
इंग्रजी साहित्याइतकंच अगाध गोडीचं आणि असीम विषयांचं साम्राज्य असणारं स्थानिक भारतीय भाषेतलं साहित्य म्हणजे बंगाली साहित्य! इंग्रजी साहित्यिकांनी जितके आशय विषय हाताळले त्याहून अधिक विषय बंगाली साहित्यात येतात त्याचे कारण बंगाली संस्कृतीत आहे. बंगली भाषेत अनेक नामवंत साहित्यिक होऊन गेलेत ज्यांनी बंगाली भाषेला जागतिक पटलावर नेलं. त्यात कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हा वाद करणं सर्वथा अनुचित होय. घनघोर पाऊस कोसळणार्या एका अंधार्या रात्री पत्त्यांचा डाव मांडून बसलेल्या दोन मित्रांच्या गप्पाष्टकापासून ‘नवलोक’ची कथा सुरू होते, बाहेर वीजा चमकत असतात, रोरावणार्या वादळाचा आवाज सर्वत्र व्यापून असतो, काही केल्या पाऊसही थांबत नाही, अशा टिपिकल गूढ रात्री त्या दोघांना तिसर्या जोडीदाराची प्रतीक्षा आहे; जेणेकरून तो येताच त्यांना डाव मांडायचाय. थोड्याच वेळात नवा जोडीदार त्यांना जॉइन होतो. पत्त्यांचा डाव सुरू होतानाच त्यांचे कथाकथन सुरू होते, शैलू त्याची गोष्ट सांगू लागतो आणि फ्लॅशबॅकद्वारे आपण थेट ‘पथेर पांचाली’च्या काळात जाऊन पोहोचतो.
बंगाली साहित्याचे एक गूढ नि तितकेच अमीट जिव्हाळ आकर्षण राहिलेय. ‘तीनकाहोन’ हा तीन कथांचा सिनेमा! त्यातला ‘नवलोक’ हा भाग विभूतीभूषण मुखोपाध्याय यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित आहे. बुद्धायन मुखर्जीनी याचे दिग्दर्शन केलेय. शैलूची गोष्ट स्वातंत्र्यपूर्व काळातल्या चळवळींच्या भारलेल्या दिवसातली! आठ वर्षांचा एक अल्लड मुलगा आणि गावातली नवविवाहिता नयनतारा यांच्यातले आकर्षण हा सिनेमाचा कथाविषय.
नयनताराचा पती कोलकत्यात नोकरीस आहे, लहानगा शैलू तिच्यावर लट्टू झालाय. तिने पतीसाठी लिहिलेली पत्रे तो वाचत असतो नि त्याच्या मनात त्याच्याविषयी असूया निर्माण होत राहते. नयनतारा ही अनाथ मुलगी. तिचे सासरी शोषण होतेय. सुरुवातीला चिमुकल्या शैलूला तिच्याविषयी आकर्षण वाटते मात्र नंतर त्याचे रूपांतर कारुण्यात होते, तिच्याविषयी त्याच्या मनात कणव दाटून येते. आपण तिला प्रेम दिले पाहिजे, तिचे मन जपले पाहिजे असे त्याला निरंतर वाटते. बालवयात लिंगदेहभावना सहसा मनात येत नाहीत मात्र वाढत्या वयानुसार शैशवातील लैंगिक आणि प्रेमभावना पाठलाग करत राहतात हा विचार कथेतून अधोरेखित केला गेलाय. ‘तीनकाहोन’मध्ये शंभर वर्षांचा मानवी मूल्यांचा, भावनांचा, भाषेचा आणि सामाजिक अधःपतनाचा प्रवास साखळीबद्ध पद्धतीने दाखवला आहे, त्यातली पहिली कडी ‘नवलोक’ची आहे. नवलोकची कथा वरवर नर्मविनोदी वाटते मात्र शेवटी शैलूचे बालविश्व उद्ध्वस्त होते तेव्हा वाईट वाटते.
