ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले पुण्यात अत्यवस्थ असताना अचानक सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूची बातमी व्हायरल झाली. त्यांचे कुटुंबीय आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्याकडून अधिकृतपणे कसलेही निवेदन जारी केले गेलेले नसताना त्यांना आदरांजली वाहण्याची अहमहमिका लागली. हा सगळा प्रकार पाहिल्यावर अनेकांना १९७९ साली याहून मोठ्या प्रमाणावर झालेली अशीच नाचक्की आठवली असेल. आणीबाणीविरोधी लढ्याचे जननायक जयप्रकाश नारायण यांचे मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे, अशी बातमी संसदेत अधिवेशनात सांगितली गेली. त्यांना आदरांजलीही वाहिली गेली. ते जिवंत आहेत, हे त्यानंतर कळले आणि जनता पक्षाच्या सरकारवर नामुष्कीची वेळ ओढवली. बाळासाहेबांनी संतप्त होऊन काढलेल्या या जबरदस्त व्यंगचित्रात मृत्यूची काळी चौकट लाथ मारून तोडणारे जयप्रकाश नारायण दिसतात आणि त्या चौकटीचे फळकूट डोक्यावर आदळलेले पंतप्रधान मोरारजीभाई देसाईही दिसतात… त्यांच्यावर बाळासाहेबांचं व्यंगचित्रकार म्हणून किती ‘प्रेम’ होतं, तेही दिसतं.