाबी लक्षात घेऊन तिथे सिंगल लेअर असलेलं होमोजिनिअस कार्पेट लावावं लागतं. तर घरासाठी हेट्रोजिनिअस कार्पेट लावतात. त्याची जाडी किमान दीड मिलिमीटर असावी, जेणेकरून ते आठ-दहा वर्षं टिकेल असं आम्ही सांगतो. काही दुकानदार स्वस्तात अर्धा मिलिमीटर जाडीचं कार्पेट विकतात, ते एका वर्षात खराब होऊ शकतं. कार्पेटमध्ये गालिचा (वॉल टू वॉल), रोल फॉर्म, टाइल
फॉर्म… असे अनेक प्रकार येतात.
कॉर्पोरेट ऑफिसेस आणि उच्चभ्रू वर्गातील लोकांच्या घरात खिडक्यांना पडद्याऐवजी ब्लाइंड्स लावण्याकडे कल असतो. ब्लाइंड्समध्ये व्हर्टिकल (वरून खाली लाइन्स असतात), रोलर (रोल होणारी), रोमन ब्लाइंड्स (स्टेप बाय स्टेप घडी पडून वर खाली जाते), प्लीटेड (एकच ब्लाइंडमध्ये दोन पडदे टाकून प्रकाश आणि ब्लॅक आऊट करता येतो), मोटराइझ्ड (रिमोटवर चालणारा पडदा), झेब्रा ब्लाइंड्स (प्रकाश येऊ देणे किंवा बंद करणे हे दोन्ही पर्याय वापरू शकता) यातील निवड करता येते. या ब्लाइंड्सचे उत्पादन आम्ही स्वतः करतो.
ऑफिस आणि घरातील भिंतींना वॉलपेपर लावण्याचा ट्रेन्ड गेली अनेक वर्षे चालत आहे. त्याद्वारे कमीत कमी वेळात हव्या त्या डिझाइनने घर सजवलं जाऊ शकतं, तेही डस्ट फ्री. विनाइल, पेपर, फॅब्रिक, गवत, फॉइल, बांबू आणि इतर अनेक सामग्रींपासून वॉलपेपरमध्ये हजारो डिझाइन्स उपलब्ध आहेत. कागदी वॉलपेपर सर्वसामान्यांना परवडणारे असतात. पीव्हीसी-कोटेड वॉलपेपर ओलावा-प्रतिरोधक आहेत तर फॅब्रिक वॉलपेपर डाग-प्रतिरोधक आणि उष्णतारोधक असतात. रेशीम आणि तागाचे कापड भिंतींना रॉयल लुक देतात. तुम्ही आवडीनुसार फोटो, चित्र, अक्षरे यांचा वॉलपेपर बनवून घेऊ शकता किंवा
बोटॅनिकल, फ्लोरल, पट्टे, थ्रीडी, विंटेज आणि मेटॅलिक पॅटर्नमधील डिझाइन आणि रंग निवडू शकता. लाकूड, फरशा, संगमरवर किंवा विटांसारखे दिसणारे वॉलपेपर तर लोक अनेक वर्षांपासून घरात लावत आहेत. चांगल्या प्रतीचा वॉलपेपर व्यवस्थित बसवल्यास आणि भिंतीवर ओलावा नसल्यास आठ ते दहा वर्षं सहज टिकू शकतात.
