आपल्याकडे मानसिक त्रासांना मुळात आजार मानण्याचीच पद्धत नाही. ते दुर्लक्षिले जातात. त्यातून अगदीच अनावस्था प्रसंग ओढवला तर वैद्यकीय सल्ला घेतला जातो. आताचा काळ कठीण आहे. एखादा छोटा-मोठा मानसिक त्रास होऊ लागला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, तातडीने मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. म्हणजे जर तसे काही असेल तर त्यामधून तुम्ही वेळीच बाहेर पडू शकता, असे डॉ. वाटवे सांगतात.
—-
स्थळ : पिंपरी चिंचवड पोलिसांचा सायबर सेल.
एक तरूण एक चमत्कारिक तक्रार नोंदवायला आला होता. तो अतिशय खात्रीने सांगत होता की परग्रहावरचे एलियन्स आपल्याशी बोलतात. ती मंडळी आपल्याला सूचना देतात आणि आपल्या डोक्यातूनही लहरी येतात, त्याने आपण पुरते हैराण झालो आहोत, असं तो पोलिसांना सांगत होता. ते पार चक्रावरून गेले होते.
प्रसंग दुसरा. स्थळ तेच. एक वयस्कर गृहस्थ याच विभागात आले होते. आपल्याला जिवे मारण्याचा कट कुणीतरी रचलेला आहे आणि आपण बाहेर पडलो की आपल्या अंगावर गाडी घातली जाते, असं ते सांगत होते.
प्रसंग तीन. स्थळ तेच. एका मध्यमवयीन गृहस्थांची तक्रार त्यांच्याच शब्दांत अशी होती- एक माणूस माझ्या डोळ्यांतून आत शिरला आहे आणि तो आता आतच बसला आहे. तो माझ्या डोळ्यांनी पाहतो. तो मला असं कर, तसं करू नकोस, अशा सूचना देतो. त्याने मला मध्यंतरी शिव्याही द्यायला सांगितल्या होत्या.
हे सगळेच्या सगळे लोक अतिशय नॉर्मल दिसणारे होते. त्यांच्याकडे पाहून त्यांच्यावर काही परिणाम झाला आहे, असं वाटण्याची शक्यताच नव्हती. आपल्याला जे वाटतंय ते आपल्या बाबतीत खरोखर घडतंय आणि पोलिसच ते थांबवू शकतात, अशा विश्वासाने हे लोक पोलिसांकडे आले होते.
अशा केसेस पोलिसांना नव्या नसतात. पण या गेल्या एकदोन महिन्यांतल्या केसेस. लागोपाठ आलेल्या. सोबत कोणी परिचयाचा माणूस नाही. सगळे एकटे आलेले. त्यांना ती त्रास देणारी माणसं खरी वाटत होती आणि त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यासाठी ती पोलिसांकडे आली होती. या अशा भासांना बळी पडणार्या माणसांचं प्रमाण अचानक का वाढीला लागलं आहे, या विचाराने पोलिसही हैराण झाले.
यातला पहिल्या प्रसंगातला, एलियन्स दिसणारा तरूण तर आधी अमेरिकतल्या एका आयटी कंपनीत काम करत होता. नोकरी गेल्यामुळे तो पुन्हा भारतात परतला होता. हातातलं काम गेल्यामुळे तो हताश झाला होता. अशीच काही ना काही, मन:स्थिती विचलित करणारी गोष्ट यातल्या प्रत्येक माणसाच्या बाबतीत घडली होती. सायबर पोलिस अधिकार्यांच्या लक्षात हे आलं आणि या सगळ्या तक्रारदारांना मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवण्यात आलं.
कोणत्याही कारणामुळे निर्माण झालेले मानसिक ताण हे अशा प्रकारच्या भासांना कारणीभूत ठरतात. सध्याच्या काळात कोरोनाने आणलेली अनिश्चितता हे तणावनिर्मितीचं एक मोठं कारण ठरलेलं आहे.
भास, भ्रम आणि अनिश्चितता
ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विद्याधर वाटवे सांगतात की मानसिक आजार होण्यासाठी वयाची अट नाही. १० ते ६० या वयोगटातील कोणाही व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. सध्या कोरोनामुळे सगळीकडे अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे अनेकांना चिंता, निराशा आणि भीती यांनी ग्रासले आहे. त्यातून देखील मानसिक आजार वर येऊ शकतात. एखाद्या गोष्टीचा भास किंवा भ्रम होणे, हे मानसिक आजाराचे लक्षण असू शकते. अलीकडच्या काळात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकांना भास आणि भ्रम होतात ते त्या तंत्रज्ञानाशी संबंधित असू शकतात. अमेरिकेतून आलेल्या तरुणाला होणारे एलियन्सचे भास हे त्याचे उदाहरण म्हणता येईल. त्याजागी एखादा खेड्यातला तरूण असता तर त्याला आपल्यावर कुणीतरी जादूटोणा करतंय असा भास झाला असता. कानात येणारे अपरिचित आवाज, एखादा पदार्थ कडू लागत असल्याचा भास होणे, हे मानसिक त्रासाचे प्रकार असू शकतात.
