
शनिमाहात्म्य या प्रबोधनकारांच्या पुस्तकातली मांडणी आपण समजून घेत आहोत. प्रबोधनकारांच्या शब्दातच त्यांनी केलेली अंधश्रद्धेची फजिती वाचताना आपण त्यांच्या शैलीने गारद होतोच, पण नव्याने विचारही करू लागतो. शनिमाहात्म्यातल्या कथेशी स्वतःच्या जीवनातल्या घटनांचं साम्य सांगून झाल्यावर ते अधिक खोलात जाऊन चिकित्सा करतात.
`शनिमाहात्म्यातल्या विक्रम राजाच्या कहाणीतल्या घटना आणि आपल्या आयुष्यातल्या घटना यांची सांगड घालून प्रबोधनकारांनी शनिमाहात्म्याची चिकित्सा झकास रंगवली आहे. शनिमाहात्म्यात विक्रमाचे हातपाय एकदाच तुटले, माझे तर शेकडो वेळा तुटले आहेत, असंही त्यांनी अगदी सहज जाता जाता सांगितलं आहे. दैववादाचा फोलपणा आणि प्रयत्नवादाच्या मर्यादा सांगतानाही ते प्रत्येक गोष्ट तपासून बघत राहतात. पौराणिक कथांना वर्तमानाशी जोडून घेत त्यातलं तथ्य समजून घेण्याचा त्यांचा आग्रह टोकाचा आहे. त्यासाठी ते स्वतःलाही सोलवटून घेत राहतात.
त्याचाच एक भाग म्हणून प्रबोधनकार प्रश्न उभा करतात, या आपत्ती टाळता आल्या नसत्या काय? मग स्वतःच त्याचं उत्तर देतात, सगळ्याच नाही, तरी बर्याच खास टाळता आल्या असत्या. मी ज्या आपत्तीच्या चरकात पिळून निघालो, त्याला ग्रहदशा जरी कारण असली, तरी मी त्याचा सर्व दोष माझ्या स्वतःच्या अज्ञानाला देतो. माझे अज्ञानच माझ्या आपत्तींना कारण. ग्रह, ग्रहदशा आणि त्यांचे फेरे या चिजा काय आहेत, या बाबतीत माझी ‘सबझूट’ वृत्ती आणि तद्विषयक चिकित्सापूर्वक विचार किंवा अभ्यास करण्याची निवृत्ती, हीच मला विशेष भोवली… शनीच्या साडेसातीविषयी अगर एकंदर ग्रहदशेच्या गुणधर्माविषयी मला स्वतःला काही निश्चित ज्ञान असते, एखाद्या ज्योतिषी मित्राने मला ते करून दिले असते, अगर त्याच्या चर्चेचा एखादा सुबोध ग्रंथ माझ्या हातात ठेवला असता, तर साडेसातीच्या काळात विशेष खबरदारीने आणि धोरणाने वागलो असतो; आणि ग्रहदशाप्राप्त आपत्तीचे आघात त्यावेळी जरी मला टाळता आले नसते, तरी त्यांची नांगी मला खात्रीने बरीच बोथट करता आली असती. अकल्पित आघातांचा अचानक मारा आगामी जाणिवेच्या ढालीवर खबरदारीने खास झेलता आला असता. कड्यावरून मी कोसळलो असतो, पण एखाद्या कपारीला घट्ट पकडून सावरलो असतो; अचेतन दगडधोंड्यासारखा थेट पायथ्याशी येऊन पडलो नसतो.
एकीकडे ग्रहदशेला आपल्या आयुष्यातल्या चढउतारांविषयी काही प्रमाणात कारण मानत असतानाच प्रबोधनकार त्याला प्रश्नही विचारताना दिसतात. त्याची उत्तरं ते अशी देतात, ग्रहदशेच्या बहुतेक आपत्त्या मनुष्यकृत असतात. आणि त्या तशा असल्यामुळे शेराला सव्वाशेर या नात्याने, किंवा परस्पर पावणेतेरा धोरणाने, मनुष्याला त्याच्याशी झुंज घेता येणे शक्य आहे. प्रतिकाराचा मारलेला फटका किंवा प्रयत्नांची हाणलेली डुक्करमुसंडी प्रतिकूल ग्रहदशेमुळे यशस्वी झाली नाही, तर ‘मी प्रतिकाराची आणि प्रयत्नांची शिकस्त केली’ एवढे समाधानसुद्धा कमी महत्त्वाचे नव्हे.
ग्रहदशेचा काहीही प्रभाव असला तरी त्यासाठी ज्योतिषांच्या नादी लागण्याची गरज नाही, असं ते आवर्जून सांगतात. ज्योतिषांचे ज्योतिष म्हणजे भूताचे भविष्य असा त्यांचा सिद्धांत आहे. त्याचा अर्थ असा की ज्योतिषी हे भविष्यातली भाकितं सांगण्याऐवजी भूतकाळात झालेल्या घटनांचेच आडाखे बांधताना दिसतात. त्याविषयी प्रबोधनकार सांगतात, १९२३ ते १९२७ अखेरपर्यंत माझे बॉम्बस्फोटी जीवन अभ्यासून, ‘तुमची सध्या साडेसाती चालू आहे’ असा अनेक ज्योतिषांनी एकच गिला चालविला. पण त्यावर उपाय काय? तर उपाय काहीच नाही… साडेसाती सुरू होऊन तिचे उपरोक्त बॉम्ब माझ्यावर कडाकड फुटेपर्यंत मात्र हे सगळे आकाशस्थ ग्रहशनि तोंडाला कुलूप लावून स्वस्थ मजा पाहत होते. परिणाम घडल्यावर त्याची कारणमीमांसा थेट शनि, राहू, केतूच्या माजघराशी नेऊन भिडवणारे कुंडलीबहाद्दर पुष्कळ असतात. तेवढ्यासाठी ज्योतिषशास्त्र-प्राविण्याची फुशारकी कशाला? दिवा भडकून घर पेटून जमीनदोस्त झाल्यावर, राहूच्या महादशेची सबब ज्योतिष्याच्या दूरदृष्टीचे मुळीच समर्थन करू शकणार नाही. घडल्या गोष्टी सांगण्यासाठी ज्योतिषशास्त्रच कशाला? आमचे घर का पेटले? तर दिवा भडकला म्हणून. दिवा का भडकला? आमचा गाढवपणा म्हणून. आकाशस्थ राहू, शनि रॉकेलचा काकडा घेऊन थोडाच आमचे घरी येत असतो? कर्माचे कारण व्यवहारशास्त्रसुद्धा बिनचूक सांगते. त्यासाठी निराळ्या ज्योतिषशास्त्राची जरूर कशाला?
ज्योतिषी कुंडलीतल्या गणितात अडकून बसतात, त्याऐवजी त्यांनी भविष्याच्या सूचना द्याव्यात, असं प्रबोधनकारांना वाटतं, बाहेर कडक उन्हाळ्याचे फुटाणे स्पष्ट दिसत आहेत. अशा वेळी ‘जोडा-छत्री घेऊन बाहेर पडा’ असा निःसंदिग्ध इशारा न देता, एखादा माणूस पाय पोळून सनस्ट्रोकने मेल्यावर, ‘हा साडेसातीचा परिणाम’ म्हणून विद्वत्ता पाघळणार्या ज्योतिष्याची त्याच उन्हात खांबाला उघडाबोडका बांधून कोणी संभावना केली, तर त्यात काही चूक होणार नाही, असे मला वाटते. आकाशस्थ ग्रहदशेचे बरे वाईट परिणाम मनुष्यमात्रावर होतात हे जर सिद्ध सत्य आहे, तर त्याविषयी आगामी सूचना देणे, इतकेच नव्हे तर उपाय सुचविणे, हेच वास्तविक ज्योतिष्यांचे कर्तव्य. पण बहुतेक सारे ज्योतिषी नुसते गणित्ये ठोकळे असतात.
प्रबोधनकारांच्या मते ज्योतिषांचे उपायही निरर्थकच असतात, त्यांचे उपाय म्हणजे मारुतीच्या मूर्तीवर शेंदूरतेल थापा आणि हातपाय जोडून स्वस्थ बसा, असे ठराविक मासल्याचे असतात. अमूक ग्रह अमक्या गृहात आला की त्याचे फळ अमूक. असल्या पाचसहाशे वर्षापूर्वी ठरलेल्या ठोकताळ्यापलीकडे त्यांची अक्कल जात नाही… असल्या पोटार्थी प्राण्यांच्या कक्षेत येणारी प्रत्येक दैववादी हटकून मर्दाचा नामर्द आणि अर्जुनाचा हिजडा बनत असतो. दैवाच्या रेषा समजून घेण्यासाठी येणारा माणसाला आत्मनिरीक्षणाचा कानमंत्र देणारा एकही ज्योतिषी माझ्या आढळात किंवा ऐकिवात नाही. आत्मनिरीक्षणालाच जे स्वतः पारखे, त्यांनी इतरांच्या दैवाची गणिते सोडविण्याची घमंड मारणे, हे हिंदू पोटार्थी ज्योतिष फार भयंकर आहे.
