पुणे शहर आता अस्ताव्यस्त पसरलंय. पण त्यातील काही जुन्या पेठा अजूनही घट्ट वीण असलेल्या जुन्या वस्तीने भरलेल्या आहेत. गंज पेठ, घोरपडी पेठ आणि मंगळवार पेठ या त्यातल्याच. या भागातल्या शाळा मराठी माध्यमाच्याच, त्याही कॉर्पोरेशनने चालवलेल्या. शाळेची फी परवडणे शक्य नाही अशी कुटुंबे भरपूर. हातातोंडाची गाठ पडता पडता पंचाईत. आईवडील दिवसभर कामाला जाणारे ती कामे सुद्धा मोलमजुरीची श्रमाने थकवणारी. काम करून घरी आल्यावर मुलांचा अभ्यास घ्यावा वगैरे गोष्टी त्यांच्या कल्पनेत सुद्धा न बसणार्या. पोरं शाळेत जात आहेत ना? नीट शिकतायेत ना? वरच्या वर्गात जातायेत ना? एवढीच साधीशी त्यांची अपेक्षा. परीक्षा झाली का, गुण किती मिळाले, एखादा विषय राहिला का, असल्या छोट्या मोठ्या गोष्टींत त्यांचे लक्ष कधीच जात नाही. याची कारणेसुद्धा जरा वेगळीच. वडील, खरे म्हणजे बापच, येताना बाटली घेऊन तरी येणार, नाही तर वाटेत थांबून ‘लावून’ तरी येणार. बायकोने केलेल्या स्वयंपाकातील चार घास सुखाने पोटात जाऊन दोघांत फारशी भांडणे न होता जो दिवस संपेल तो दिवाळीसारखा. अशा वातावरणात शिकणारी मुले जेमतेम सातवी-आठवीपर्यंत पोहोचतात. पण नववीचा अभ्यास जड झाला म्हणून शाळा सोडतात. यांची संख्या खूपच मोठी. पाचवीमध्ये वर्गात पन्नास मुले असली तर नववीमध्ये त्यांची संख्या वीस-बावीस वर पोचलेली. हे या भागातील सगळ्या शाळांचे कायमचे दृश्य.
दहावी शिकला तर अगदी मोलमजुरीची कामे नाहीत तर जरा बर्या कामात मुलगा जाईल, एवढीच आईबापाची अपेक्षा. मुलगी असेल तर घरी राहून टवाळक्या करण्यापेक्षा शाळेत गेली तर निदान तिची काळजी तरी नाही, अशी आईची कल्पना. काही अडले नडले तर क्लास नावाची चीज कोणालाच न परवडणारी. अशा मुलांकरता काही संस्था आठवीपासून मार्गदर्शनपर पूरक काम करतात. मंगळवार पेठेतील स्वरूपवर्धिनी ही अशीच एक संस्था.
गणेशचे घर मंगळवार पेठेतल्या कडबा कुट्टी केंद्राच्या शेजारीच हाकेच्या अंतरावर. लहानपणापासून गणेश तिथल्याच मनपाच्या शाळेत शिकला. एक चांगली गोष्ट म्हणजे त्याचे वडील दारूला न शिवणारे माथाडी कामगार. घराजवळच्याच मालधक्क्यावर दिवसभर राबून निगुतीने संसार करणारा हा माणूस. बायकोही कष्टाळू. पुण्यातील स्वच्छ संस्थेकरता काम करून काच, कापड, कचरा, प्लास्टिक गोळा करणार्या महिला गटातून जमेल तशी मिळकत मिळवणारी कष्टकरी बाई.
गणेश जात्याच चटपटीत व हुशार सुद्धा. अक्षर नेटके. पाढे पाठ. गणिताची आवड. दिसेल ते वाचायची एक लागलेली छान चटक. एवढेच नव्हे तर इयत्ता तिसरी चौथीपासूनच स्वतःचे कपडे स्वच्छ कसे ठेवावेत, ते स्वतःच कसे धुवावेत आणि इस्त्री नसली तरी कसे वापरावेत याचे जणू बाळकडूच गणेशकडे होते. त्याला पाहिल्यावर कोणालाही हा मुलगा एका माथाडी कामगाराच्या घरातला आहे असे वाटू नये इतकी त्याची टापटिपीची स्वच्छतेची राहणी.