डिप्रेशन आणि उन्माद औदासीन्य अवस्था (कभी खुशी कभी गम)
मानसिक आजारांत डिप्रेशन आणि उन्माद औदासीन्य अवस्था हे प्रकारही गणले जातात. महिला आणि पुरुषांमध्ये डिप्रेशनच्या आजाराचे प्रमाण हे चार टक्के तर उन्माद औदासीन्य अवस्था म्हणजे अचानक अकारण उत्साही वाटणे आणि नंतर मरगळल्यासारखे होणे, हा प्रकार महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, त्याचे प्रमाण साडेचार टक्क्यांपर्यंत आढळते. डिप्रेशनग्रस्त मंडळी निराशेच्या गर्तेत असतात. यातून पुढे तीव्र स्वरूपाचे मानसिक आजार निर्माण होण्याची शक्यता असते. या सगळ्यामागचे प्रमुख कारण असते ते म्हणजे मेंदूतील रसायनात होणारे बदल हे असते. काही वेळेला मानसिक आजार आनुवांशिक देखील असतात. व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणसांमध्येही मानसिक आजाराची लक्षणे दिसू शकतात.
काही मानसिक आजार तात्कालिक स्वरूपाचे असतात. योग्य उपचारांनंतर ते सहा महिन्यांत देखील बरे होतात. काही आजार दीर्घकाळ टिकणारे असतात. त्यासाठी कायम डॉक्टरांचा सल्ला आणि औषधांची गरज असते.
आपल्याकडे मानसिक त्रासांना मुळात आजार मानण्याचीच पद्धत नाही. ते दुर्लक्षिले जातात. त्यातून अगदीच अनवस्था प्रसंग ओढवला तर वैद्यकीय सल्ला घेतला जातो. आताचा काळ कठीण आहे. एखादा छोटा-मोठा मानसिक त्रास होऊ लागला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, तातडीने मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. म्हणजे जर तसे काही असेल तर त्यामधून तुम्ही वेळीच बाहेर पडू शकता, असे डॉ. वाटवे सांगतात.
जनजागृती हवी…
मानसिक आजारांबाबत समाजात देखील मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. धीर करून कोणी वैद्यकीय सल्ला घेतला आणि मानसिक आजार निष्पन्न झाला की त्या माणसाकडे पाहण्याचा समाजाचा, नातेवाईक, घरातली मंडळींचाही दृष्टिकोन बदलतो. याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, हा वेडा झाला आहे, अशा पद्धतीने लोक वागू लागतात. त्याने आजारात आणखी भर पडते. काही वेळेला यातून रूग्णाला उपचार मिळण्यासही उशीर होतो. त्यातून त्याचा आजार बळावत जातो. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी मानसिक आजारांची तोंडओळख करून देणे, त्याबद्दल जनजागृती करणे, असे उपक्रम स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन राबवण्याची गरज आहे. मानसिक आजार झालेल्या व्यक्तीबरोबरच त्याच्या घरातील लोकांचेदेखील समुपदेशन करण्याची आवश्यकता असते, असे डॉ. वाटवे सांगतात.
सर्वसामान्य आजारांचा दर्जा हवा
मानसिक आजारांचे वाढते प्रमाण पाहता त्यांना सर्वसामान्य आजारांचा दर्जा देण्याची गरज असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. किरण चव्हाण व्यक्त करतात. एका व्यक्तीला १६ वर्षांपासून स्किझोप्रâेनियाचा आजार होता. पण, घरातले काय म्हणतील, समाज काय म्हणेल याचा विचार करून ते गृहस्थ त्यावर डॉक्टरी उपचार न करता, इतर उपचार करत बसले होते. त्यात त्यांचे पैसेही गेले आणि त्रास वाढत राहिला. मानसिक आजारांना सर्वसामान्य आजाराचा दर्जा दिला तर असे प्रकार होणार
नाहीत, असे डॉ. चव्हाण यांना वाटते. संशय, भास, भ्रम असे प्रकार व्हायला लागले की अनेक लोक ‘बाहेरची बाधा’ म्हणून डॉक्टरांकडे जाण्याऐवजी अंधश्रद्धांवर आधारलेल्या उपायांचे शोध घेतात. काही जण त्यातून वेगळे प्रश्न निर्माण करून घेतात. असे प्रकार करणे म्हणजे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे आहे. तेव्हा स्वत:मध्ये किंवा जवळच्या माणसांमध्ये नैराश्य, भास, भ्रम यांची लक्षणं दिसली तर वेळ दवडू नका, मानसोपचार तज्ज्ञांकडेच जा.
मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी
मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवायचे असेल तर रोज दोन तास तरी स्वतःसाठी द्या. त्यात योगसाधना, ध्यानधारणा करा. संगीत ऐका, निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ खर्च करा. सकारात्मक विचार करा, चिडू नका, रागावू नका. मन कायम प्रयत्नपूर्वक आनंदी ठेवा. आयुष्यात अडचणी आहेत, त्रासही आहेत. नकारात्मक विचार केल्याने त्या आपोआप नष्ट होत नाहीत. त्यामुळे मनाला त्या विचारांच्या जाळ्यात न फसण्याचं वळण लावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही लक्षण आढळलं तर कशाचीही लाज न बाळगता आधी डॉक्टर गाठाष्ठ नाहीतर ताणतणावांचे एलियन्स खरोखरच तुमच्या मेंदूचा ताबा घेतील.
– सुधीर साबळे
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)