शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जीवनाचे विविध पैलू दर्शवणारे ‘निश्चयाचा महामेरू’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे संपन्न झाले. या पुस्तकाचे लेखन, संपादन पत्रकार व साप्ताहिक ‘मार्मिक’चे स्तंभलेखक योगेंद्र ठाकूर यांनी केले असून मारुती साळुंखे यांनी सहाय्य केले आहे. आमोद प्रकाशनातर्फे आयोजित या सोहळ्यात शिवसेना नेते भास्कर जाधव, विधान परिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, सचिव/खासदार विनायक राऊत, सचिव/खासदार अनिल देसाई, उपनेते आमदार सचिन अहिर, उपनेते रवींद्र मिर्लेकर आणि वितरक सेनेचे दिलीप ब्राह्मणे आदी उपस्थित होते.
‘निश्चयाचा महामेरू’ या पुस्तकात उद्धव ठाकरे यांचा थोडक्यात परिचय तर आहेच, पण त्याशिवाय उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व, मराठी बाणा, महाराष्ट्र व राष्ट्र, शेती आदींवरही भाष्य आहे. त्यांची काही भाषणे व मुलाखतींचाही यात समावेश आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. या अडीच वर्षांच्या काळातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचाही थोडक्यात उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे. याशिवाय शिवसेना नेते, खासदार, आमदार, पदाधिकारी, लेखक, पत्रकार आदींनीही उद्धव ठाकरे यांच्याविषयी लेख लिहून या पुस्तकात त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे.