• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

महाराष्ट्र अंमली पदार्थांच्या विळख्यात

राजू वेर्णेकर -स्पेशल रिपोर्ट

Marmik Team by Marmik Team
September 5, 2026
in स्पेशल रिपोर्ट
0
महाराष्ट्र अंमली पदार्थांच्या विळख्यात

महाराष्ट्रात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीचा धंदा फोफावला असून मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नागपूर यांसारखी प्रमुख शहरे व ग्रामीण भागासह राज्याच्या कानाकोपर्‍यात अंमली पदार्थांचे जाळे पसरले आहे. हेरॉइन, अफू, चरस, गांजा, कोकेन कोडीन मिश्रित कफ सिरप, एमडी (मेफेड्रेन) यांच्यासारखी मादक द्रव्ये प्रवासी बसेस, रेल्वे प्रवासी, कुरीयर पार्सल्स आणि इतर माध्यमातून बाजारात पोहोचतात आणि लहान तस्करांच्या माध्यमातून गल्लीबोळात ती सहज उपलब्ध होतात. शाळकरी आणि महाविद्यालयीन तरुण-तरुणी एमडीसारख्या महागड्या व घातक अंमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. उच्चभ्रू लोकांच्या पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन केले जाते. डार्क वेब नेटवर्क, क्रिप्टो करंसी, मोबाईल ऑनलाईन पेमेंट अशा माध्यमातून पैशाची देवाण घेवाण होत असते.
देशपातळीवर ओडिशा आणि झारखंडमधून गांजाची आवक होते. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून अफू आणि इतर पदार्थ येतात. मध्य प्रदेशातूनही अफू आणली जाते आणि कर्नाटक,केरळ आणि गोवा येथूनही अंमली पदार्थांचा पुरवठा महाराष्ट्रात होतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि मध्य आशियातून हेरॉईन समुद्रमार्गे भारतात पाठवले जाते. कोकेन दक्षिण अमेरिकेतून कंटेनरद्वारे येते. हे अंमली पदार्थ भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून तस्करी करून महाराष्ट्रात आणले जातात.
केंद्र सरकारच्या अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने गेल्या वर्षी देशभरातून २००० कोटी रुपये किमतीचे १.३३ लाख किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करून राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील अंमली पदार्थ बनविणार्‍या सहा अवैध प्रयोगशाळा उद्ध्वस्त केल्या. यांत मुंबईतून जप्त केलेल्या ८१४.१७ कोटी रुपये किंमतीच्या अंमली पदार्थांचा समावेश होता. तर या वर्षी आतापर्यंत कित्येक कोटी रुपयांचे अंमली पदार्थ विविध यंत्रणानी महाराष्ट्रातून जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत.
छापेसत्र सुरूच. मुंबई पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथक, एनसीबी, केंद्र सरकारचे महसूल गुप्तचर संचालनालय यांच्यातर्पेâ छापेसत्र सुरूच असून महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी धाडी घालून अंमली पदार्थ जप्त करण्यात येत आहेत. गेल्या काही महिन्यातील कोटी कोटी रुपयांचा माल जप्त करणारे मोठे छापे पुढीलप्रमाणे:

२५ फेब्रुवारी : १२.९१ कोटी रु. किमतीचा १३ किलो हायड्रो गांजा, पाच लाख रुपये किमतीची कार, २८,००० रुपये आणि तीन मोबाईल फोन वाशी रेल्वे स्थानकाजवळ वाशी (नवी मुंबई) पोलिसांतर्पेâ जप्त. तिघांना (श्याम शिवकुमार बनवानी, संदीप दिलीप पाटील व अनिकेत सुनील तेलंगी) अटक.
८ मार्च : ०३.०१ कोटी रुपयांचे ०२.८० ग्रॅम ‘एमडी’ अमरावतीत लालखडी-सुकळी मार्गावर जप्त, दोघाना अटक. अमरावती पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई.
४ एप्रिल : २.०७ कोटींचे ड्रग्ज मिरा रोड येथील नया नगर भागात जप्त.
७ एप्रिल : १० कोटी रुपये किमतीचे २९ किलो हायड्रोपोनिक गांजा आणि मेफेड्रोन मुंबईतील नागपाडा, वडाळा, अंधेरी, विलेपार्ले आणि धारावीतून जप्त, १० आरोपींना अटक. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई.
१ मे: १७४५ कोटी रुपयांचे ३४९ किलो कोकेन नवी मुंबईतील कळंबोली परिसरातून, एका कारमधून एनसीबीने जप्त केले. आधी एक किलोची १३६ पाकिटे जप्त करून एका आरोपीस अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत त्याने भिवंडीतील रेहनाळ गांवातील गोदामात एक किलोची २१३ आणखी पाकिटे असल्याचे सांगितल्यावर ती जप्त करण्यात आली.
६ मे : १३.६१ कोटी रुपयांचे १.३२४ किलो मेफेड्रॉन आणि १०० कोटी रुपयांचा मेफेड्रॉन तयार होऊ शकेल एवढा कच्चा माल, मालवणी व गोराई भागातील छाप्यात मिरा-भाईंदर आणि मुंबई पोलिसांनी जप्त करून दोन महिलांसह १३ जणांना अटक केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे निवासी फ्लॅट भाड्याने घेऊन त्यात मेफेड्रॉन निर्मितीचे काम सुरू होते.
१३ मे : १.९० कोटीं रुपये किमतीचे अंमली पदार्थ वसई विरार, मिरा भाईंदरमधून जप्त, ५१ आरोपींना अटक. वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची कारवाई.


२६ मे : ५०.७४ कोटी रुपयांचे १४.५ किलो मेफेड्रॉन (पावडर आणि लिक्विड स्वरूपात), ड्रग्ज बनवण्याचे साहित्य, एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस दक्षिण मुंबईतील अग्रीपाडा परिसरातील यास्मिन अपार्टमेंटमधील १० व्या मजल्यावरील एका फ्लॅटवर छापा टाकून मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाच्या कांदिवली युनिटने जप्त केले. याप्रकरणी एक बांगलादेशी महिला आणि मुख्य आरोपी शोएब शौकत याच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली.
१ जून : ८० कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज गुजरातमधील एका फॅक्टरीवर छापा टाकून साकीनाका पोलिसांनी जप्त केले. काही आरोपीना अटक.
१६ जून : मिरा भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यातील संदिला तहसीलमध्ये छापा टाकून आधी २.०७ कोटीं रुपये किमतीचे १.३ किलो मेफेड्रॉन आणि सुमारे ३०० लीटर मोनो मिथायलामाइन जप्त करून दोघांना ताब्यात घेतले. नंतर घातलेल्या छाप्यामध्ये एकंदर २० आरोपीना अटक करून २२.७९ कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
१८ ऑगस्ट : १०.०१ कोटी रुपये किमतीचा १० किलोहून अधिक वजनाचा चरस मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथून जप्त. बिहारमधील संशयितास अटक. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई.
२० ऑगस्ट : १.६५ कोटी रुपये किमतीचा ३०० किलो गांजा, मिरज-पंढरपूर महामार्गावरील तानंग फाट्याजवळ मंगेश प्रकाश मोरे (४६) यांच्या ताब्यातील अशोक लेलँड गाडीतून जप्त. मोरेला अटक. गांजा बालेघाट (ओडिशा) येथील शेतातून आणून तो पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेला जात होता. सांगली पोलिसांची कारवाई.
२३ ऑगस्ट : अंमली पदार्थविरोधी पथकाने महाराष्ट्र-कर्नाटक-गोवा सीमेवरील कोल्हापूरातील चंदगड तालुक्यात हाजगोली येथे पोल्ट्री फार्मच्या आडून चालणार्‍या मेफेड्रेन तयार करण्याच्या कारखान्यावर छापा टाकून १.१३ कोटी रुपये किमतीचे २०८ ग्रॅम मेफेड्रोन आणि इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणात बेळगावातील सूत्रधारसह तिघांना अटक करण्यात आली.
२५ ऑगस्ट : ३.४१ कोटी रुपयांचे २,५३२ ग्रॅम अ‍ॅम्फेटामाइन आणि ८७८ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) डीआरआय मुंबई झोनल युनिटच्या अधिकार्‍यानी पुणे रेल्वे स्थानकावर जप्त करून एका महिलेला ताब्यात घेतले. आरोपी महिला दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून प्रवास करत पुण्यामार्गे जात होती.
निर्जन स्थळी कारखाने
एमडीसारखे (मॅफेड्रॉन) रासायनिक ड्रग्ज पुणे, नाशिक, सोलापूर, पालघर येथील बंद आणि निर्जन ठिकाणच्या कारखान्यांमध्ये बेकायदा तयार केले जातात. वर्धा, सातारा, धाराशिव, लातूर आणि ठाणे येथील कारखान्यातही एमडीसारख्या अंमली पदार्थांचे साठे सातत्याने सापडत आहेत.
दाऊद इब्राहिम सिंडिकेट
दाऊद इब्राहिमचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अंमली पदार्थांचे रॅकेट दीर्घकाळापासून सुरू आहे आणि मुंबई त्याचा भाग आहे. दाऊदच्या इशार्‍यावर काम करणार्‍या महमद सलिम डोला याला टर्कीहून अटक करून त्याला या वर्षी एप्रिलमध्ये भारतात आणण्यात आले. सध्या तो आर्थर रोड तुरुंगात आहे. सलिम डोलासाठी ड्रग निर्मितीचे कारखाने उभारणार्‍या दयानंद मूदनारला अटक झाल्यानंतर त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तिथे त्याचा नुकताच मृत्यू झाला.

नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस अ‍ॅक्ट १९८५(२०१२) नुसार ड्रग्ज अल्प प्रमाण आढळल्यास : एक वर्षापर्यंतचा कारावास किंवा १०,००० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही. मध्यम प्रमाण : १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड. व्यावसायिक प्रमाण : १० ते २० वर्षांपर्यंत सक्तमजुरी आणि एक ते दोन लाख रुपयांपर्यंत दंड (दंडाची रक्कम न्यायालयात वाढवली जाऊ शकते). पुन्हा गुन्हा केल्यास: दीडपट शिक्षा किंवा काही विशिष्ट गंभीर गुन्ह्यांमध्ये फाशीची तरतूद आहे. एनडीपीएस कायद्याखाली आरोपींना जामीन मिळत असल्यामुळे आता व्यावसायिक प्रमाणावर ड्रग्सचा पुरवठा व तस्करी करणार्‍या गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद केली आहे. याचबरोबर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत. तरीही अमली पदार्थांचा धंदा फोफावत आहे ही चिंतेची बाब आहे.

निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त जयवंत हरगुडे यांच्या म्हणण्यानुसार अंमली पदार्थांचा व्यापार करणार्‍यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने आता थेट मकोकाअंतर्गत कारवाई करण्याचे ठरविल्यामुळे अंमली पदार्थांची विक्री थोड्याफार प्रमाणात कमी होईल. मात्र हा काळा धंदा पूर्णपणे बंद करणे कठीण आहे. याला कारण म्हणजे अंमली पदार्थ सहजपणे हाताळता येतात. ते पूर्वनिश्चित ठिकाणी पोहचविण्यासाठी लहान मुले आणि महिला गरिबीपायी स्वस्तात उपलब्ध होतात. ड्रग पेडलर दरवेळी माणसे बदलतात यामुळे त्यांची नोंद होत नाही.
कोर्ट केसेस म्हणाल तर पुरावा नष्ट करणे, साक्षीदार फिरवणे अशा बाबींमुळे त्या टिकत नाहीत. भ्रष्टाचाराची लागण खालपासून वरपर्यंत आहे. काही वर्षांपूर्वी आम्ही वरळीमध्ये अंमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये गुंतलेल्या एका पोलिस अधिकार्‍याला रंगेहाथ पकडले होते. पण पुरावे नष्ट करून शेवटी तो सुटलाच. पण दुसर्‍या एका झवेरी बाजारमधील ३ ग्रॅम ड्रग्ज केसमध्ये आरोपींना १० वर्षे सजा सुनावण्यात आली. असेही अपवाद आहेत.