गणेश हायस्कूलमध्ये गेल्यापासून त्याने कायम ७० टक्के मार्क टिकवले. आठवीमध्ये त्याला स्वरूपवर्धिनीमध्ये प्रवेश पण मिळाला. काय वाचायचे, कसे वाचायचे, वाचनाचा वेग कसा वाढवायचा व अभ्यासातील अडचणी सोडवायच्या, यासाठीचे तेथील गुरुजनांचे मोठ्या मित्रांचे मार्गदर्शन त्याच्यासाठी अक्षरशः त्याच्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल करणारे ठरले. मनातील आदर्श समोरील व समाजातील चांगल्या व्यक्ती यांच्या भेटीगाठी या संस्थेच्या निमित्ताने होऊ लागल्या. पाहता पाहता इयत्ता दहावी गणेश चांगल्या मार्कांनी पास झाला.
ऑडिट करण्यासाठी एका प्रख्यात ऑडिटर कंपनीतर्फे आर्टिकलशिप करणारी दोन मुले संस्थेत नियमितपणे महिनाभर येत होती. दहावीची परीक्षा झाल्यानंतर त्या दोघांच्या कामांमध्ये मदतनीस म्हणून, त्यांना लागतील त्या फायली काढून देण्याचे काम करण्याकरता गणेशची नेमणूक झाली होती. हे काम करता करता गणेशच्या मनाने पक्के ठरवले की या मुलांसारखेच आपल्याला कॉमर्स शाखेत जाऊन खूप अवघड असलेल्या सीए नावाची परीक्षा द्यायची आहे. त्यासाठी खूप अभ्यास करायला लागतो. चांगले इंग्रजी यायला लागते, हेही त्याला त्यांच्याकडूनच कळले. सुदैवाने संस्थेची लायब्ररी खूप मोठी व अनेक विषयांची मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तकांनी भरलेली होती. संस्थेत येणार्या कोणत्याही मुलाला त्या लायब्ररीत बसून अभ्यास करण्याची कायमच मुभा असे. पुस्तकं हाताळताना, वाचताना कोणताही अडसर नसे. दहावीचा निकाल अपेक्षेप्रमाणे चांगला लागून जवळच्या एका ज्युनिअर कॉलेजमध्ये कॉमर्सला गणेशला प्रवेश मिळाला. अनेक प्रश्न समोर उभे होते. गणेशच्या वर्गातील जवळपास सगळीच मुले बहुतेक विषयांच्या क्लाससाठी जात होती, जे गणेशला अजिबात शक्य नव्हते. यावरही गणेशने एक छान उपाय शोधला व त्यासाठी संस्थेतील प्रशासकांनी मदत केली. ज्या क्लासला जायचे होते, त्या क्लासमधे
कॉलेजची वेळ सोडून झाडलोटीपासून विद्यार्थ्यांच्या नोंदी ठेवण्यापर्यंत सगळी कामे करण्याचे त्याने अंगावर घेतले. या बदल्यात त्याला क्लासमध्ये फीमाफी देऊन सामावून घेतले गेले.
पहिल्या सहा महिन्यांतच गणेशची हुशारी पाहून क्लासचालकांनी त्याला पॉकेटमनी सुद्धा द्यायला सुरुवात केली. आता खर्या अर्थाने गणेशची गाडी रुळावरून जोरात सुटली होती. अकरावी, बारावीही गणेश चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. एवढेच नव्हे तर सीएसाठीची प्रवेश परीक्षाही तो चांगल्या मार्काने पास झाला. संस्थेच्या एका देणगीदार सीएकडे त्याला आर्टिकलशिपसाठी दाखल करून घेण्यात आले. दर महिन्याला आर्टिकलशिपसाठीचा पगार पण आता सुरू झाला होता. त्यातून जमेल तसे पैसे तो आईला देत असे. खरे तर आईवडील आता धन्य झाले होते. मुलगा काय शिकत आहे, पुढे काय करणार आहे, याची त्यांना कसलीही कल्पना नव्हती व कळण्याची शक्यताही नव्हती. तो मोठ्ठा साहेब बनणार आहे याची मात्र खात्री पटली होती. त्याच्या आसपासच्या घरांमध्येसुद्धा आता गणेश ‘साहेब’ बनणार, खूप कमावणार व काही वर्षातच या वस्तीला कायमचा दुरावणार अशी चर्चा सुरू झाली होती. गणेशबरोबरचे त्याचे शाळासोबती विविध तांत्रिकी कोर्स करून छोट्या मोठ्या कारखान्यातून कामाला लागले होते. मित्राचा त्यांना अभिमान वाटत असे.