स्वतःचं आत्मनिरीक्षण करण्याचा हा उपाय प्रबोधनकारांनी फक्त सांगितलाच नाही, तर स्वतःच्या जीवनातही अमलात आणला. त्यातूनचे हे शनिमाहात्म्य पुस्तक जन्माला आल्याचं ते सांगतात. ते त्याविषयी लिहितात, अखेर संक्रांतीला विचारक्रांती झाली. सर्व सणात मला संक्रांतीचा सण फार आवडतो. त्याच्या नावात क्रांती तर आहेच आहे, पण या दिवसापासून सार्या विश्वाच्या चक्रगतीतही क्रांतीच होत जाते… ‘आपण आपणाशी ओळखावे, या नाव ज्ञान’ असा समर्थांचाही इशारा आहे. ह्या दिवशी मी जे चिंतन मनन केले, त्याचा परिणाम मी प्रस्तुत ग्रंथाच्या रूपाने जनता जनार्दनाच्या सेवेला सादर रुजू करीत आहे. हातपाय तुटून आपत्तींच्या मुरोळ्यात लोळत लोळताही ‘शनिमाहात्म्य’ लिहून मला माझ्या देवाची जनता जनार्दनाची सेवा करता आली, हे काय लहानसहान समाधान?
पुढच्या प्रकरणात प्रबोधनकारांनी राजा विक्रमाच्या कहाणीच्या पुढच्या भागाचा खरा अर्थ सांगितलाय. या कहाणीत सर्वस्व गमावलेला विक्रम दीपराग गातो आणि संपूर्ण शहरातले दिवे पेटतात, असा प्रसंग आहे. त्याचा संबंध प्रबोधनकारांनी अंतरीच्या ज्ञानदिव्या`शी लावला आहे. हे वाचून प्रबोधनकार नेमकी शनिमाहात्म्याच्या दैववादी कहाणीतून प्रयत्नयोगाची तत्त्वं कशी बाहेर काढत होते, हे लक्षात येईल, `अशा वेळी त्याला आपली अंतस्थ ज्ञानज्योतच पाजळून, आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण करावे लागते. दिवा लावल्याशिवाय अंधार जाणार कसा आणि दिसणार काय? हेच ‘अंतरीच्या ज्ञान-दिव्या’चे तत्त्व महिपतीने दीपरागाच्या उपमेने व्यक्त केले आहे. एकदा दीपराग चांगला आळवला गेला, अंतरीचा ज्ञान-दिवा प्रज्वलित होऊन आजूबाजूवर प्रकाश पडला, की त्याच्या पाठोपाठ ‘श्री’ राग ठेवलेलाच. दीप लावल्याशिवाय श्रीची प्राप्ती होणार कशी?
शनिमाहात्म्याच्या कहाणीतला भाकडपणा त्यांनी वारंवार समोर आणलाच आहे. त्यानिमित्ताने एकूणच पौराणिक पोथ्यांचेही ते वाभाडे काढतात, ‘सर्वात मी शनि श्रेष्ठ, माझा धाक सार्या त्रिभुवनाला, माझ्यापुढे हे विश्व म्हणजे कःपदार्थ’ ही पौराणिकी परंपरेची प्रतिष्ठा प्रसिद्ध करणे, वगैरे मामली पुराणी प्रकारच तात्याजी महिपतीने कथन केले आहेत. गणेशपुराणात गणपती श्रेष्ठ, बाकी देव कुचकामी. शिवपुराणात शिव श्रेष्ठ, बाकी देव फोलकट. देवी पुराणात, देवी थोर, बाकीचे पुल्लिंगी देव सारे खापर्याचोर, ही जी पुराण लेखकांची जुनी खोड, तोच अखेर तात्याजी महिपतीलाही पत्करावी लागली. आधीच हिंदुस्थानातल्या हिंदूंच्या बोकांडी तेहतीस कोटी देवांची फलटण गांधीलमाश्यांप्रमाणे डसलेली आहे. त्यात पुन्हा शैववैष्णव, जैन-लिंगायत, वेदिक भागवती वगैरे वादांची पानपते नित्य घुमश्चक्री घालीत असतातच आणि त्यातच प्रत्येक पुराणातल्या आणि माहात्म्यातला ‘हीरो’ स्वतःच्या सर्वश्रेष्ठत्वाचा ताशा चौघडा बडवू लागला की ‘आता व्हट्ट द्यावं तरी कोण कोणाला?’ असा विलक्षण इलेक्षनी पेच वाचक-भगतांपुढे पडतो. बोलून चालून हे ‘शनिमाहात्म्य’ तेव्हा त्यात कवीने शनीचे सर्वांगीण स्तोम न माजवावे, तर कोणाचे? इलेक्शनच्या हंगामात प्रत्येक उमेदवार झब्बूचे पोवाडे गाण्यासाठी जसे शेकडो पोटाळ पंडित टोळधाडीप्रमाणे खेडोखेडी त्या झब्बूचे तुणतुणे वाजवीत फिरतात, तसेच हे माहात्म्य-लेखक आपापल्या माहात्म्य-देवाचे ढोलके बडवितात. ह्यापेक्षा त्यात विशेष काहीच नाही.`
विक्रमाच्या कहाणीचा अर्थ सांगताना प्रबोधनकार व्यावहारिक शहाणपणाचे धडे देतात. उदाहरणार्थ, आपत्तीच माणसाला खरे मित्र कोण आणि शत्रू कोण याची जाणीव करून देते किंवा गर्व हाच माणसाला जमिनीवर आपटतो. त्याशिवाय ते राजा विक्रमाच्या निमित्ताने प्रामाणिकपणा, परोपकार अशा सद्गुणांचा उपदेश करतात. पण त्यांचा मुख्य उद्देश शनिमाहात्म्यातलं थोतांड सांगण्यावरच आहे. शनिमाहात्म्याच्या शेवटी शनि सांगतो की तुम्ही शनिमाहात्म्याचं पारायण केलं की तुमची साडेसातीतून मुक्तता होईल. प्रबोधनकार याला उत्तम जाहिरातीचा दाखला म्हणतात आणि त्याचा फोलपणा दाखवतात, शनिमाहात्म्य फक्त मराठी भाषेतच आहे. गुजराथी, हिंदी, मद्रासी, बंगाली किंवा गुरुमुखी भाषेत याचा पत्ता नाही. या भाषा बोलणारांना मराठी भाषा समजत नाही. शनीची साडेसाती जर सर्व मनुष्यमात्रास भोवते, तर या बिनमराठी भाषकांची साडेसाती टाळण्याचे काहीच शनिवाण साधन शनीने निर्माण केलेले नाही, असे म्हणावे लागेल. शनीची कृपादृष्टी सार्या जगात फक्त मराठी महाराष्ट्रावरच विशेष दिसून येते म्हणूनच महाराष्ट्रात ‘पुणे’ आणि ‘शनिमाहात्म्य या दोन बिनताेड चिजांची खास मेहेरबानी झालेली दिसते.
या आठव्या प्रकरणाचा शेवट करताना प्रबोधनकारांनी जे शालजोडीतले दिले आहेत, ते भारीच आहेत, गीता उपनिषदादि मोठमोठ्या ग्रंथांच्या नशिबी जे सर्टिफिकेट लाभले नाही, ते तात्याजी महिपतीच्या ‘शनिमाहात्म्य’ चोपड्याला लाभले, ते फक्त मराठी भाषेला मिळाले! त्याची महती फक्त महाराष्ट्रात! केवढे आमचे भाग्य! काय आमची थोरवी शनिदेवाची महाराष्ट्रावर केवढी ही लांबरुंद कृपेची पाखर! एका या शनिमाहात्म्याच्या नुसत्या श्रवणाने अतिदारुण ग्रहपीडा कल्पांतिसुद्धा बाधायच्या नाहीत! लेखक पाठकांनासुद्धा खास ग्रंथाचे व शनीचे पोलीस प्रोटेक्शन केवळ भावे श्रवण केले पुरे, की दुःख, दारिद्र््याचा निःपात झालाच म्हणून समजावे. असला हा शनिमाहात्म्याचा कल्पतरु किंवा चिंतामणी, अवघ्या एक आण्यात खरेदी करून खिशात बाळगिण्याची महाराष्ट्रीय मर्हाठ्यांना खास सवलत दिल्याबद्दल शनीचे अभिनंदन करावे, का तात्याजी महिपतीच्या बिनतोड भाग्याचा महिमा गावा, एवढाच प्रश्न सुटावयाचा आहे.

