• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मीम्स, पोस्टर्स, विनोदांनी घडवली हसरी क्रांती!

रवींद्र मराठे सातासमुद्रापलीकडून

Marmik Team by Marmik Team
July 30, 2026
in सातासमुद्रापलीकडून
0
मीम्स, पोस्टर्स, विनोदांनी घडवली हसरी क्रांती!

छाया-रुपेश जाधव

जंतरमंतरवरच्या गर्दीत एक फलक झळकत होता — त्यावर आत्मविश्वासाने सजलेल्या लिपस्टिकचा उल्लेख करत एक तरुणी सांगत होती की तिचं ‘फाउंडेशन’ दिवसभराच्या घामातही टिकून राहिलं, ‘सरकारसारखं ढासळलं नाही.’
शेजारीच आणखी एक पोस्टर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला उशीर होण्यामागचं कारण सांगत होतं. नोकर्‍यांच्या तुटवड्याच्या आपल्या देशात कदाचित मंत्र्यांनाही नवी नोकरी मिळेपर्यंत जुनी सोडायची भीती वाटत असावी, अशी ही थेट कॉर्पोरेट भाषेतली टोलेबाजी होती.
तिसरीकडे एक तरुण ”GRWM’ ‘ (गेट रेडी विथ मी) रील शूट करत सांगत होता की तो आंदोलनासाठी तयार होताना ‘कणा, झुमके आणि आपला घटनात्मक हक्क’ परिधान करून निघाला आहे. जी भाषा आजी-आजोबांच्या पिढीला ‘असभ्य’, ‘फालतू’ किंवा ‘संस्कारहीन’ वाटेल, तीच भाषा घेऊन जेन झीने दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलनाचं व्याकरणच बदलून टाकलं. आणि हा उद्धटपणा केवळ मौजमजेपुरता मर्यादित नव्हता. कॉक्रोच जनता पार्टीने स्वतःच स्वतःला दिलेलं अधिकृत घोषवाक्य आहे. ‘आळशी आणि बेरोजगारांचा आवाज.’ कुठल्याही पारंपरिक राजकीय पक्षाने स्वतःला असं संबोधणं अशक्य आहे; पण जेन झीने सरन्यायाधीशांनी मारलेला ‘झुरळं-परजीवी’ हा शिक्का स्वतःच्या अंगावर मिरवत, त्याच अपमानाला शस्त्र बनवलं.

२० जुलैच्या लाठीचार्जनंतर तर भाषेची धार आणखी तीव्र झाली — गरम कलाकार नावाच्या एका यूट्यूबर-रॅपरने त्या दिवसाच्या घटनांवर एक रॅप गाणं टाकलं, ज्यात साध्या, रोखठोक रस्त्यावरच्या शब्दांत साध्या वेशातील गुंड, नामपट्टी काढून टाकलेले पोलीस आणि लहान मुलं-वृद्धांवर झालेल्या लाठीहल्ल्याचं थेट, कुठलाही मुलाहिजा न राखता वर्णन केलं होतं. अशी उघड, बटबटीत आणि अनफिल्टर्ड भाषा — जी दूरदर्शनवरच्या सभ्य चर्चेत कधीच ऐकायला मिळणार नाही — तीच भाषा आता लाखो मोबाईलवर वाजत होती.
‘अचकट-विचकट’ भाषा
एका एक्स युजरने थेट ‘प्रोटेस्ट नाही, मीम पोस्टर स्पर्धा’ असं शीर्षक देत जंतरमंतरवरील फलकांचा एक धागाच सुरू केला — आणि तो व्हायरल झाला. यात ‘फुलेरा के प्रधान’ (‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजमधल्या पात्राचा संदर्भ) असे कोट्या करणारे फलक होते. गांधी-आंबेडकरांना ‘नव्या सीझनसाठी’ पुन्हा बोलावल्याची थट्टा होती आणि मोदींच्या करोनाकाळातील थाळीनादाच्या आवाहनाची उलटवलेली नक्कल करत तरुणांनी पुन्हा थाळ्या-चमचे वाजवले— यावेळी टाळ्यांसाठी नव्हे, तर जाब विचारण्यासाठी. काहींनी लहान मुलांच्या डायपरवर मंत्र्यांसाठी राजीनाम्याचे संदेश लिहून थेट त्यांच्या कार्यालयात ‘डायपर डोनेशन ड्राइव्ह’ पाठवले— विनोद आणि व्यंग यांचा वापर करत सत्तेला आरसा दाखवण्याची ही शैली, जुन्या पिढीच्या ‘सभ्य’ आंदोलनाच्या व्याख्येत बसतच नाही. ही भाषा उद्दामपणे बेधडक आहे — इथे ना घोषणाबाजीचं गांभीर्य आहे, ना नेत्यांसमोरचा आदरयुक्त धाक. समाजमाध्यमांवर स्वच्छंद वाढलेल्या या पिढीसाठी सत्तेची खिल्ली उडवणं हे बंडखोरीचं नवं रूप आहे— आणि नेमकं याच बेधडकपणामुळे सरकारला हे आंदोलन ‘गांभीर्याने घ्यावंच लागलं’, कारण दुर्लक्ष केलं की तेच पोस्टर आणखी वेगाने पसरत होतं.

काही पोस्टरं तर अशी होती की ती छापताना वृत्तपत्रांनाही संकोच वाटावा. नेत्यांची खिल्ली उडवणारी, त्यांच्या ‘प्रतिष्ठे’ची लक्तरं वेशीवर टांगणारी, आणि— ज्येष्ठांच्या भाषेत — ‘अगदीच असभ्य’ भाषेतली. पण गंमत अशी की, या ‘असभ्यते’नेच आंदोलनाला धार दिली. कारण या पिढीचा युक्तिवाद सरळ होता : ‘ज्यांनी देशाची तिजोरी लुटली, तरुणांची स्वप्नं मारली, त्यांच्याबद्दल बोलताना आम्ही शिष्टाचार का पाळायचा? भ्रष्टाचार ‘असभ्य’ आहे; त्याची चेष्टा नव्हे!’ हा मुद्दा नीट समजून घेण्यासारखा आहे. आजवर सार्वजनिक अभिव्यक्तीला अलिखित मर्यादा होत्या. नेत्यावर टीका करा, पण ‘आदरपूर्वक’. व्यवस्थेवर बोला, पण ‘संयमाने’. जेन झी-ने हे संकेतच फाडून फेकले. त्यांनी सांगितलं— आदर हा कमावण्याची गोष्ट आहे, वयाने किंवा खुर्चीने मिळण्याची नव्हे. आणि एकदा ही मर्यादा ओलांडली गेल्यावर जे घडलं, ते अभूतपूर्व होतं, भीतीच नाहीशी झाली. जो तरुण काल नेत्याच्या नावाने मीम बनवून हसत होता, तो आज त्याच नेत्याच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उभा होता. हास्य हे भीतीचं सर्वांत प्रभावी औषध ठरलं.
गर्दी वाढवणारा व्हायरल इफेक्ट
मुंबई, इंदूर, उदयपूर, हैदराबाद. या शहरांमध्येही आंदोलन पोहोचलं, आणि याचं मोठं श्रेय जातं याच मीम-संस्कृतीला. जे विद्यार्थी प्रत्यक्ष जंतरमंतरवर पोहोचू शकले नाहीत, त्यांनी इन्स्टाग्राम आणि एक्सवरून या विनोदी पोस्टर्सना, रील्सना आणि गाण्यांना इतकं पसरवलं की आंदोलन हे केवळ दिल्लीपुरतं न राहता, एका राष्ट्रीय सांस्कृतिक घटनेत रूपांतरित झालं. एक्स अकाउंटवर बंदी आल्यानंतर काही तासांतच ‘Cockroach Is Back’  असं शीर्षक असलेलं नवं अकाउंट उभं राहिलं, आणि अवघ्या दीड तासात चोवीस हजारांहून अधिक फॉलोअर्स जमा झाले. इन्स्टाग्रामवर या चळवळीचे अनुयायी भाजपच्या अधिकृत पानापेक्षाही दुप्पट झाले. हा आकडाच सांगतो की विनोद हे केवळ मनोरंजन राहिलं नाही, ते सदस्यनोंदणीचं सर्वांत प्रभावी साधन बनलं. यामागचं मानसशास्त्र सोपं आहे. कंटाळवाण्या भाषणापेक्षा एक हसवणारा मीम शेअर करणं सोपं आहे आणि तो शेअर करणारा प्रत्येक तरुण अप्रत्यक्षपणे चळवळीचा प्रचारक बनतो. जो विद्यार्थी राजकारणाबद्दल कधी बोलतही नव्हता, तोही एका मजेशीर रीलवर हसून ती फॉरवर्ड करत होता. आणि हसता हसता तो आंदोलनाचा भाग बनत होता. भीतीने नव्हे, तर करमणुकीतून आलेला हा सहभाग होता आणि म्हणूनच तो अधिक टिकाऊ आणि अधिक सर्वसमावेशक ठरला.