ही माहिती देऊन राजेश कुचिक म्हणाले, सहा वर्ष राजेश गंधेकरच्या दादर ऑफिसमधून व्यवसाय करत होतो. व्यवसायात हळूहळू जम बसत होता. २००७ साली वडाळा टेलिफोन एक्स्चेंजजवळ स्वतःचं पहिलं ऑफिस सुरू केलं. एका वर्षातच त्याच्या बाजूची जागाही घेतली. एक दिवस संतोष सातुसकरचा फोन आला. दादर मार्केटमध्ये एक जागा रिकामी झाली आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तू ती सोडू नकोस. ती जागा होती हिंदी सिनेमातील प्रसिद्ध एडिटर व्ही. एन. मयेकर यांची. त्या जागेत २०१२ साली दादर मार्केटमध्ये आमचं शोरूम सुरू झालं. जाता येता लोक शोरूममध्ये येऊन सॅम्पल बघून जायची, पण तीन महिने झाले तरी एकही ऑर्डर हातात नव्हती. आम्हाला टेन्शन आलं, आपण दरमहा ३६ हजार रुपये भाडं भरतोय. आतापर्यंत एक लाख रुपये भाडं भरलंय, पण ऑर्डर नसेल तर कसं होईल. जुन्या कामातून पैसे मिळत होते. चौथ्या महिन्यापासून मात्र कामं यायला सुरुवात केली. तीन महिन्यांत येऊन गेलेलेच ग्राहक होते. त्यातून लक्षात आलं की लोक घर घ्यायचा विचार करतात, तेव्हापासूनच घराला कशी सजावट करता येईल हे पाहण्यासाठी मार्केट फिरत असतात. घराचं इंटरियर पूर्ण होतं तेव्हा ते फिनिश प्रोडक्टसाठी आमच्याकडे येतात. यामुळेच दुकानात येणार्या प्रत्येक ग्राहकाला तो घराचे काम आज करेल की चार महिन्यांनी, याचा विचार न करता सजावटीचे सर्व प्रकार दाखवणे आणि त्याबद्दल योग्य सल्ला देणे हे काम आम्ही प्रामाणिकपणे करतो. एकदा सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन परत येताना मला वाटेत जनता सहकारी बँकेत फर्निचरचे काम सुरू असलेले दिसलं. राजाराम आयगल यांच्याकडे त्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट होतं. मी त्यांना भेटून कॅटलॉग दाखवले. त्यांनी बँकेचं काम आम्हाला दिलं. कामाची क्वालिटी आणि वक्तशीरपणा पाहून त्यांनी नंतरही आम्हाला अनेक कामं दिली.
काही कटू अनुभव देखील आले. एक काम पूर्ण होईपर्यंत मालक अगदी गोड बोलत होते, पण काम पूर्ण होऊन पैसे द्यायची वेळ आल्यावर मात्र त्यांनी आमचा फोन घेणे बंद केलं. सोसायटीचा वॉचमन आत सोडेना.
ते पैसे बुडाले. अर्थात सगळेच लोक असे नसतात. व्यवसायात ९५ टक्के लोक चांगलेच भेटतात, पाच टक्के लोक असे असतात. काही कॉन्ट्रॅक्टर तर लोकांना फसविण्यासाठीच या धंद्यात आहेत. नवीन मुलांना सुरुवातीला मोठी ऑर्डर मिळण्याचं अप्रूप असतं, त्याचाच हे लोक फायदा उठवतात. असे अनुभव घेतल्यानंतर काम करण्याआधी अॅडव्हान्स घेणे, मटेरियल ग्राहकाकडे पोहोचताच कामाचे संपूर्ण पैसे घेणे, काम देणार्याची योग्य पारख हे करू लागलो.
कोणतेही काम सुरू करण्याआधी आम्ही जागेची पाहणी करतो. घराची भिंत खडबडीत असल्यास वॉलपेपर न लावण्याचा सल्ला देतो. पुट्टी वगैरे लावून भिंत प्लेन करून घ्यायला सांगतो. भिंत ओलसर असल्यास आधी सिमेंट शीट लावून नंतर वॉलपेपर लावायला सांगतो. यामुळे काही वेळा ग्राहकाला असं वाटतं की आम्ही मुद्दामून त्यांचं काम टाळतोय. पण खरं कारण सांगणं आणि त्याप्रमाणे सल्ला देणं हे आमचं काम आहे. सनकंट्रोल फिल्म लावताना आम्ही गरवारे ब्रँड सांगितला तर तोच लावतो, चायनाचा लावत नाही. ओरिजिनल फिल्म कशी ओळखायची याबाबत ग्राहकांना सजगही करतो. आमचा फायदा होतोय म्हणून ग्राहकांचं नुकसान आम्ही कधीच करत नाही. हे खरं तर आपल्या मराठी जीन्समध्येच नाहीये. कदाचित यामुळेच मराठी माणसाला धंदा करता येत नाही, असं म्हणतात. आपण खोटं बोलून धंदा करत नाही. मला वाटतं मार्केटमध्ये इतर लोकांचा अनुभव घेऊन ग्राहकांनाही हळूहळू पटू लागलंय की मराठी माणसाकडून काम करून घेतलं तर क्वालिटीत फसवणूक होणार नाही.