‘पोस्ट मॉर्टेम’ आणि ‘टेलीफोन’ या पुढच्या दोन कथा यात आहेत. सुरुवातीला खूप संथ वाटणार्या गोष्टी हळूहळू पुढे जाऊन अधिक टोकदार वाटू लागतात. जी गोष्ट शांत मंद वाटते तिचा शीतल कालखंड तिच्यासोबत असतो, मात्र धडकी भरावी अशा वेगाने काळ वाहू लागतो तेव्हा तोच जुना शांत कालखंड वेगळा भासू लागतो. त्या त्या काळातल्या मानवी भावना सजीव आणि निर्जीव वस्तूंशी कशा निगडित असतात हे पात्रांच्या संवादातुन समोर येते. ‘नवलोक’ची कथा अशी का लिहिली असावी याचे उत्तर विभूतीभूषण मुखोपाध्याय यांच्याच ‘श्रीमान पृथ्वीराज’ या कथेमध्ये दडलेय. याही कथेचा नायक रसिक हा किशोरवयीन चंचल स्वभावाचा नवयुवक आहे. अख्खे गाव त्याला वैतागलेय. त्याचे वडील तर अक्षरश: त्याच्यावर खार खाऊन असतात. त्याच्या रोजच्या खोड्या आणि गावाला पिसाळून सोडण्याच्या करामती यांनी ते हैराण झालेत. रसिकला याच्याशी फारसे देणेघेणे नाही, त्याला मनोमन वाटत असते की तो स्वतः पृथ्वीराजच (पृथ्वीराज चौहान)आहे!

कथेचा कालखंड स्वातंत्र्यपूर्व चळवळींचा आहे. स्वराज्य मोहिमेचा रसिकवर मोठा पगडा असतो. इतिहासात पृथ्वीराज चौहाननी जसे मुघलांचे आक्रमण परतावून लावण्यासाठी प्रयत्न केले होते, तसे आपण ब्रिटिशांच्या विरोधात बंड केले पाहिजे असे त्याला सतत वाटते. परिणामी तो स्वतःला पृथ्वीराजच समजतो! आपल्या मुलाचा हा वाह्यातपणा पाहून, त्याच्यात सुधारणा होण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून त्याचे वडील त्याचं लग्न करायचं ठरवतात. देखण्या अमलाशी त्याचं लग्न लावून देतात. अमला ही साक्षर आहे, विचारी आहे आणि वयाने लहान असूनही तिची स्वतःची विचारधारा आहे. तिच्या वडिलांना जमीनदाराचे लेबल हवे असते म्हणून ते रसिकचे स्थळ आल्यावर होकार देतात. मात्र कालांतराने त्यांचा हिरमोड होतो. ते मुलीला माहेरी परत घेऊन येतात. मधल्या काळात रसिकला तिचा लळा लागतो. त्याला अमलाची आठवण येऊ लागते. अनेक अडचणींवर मात करून ते दोघे सुखी दांपत्यजीवन जगू लागतात अशी साधीसरळ कथा. बंगाली सिनेमापैकी आजवरच्या दहा सर्वश्रेष्ठ लोकप्रिय रोमँटिक सिनेमात याची गणती होते. हा सिनेमा अफाट लोकप्रिय झाला. रसिक आणि शैलू ही दोन भिन्न सिनेमामधील भिन्न पात्रे असली तरी ती एकाच व्यक्तीची दोन रूपे आहेत हे वाचनाअंती उमगते. दोहोंचे वय जवळपास सारखेच आहे, कालखंडही तोच आहे आणि त्यांच्या आयुष्यात घडणार्या गोष्टी समांतर आहेत, त्याकडे पाहण्याचे त्यांचे दृष्टिकोन मात्र भिन्न आहेत.