अंमली पदार्थांच्या व्यापारास साधारणपणे १९८२मध्ये सुरुवात झाली. तेव्हा मर्यादित स्वरूपात उलाढाल्या होत असत. १९८५मध्ये एनडीपीएस कायदा आला आणि अंमली पदार्थांची तस्करी आणि गैरवापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. आता हा धंदा प्रचंड प्रमाणात फोफावला असून देशव्यापी उद्योग झाला आहे. मेफेड्रॉनसारखे ड्रग रसायनावर आधारित असल्यामुळे प्रयोगशाळेत सहज बनविता येते. याचप्रमाणे गांजाही दुर्गम भागात मुख्य पिकामागे लपवून उत्पन्न करणे कठीण नाही. अंमली पदार्थविरोधी यंत्रणा आपले काम करतात. मात्र अशा प्रचंड प्रमाणात चाललेल्या धंद्याला आळा घालण्यासाठी मनुष्यबळ पुरेसे नाही. शिवाय पक्क्या खबरींशिवाय त्या कारवाई करू शकत नाहीत.
गेल्या काही महिन्यातील इतर छापे :
७ फेब्रुवारी २०२६ : ३.८२ लाख रुपये किंमतीचे २५.५ ग्रॅम एमडी अमरावतीत जप्त, दोघांना अटक (अब्दुल शोएब अब्दुल जब्बार व सईद खान शरीफ खान). अमरावती पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई.
१३ फेब्रुवारी : १२ ग्रॅम एमडी जप्त,
अ‍ॅकॅडमी हायस्कूल जवळ, अमरावती, एकास अटक (समीर खान शमीम खान (१९). अमरावती पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई.
१९ फेब्रुवारी : १.१२ लाख रुपये किमतीचे ११ ग्रॅम ३९० मिलीग्रॅम एमडी अमरावतीमध्ये जप्त, एकास अटक, सय्यद नाझिम सय्यद कासीम (३५). नागपूर डीआरआयची कारवाई.
२४ एप्रिल : साकीनाका पोलिसांनी मुंबईतील अंधेरी ओशिवरा भागातील
मेफेड्रॉन तयार करणार्‍या एका फ्लॅटवर छापा टाकून २५.५ किलो तयार मेफेड्रोन, २५ किलो अर्धवट तयार ड्रग्ज आणि १०० लिटर रसायने जप्त करून सहाजणांना अटक केली. या फ्लॅटमध्ये आरोपींना ड्रग्ज बनवण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात येत होते. आरोपीना ऑगस्टमध्ये विशेष एनडीपीएस न्यायालयाने २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
१४ मे : ५.७४ लाख रुपये किंमतीचा १०.८७ किलो गांजा एचडीआयएल इंडस्ट्रियल इस्टेट, चंदनसार, विरार पूर्वे जवळ जप्त, एकास (कृष्णा पांडे (२२) अटक, मिरा-भाईंदर. वसई-विरार पोलीसांची कारवाई.
८ ऑगस्ट : १०८० कोडेन सिरपच्या बाटल्या आणि १ किलो चरस, मुंबई जवळ भिवंडीत प्रवासी बस मधून जप्त. नंतर घातलेल्या छाप्यामध्ये १३,९३८ कोडेन सिरपच्या बाटल्या आणि १२२४० ट्रेमाडोल टेब्लेट्स गुजरात मधील वडोदरा येथील गोदामातून जप्त. एनसीबीची कारवाई.
१२ ऑगस्ट : १०६० किलो चरस, ईशान्य मुंबईतील घाटकोपर मधून जप्त. एनसीबीची कारवाई.
१७ ऑगस्ट : ७.३२ लाख रुपये किमतीचे एमडी, २०.१७ लाख रुपयांची रोकड आणि ६४,००० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने अंबरनाथमधील(ठाणे जिल्हा) भगतसिंग नगर परिसरातून जप्त. चार आरोपीना (अयाज साहेबजाद सय्यद, नूरजहाँ तौफिक शेख, शाकीरा इश्तियाक अन्सारी आणि शरीफ सलीम शेख) अटक. अंबरनाथ पोलिसांची कारवाई.
