‘हल्लो दिलीप! मी आनंद दिघे बोलतोय!’
‘हे काय सांगायला हवे? मी तुमचा आवाज ओळखणार नाही का?’
‘काय हालचाल आहे, आपल्या महाराष्ट्रात?’
‘साहेब गद्दारांच्या पापाचा घडा काठोकाठ भरला आहे!’
‘तो दाढी काय करतो?’
‘साहेब तो तडफडत आहे, चडफडत आहे, दाढीचे केस उपटून उपटून मोजत आहे?’
‘का रे काय झाले त्याला?’
‘काही नाही. तो प्रत्येक वेळी दाढीचे केस उपटून मोजतो व प्रार्थना करतो की हे देवा किमान इतके तरी खासदार निवडून येऊ दे!’
‘अरे पण तो तर आसामच्या कामाख्या देवीचा भक्त झाला होता ना?’
‘हो, पण मतदान करायला आसामचे लोक आले नव्हते, महाराष्ट्राचेच होते ना!’
‘तुला काय वाटतं त्याचे किती लोक येतील निवडून? तू खडूस पत्रकार आहेस, त्यामुळे माझा तुझ्यावर पहिल्यापासून विश्वास आहे.’
‘खरं सांगू का साहेब! त्याने १५ खासदार उभे केले. त्यातले यामिनी जाधव व रवींद्र वायकर यांच्या गळ्यात उगाच उमेदवारीचं लोढणं घातलं आहे. तुम्ही ज्याला कानफडले होते तो दिडफुट्या म्हस्के तर स्वत:ला भलताच स्मार्ट समजायला लागला होता. मिंध्याने त्याला आपल्या ठाण्यातून उमेदवारी देऊन त्याची व स्वत:ची कबर खोदली आहे. त्यामुळे हे तर १०० आडवे होतील.’
‘आणि त्याचा तो मुलगा… काय रे नाव त्याचं?’
‘तो श्रीकांत का?’
‘हो, हो! तोच! तोपण तुझ्या कल्याणमधून पुन्हा उभा आहे. खूपच उर्मट व उद्धट आहे, असे सगळे म्हणतात.’
‘खरंच आहे! साहेब मला पण तो दोन वेळा नडला होता!’
‘काय बोलतोस! त्याची इतकी हिंमत? तू तर मलाही जाब विचारायचास धर्मवीर अद्याप गप्प का? त्याला ती अवदसा कशी आठवली? अरे, त्या एकनाथला तरी कळायला हवे होते. त्याने आपल्या पित्यापेक्षा मोठ्यावर दादागिरी करताना पोराला आवरायला हवे होते. ‘तो तर म्हणे पाच लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून येणार असे ऐकले!’
‘साहेब, तुम्हीच सांगितले होते, गद्दारांना क्षमा नाही, मग तुमचा ठाण्यातील शिवसैनिक त्याला सुका सोडतील का?’
‘मग त्याचे काय होईल?’
‘जसा तुम्ही गणेश नाईकांना पाडायला सीताराम भोईर हा एक नगरसेवक दिला होता, तसेच उद्धव साहेबांनी वैशाली दरेकर या माजी नगरसेविकेला तिकिट दिले आहे.’
‘ही कोण वैशाली दरेकर?’
‘साहजिकच आहे, तुम्ही तिला ओळखत नसाल! कारण तुमच्या हयातीत ती राजकारणात नसावी.’
‘पण ती येईल का निवडून! कारण या गद्दारांकडे सत्ता आहे, पैसा आहे, सरकारी यंत्रणा आहे आणि आपल्यात राहून गब्बर झालेले त्या गद्दाराचे गुलाम झाले आहेत.’