दृश्य-श्राव्य परिणामाची ताकद
जुन्या राजकारणाचं व्याकरण होतं, तासभर चालणारं भाषण, वर्तमानपत्रातलं छापील निवेदन, दुसर्‍या दिवशी टीव्हीवरची चर्चा. जेन झीने हे व्याकरणच मोडीत काढलं. पोलिसांनी लाठीचार्ज केला, तेव्हा तरुणांनी पळापळीचे व्हिडिओ ‘सबवे सर्फर’ या मोबाईल गेमच्या संगीतावर आणि ‘चक दे इंडिया’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘भाग डीके बोस’ आणि ‘गंगनम स्टाइल’ यांसारख्या गाण्यांवर पोस्ट केले. एका व्हिडिओत तर थेट लिहिलं होतं, ‘दिल्ली पोलिसांचे कार्डिओसाठी आभार.’ जिथे एक भाषण ऐकायला दहा मिनिटं लागतात, तिथे एक पंधरा सेकंदांची रील बघता बघता तीच गोष्ट अधिक तीव्रतेने, अधिक भावनेने आणि अधिक स्मरणीयतेने पोहोचते. दृश्य आणि संगीताची ही जोडी माहितीपेक्षा भावना जास्त वेगाने पोहोचवते, डोळ्यासमोर धावणारा घाबरलेला विद्यार्थी आणि कानात वाजणारं परिचित गाणं, हे संयोजन कुठल्याही तासभराच्या भाषणापेक्षा जास्त खोलवर परिणाम करतं. जुन्या पिढीतील नेता आपल्या भाषणातून ‘तर्क’ मांडत राहिला, तर जेन झीने त्याच वेळी ‘भावना’ थेट काळजाला भिडवली. आणि राजकारणात शेवटी जिंकते तीच बाजू, जी लोकांच्या मनात जास्त काळ रेंगाळते.
राजकीय पटलावरचा भूकंप
जेन झीने राजकीय अभिव्यक्तीची व्याख्याच बदलून टाकली आहे. आधीच्या पिढ्यांसाठी आंदोलन म्हणजे घोषणा,
बॅनर आणि नेत्याचं भाषण. जेन झीसाठी आंदोलन म्हणजे एक सामायिक सांस्कृतिक अनुभव. जिथे राजकीय संदेश आणि इंटरनेट ट्रेंड्स इतके एकजीव होतात की तेच वेगळे करता येत नाहीत. राजकीय पक्षांची अधिकृत भाषा, त्यांचे पत्रकार परिषदांतले सावध शब्द, त्यांचे रंगीत परंतु ठराविक ढंगाचे फलक. हे सगळं या उत्स्फूर्त, अनियंत्रित आणि निर्भीड विनोदासमोर अगदीच सपक वाटू लागलं आहे.


