अशी आहे ग्रहस्थिती
राहू-वृषभेत, केतू-वृश्चिकेत, शनि-मंगळ-प्लूटो मकरेत, गुरु-शुक्र-नेपच्युन कुंभेत, रवि-बुध मीन राशीत, चंद्र- मीन त्यानंतर मेष, वृषभ आणि सप्ताहाच्या अखेरीस मिथुनेत.
मेष – सप्ताहाची सुरुवात थोडी कंटाळवाणी राहील. मात्र, त्यानंतरचा काळ अधिक उत्साहवर्धक राहणार आहे. अनेक प्रलंबित कामे झटपट मार्गी लागतील. त्यामुळे सुखद अनुभव येईल. अनपेक्षित शुभघटना अनुभवायास मिळतील. पैशाचे प्रश्न मार्गी लागतील. संततीसाठी खर्च होईल. नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी प्रवास करावा लागेल. धार्मिक कार्यातून चांगले लाभ मिळतील. कुटुंबासाठी वस्तू खरेदी कराल. जमिनीच्या संदर्भातील प्रश्न मार्गी लागेल.
वृषभ – येणारा काळ अपेक्षापूर्तीचा राहील. शुक्राचे राश्यांतर दशमात, त्यासोबत गुरु-नेपच्युन, योगकारक शनि भाग्यात, सोबत उच्च मंगळ, लाभात रवि आणि बुध, त्यामुळे ग्रहस्थिती उत्तम राहील. नववर्षाची सुरुवात अनेक शुभ गोष्टी देईल. परदेशातील संस्थेच्या माध्यमातून व्यवसायाला चांगली चालना मिळू शकते. नव्या कामाच्या संधी चालून येतील. व्यापारात छप्पर फाड के लाभ मिळण्याची शक्यता आहे. सट्टाबाजार, वायदेबाजारातून चांगले लाभ मिळतील. काही मंडळींना कुटुंब, नातेवाईकांकडून लाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुन – प्रतिभावंत व्यक्तींबरोबर भेट होईल. घरात धार्मिक कार्य घडेल. क्रीडाक्षेत्राशी जवळीक असणार्यांना चांगला काळ आहे. खेळाडूंना चमकण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळेल. भाग्योदयाची सुरुवात होईल. हातून दानधर्म, अन्नदान घडेल. राजकारणात एखादी महत्वाची जबाबदारी खांद्यावर पडू शकते. अधिकाराचा गैरवापर अंगाशी येऊ शकतो. बुधाचे दशमातील भ्रमण उद्योजक व्यावसायिकांना यश मिळवून देईल.
कर्क – नव्या वर्षाची सुरुवात दमदारपणे करणार आहात. परदेशातील कंपन्यांबरोबर देवाणघेवाण असणार्यांसाठी उत्तम काळ आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. वाडवडिलांच्या पुण्याईचा चांगला फायदा होईल. शुभकार्यासाठी सढळ हाताने मदत होईल. कौटुंबिक लाभ होतील. जमीन, प्रॉपर्टीचे व्यवसाय करणारे फायद्यात राहतील. सासुरवाडीकडून लाभ मिळतील. महिलांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
सिंह – भागीदारीच्या व्यवसायासाठी नवीन संधी चालून येईल. भावंडांबरोबर चांगले जुळेल. त्यांच्याकडून आर्थिक सहकार्य लाभेल. प्रवासात नव्या ओळखी होतील. विवाहाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल. राजकारणात चांगली संधी मिळेल. काही महिलांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. एखादी छोटी शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. काही मंडळींना संघर्षमय परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. कोर्ट-कचेरीच्या कामात मानसिक विवंचना वाढतील. जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे.
कन्या – आठवड्याच्या सुरुवातीचे दोन दिवस अशांतीचे आहेत. त्यामुळे थोडे चिंताग्रस्त राहाल. जोडीदाराच्या तब्येतीची चिंता लागून राहील. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. व्यावसायिकांसाठी अनुकूल काळ आहे. मोठ्या व्यक्तीकडून चांगली मदत होईल. मात्र, भविष्याचा विचार करून गुंतवणुकीचा विचार करा. डॉक्टरांसाठी फायदेशीर आठवडा आहे. कोर्ट-कचेरीचे निकाल सकारात्मक लागतील. मामाकडून चांगले सहकार्य मिळेल.
