नारळाला कल्पवृक्ष उगीचच म्हणत नाहीत. नारळ असंख्य रीतींनी भारतीय स्वयंपाकपद्धतीत वापरला जातो. ओला नारळ मला अतिप्रिय. काही वर्षांपूर्वी कॉलेस्ट्रोल वाढीसाठी नारळाला व्हिलन ठरवल्यानंतर आजकाल पाश्चात्य जगही मेंदूच्या आजारांवरील उपचारांसाठी, अल्झायमरसाठी ओल्या नारळाच्या प्रेमात पडलं आहे. महाराष्ट्रीयन स्वयंपाकपद्धतीत रोजच्या भाजी, आमटी, उसळींना ओला नारळ आणि दाण्याचं कूट हे प्रांतानुसार आवडीनुसार वापरलं जातंच. नारळाची वडी केली जाते. नारळीभातही केला जातो. ओल्या नारळाच्या जरा वेगळ्याच पाककृती शोधताना काही पदार्थ सापडले.
नारळाची पुरणपोळी म्हणजे कायी होळगे. पुरणाऐवजी ओल्या नारळाचं सारण भरून ही पुरणपोळी केली जाते.
पुरणपोळी
साहित्य :
पारीसाठी : २ वाट्या गव्हाचे पीठ
पाव टी स्पून हळद
१ टे स्पून मैदा
मीठ दोन चिमूटभर
१ टेबलस्पून तेल
सारणासाठी : २ वाट्या ओला नारळ
पाऊण वाटी गूळ (जास्त गोड करू नये. नारळाला स्वतःची गोडी असतेच.)
अर्धा टी स्पून वेलची पावडर
२ टे स्पून मिल्क पावडर
तूप पोळीला लावण्यासाठी
कृती : आवरणासाठी :
परातीत गव्हाचे पीठ, मैदा, मीठ व पाणी मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्या. मग वरतून तेल लावून मळून झाकून ठेवा.
सारणासाठी : नारळ खोवून घ्या. गूळ किसून किंवा चिरून घ्या. पॅन गरम करायला ठेवा. त्यामध्ये गूळ व पाव कप पाणी घालून मिक्स करा. मग गूळ पूर्ण विरघळला व त्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये खोवलेला नारळ घालून मिक्स करून मिश्रण थोडे घट्टसर आटवून घ्या. मग त्यामध्ये मिल्क पावडर व वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या. आता आच बंद करून मिश्रण थंड करायला ठेवा.
पुरणपोळी करण्यासाठी : मळलेल्या पिठाचे एकसारखे गोळे बनवा. तसेच नारळाच्या सारणाचे एकसारखे गोळे बनवा. पिठाचा एक गोळा घेऊन पुरीच्या मापाचा गोळा लाटून घ्या. त्यावर ओल्या नारळाचा गोळा ठेवून पुरी मुडपून पोळी लाटून घ्या. तवा गरम झाला की त्यावर पोळी छान खमंग भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व पोळ्या लाटून भाजून घ्या.
गेणसेले
हा पदार्थ पानगीच्या जवळपास जाणारा आहे. पण पानगी केळीच्या पानात भाजून करतात आणि गेणसेले पानात ठेऊन वाफवतात हा फरक आहे. पानगी तिखटाची पण असते आणि गेणसेले गोड पदार्थ आहे. गेणसेलेमधे नारळाच्या चवात आंब्याचा रस, फणसाचा रस घालून फ्लेवरही देता येईल. काकडी खिसून, खसखसही घालू शकतो. ओला नारळ अर्थातच आहेच.
साहित्य : केळीची पाने, तांदळाची पिठी एक वाटी, ओलं खोबरं एक वाटी, गूळ पाव वाटी, चिमूटभर मीठ.
१. नारळात किसलेला गूळ, चिमूटभर मीठ कालवून चव तयार करायचा. आंबा रस/फणस रस असेल तर घालायचा.
२. केळीची पाने धुवून पुसून घ्यायची. तेलाचा पुसट हात लावायचा.
३. तव्यावर केळीचे पान ठेवायचं. शक्यतो नॉन स्टिक किंवा कास्ट आयर्नचा सीझन्ड तवा घ्या.
केळीच्या पानावर एक डाव पीठ पसरवून अर्ध्या भागात नारळाचा चव घालायचा. केळीचं पान दुमडून तव्याखाली आच सुरू करायची. गरम तव्यावर गणसेले नीट भाजून घ्यायचं. झाकण ठेवून मंद आचेवर तीनचार मिनिटं शेकलं की पलटून पुन्हा झाकण ठेवून तीनचार मिनिटं वाफेवर शिजू द्यायचं.
सुरेख केळीच्या पानांच्या वासाचा गोड पदार्थ तयार होतो.
निनावं
नाव नसलेला हा पदार्थ रूपानं फार छान दिसतो. निनावं ही खास सीकेपी खासियत आहे. श्रावणात जिवतीच्या पूजेला जो नारळ ठेवतात तो श्रावण संपल्यावर वापरून निनावं करतात. याला दाट्या असंही म्हणतात. एकप्रकारे कणीक, बेसन, नारळ, गूळ याचा हा देशी बेक्ड केक म्हणता येईल.
साहित्य : एका नारळाचे दूध,
१ वाटी डाळीचे पीठ,
१ वाटी गव्हाचे पीठ,
अर्धी वाटी साजूक तूप
२ वाटी चिरलेला गूळ,
१ टीस्पून वेलचीपूड
अर्धा चमचा जायफळ पूड,
चवीनुसार मीठ.
कृती :
१) प्रथम डाळीचे पीठ तूप न घालता कोरडेच मंदाग्नीवर भाजून घ्यावे. नंतर गव्हाचे पीठ भाजून घ्यावे. साधारण तीन ते चार मिनिटं प्रत्येक पीठ भाजायचं.
२) त्यानंतर तूप घालून दोनही पीठं पुन्हा भाजून घ्यावी.
३) आता पिठात नारळाचे दूध घालून सर्व मिश्रण ढवळत राहावे. चांगलेच एकजीव होईपर्यंत परतून घेऊन सर्व गाठी मोडून घ्या. मंद आचेवर एक वाफ येऊ द्या.
४) झाकण काढून त्यात वेलची पूड, जायफळ पूड, चवीपुरते चिमूटभर मीठ, गूळ घालून ढवळून सर्व एकजीव करून घ्यावे.
५) मिश्रणात थोडे तूप घालून भांड्याखाली तवा ठेवा. कमीत कमी १५-२० मिनिटं मंद आचेवर खरपूस भाजून झाल्यावर गॅस बंद करा.
६) गार झाल्यावर ड्रायफ्रूट्सचे काप पेरून वड्या पाडा.
– जुई कुलकर्णी
(लेखिकेला पारंपरिक अन्नपदार्थांविषयी उत्सुकता आहे आणि पाककलेत रुची आहे.)