हसणार्‍या पिढीला हलक्यात घेऊ नका
जगातली सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश. बेरोजगारी, पेपरफुटी, महागाई, घराणेशाही, जेन झीच्या जागतिक संतापाची सगळी कारणं ठासून भरलेली. आणि इथली तरुणाईही तितकीच ‘मीम-साक्षर’. उपहासातून प्रतिकार ही भाषा भारतीय तरुणाईने केव्हाच आत्मसात केली आहे. किंबहुना, तिची तालीम गेली काही वर्षं सुरूच होती… उदाहरणं शोधायला दूर जायला नको. रेल्वे भरती परीक्षांच्या गोंधळावरून बिहार-उत्तर प्रदेशात उसळलेला विद्यार्थ्यांचा संताप आठवा— रेल्वे रुळांवर उतरलेल्या त्या तरुणांच्या मागे कुठलाही पक्ष नव्हता; होते टेलिग्राम ग्रुप्स, यूट्यूबवरचे ‘खान सर’सारखे शिक्षक-प्रभावक आणि लाखोंच्या घरातले व्हायरल व्हिडीओ. ‘अग्निपथ’ योजनेविरोधातला उद्रेकही असाच — सरकारी घोषणा दुपारी झाली आणि संध्याकाळपर्यंत ‘चार साल की नौकरी, फिर क्या?’ विचारणारी मीम्स देशभर पसरलीही होती. पेपरफुटीच्या मालिकेने तर एक स्वतंत्र मीम-विश्वच जन्माला घातलं — परीक्षेआधीच ‘व्हॉट्सअ‍ॅपवर पेपर आला का?’ विचारणारे विनोद हे विनोद नसून तरुणाईच्या वैफल्याचा हुंकार होता. शेतकरी आंदोलनात ट्रॅक्टरवर लावलेले खोचक फलक आणि आंतरराष्ट्रीय पॉप-तारकांपर्यंत पोहोचलेले हॅशटॅग असोत, की शाहीन बागेतल्या भिंतींवरची कलात्मक-उपरोधिक पोस्टरं असोत— भारतीय आंदोलनांचं सौंदर्यशास्त्र आधीच बदलू लागलं आहे. आणि झुरळाचं प्रतीक हे त्या बदलाचं ठसठशीत शिखर : अपमानाचंच हत्यार बनवण्याची जेन झीची खास शैली.

राजकारणातला ‘गेमचेंजर’
भारतीय राजकारणासाठी हा ‘गेमचेंजर’ का ठरू शकतो, याची तीन ठोस कारणं आहेत.
पहिलं – संख्येचं गणित. भारतात दर निवडणुकीला कोट्यवधी नवमतदारांची भर पडते; २०२९पर्यंत जेन झी हा देशातल्या मतदारसंघांचा निर्णायक घटक बनलेला असेल. आणि ही पिढी राजकारण कुठून समजून घेते? जाहीर सभांमधून नव्हे; रील्स, पॉडकास्ट, मीम-पेजेस आणि स्वतंत्र यूट्यूब पत्रकारांकडून. जो राजकीय संदेश तीस सेकंदांत, हसवत-टोचत पोहोचत नाही, तो या पिढीसाठी अस्तित्वातच नाही. पक्षांचे ‘आयटी सेल’ आहेत, हे खरं; पण आयटी सेलचा प्रचार आणि तरुणाईचा उत्स्फूर्त मीम यांच्यातला फरक ही पिढी क्षणात ओळखते. पगारी विनोद कधीच व्हायरल होत नाही, हा या युगाचा नियम आहे.