असे सगळे चांगले चाललेले असताना अचानक एक मोठी ठेच गणेशला आयुष्यात पहिल्यांदाच लागली. सीए इंटरमिजिएटच्या दोन ग्रूपपैकी एका ग्रूपमध्ये तो नापास झाला. खरे तर सीए करणार्या मुलांच्या पैकी उत्तम अभ्यास असलेल्या अनेकांच्या कपाळी हे अनेकदा लिहिलेले असते. त्यांना त्याची कल्पनाही असते. मात्र गणेशला असे काही घडेल हे पूर्णपणे अनपेक्षित होते.
सीएची उमेदवारी सुरू केल्यापासून विविध कंपन्यांमध्ये कामानिमित्त गणेशला जावे लागत असे. तिथले मोठमोठे साहेब लोक तिथले वातावरण कामाच्या पद्धती, जेवणखाण्याच्या पद्धती, या त्याला नवीनच होत्या. अशा काही छानशा वातावरणात कायमच काम करायचे त्याच्या मनात पक्के रुजलेले होते. त्याला या निकालामुळे मोठा मानसिक धक्का बसला. आपल्या मनातील स्वप्न आता भंगते का काय असे त्याला वाटू लागले. लहानपणापासून काढलेले खडतर दिवस पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत. रात्री घरी गेल्यानंतर तेच वातावरण पुन्हा समोर उभे राहत असे. तो मनाने सैरभैर झाला. निकाल ऐकून त्याचे आईवडील तर पूर्णपणे मनाने खचलेच.
आधार मिळाला
गणेश ज्या चार्टर्ड अकाउंटंटकडे काम करत होता त्यांनी त्याच्या दुःखावर फुंकर घातली. ते त्याच्या घरी आले. आई-वडिलांशी त्यांनी संवाद साधला. हळूहळू सगळे वातावरण पालटू लागले. गणेश पुन्हा जोरात अभ्यासाला लागला व पुढच्याच प्रयत्नात तो इंटरमिजिएट परीक्षा व्यवस्थित मार्काने पास झाला.
‘कहानी में ट्विस्ट’ म्हणतात तसा यानंतरच खरा सुरू होतो. नापास झाल्यानंतर झालेला गणेशच्या व्यक्तिमत्त्वातला बदल हा सगळ्यांना जरा चक्रावणारा होता. मला नापास केले गेले, कारण मी माथाडी कामगाराचा मुलगा. माझे शिक्षण मनपाच्या शाळेत झाले. मराठी माध्यमातून झाले. माझ्याबरोबर सीए करणार्या सगळ्या मुलांचे आईवडील कसे उच्चशिक्षित चांगल्या नोकर्या करणारे. माझी आईवडील मात्र शाळेचे तोंड न पाहिलेले. अशी आजवर गणेशच्या तोंडातून न आलेली वाक्ये एखाद्या प्रसंगानुसार भडाभडा बाहेर पडायची. त्याचे तेच तेच बोलणे हे ऐकून हळूहळू त्याचे सहकारी तुटू लागले. दरम्यान त्याची आर्टिकलशिप पण संपली. आता अभ्यासिकेमध्ये बसून अभ्यास करणे एवढाच दिनक्रम राहिला होता. अभ्यासिकेमध्ये बसल्यानंतर विविध पेपरमधे वाचताना सीए झालेल्या मुलांना मिळणार्या नोकर्यांचे पगाराचे आकडे (पॅकेज) वाचण्याचा त्याला छंद जडला. कोणाला दहा लाख, कोणाला बारा लाख, कोणाला अठरा लाख मिळाले याची त्याच्या मेंदूत कोरीव नोंद ठसत होती. मनाशी त्याने ठरवून टाकले की मला किमान पंधरा लाख मिळाले तरच मी नोकरी घेणार.