तूळ – चांगले लाभ मिळणार आहेत. शुक्राचे पंचमात कुंभेतील राश्यांतर झाल्यामुळे खर्चिक आणि विलासी वृत्तीला साजेसे खर्च कराल. कलेच्या माध्यमातून चांगले आर्थिक लाभ मिळतील. नावलौकिक प्रसिद्धी मिळेल. भक्तिमार्गात नवा मार्ग सापडेल. संगीतक्षेत्रातील मंडळींना लाभदायक काळ आहे. विद्यार्थ्यांना, वाहन व्यवसाय, जागेचे व्यवहार, करणार्या मंडळींना उत्तम काळ आहे. मोठे काम सोपे होईल.
वृश्चिक – कार्यक्षेत्रात ठसा उमटवण्याची संधी मिळेल. सुखस्थानात राश्यांतर झालेला शुक्र, कौटुंबिक सौख्य लाभेल. घरासाठी एखादी मोठी वस्तू खरेदी कराल. नवीन वास्तूचा प्रश्न मार्गी लागेल. कामाच्या ठिकाणी पतप्रतिष्ठा वाढेल. अनपेक्षित धनलाभ होतील. विद्यार्थीवर्गास चांगले यश मिळेल. महिलांना अनपेक्षित भेट मिळेल. जुने वादविवाद, भांडणे, कटकटीचे विषय सामोपचाराने सोडवण्यात यश मिळेल. खेळाडूंसाठी प्रसिद्धीचा काळ आहे.
धनू – स्वयंरोजगारात चांगले यश मिळेल. तुमच्या निर्णयांचा चांगला फायदा झाल्याचे दिसेल. धार्मिक कार्य, यात्रा, प्रवासाचे योग आहेत. प्रवासात महत्वाच्या वस्तू सांभाळा. खासगी-सरकारी निविदांच्या माध्यमातून काम करणार्या ठेकेदारांना लाभ होण्याचे योग आहेत. सौदर्यप्रसाधनांचा व्यवसाय करणार्यांसाठी अत्यंत लाभदायक आठवडा आहे. नोकरीच्या निमित्ताने प्रवास होईल.
मकर – एखादा नवा व्यवसाय सुरू कराल. फक्त योग्य विचार करून निर्णय घ्या. हातात घेतलेले काम तडीस नेण्यासाठी अनुकूल काळ आहे. भविष्यात त्याचा मोठा फायदा होईल. व्यवसायाचे आर्थिक गणित मार्गी लागेल. अपेक्षित धनलाभ होतील. साडेसातीमुळे एखादया मोठ्या कामाला विलंब लागू शकतो. घाईत निर्णय घेणे टाळा. अभियांत्रिकी क्षेत्रातल्या लोकांसाठी संघर्षमय काळ आहे.
कुंभ – योग्य निर्णय घेऊन पावले टाकली तर ते भविष्याच्या दृष्टीने बरे राहील. पैशाचे निर्णय सतावत असतील तर काळजाचे कारण नाही. आता हा त्रास हलका होईल. शुक्राचे राश्यांतर झाल्यामुळे मनावरचे दडपण कमी होईल. कुटुंबातील वादविवाद नाराजी हळूहळू निवळेल. विवाह जमण्यासाठी अनुकूल काळ आहे. व्यवसायात खबरदारी घ्या, चुकून आर्थिक गणित बिघडू देऊ नका.
मीन – मनात भ्रम निर्माण करणारी स्थिती समोर उभी राहिल्याने आत्मविश्वासाला तडा जाऊ शकतो. घेतलेल्या निर्णयावर भरवसा राहणार नाही. त्यामुळे आरोग्य बिघडू शकते. मात्र, तुमच्या अनपेक्षित लाभाचे प्रमाण चांगले वाढणार आहे. कोर्ट-कचेरीच्या कामात तुमच्या बाजूने निर्णय लागतील. शत्रूवर विजय मिळवाल. मेडिकल क्षेत्रातील मंडळींसाठी चांगला आठवडा आहे. नव्या गुंतवणुकीचा निर्णय विचारपूर्वक घ्या.