(देवदर्शनाचा नियोजित कार्यक्रम. म्हादेंद्र येणार ह्या वार्तेने गावकरी तयारी करतायत, बात्रा वगैरे मंडळी विशेष काळजीने देखरेख करतायत. पूजेची साहित्यसामग्री आणि सजावटीचे सामान मंदिरात आणून ठेवले आहे. तोच काही पाहुणे मंडळी, मेमाणे, पावणे वगैरेही देवदर्शनासाठी तिथं आली आहेत.)
मेमाणे : (आजूबाजूची लगबग पहात) कुठला उत्सव आहे का इथे?
भाट : (नवीन चेहरे बघून अंगभूत लाळघोटेपणाने हसत पळत जवळ जात) हो, असंच समजा!
पावणे : (शंकेने) समजा म्हणजे नाहीय का तसं काही?
भाट : म्हंटलं तर आहे आणि म्हंटलं तर नाहीय.
मेमाणे : (गोंधळून) याचा काय अर्थ?
भाट : अहो आज म्हादेंद्र येताय, देवदर्शन आणि पूजा करण्यासाठी.
बात्रा : (हसत हसत)असं तसं का? डायरेक फाईव्ह स्टार दर्शन देवाला!
मेमाणे : (प्रश्नार्थक मुद्रेने) पण हे म्हादेंद्र आहेत कोण?
भाट : (कौतुकाने) आमच्या गावचे पंच! ज्यांना सर लावायला आणि ठेवायला आवडत नाही, पण तेच मुख्य पंच आहेत. फक्त ते स्वतःला वेगवेगळी नावं ठेवतात जसं गावगडी, चौकीदार, गावगुव्वव… (जीभ बाहेर काढत, विव्हळत) ह्या अवघद शब्दाने जीब चावली पलत!
पावणे : (गाभार्यात बघत) हा सोन्याचा पाट देवासाठी आणलाय का?
भाट : छे! देवाला कसले आलेत चोचले? तो पाट म्हादेंद्रसाठी आणलाय!
मेमाणे : आणि देव?
भाट : (मूर्तीकडे बोट दाखवत) तो आहेच की सागवनाच्या लाकडी आसनावर बसलेला!
पावणे : एक व्यक्तीच्या देवदर्शनासाठी एवढ्या छानचौकीची, उधळपट्टीची खरंच गरज आहे का?
बात्रा : अगदी हीच भूमिका म्हादेंद्र यांची होती.
मेमाणे : मग एवढा महागडा तामझाम केला कुणी?
बात्रा : म्हणजे काय? ग्रामपंचायतीने केलाय हा खर्च! हां आता त्यासाठी पंचायतीने एक एकसदस्यीय समिती नेमली होती. खुद्द म्हादेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली!
पावणे : व्वा! याला म्हणतात एकमताचा कारभार!
मेमाणे : पण असला महागडा सोहळा करण्याचं कारण काय?
भाट : साहेबांना ‘विलेक्शन’ खेळायची आवड आहे, त्या त्या प्रसंगी त्यांना ३३ कोटी देव आठवत असतात.
पावणे : पण त्यांच्या आवडीसाठी गावाने का भुर्दंड सोसावा?
बात्रा : त्यांच्यासाठी गाव झिजलाय!
मेमाणे : गावासाठी ते झिजलेत असं म्हणायचंय का?
भाट : (चटकन सावरून घेत) तेच तेच म्हणायचंय त्यांना फक्त अर्थ चुकवला त्यांनी!
पावणे : शब्द चुकवला म्हणायचं असेल त्यांना!
भाट : तेच तेच! हे काय आणि ते काय? एकूण एकच होतं की!
मेमाणे : पण ते गावासाठी झिजले म्हणजे केलं काय नेमकं त्यांनी?
भाट : (मंदिरा समोरील रस्ता दाखवत) हा बघा हा रस्ता…
पावणे : काय नवा बनवला?
भाट : छे! असली भिकार कामं ते करत नसतात. त्यात पैशाचा अपव्यय वा निरर्थक खर्च ते मुळीच करत नाहीत!
मेमाणे : मग तुम्ही तर म्हणाला, रस्ता…
भाट : अहो त्याला नवं नाव दिलं कर्तव्यपथ!
पावणे : फक्त इतकंच?
भाट : नाही, इमारत… इमारत आहे ना? ग्रामपंचायतीची!
मेमाणे : काय तिलाही नवं नाव दिलंय का?
भाट : छे! असली भंकस म्हादेंद्र करत नाही. त्यांनी खास कोटींचे खर्च करत नवी इमारत बांधून घेतलीय! आहात कुठं?
पावणे : इथं लाईट-पाण्याची काही कामं झालीत का?
भाट : हे काय नळांना तोट्या आहेत, विजेचे खांब जागच्या जागी आणि जागोजागी आहेत. अजून काय हवं?
मेमाणे : ते आहेत म्हणजे वीज-पाणी मुबलक आहे समजायचं का?
भाट : तुमच्या पँटला चार खिसे नि शर्टाला दोन खिसे आहेत, मग तुमच्याही खिशात बक्कळ पैसा आहे असं समजायचं का?
मेमाणे : नुसता खिसा असण्याचा पैसा असण्याशी काय संबंध?
भाट : जो संबंध तुम्ही नळ्यांच्या तोट्यांचा नि विजेच्या खांबांचा जोडताय तसा!
पावणे : अहो पण तुम्हीच म्हणलेला ना? गावगड्याने खूप कामं केलीत म्हणून?
बात्रा : अहो त्यांनी कामं केलीत हो! गावात खांब बसवले, खास मित्राकडून ‘लाईन’ मारली, पण ती लाईट लोकांनाच परवडेना, त्याला म्हादेंद्र काय करणार? आता अर्धा गाव अंधारात आहे. पण ती लोकांची चूक! त्यांनी तोट्या बसवल्या पण धरण काय…? कसं भरणार?
मेमाणे : अहो भाषा सांभाळा जरा!
बात्रा : भाषेचं काय? साहेबांनी गायी सांभाळण्याचा मंत्र दिलाय, त्याच गोठ्यात टाकून देऊ कधी तिलाही वैरण! एकाने कितीसा फरक पडतोय? (मागे तयारीकडे बघत) अरे गोठ्यातून चांगलं एक पाटी शेण आण, ड्रमभर पंचगव्य करायचंय. पूर्ण गावाला द्यायला.
भाट : (दुरुस्ती करत) गावाला प्रसाद म्हणून देण्यासाठी!
बात्रा : हां तेच! घे समजून! (तयारी करणार्यांना सूचना करत) आणि कोपर्या-कोपर्याच्या मोक्याच्या जागा बघा.
भाट : कोपर्या-कोपर्यात शोभेच्या झाडांच्या कुंड्या ठेवल्यात, माळा सोडल्यात. काही ठिकाणी पडदे तर काही ठिकाणी मूर्ती उभ्या केल्यात. झालंय सगळं!
बात्रा : ते सगळं तात्काळ हटवा, तिथून चांगला अँगल साधून, येणार्या म्हादेंद्रना कॅप्चर करता येतं का बघा!
भाट : काय जाळी घेऊन माणसं उभी करायचीत का?
बात्रा : अरे कॅमेरा घेऊन फोटो काढायला म्हणतोय मी! आणि ह्या दोघांना देखील परिचितांच्या रांगेत बसवा.
भाट : काय म्हणून?
बात्रा : (जीभ घसरते) म्हादेंद्र त्यांचे गुरू म्हणून!
भाट : (चूक दुरुस्त करत) ते म्हादेंद्रचे गुरू म्हणून म्हणायचंय का?
बात्रा : तेच तेच! पूजासामग्री आणि इतर वस्तू पण बघून घ्यायला लावा.
भाट : धोकादायक वस्तू चेक करायला का?
बात्रा : नाही, शक्य तिथे मिनी कॅमेरे फिट करा! चांगल्या अँगलचे फोटो येण्यासाठी!
भाट : पण जागेअभावी काही कॅमेरे कमी केले तर…?
बात्रा : हवंतर पूजासामग्री कमी करा, पण कॅमेरे कमी करता येणार नाही.
भाट : पण देव?
बात्रा : (जीभ पुन्हा घसरते) त्यांचे देव म्हादेंद्र आहे की!