१८ ऑगस्ट : २२ लाख रुपयांचे अमली पदार्थ पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरात मलठण इथे जप्त. दोघाना अटक. पुणे पोलिसांची कारवाई.
२३ ऑगस्ट : ५.६० लाख रुपये किमतीचे २८ ग्राम ‘एमडी’ मुंबईतील दहिसर चेक नाक्याजवळ जप्त, अभिनेता रोहुला मेहदीला अटक. काशी मिरा पोलिसांची कारवाई. ३.५० कोटी रुपयांचे ३०२ ग्रॅम हेरॉईन मुंबईतील जोगेश्वरी येथे अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांनी जप्त करून एका संशयिताला अटक केली. ८.८० लाख रुपये किमतीचे ५५.१ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन), ४७,८५० रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल फोन, असा ०९.३७ लाख रुपयांचा मुद्देमाल, मोरारजीनगर परिसरातून मुंबईतील पवई पोलिसांनी जप्त करून मुबारक मोमीन खान उर्फ लालू (३२) या तडीपार आरोपीला अटक केली.
२४ ऑगस्ट : १.५९ लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन, एक दुचाकी आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण ०१.९२ लाख रुपयांचा मुद्देमाल मालेगांवच्या रमजानपुरा पोलिसांनी जप्त करून दोन संशयितांना (अफसर अनिस कुरेशी आणि हनिफ शेख गुफरान) यांना ताब्यात घेतले..
२५ ऑगस्ट : सुरत पोलिसांच्या गुन्हे शाखेने बडोद्याजवळ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर, एका कारचा पाठलाग करून ३० लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. विमानातील एका माजी कॅबिन क्रू हा माल घेऊन बडोद्याहून मुंबईच्या दिशेने चालला होता. या रॅकेटमध्ये मलेशियन एअरलाईन्सची एक माजी एअर होस्टेस पण सापडली. आरोपी मुंबईचे असून पोलिसानी त्यांना ताब्यात घेतले.
२.४० लाख रुपये किमतीचे १३,५९० मिलिग्रॅम मॅफेड्रोन, दोन मोबाईल आणि एक दुचाकी, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील द्वारकादास शामकुमार शोरूमसमोर, सिडको पोलिसांनी जप्त करून दोन आरोपीना शेख सादीक शेख सलीम (२७) आणि अमान कुरेशी मुश्ताक कुरेशी (२५) ताब्यात घेतले.
२६ ऑगस्ट : १२.२० लाख किमतीचे ५६ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करून स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), शिरूर पोलीस आणि न्हावरे पोलिसांनी दोघांना (प्रदीप विठ्ठल कोरेकर आणि साईनाथ जनार्दन भोसेकर) अटक केली. तिसरा आरोपी फरार झाला.

Previous Post

महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंचे काय चुकले?

Next Post

हे तर जातीय नक्सली!

Next Post
हे तर जातीय नक्सली!

हे तर जातीय नक्सली!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.