गेली २६ वर्ष आम्ही हे काम करत आहोत. आमच्याकडे आलेला ग्राहक आयुष्यभरासाठी जोडला जातो. या व्यवसायाचं कुठे प्रशिक्षणकेंद्र नाहीये. प्रत्येकजण हे काम करत करत शिकतो. आमच्या अनुभवाचा उपयोग या क्षेत्रात येऊ पाहणार्या तरुण पिढीला व्हावा यासाठी आम्ही आमचे प्रॉडक्ट सॅम्पल्स घेऊन आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी जातो. कारण कागदावर शिकणं वेगळं आणि प्रत्यक्षात बघणं वेगळं. प्रॉडक्ट अवेअरनेससाठी, प्रॉडक्टची विविधता आणि उपलब्धता, प्लस पॉइंट-मायनस पॉईंट यांचे प्रात्यक्षिक आम्ही या मुलांना विनामूल्य देतो. ‘महाराष्ट्र व्यापारी पेठ‘मध्ये आम्ही तीन वर्षे स्टॉल लावला, पॅम्प्लेट वाटली. पेठेत स्टॉल लावून आता चार वर्ष झाली. आजही जुनी पॅम्प्लेट घेऊन ग्राहक येतात आणि कामं देतात. अंतर्गत सजावट क्षेत्रात रोज नवनवीन ट्रेंड्स येत असतात. ग्राहक मागणी करतील ती प्रत्येक गोष्ट आमच्याकडे हवी यासाठी स्वतःला अपडेटेड ठेवावं लागतं. आर्किटेक्चर, इंटिरियरच्या प्रदर्शनांना आम्ही हजेरी लावतो. तिथे नवीन गोष्ट आवडल्यास तिथे कार्ड सोडून द्यायचं. मग ती कंपनी आपल्याला ई-मेलने त्यांच्या प्रॉडक्ट्सबद्दल माहिती देते किंवा दुकानात त्यांचा सेल्समन व्हिजिट करून सॅम्पल ठेवून जातो. या व्यवसायात फार भांडवल हाताशी ठेवावं लागत नाही. ग्राहकाचं घर पूर्ण झाल्यानंतर आमचं काम चालू होतं. ते साधारणपणे दोन ते तीन दिवसात आणि फार मोठी ऑर्डर असेल तर एक आठवड्यात पूर्ण होतं. आमच्याकडे सर्व फिनिश्ड प्रोडक्ट्स आहेत. वॉलपेपर, कार्पेट, सन कंट्रोल फिल्म, वूडन फ्लोरिंग, आर्टिफिशियल ग्रास, व्हर्टिकल गार्डनिंग, डेक फ्लोरिंग, वॉल स्टिकर, कोलॅप्सिबल मॉस्किटो नेट लावून देण्याचं काम साज डेकोरमध्ये केलं जातं.’
प्रत्येकाला आपलं घर इतरांपेक्षा वेगळं दिसायला हवं असतं. त्यामुळे या व्यवसायात बाराही महिने तेजी असते. या क्षेत्रात तरूण मुलांसाठी चांगली संधी आहे. सुंदर आणि टिकाऊ काम करण्याची कला साधली तर इथे यश पक्के. राजेश कुचिक आणि संतोष विसपुते यांनी व्यवसायाची पार्श्वभूमी आणि गाठीशी भांडवल नसताना मेहनत आणि हुशारीवर मराठी माणूस धंद्यात यशस्वी होऊ शकतो हे दाखवून दिलं आहे.