दुसरं -भाषेच्या भिंती कोसळल्या आहेत. पूर्वी राष्ट्रीय आंदोलनाला हिंदी-इंग्रजीचा टप्पा गाठावा लागे. आता मराठी मीम-पेजेस, तमिळ टिकटॉक-वारस, भोजपुरी रील्स आणि पंजाबी पॉप हे सारे एकाच वेळी एकाच विषयावर तुटून पडतात. बेरोजगारीवरचा एक विनोद चोवीस तासांत बावीस भाषांमध्ये अवतरतो. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर, मराठी तरुणाईची मीम-संस्कृती ही आज कुठल्याही पक्षाच्या प्रचारयंत्रणेपेक्षा वेगवान आणि धारदार आहे. स्थानिक नेत्यांच्या वक्तव्यांची चिरफाड करणारी पेजेस लाखोंच्या फॉलोअर्ससह उभी आहेत.
तिसरं – आणि सर्वांत महत्त्वाचं – विश्वासाचं स्थलांतर. सर्वेक्षणांमागून सर्वेक्षणं सांगतात की भारतीय तरुणाईचा पारंपरिक राजकीय संस्थांवरचा विश्वास घसरतो आहे, पण लोकशाहीवरची श्रद्धा कायम आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. ही पिढी राजकारणाला विटलेली नाही; ती राजकारणाच्या ‘सादरीकरणा’ला विटली आहे. तिला मुद्दे हवे आहेत, पण भाषणबाजीशिवाय; सहभाग हवा आहे, पण झेंडे उचलण्याच्या गुलामीशिवाय.

नेपाळमध्ये आंदोलनानंतर नवं नेतृत्व निवडताना तरुणांनी चक्क ‘डिस्कॉर्ड’ या गेमिंग-अ‍ॅपवर मतदान घेतलं — लोकशाहीचं हे नवं रूप भारतीय पक्षांच्या कल्पनेपलीकडचं आहे. आणि इथेच खरा इशारा आहे. भारतातली व्यवस्था शेजार्‍यांपेक्षा कितीतरी भक्कम आहे हे खरं, पण संताप साठण्याची प्रक्रिया सीमा ओळखत नाही. श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ. तीन शेजारी, तीन धडे. भारतातल्या प्रत्येक पक्षाने हे नीट वाचून ठेवावं. जी पिढी काठमांडूचं आंदोलन ‘लाइव्ह’ पाहत होती, ती दिल्ली-मुंबईतही तेच स्क्रोल करत होती. प्रेरणा डाउनलोड व्हायला व्हिसा लागत नाही.
जुने बुरुज ढासळताना
आणि म्हणूनच शेवटचा, सर्वांत कठोर मुद्दा, जुन्या नेत्यांची झपाट्याने होणारी अप्रस्तुतता. हे नेते संपले असं नाही; ते ‘अदृश्य’ झाले. या पिढीच्या विश्वात त्यांचं अस्तित्वच नोंदलं जात नाही. पन्नास वर्षांचा राजकीय अनुभव सांगणारा नेता आणि पन्नास लाख व्ह्यूज मिळवणारा एकोणीस वर्षांचा मीम-निर्माता — यांच्यातली लढाई विषम वाटते, पण निकाल उलटा लागतोय. नेपाळमध्ये अनुभवी पंतप्रधानांना ज्यांनी घरी बसवलं, त्यांच्यापैकी अनेकांना मतदानाचाही अनुभव नव्हता! जुन्या नेत्यांची शस्त्रं— वक्तृत्व, संघटना, अनुभव— या नव्या रणांगणावर चालतच नाहीत. त्यांचं दीड तासाचं भाषण एक तरुण पंधरा सेकंदांच्या विडंबनात उडवून लावतो आणि ते विडंबन भाषणापेक्षा दसपट लोकांपर्यंत पोहोचतं. काही नेते केविलवाण्या पद्धतीने ‘तरुण बनण्याचा’ प्रयत्न करतात— रील्स बनवतात, तरुणाईची भाषा बोलू पाहतात. पण नक्कल लगेच पकडली जाते आणि त्यावरही मीम्स बनतात! व्यंगचित्रकाराशी युद्ध जिंकता येत नाही, हे जुनं सत्य; आता ते कोट्यवधी व्यंगचित्रकारांची फौज समोर असताना अधिकच निर्दय बनलं आहे.
भारतातही याची चाहूल स्पष्ट आहे. सत्तरी ओलांडलेले नेते अवघडून रील्स करताना दिसतात आणि त्या केविलवाण्या प्रयत्नांवरच नव्या मीम्सचा पाऊस पडतो. घराणेशाहीच्या शिड्यांवरून वर आलेल्या ‘युवा’ नेत्यांची पंचेचाळिशीही या पिढीला ‘युवा’ वाटत नाही. कारण तिचं ‘युवा’पण वयात नाही, भाषेत आहे. ज्या नेत्याला ‘रोस्ट’ म्हणजे काय हे समजत नाही, तो या पिढीशी संवादच साधू शकत नाही. जे मोजके नेते या भाषेत अस्सलपणे बोलतात- पॉडकास्टवर तासभर मोकळेपणाने मुलाखती देतात, स्वतःवरच्या विनोदांना दिलखुलास दाद देतात. त्यांची लोकप्रियता पक्षीय सीमा ओलांडून वाढते आहे. निवडणूक प्रचारातही हे स्थित्यंतर दिसू लागलं आहे. प्रचारसभांच्या गर्दीपेक्षा ‘व्ह्यूज’चे आकडे मोजले जातात, आणि उमेदवाराची भाषणं कमी अन् त्याचे ‘क्लिप्स’ जास्त फिरतात. उद्याच्या निवडणुका सभांच्या मैदानांवर नव्हे, तर मोबाईलच्या स्क्रीनवर लढल्या जातील. आणि तिथे उमेदवारी अर्ज भरावा लागत नाही, फक्त अस्सल असावं लागतं.

