इतिहासाचार्य राजवाडेंनी चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंवर केलेल्या आरोपांची उत्तरं देताना प्रबोधनकारांनी महाराष्ट्राच्या इतिहासाकडे बघण्याची नवी दृष्टीच मांडली आहे. ते करताना त्यांनी छत्रपती संभाजीराजांच्या बदनामीचं खंडन केलंय.
– – –
महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांचा विरोध असताना काशीहून गागाभट्ट बोलावून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक घडवून आणण्याचं श्रेय प्रबोधनकार स्वराज्याचे चिटणीस बाळाजी आवजी यांना देतात. त्याचे पुरावेही ते देतात. त्यांच्या या कृत्यामुळे ब्राह्मणांनी बाळाजींविरुद्ध आणि एकूणच त्यांच्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाला नामोहरम करण्यासाठी कारस्थानं केली. त्यातून ब्राह्मण विरुद्ध कायस्थ असा संघर्ष सुरू झाला. तो सतत चालूच राहिला. त्याचाच एक भाग म्हणजे इतिहासाचार्य राजवाडे यांनी कायस्थांची केलेली बदनामी, अशी मांडणी प्रबोधनकारांनी `कोदंडाचा टणत्कार` ग्रंथात केलीय.
राजवाडेंनी `कायस्थ धर्मदीप` या पोथीचा आधार घेऊन कायस्थांचं कूळ हलकं असल्याचा दावा केला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करत प्रबोधनकारांनी फक्त ऐतिहासिक आरोपांना उत्तरं दिली आहेत. त्यातला पहिला आरोप हा छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा होता. बाळाजी आवजींनी चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंसाठी विधिवत उपनयनाचा म्हणजे मुंजीचा आग्रह धरला. तो अधिकार देण्याविषयीचा खटला संभाजी राजांनी चालवला. त्यांनी चांद्रसेनीय कायस्थ हे क्षत्रिय नसल्याचं मत दिलं. त्यामुळे कायस्थांनी संभाजी महाराजांच्या विरोधात कारस्थानं रचली आणि त्यातून संभाजीराजांचा शेवट झाला, असं या आरोपाचं स्वरूप होतं.
राजवाडेंनी केलेला आरोप हा बिनबुडाचा असल्याचं प्रबोधनकारांनी सिद्ध केलं. मुळात शिवाजी महाराज अशा गुंतागुंतीच्या विषयावरील न्यायनिवाड्याची जबाबदारी अवघ्या बारा वर्षांच्या संभाजीराजांवर टाकतील, अशी शक्यता नसल्याचं त्यांचं मतही सहज पटण्यासारखं आहे. इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांनी भारत इतिहास संशोधन मंडळातही या मुद्द्यावर चर्चा घडवून आणली. त्यातही राजवाडेंकडे त्यांच्या आरोपाला आधार देता येईल, असा कोणताही पुरावा नसल्याचं उघड झालं. त्यामुळे राजवाडेंचं कायस्थांविरुद्धचं मूळ गृहितकच चुकीचं ठरलं. उलट खंडोबल्लाळांसारख्या कायस्थांनी छत्रपती संभाजी आणि राजाराम यांच्या काळात स्वराज्याशी कसं इमान राखलं, याचा इतिहासच प्रबोधनकारांनी मांडला. त्यातून राजवाड्यांचा खोटेपणा उघड केला.