भाट : (अर्थाबरहुकूम अंदाज लावत) म्हादेंद्रचा देव हा आहे, असं म्हणायचंय का?
बात्रा : तेच म्हणालो की मी? त्या फुलांच्या पाकळ्या आणल्यात का?
भाट : तुम्ही जवळपास गोणीभर पाकळ्या सांगितल्यात, इतक्या देवाला अर्पण करायच्यात का?
बात्रा : नाही, म्हादेंद्र प्रवेश करते झाले की सुरुवातीपासून त्यांच्यावर पाकळ्यांची उधळण करायची, अगदी गर्भगृहात जाईपर्यंत!
कार्यकर्ता : (घाईने येत) बात्राजी तयारी झाली का? म्हादेंद्र आलेत!
बात्रा : झालीय की! ये रेड कार्पेटवरून सर्वांनी बाजू व्हा! सांगितलंय त्याप्रमाणे करा, आवरा! आधी देवाचे अष्टांगस्नान मागाहून पूजा, आरती व नैवेद्य याप्रमाणे रूपरेषा सर्वांना ठाऊक असेलच. चला, लागा कामाला! (चटकन् तो स्वतः बाजूला होतो, आणि इतरांना खुणेने कॅमेर्याच्या अँगलपासून दूर होण्यास सांगतो.)
(तोच एक रथातून मुकुटधारी म्हादेंद्र उतरतात, आज त्यांनी दशावतारातला कुठलासा अवतार धारण केलेला दिसतोय, वानरसेना त्यांच्या मागून फुत्कारे टाकत नाचत येतेय, कुणीतरी बिगुल फुंकतो. त्या पाठोपाठ बीभत्स रागात वाद्ये वाजू लागतात. म्हादेंद्र मंदिरात प्रवेश करतात, त्यांच्यावर धोत्र्याच्या फुलांच्या पाकळ्या उधळल्या जातात. ही प्राण्यांची सर्कस गर्भगृहात प्रवेशते. गाभार्यातील मूर्ती पंचधातूच्या मोठ्या पात्रात ठेवलीय, तिथे निरनिराळ्या नद्यांचं पाणी आणि मूर्ती स्नान घालण्याच्या चीजवस्तूंची तयारी दिसतेय, पण त्याकडे दुर्लक्ष करत म्हादेंद्र चक्क गाभार्यात मूर्तीच्या ठिकाणी स्वतः जाऊन बसतो. तोच एकच गलका होतो.)
पुजारी : (मूर्तीची आठवण करून देताना) हे गैर आहे शेठ, इथे मूर्ती असताना तुम्ही त्या जागेवर बसताय…
म्हादेंद्र : पुजारीजी! मैं जब जब इस मंदिर में आया हूँ। तब तब मुझे ये एहसास होता था! ना लॉजिकली, ना बायोलॉजिकली मैं
बायोलॉजिकल नहीं हूँ। आपकी तरह! मैं ही सुपर पॉवर हूँ। मैं ही भगवान हूँ। मैं ही ये सृष्टि चलाता हूँ। ऐसी मेरी धारणा हैं। मैं कोई आम बायोलॉजिकल इंसान नहीं हूँ। इसीलिए मैं आज से यही बैठूंगा! मित्रों…!!!
(मागून म्हादो, म्हादो, सावन भादो चा घोष चालू होतो, टाळ्यांच्या गजरात म्हादेंद्र बोलत राहतात. तोच एक श्रद्धाळू धावत येतो.)
श्रद्धाळू : (गर्भगृहाच्या बाहेर अडवलं गेल्याने ओरडत) मला जाऊ द्या आत! मला नवस फेडायचाय!
म्हादेंद्र : (गाभार्यातून) बालका काय आहे नवस?
श्रद्धाळू : (हातातला शेंदूर समोर ठेवत) एकदम साधा! देवाला शेंदूर फासून मटणाचा नैवेद्य दाखवण्याचा नवस आहे! (मागून आलेल्या मटणाच्या ताटाकडे बोट दाखवत तो बोलतो.)
(ते ऐकताच म्हादेंद्र बाहेर धाव घेतो. एकाएकी उतरलेलं देवत्त्व लोकं अवाक होऊन पहात राहतात.)