‘श्रीमान पृथ्वीराज’मधील अमला या नायिकेची भूमिका महुआ रॉयचौधरी या देखण्या अभिनेत्रीने साकारली होती. कमी वयात अफाट लोकप्रियता लाभलेली अभिनेत्री म्हणून तिचा उल्लेख आजही केला जातो. वयाच्या सहविसाव्या वर्षी मद्यधुंद नशेत पेटलेल्या अवस्थेत तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं आणि त्यातच तिचा अकाली मृत्यू झाला. दिव्या भारतीचे जे स्थान हिंदी सिनेसृष्टीत आहे तेच स्थान महुआला बंगाली सिनेसृष्टीमध्ये आहे. तिच्यावरती आता बायोपिक येतोय.
विभूतीभूषण मुखोपाध्याय यांनी रानू नावाच्या मुलीची कथामाला लिहिली आहे, त्याचे विविध भाग आहेत. त्या रानूमध्ये आणि महुआमध्ये खूप साम्य होते, हा विलक्षण योगायोग! सौन्दर्य हा अभिशाप अशा अर्थाचे शीर्षक असणार्या कथेतली नायिका जशी वाहवत जाते तसंच काहीसं या महुआचं झालेलं! तसे पाहिले तर विभूतीभूषणना बंगाली साहित्यात नर्मविनोदी लेखन करणारे लेखक म्हणूनच ओळखले जाते, मात्र वास्तव तसे नव्हते. रसिक आणि शैलू या पात्रांद्वारे ते स्वतःकडे तटस्थ भावनेने पाहात असावेत असे वाटते कारण त्यांचे शैशव! ते आजन्म अविवाहित राहिले. उपजीविकेचे साधन म्हणून त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला होता. बिहारच्या दरभंगामध्ये जन्मलेल्या विभूतींचे बालपण हलाखीत गेलं. त्यांचे ज्या मुलीवर प्रेम होतं, तिचं बालवयातच लग्न झालं. तिला ते भेटत राहिले मात्र आपल्यातल्या व्यथेला ते हसर्या चेहर्याने सामोरे गेले. त्यांच्या प्रेमविषयक लेखनास विनोदाला कारुण्याची झालर होती त्यामागचे गमक हेच असावे. आयुष्यात पुन्हा त्यांनी कुणावरही प्रेम केलं नाही.

‘दंपती’ ही त्यांचीच कथा आहे जी सत्तरच्या दशकात लिहिलीय. यातल्या नायिकेचे वय पस्तिशीचे आहे. लग्न होऊन बरीच वर्षे झाली तरी कथेतल्या दांपत्यास मुलबाळ झालेलं नसतं, त्यांची मानसिक कुतरओढ आणि समाजाचा त्याविषयीचा दृष्टिकोन हा कथाविषय. यातल्या नायिकेचे चित्रण आणि रानू, अमला, नयनतारा यांच्यातले साम्य विलक्षण आहे. अगदी मातृत्वभावाने विभूतीभूषण यांनी तिच्याविषयी लिहिलं आहे. त्यांच्या किशोरवयीन प्रेमिकेच्या आयुष्यात पुढे जाऊन असे काही घडले असेल का, ज्याची त्यांनी दखल घेतली असावी असा कयास करता येईल. लेखक त्याच्या पूर्वायुष्याकडे कसे पाहतो आणि त्याची कशी मांडणी करतो यावरून बर्याच गोष्टींचा अंदाज लावता येतो, विशेषतः जडणघडण आणि वैचारिक धारणा कळू शकतात.
विभूतीभूषण कसल्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता, कुणाच्याही अधेमध्ये न पडता आपल्याला काय सांगायचे आहे ते आपल्या साहित्यकृतींतून मांडत असत. वृद्धापकाळात ते पुन्हा आपल्या मूळगावी परतले आणि तिथेच त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या एका कथेतला नायक कृष्णलाल याची नोकरी जाते, काहीकाळ तो दिशाहीन होतो मात्र संघर्ष करून पुन्हा त्याची गाडी मार्गी लागते. मात्र एके दिवशी त्याचे मन उचल खाते आणि तो गावी परततो. एक मुस्लिम महिला त्याला मुलगा मानून त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असते, हा तिच्यावर रागराग करतो, चिडतो; मात्र गावी परतल्यावर त्याच्यात बदल झालेला असतो. हे व्यक्तिचित्र त्यांच्या आयुष्याशी निगडीत होतं!