राजवाडे यांच्या आरोपाला उत्तर देताना प्रबोधनकारांनी संभाजीराजांच्या इतिहासाचा थोडक्यात मागोवा घेतला. त्यातून राजवाडे कंपूतल्या इतिहासकारांनी संभाजीराजांचं चरित्र विपर्यस्त लिहिल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला. प्रबोधनकार लिहितात, `आम्ही प्रतिज्ञापूर्वक सांगू शकतो की राजवाड्यांना संभाजीकालीन इतिहासाचा श्रीगणेशासुद्धा अजून उमगलेला नाही. अलीकडे प्रो. जदुनाथ सरकार वगैरे संशोधकांनी संकलित केलेल्या साहित्यावरून असे स्पष्ट दिसते की उपलब्ध संभाजीचे चरित्र अत्यंत विपर्यस्त आहे. तो जितका क्रूरकर्मा, व्यभिचारी, व्यसनी किंवा उतावळा म्हणून रंगविण्यात आलेला आहे, तसा वास्तविक प्रकार आता दिसत नाही. संभाजीविरुद्ध कारस्थाने लढविणार्या कंपूने स्वतःवरील राज्यक्रांतीचे पाप टाळण्यासाठी संभाजीविषयी भलभलत्या कंड्या उलटविल्या व त्या बखरींत उमटविल्या, असे सिद्ध होण्यास आता फारसा अवकाश नाही.`
प्रबोधनकार फक्त भाकीत करून शांत बसले नाहीत, तर त्यांनी पुढे संभाजीराजांची बदनामी दूर करण्यासाठी इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांचे महत्त्वाचे लेख `प्रबोधन`मध्ये छापले. संभाजीराजांचं खरं कर्तृत्व जगासमोर आणण्याच्या अगदी सुरुवातीच्या प्रयत्नांपैकी ते एक असावेत. `कोदंडाचा टणत्कार` या ग्रंथातही प्रबोधनकारांनी संभाजीराजांवरच्या अनेक आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात दिलेरखानाशी हातमिळवणी, सोयराबाई आणि अष्टप्रधान मंडळाशी क्रूर वागणूक, ब्राह्मण मुलीची अब्रू लुटणं असे आरोप आहेत. त्याविषयी त्यांचा तर्क असा आहे, `संभाजीला ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व मुळीच मान्य नसल्यामुळे आणि तो आपली डाळ मुळीच शिजू देणार नाही, ही मोरोपंतादि ब्राह्मणांची खात्री असल्यामुळे सोयराबाईच्या कारस्थानाकडे एकादिलाने वळण्यापलीकडे त्यांना गत्यंतरच नव्हते. यांत कसली स्वराज्यनिष्ठा आणि राजनिष्ठा?`
कायस्थांनी राघोबादादाला साथ दिल्याची परिणती नारायणराव पेशव्याच्या खुनात झाल्याचा आरोप खोडून काढण्यात प्रबोधनकारांना फारसे प्रयत्नही करावे लागलेले नाहीत. त्यासाठी त्यांनी नारायणरावाच्या व्यभिचाराचे, कुकर्मांचे आणि व्यसनाधीनतेचे धिंडवडेच काढले आहेत. नारायणरावाची आई गोपिकाबाईंच्या कारस्थानी स्वभावाचीही माहिती यानिमित्ताने त्यांनी समोर ठेवली आहे. पेशवाईचे गुणगान गायले जाण्याच्या आणि नारायणरावाला निरागस नायक ठरवण्याच्या काळात हे वाचकांसाठी धक्कादायक होतं.
कायस्थांवरचे शेवटचे दोन आरोप हे दुसर्या बाजीरावाच्या विरुद्ध सातारा गादीचे छत्रपती प्रतापसिंह यांच्यावतीने इंग्रजांशी संधान बांधल्याचे आणि त्याचा शेवट छत्रपतींच्या पदभ्रष्टतेत झाल्याचा आहे. या आरोपाच्या निमित्ताने प्रबोधनकारांनी मराठेशाहीच्या अखेरच्या काळातल्या इतिहासाचा ध्यासच घेतला. छत्रपती प्रतापसिंह यांचे सहकारी रंगो बापूजी हे त्यांच्या संशोधनाचे नायकच बनले. तेव्हाच्या शंभर वर्षांपूर्वीचा खरा इतिहास लोकांना माहीतच नव्हता. प्रबोधनकारांनी तो फक्त या ग्रंथातच मांडला नाही, तर गावोगाव भाषणं देत लोकांना सांगितला. त्यावर छोटी पुस्तकं आणि लेखही लिहिले. शेवटी त्यांनी छत्रपती प्रतापसिंह आणि रंगो बापूजी यांचं चरित्रच लिहिलं. इतिहासलेखनाच्या दृष्टीने ते त्यांचं कदाचित सर्वात महत्त्वाचं पुस्तक ठरलं. छत्रपती शाहू महाराजांनी मृत्यूशय्येवर असताना त्यांच्याकडून हे पुस्तक लिहिण्याचं वचनच घेतलं होतं. त्यावरून त्याचं महत्त्व लक्षात येऊ शकतं. या पुस्तकाचं सूतोवाच `कोदंडाच्या टणत्कार`मधे झालेलं आहे, म्हणून हे पुस्तकही तितकंच महत्त्वाचं ठरतं.