‘साहेब, दिवार चित्रपट आपण पाहिला होता, त्यातला डायलॉग तुम्हाला आठवतो का? मेरे पास बंगला है गाडी है, तेरे पास क्या है! यावर अमिताभ बच्चन बोलतो, मेरे पास माँ है! तसेच या गद्दारांकडे सत्ता अमाप संपत्ती व सरकारी यंत्रणा आहे, परंतु आपल्या उद्धव साहेबांकडे निष्ठावंत शिवसैनिक आहेत!’
‘तू तर त्याला अजिबात सोडत नाही, रोज झोडपून काढतोस! आत्ता तुला काय वाटतं? कोण जिंकेल?’
‘कल्याण लोकसभा मतदारसंघात नव्हे, तर आपल्या ठाणे जिल्ह्यातून या गद्दारांना गाडणारच आहोत. शिंदेचा मुलगा तर एक लाखाहून अधिक मतांनी हरणारच आहे. मुस्लीम बांधव, बहुजन समाज, काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबरच ‘आप’ आपल्यासोबत आहेत. आणि हो श्याम गायकवाडही आपल्यासोबत आहे. ‘निर्भय बनो’ची पूर्ण टीम आपल्यासोबत होती. आणि भाजपने तर यांच्यात पाचरच मारली आहे. गणपत गायकवाडच्या लोकांनी आपल्याला मतदान केले आहे. इतकेच नव्हे तर त्या गद्दाराने बळजबरी व धाक दाखवून ब्लॅकमेल केलेल्या शिवसैनिकांनी गनिमी कावा करून त्याच्या हॅटट्रीकचा बलून डिफ्यूज केला आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो हा गद्दारपुत्र आपटणार, तुमच्या भाषेत सांगायचे तर त्याची खाट पडणार!’
‘तुझ्यात इतका आत्मविश्वास कुठून येतो, याचाच मी विचार करीत असतो.’
‘हो, साहेब, तो तर मी तुमच्याकडूनच शिकलो आहे. आपला राजन विचारे तर ठाण्यातून विक्रमी मतांनी निवडून येऊन एकनाथ शिंदेला त्याची दाढी व मिश्या भादरायला भाग पाडेल.’
‘भिवंडीत सुरेश बाळ्यामामा म्हात्रे याने कपिल पाटलांना कडवी टक्कर दिली आहे. निलेश सांबरेमुळे बाळ्यामामा निवडून येईल. उद्धव ठाकरेंवरील प्रेमामुळे भिवंडीत बाळ्यामामा येणारच. पालघरलाही भारती कामडीचे पारडे जड आहे. म्हणजे तुमच्या ठाणे जिल्ह्यात गद्दारांचा सुपडा साफच होणार!’
‘आणि काय रे, महाराष्ट्रात आपली परिस्थिती काय आहे?’
साहेब, २२ पैकी १८ जागी आपले खासदार नक्की निवडून येत आहेत. कोंकणात त्या राण्याचे पानिपत विनायक राऊत करणार आहे. त्याचे तोंड पुन्हा एकदा काळे होणारच आहे. अनंत गीते यांचाही विजय पक्का आहे. मुंबईतून अरविंद सावंत, अमोल किर्तीकर, (गजाभाऊचा मुलगा) अनिल देसाई, हे देखील विजयाचा गुलाल उधळणार आहेत. संभाजी नगर मधुन चंद्रकांत खैरेही विजयी होणार आहेत. किमान १८ खासदार नक्की येतील साहेब!
‘आणि महाविकास आघाडीचे किती येतील?’
‘महाविकास आघाडीचे ३० ते ३५ खासदार येतील. बाकीचे १३ ते १८ हे महायुतीचे येतील.’
‘ठिक आहे. खूप चांगली माहिती दिली आहेस. मी येथील बाळासाहेब, माँसाहेब, दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक आदींना तुझी ही बातमी सांगतो. ४ जूनला पुन्हा फोन करेन. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. तुझा जोडीदार डांबर्या येथे आहे. तू तुझी बॅटिंग सुरू ठेव, आमचे सर्वांचे तुला आशिर्वाद आहेतच! जय महाराष्ट्र!’