एक जुनी म्हण आहे ना, ‘खाईन तर तुपाशी, नाहीतर राहीन उपाशी’. अगदी त्याला साजेशी त्याची मन:स्थिती झाली होती. अशात सीएची परीक्षा तो उत्तीर्ण झाला. वाचकांच्या माहितीसाठी म्हणून येथे नोंदवत आहे. दहावी बारावीचे उत्तम मार्क, सीएच्या तीनही पातळ्यांवर सर्व परीक्षा चांगल्या मार्कांनी व एकाच वेळी दोन्ही ग्रूपमध्ये पास होणार्या विद्यार्थ्यांना पॅकेज किंवा उत्तम पगार मिळतो. अशांची संख्या एकूण पास होणार्यांमध्ये जेमतेम दोन टक्के असते. हा पगारातील फरक इतका मोठा असतो की ज्याचे नाव ते. रडतखडत पास होणार्यांना चार लाखाचे पॅकेज मिळते तर उत्तम पास होणार्यांना बारापासून सुरुवात होते. निकालानंतर गणेश विविध ठिकाणी अर्ज करत होता. प्रत्येक ठिकाणी त्याला मुलाखतीसाठी बोलावलेही जाई. मात्र देऊ केलेला पगार व गणेशच्या मनातला पगार यातील दुपटीपेक्षा जास्त असलेली तफावत पाहून गणेशच्या शब्दांत तो ‘त्या नोकरीवर लाथ मारून परत येत असे’. निकाल लागल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी काही ठराविक कालावधीत म्हणजे सुमारे दोन-तीन महिने हा प्रकार चालू होता. त्यानंतर गणेशने अर्ज केला तर त्याला उत्तरही येईनासे झाले. ज्यांच्याकडे सीए केले त्या चार्टर्ड अकाउंटंटनी गणेशमध्ये झालेला हा बदल पाहून हात टेकले. एवढेच नाही तर गणेशला स्वतःच्या ऑफिसमध्ये काही कामही देण्याचे नाकारले. घरात आई-वडिलांशी संवाद नाही. बाहेर बोलायला मित्र नाही. हातात पगाराचे पैसे नाहीत. कोणत्याही नोकरीत काम करण्याची इच्छा नाही. मात्र परिस्थितीबद्दलचा मनात साचलेला संताप अशा कोंडीत गणेश सापडला होता.
एक दिवशी गणेश जेवायला पानावर बसलेला असताना आईने ‘फुकटचे खाणारा माझा हुशार, पण वाया गेलेला मुलगा’ अशा शब्दात त्याचा उद्धार केला. तो जिव्हारी लागला म्हणून का होईना, त्याच आठवड्यात तडकाफडकी गणेशने मिळाली ती नोकरी स्वीकारली. तशी ती अपेक्षेनुसार नसली तरी वर्षाला पाच लाख रुपये देणारी होती. संतापाने, अस्वस्थ मनाने, वैतागत कामाचा पहिला महिना संपला आणि गणेशच्या हातात चाळीस हजाराचा पगार पडला. इतकी मोठी रक्कम त्याच्या हातात प्रथमच येत होती. इतकेच काय गणेशच्या आई-वडिलांनीही एकरकमी चाळीस हजार पाहिले नव्हते.
तापलेल्या तव्यावर पाणी पडते व त्यानंतर हळूहळू तो थंड होत जातो. पाण्याची वाफ हवेत विरून जाते तसाच गणेश शांत होत गेला. सहा महिन्यात कामात रुळला. त्याची कामातील तडफ पाहून, नेकीवर विश्वास ठेवून वर्ष संपताना कंपनीने वार्षिक पगारात चक्क दोन लाख रुपयांची वाढ केली. अखेरीस गणेशच्या घराची म्हणतात तशी साडेसाती संपली होती. सीए गणेशची करिअर सुरू झाली.
तात्पर्य : अडचणींचे डोंगर पार पडताना मन शांत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. अंगभूत हुशारी नेहमीच उपयोगी पडते. पण परिस्थितीने यशाची चुणूक दाखवल्यानंतर सारासार विचार करणारी व्यक्ती योग्य निर्णयापर्यंत येते. भले मोठे पगार, छान छान पॅकेज हे सारे फार तर हजारात एखाद्यालाच मिळते. सरसकट नाही.