छत्रपती शिवरायांच्या काळातल्या एका निवाड्याच्या आधारे प्रबोधनकार चांद्रसेनीय कायस्थ हे क्षत्रिय असल्याचं सिद्ध करतात. त्यांना त्याविषयी कुठेही शंका नाही. त्यावर ते लिहितात, `आम्ही राजवाड्यांना व त्यांच्या घमेंडखोर मताच्या ब्राह्मणांना प्रतिज्ञापूर्वक सांगतो की कोणत्याही काळचा कायस्थ प्रभू वाटेल ती शिवी गाळी सहन करून शिवराळाला क्षमा करील. पण त्याला कोणी ब्राह्मण उपाधी चिटकवू म्हणेल तर तो त्याच्या नरडीचा घोट घेईल.` फक्त राजवाडेंच्या आरोपांना उत्तर देऊन प्रबोधनकार शांत बसले असले तर आश्चर्यच होतं. त्यांनी राजवाडेंच्या निमित्ताने चित्पावनांवर टीकेच भयंकर आसूड ओढलेत. चित्पावन त्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर होते. तरीही ते करताना प्रबोधनकार कुठेही बिचकलेले नाहीत. ते कोणाचीही तमा न बाळगता त्यांना कळलेल्या सत्याच्या बाजूने उभे राहिलेले दिसतात.
प्रबोधनकारांनी केलेली टीका मूळ पुस्तकात संदर्भांच्यासह वाचणं योग्य. पण त्याचं सार म्हणता येईल अशी छत्रपती शाहू महाराजांशी झालेली चर्चा प्रबोधनकारांनी पुस्तकाच्या शेवटी दिली आहे. ती प्रबोधनकारांच्याच शब्दांत वाचायला हवी, `कै. शाहू छत्रपती एकदा प्रस्तुत लेखकाला म्हणाले, `ऑ. गोखले मोठे पेट्रियट खरे. पण मला ते एकदा पुण्याच्या स्टेशनवर भेटले असताना मी माझ्या चळवळीची दिशा त्यांना सांगितली. बहुजनसमाज जागृतीचे तत्त्व अक्षरश: मान्य करून ते मला किंचित ठासून म्हणाले की हा प्रयत्न करताना ब्राह्मणांसारख्या जागृत समाजाला डिवचण्याचा यत्न करू नका. Don`t try to tease the articulate community like Brahmins. सारांश टिळक झाले काय किंवा गोखले झाले काय, सर्वांच्या पेट्रिऑटिझममध्ये ब्राह्मणी वर्चस्वाचा एक रिझर्व कम्पार्टमेंट आहे. त्याला कोणी हात लावूं नका म्हणतात. ब्राम्हणांनी आपल्या वर्चस्वाचा टेंभा मिरविण्याचे सोडल्याशिवाय किंवा ब्राम्हणेतरांनीच ब्राम्हणांना दूर झुगारून दिल्याशिवाय ब्राम्हणेतरांना आत्मोद्धाराचा मार्ग कसा चोखाळता येईल, हे मला समजत नाही. कितीही केले तरी ब्राम्हण अखेर आपल्या जातीवरच जातो, याचे मी प्रत्यक्ष अनुभवाचे लाख दाखले देईन. मग ठाकरे साहेब, तुमचें मत काहीही असो.` हा किस्सा सांगून प्रबोधनकार शाहू महाराजांच्या म्हणण्याला दुजोरा देतात.
अशा निष्कर्षाला आल्यानंतर प्रबोधनकार ग्रंथाच्या शेवटी बहुजन समाजाला इशारा देतात. तो फार महत्त्वाचा आहे, `आजचे राजकारण क्षुद्र भिक्षुकी आहे. आचारी पाणक्यांना देशभक्त आणि माथेफिरू पिसाटांना महर्षि किंवा सेनापती बनविणार्या या राजकारणाच्या धांगडधिंग्यात महात्मा गांधींसारखा लोकोत्तर संन्याशीही वैतागून गेला, मग इतरांची काय क्षिती? राजवाड्यांचा उपद्व्याप वरवर पाहणार्याला वैयक्तिक दिसेल, एका कायस्थ ज्ञातीपुरता संकुचित वाटेल. किंवा त्याचे महत्त्व दिवाणखाणी गप्पापुरते अगर वर्तमानपत्री नियमित भासेल, परंतु हे एक अतिव्यापक डावपेचांचे सामुदायिक पाठबळांचे भयंकर भिक्षुकी कारस्थान आहे. एवढे ब्राह्मणेतर जनतेला जर नीट पटेल तर ब्राह्मणांच्या नानाविध ढोंगधतुर्यांना बळी पडणार्यांची संख्या पुष्कळच कमी होईलच, अशी आशा आहे.`
प्रबोधनकारांनी हा इशारा दिल्याला शंभराहून जास्त वर्षं झाली. पण ब्राह्मणेतर आजही भिक्षुकी कारस्थानांना बळी पडत आहेतच. मग ती कारस्थानं धार्मिक असोत, सांस्कृतिक असोत किंवा राजकीयही असोत. त्याची उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसत आहेतच.