• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

खरी महाशक्ती उद्धवजींच्या पाठिशी!

(संपादकीय २ जुलै २०२२)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 30, 2022
in संपादकीय
0

शिवसेनेतून बंडखोरी करून सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेले नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचे मनोबल वाढवण्यासाठी केलेल्या एका भाषणात ‘आपल्यामागे एक महाशक्ती आहे, ती आपल्याला कधीही, काही कमी पडू देणार नाही,’ असे विधान केल्याचे प्रसिद्ध झाले. पाठोपाठ हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद ही ती महाशक्ती आहे, असा केविलवाणा खुलासाही शिंदे यांनी केला… तो केविलवाणा अशासाठी की शिंदे हे दावे करत होते, तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षा’ हे निवासस्थान सोडत होते आणि तिथे जमा झालेली शिवसेनेची महाशक्ती- सर्वसामान्य शिवसैनिक आणि मुख्यमंत्र्यांवरील प्रेमापोटी जमलेले इतर सर्वसामान्य नागरिक गहिवरून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत होते… ‘मातोश्री’पर्यंतच्या त्यांच्या प्रवासात वाटेत थांबून त्यांना मायबाप जनतेचे आशीर्वाद स्वीकारावे लागत होते…
शिवसेनाप्रमुखांनी उभी केलेली महाशक्ती तर थेट उद्धवजींच्या पाठिशी होती… मग शिंदे यांच्या पाठिशी जी उभी आहे असे ते म्हणतात ती महाशक्ती कोणती आहे? आज ती त्यांच्यामागे का आहे?
ही महाशक्ती मोठी लबाड आहे, ती आधी ठरावीक लोकांच्या पाठी लागते, त्यांचे जिणे मुष्कील करते आणि त्यांना पुरते जीर्ण विदीर्ण केल्यानंतर त्यांच्या पाठिशी उभी राहते… म्हणजे तसा देखावा उभा करते… ही महाशक्ती हे सगळे उपद्व्याप करते ते एकाच हेतूने- या दिवाभीत महाशक्तीला त्या माणसाच्या खांद्यावर आपली बंदूक ठेवायची असते आणि राजकीय शिकार साधायची असते… शिकार साधली तर आमच्या बंदुकीने साधली, नेम चुकला तर त्या माणसाच्या खांद्याचा नेम चुकला, अशी ही व्यवस्था! ही नुसती नावाचीच महाशक्ती- हिच्यात समोरून लढण्याची हिंमत नाही आणि ताकद नाही; कायम दुसर्‍यांच्या मेंदूंचा कब्जा करून त्यांची मनगटं भाड्याने मिळवायची आणि त्या माध्यमातून कार्य साधून आपण नामानिराळे, शुचिर्भूत राहायचे, ही तिची अनेक वर्षांपासूनची भ्याड कार्यपद्धती आहे. शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना पीळ दिला आणि शिवसेनेने ज्यांच्यात सर्व प्रकारचे बळ निर्माण केले, त्यांतली काही कचखाऊ, भाडोत्री मनगटे आज महाराष्ट्राच्या मुळावर उठलेल्या या महाशक्तीच्या तालावर ताताथय्या करत आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी त्यांच्या या गद्दारीची अनेक कारणे दिली आहेत. ती एकाहून एक हास्यास्पद आहेत. करूण आहेत. मुख्यमंत्री आपल्याला भेटत नाहीत, आपल्या अडीअडचणी समजून घेत नाहीत, त्यांच्याभोवती कोंडाळे आहे, पुरेसा निधी आपल्या मतदारसंघाला मिळत नाही, तो अर्थ खात्याकडून अडवला जातो आणि ज्यांच्याविरोधात लढलो, त्यांच्यासोबत सत्तेत बसण्याची वेळ आली आहे, अशा आशयाच्या या तक्रारी आहेत. एकतर, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले तसे, या तक्रारी मुंबईतच बैठक बोलावून त्यांच्या कानावर त्या घालणे सहज शक्य होते. त्यासाठी तथाकथित महाशक्तीच्या मदतीने आधी सुरतला आणि मग तिथूनही दूर गुवाहाटीला पळून जाण्याची गरज काय होती? पक्षप्रमुखांपुढे तक्रार मांडायची नाही, ती वेगळ्या राज्यात जाऊन, कडेकोट बंदोबस्तात बसून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मांडायची आणि त्यांनी सामोपचाराने चर्चेसाठी समोर बोलावल्यानंतर एकदम आमचा गट हीच खरी शिवसेना असा दावा करायचा, यात काही संगती लागत नाही.
ती लागत नाही, कारण ती संगती नाहीच. शिवसेनेने तथाकथित हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षाबरोबर ताबडतोब युती करावी, आज आपल्या हातात असलेले आणि पुढची अडीच वर्षे आपल्याकडेच राहणार आहे, असे मुख्यमंत्रीपद सोडायचे आणि भाजपला मुख्यमंत्रीपद देऊन आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायचे, त्यातून पक्षाचे, महाराष्ट्राचे आणि हिंदुहिताचे भले होईल, अशी ही कल्पना आहे. शिवसेनाप्रमुखांच्या काळात युती झाल्यापासून त्यांच्या करिश्म्याच्या आधारावर राज्यभर पाळेमुळे विस्तारणार्‍या आणि ती विस्तारल्यावर शिवसेनेला संपवण्याचे हरतर्‍हेने प्रयत्न करणार्‍या दगाबाज भाजपबरोबर शिवसेनेने यायलाच हवे, असा शिंदे यांचा हट्ट आहे. अडीच वर्षे नगरविकास खात्यासारख्या सर्वात महत्त्वाच्या खात्यांपैकी एका खात्याची धुरा सांभाळल्यानंतर आता शिंदे यांना आघाडीचे इतर घटकपक्ष काम करू देत नाहीत, असा साक्षात्कार झाला आहे. असाच त्यांना भाजपबद्दलही झाला होता आणि तेव्हाही त्यांनी राजीनामा दिला होता. आता मात्र त्याच भाजपमध्ये गेल्यावर ‘आपल्याला काहीही कमी पडणार नाही’ अशी त्यांची खात्री का झाली असेल, याची कल्पना मराठीजनांना आहे.
महाविकास आघाडी सरकार हरतर्‍हेने प्रयत्न करून पडत नाही म्हटल्यावर ईडी आणि सीबीआयची शुक्लकाष्ठे मागे लावून, अमाप धनशक्ती वापरून, केंद्रसत्तेचा पुरेपूर गैरवापर करून हे बनावट बंड उभे करण्यात आले आहे. त्यात हिंदुत्वाचे किंवा महाराष्ट्राचे हित कणभर नाही, शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांना संरक्षण आणि पुनर्वसनाची हमी फक्त आहे आणि तीही त्यांची उपयुक्तता आहे तोवरच. ती संपली की त्यांनाही कचर्‍यात टाकले जाणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना ही तथाकथित महाशक्ती इतकी सक्रिय का झाली आहे, तिला शिवसेनेत फूट पाडून मुंबई येनकेनप्रकारेण हिसकावून का घ्यायची आहे, हे मराठीजन उत्तम प्रकारे ओळखून आहेत. शिंदे यांच्याकडे विधिमंडळातील आकडे तरी आहेत की नाही, हे अजून स्पष्ट नाही. शिवसेनाप्रमुखांनी चेतवलेली महाविराट महाशक्ती मात्र आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच मागे उभी आहे. ती महाराष्ट्रद्रोह्यांचे हे कुटील कारस्थान उधळून लावल्याशिवाय राहणार नाही.

Previous Post

नया है वह…

Next Post

संभाजीराजांच्या कर्तृत्वाचा नवा इतिहास

Next Post

संभाजीराजांच्या कर्तृत्वाचा नवा इतिहास

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.