‘ललित बाबू’ नावाची त्यांची एक कथा आहे, ज्यात एका अधेडवयीन नायकाची गोष्ट आहे. कुमारवयात जिचे त्याने शोषण केलेलं असतं, तिच्या घरी तो अधून मधून काही ना काही निमित्त काढून जात असतो. अशी काही दशके जातात. या समग्र काळात तिचे घर, तिच्या जाणिवा आणि तिच्याविषयी बदलत गेलेल्या त्याच्या भूमिका अशी बांधीव कथा. विभूतीभूषण मुखोपाध्याय यांच्याविषयी वाचले तेव्हा हा ललितबाबू मला ओळखीचा वाटला. तो आपल्यापैकी कित्येकांच्या मनात दडून आहे, आपण त्याला बाहेर काढत नाही. रसिक, शैलू जेव्हा मोठे होतात तेव्हा त्यांच्यातला ललितबाबू मागे वळून पाहतो असे तर हे नसेल ना? असो. मला हा माणूस आणि त्याच्या कथा जाम आवडल्या.
आता एक वेगळी नोंद – १९८५ मध्ये महुआ रॉय चौधरीचे निधन झाले तेव्हा ती सहवीस वर्षांची होती. तिने आत्महत्या केली असे अनेकांचे मत आहे. ती आगीने कशी वेढली गेली हे सत्य कधीच समोर आले नाही. आज ती हयात असती तर साठीपार वयाची असती. सोनागाचीमध्ये पन्नाशी साठीतल्या बायकांचे जे कुंटणखाने आहेत त्यात अजूनही महुआचे कलर फिके झालेले, कपचे उडालेले फोटो दिसतात. तिच्याविषयीचे सुप्त आकर्षण या स्त्रियांमध्ये दिसलेलं. स्वतःला संपवावं असं या बायकांना खूपदा वाटत असतं मात्र त्या ते करू शकत नाहीत याची अनेक कारणे आहेत, मात्र प्रसिद्धीच्या शिखरावर असणार्या देखण्या सुस्वभावी महुआने ते केले याचे त्यांना विलक्षण अप्रूप.
आपल्याकडे मेळघाटात दोनशे रुपयांना एक बाटली ‘सिड्डू’ मिळते, सिड्डू म्हणजेच मोहाची दारू! ही, ज्या मोहाच्या फुलांपासून बनवली जाते ती फुले बंगालमध्ये महुआ नावाने ओळखली जाते. मोहाची फुले झाडावरून तोडली जात नाहीत, वसंत ऋतु सरताच पिकलेली फुले जमीनीवर पडतात, त्यांच्यापासून सिड्डू बनवली जाते. महुआपासून बनवलेल्या दारूचं बंगाली मोहूवा! महुआ रॉय चौधरी जेव्हा आगीने होरपळून निघाली होती तेव्हा ती मद्याच्या अंमलात होती! तिच्या निधनानंतर विभूतीभूषण यांनी शोक व्यक्त केला. ललितबाबू मधल्या नायिकेचे आयुष्य म्हणजे मोठी विडंबनाच! आपल्याकडे आताशा विनोदी लेखन कमी केले जातेय कारण वाचकांचा त्याकडे फारसा कल नसतो, नर्मविनोदी लेखनातून कारुण्य अधोरेखित करण्यासाठी एखादाच विभूतीभूषण मुखोपाध्याय असतो, कारण ही साक्षात जीव जाळणारी गोष्ट आहे!
आपण केलेल्या चुका आणि अपराध आपल्याला जितके ठाऊक असतात तितके ते कुणालाच ठाऊक नसतात. आपण परत परत त्या अपराधचिन्हांपाशी येत राहिलो तर आत्मपरीक्षण करण्याची सवय जडते, ज्यातून आपण प्रगल्भ होत जातो! आपल्यात दडलेला ललित बाबू शोधता आला पाहिजे!