पुढे काय?
अर्थात, या चळवळीपुढची आव्हानंही नाकारता येणार नाहीत. सरकार पाडणं आणि सरकार चालवणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. नेतृत्वहीनतेचं जे बळ रस्त्यावर होतं, तेच वाटाघाटींच्या टेबलावर दुर्बलता ठरू शकतं. नेपाळ आणि बांगलादेशपुढचा आजचा प्रश्न हाच आहे— विध्वंसाची ऊर्जा विधायकतेत कशी वळवायची? पण एक गोष्ट निर्विवाद. सार्वजनिक अभिव्यक्तीच्या मर्यादांचे जुने कुंपण जेन झीने कायमचं मोडलं आहे. सत्तेची चेष्टा हा आता गुन्हा नाही; तो लोकशाहीचा श्वास आहे, हे या पिढीने सिद्ध केलं.
भारतीय लोकशाहीसाठी यात संधीही आहे आणि इशाराही. संधी अशी की, राजकारणापासून तुटत चाललेली म्हणून जिची हेटाळणी झाली, ती पिढी प्रत्यक्षात राजकारणात नव्या वाटेने परतते आहे. तिला फक्त जुन्या दरवाजांतून आत यायचं नाही, एवढंच. जो पक्ष तिच्याशी तिच्या भाषेत, अस्सलपणे आणि उत्तरदायित्वाने बोलेल, त्याला ही ऊर्जा विधायक शक्ती म्हणून मिळू शकते. आणि इशारा असा की, ही ऊर्जा फार काळ दुर्लक्षिली गेली, तर तिचं रूपांतर कशात होतं, हे काठमांडू आणि ढाक्याने नुकतंच जगाला दाखवलं आहे.
इतिहासाला विनोदबुद्धी असते म्हणतात. या पिढीने ती विनोदबुद्धीच इतिहास घडवण्याचं हत्यार बनवली. ज्या ज्येष्ठांना ही पोस्टरं ‘असभ्य’ वाटतात, त्यांनी एकच लक्षात ठेवावं— हसणारी पिढी घाबरत नाही. आणि जी पिढी घाबरत नाही, ती जग बदलते. हसता हसता.

(लेखक अमेरिकेतील रिचमंड, व्हर्जिनिया येथे राहणारे राजकीय विश्लेषक असून ते २५ वर्षांहून अधिक काळ परदेशात वास्तव्य करीत आहेत. ईमेल पत्ता : [email protected])

Previous Post

प्रधान गेले, आता?…

Next Post

शहाणे असाल तर वेळेत सुधारा!

Next Post
तरुणाईचा बांध फुटतो तेव्हा…

तरुणाईचा बांध फुटतो तेव्हा...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.