न्यायालयावर पक्षपातीपणाचा डाग का लागतोय?
महाराष्ट्रात भाजपची सत्ता गेल्यानंतर पिसाळलेल्या भाजप नेत्यानी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्याची जुनी प्रकरणे बाहेर काढून केंद्रातील ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांना हाताशी धरून सरकारला बदनाम करण्याचा विडा उचललेला दिसतोय. त्याला आता राज्यपालांचीही साथ मिळत आहे पण ज्या न्यायालयावर जनतेचा नव्हे तर सर्वांचाच विश्वास होता तेसुद्धा आता भाजपची साथ देतात की काय अशीही शंका उपस्थित होऊ लागली आहे. त्याची उदाहरणे खालीलप्रमाणे—
१. एका मराठी आर्किटेक्टच्या आत्महत्यापूर्व चिठ्ठीत रिपब्लिकन टीव्हीचा सर्वेसर्वा आणि भाजपचा चाहता अर्णब गोस्वामी याचे नाव असूनही कोर्टाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
२. चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधून समाजात भाजपच्या सहाय्याने राजकारण करत असतानाही तिच्यावर केंद्राच्या मदतीने कोणतीही कारवाई होत नाही.
३. भाजप नेते किरीट सोमैय्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल होऊनही कोर्ट त्याची दखल घेत नाही.
४. नारायण राणे आणि त्यांचे पुत्र यांनी दिशा सालीयन प्रकरणात बदनामीचे वक्तव्य करूनही त्याची दखल न घेता त्यांना जामीन मिळतोय. त्यांनी केलेल्या वक्तव्याची शहानिशा न करता लोकप्रतिनिधींच्या हक्काखाली त्यांच्यावर मेहरबानी केली जाते.
५. रश्मी शुक्लावर फोन टॅपिंग प्रकरणी कोणतीही कारवाई न करता वेळोवेळी दिलासा
६. परमवीर सिंग यांना अजूनही अटक नाही पण सतत दिलासा. याविरुद्ध भाजप विरोधकांना मात्र ना जामीन ना दिलासा फक्त अटक, म्हणूनच जनतेला न्यायालय एकतर्फी निर्णय देते असा संशय येणे स्वाभाविक आहे.
– अरुण पां. खटावकर, लालबाग
महाराष्ट्र सरकार विरोधकांना पुरून उरणार…
महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची सत्ता येणार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होणार हे मी दोन वर्षापूर्वी भविष्य माझे मित्र बँक निवृत्त विद्याधर जोशी यांना सांगितले होते. भाजप-शिवसेना व `मी येणारच पुन्हा येणारच’ असे छातीठोकपणे फडणवीस साहेब सांगत होते. पण प्रत्यक्षात त्यांच्या `ओव्हर कॉन्फिडन्स’ने किंवा अतिविश्वासाने आत्मघात झाला ही सल अजूनही तळपायात काट्याप्रमाणे सलतच आहे. दूरदर्शन वाहिन्या आजही दहावेळा सध्या विरोधी पक्ष प्रमुख-माजी मुख्यमंत्री यांचे दर्शन घडवतात व मोठेपणा दाखवितात.
सर्वोदय समाजाचे १४ मार्चला ७५व्या वर्षात पदार्पण झाले. म. गांधी यांच्या हत्येनंतर दीड महिन्यातच `सर्वोदय समाज’ आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केला. ते भाषण देताना म्हणाले, `आर.एस.एस. संघटना अगदी फॅसिस्ट पद्धतीची आहे. असत्य हे त्यांचे तंत्र (टेक्निक) आहे. `आर.एस.एस.’ जमात दंगाधोपा करणार्या उपद्रववाद्यांची जमात नाही तर ती फॅसिस्ट फिलॉसॉफरांची जमात आहे. (संदर्भ – दै. लोकसत्ता १५ मार्च २२)
नागपूर येथील संघकार्यालयात ५५ वर्षे स्वातंत्र्यदिनी तिरंगा न फडकविता… संघ कार्यकर्ते यांनी स्वातंत्र्य युद्धात भाग न घेता… आता ‘आम्हीच देशप्रेमी, इतर पक्षाचे लोक द्रेशद्रोही’ असा नगारा वाजवित असतात. संघ-राजकारणी संघटना नाही असे म्हणतात पण भाजपचा रिमोट मात्र हाती ठेवतात हे सत्य लपून नाही. पण सध्याच्या भाजपप्रणित राज्यात हे सर्व खपून जाते. हे सर्वसामान्य बोलला की… तो मोदीविरोधी आहे असा सूर निघतो. भलाही तो सूर… बेसूर, भेसूर किंवा असूर असो. त्रिपक्षीय महाराष्ट्र सरकारची तीनचाकी कार… पूर्ण पाच वर्ष शासन करणार आणि विरोधकांना पुरुन उरणारच… असा सर्वसामान्य जनांस विश्वास आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरी भाषेत विरोधकांना भाजपाला ठोकतात तेव्हा `ईडीची शिळी कढी’ वापरून कडी करणे, खोटेपणाचा कांगावा करण्यात ओरड, आरडाओरड करण्यातच धन्यता समजतात.. हे मात्र सत्य!
– देवेंद्र वि. ढोले, नागपूर
सरडोपचार विनोदबुद्धीत भर टाकणारा
पूर्वी ‘कुंपणावर बसणे’ यास दूषण मानले जाई, कारण कुंपणावर बसणारी व्यक्ती सहसा कोणतीही भूमिका न घेता इतरांची फक्त मजा लुटून आनंद मिळवत असे. मात्र सॅबी परेरा यांच्या ‘कुंपणावरून…’ ह्या लेखातून कुंपणावर बसूनसुध्दा आपण आपले आयुष्य किती सुखी व अर्थपूर्ण जगू शकतो ते कळते. परिसरातील अगदी साध्या घटनांमधून सूक्ष्म बोधग्रहण करणे हे फक्त विनोदी लेखक सॅबी परेराच जाणो. लेख अप्रतिम झाला असून सरडोपचार वाचकांच्या विनोदबुध्दीत भर टाकेल यात शंका नाही!
– रेमंड मच्याडो, वसई
लिखो सिर्फ मार्मिक में ही!
सरड्यासारख्या प्राण्याकडून शिकण्यासारख्या एवढ्या गोष्टी असतील असे सरड्याची कुंपणावर सोबत करणार्यांना देखील माहित नसतील! सरड्याला मदतीला घेऊन सॅबींनी कुंपणावरच्या सगळ्या मंडळींना धुवून काढले आहे. सॅबी ‘कहीं पे निगाहें’ फैलावो लेकिन लिखो सिर्फ मार्मिक, सिर्फ मार्मिक में ही!
– फ्रान्सिस आल्मेडा, निर्मळ, वसई-विरार
अतिशय सुंदर लेख
सॅबी परेरा यांनी डोळे उघडले. सुंदर लेख.
– अँथनी परेरा
उपरोध कमालीचा
उपरोधाची कमाल. सॅबी यांची धमाल.
– स्मिता सराफ