• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

भोंदूच्या भजनी संधीसाधू!

सदानंद घायाळ (राज्यकारण)

marmik by marmik
April 1, 2026
in राज्यकारण, विशेष लेख
0
भोंदूच्या भजनी संधीसाधू!

नाशिकचा कथित कॉस्मोलॉजी तज्ज्ञ ‘कॅप्टन’ अशोक खरात या दहावी नापास भामट्याने धर्माचा बुरखा पांघरून राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना आपल्या तालावर निव्वळ नाचवलं. अनेक बड्या नेत्यांचे, मंत्र्यांचे खरातसोबत पॉवरफुल कनेक्शन होते. पण हे लोक खरोखरच श्रद्धेपोटी तिथे गेले होते की या भोंदूच्या काळ्या साम्राज्यातील काळ्या पैशाचे वाटेकरी व्हायला गेले होते, हाही प्रश्नच आहे. अनेक वर्ष लैंगिक शोषणाचं रॅकेट चालवणार्‍या याच भोंदूबाबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. त्याच्या मोबाईलमध्ये शोषणाच्या शेकडो क्लिप सापडल्यात. त्यामुळेच त्याला महाराष्ट्राचा एपस्टिन म्हटलं जातंय. त्याला गुरू मानणार्‍या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामाही झालाय. पण वर्षभरापूर्वीच हे प्रकरण उघड करणार्‍या पत्रकाराला कोण त्रास देत होतं, विखे पाटलांनी वर्षभरापूर्वीच खरातच्या काळ्या कारनाम्याची प्रशासनाकडूनच माहिती मिळालेली असताना कारवाई का झाली नाही, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

अशोक खरात स्वतःला मर्चंट नेव्हीतला माजी अधिकारी म्हणवतो. २२ वर्षांच्या कारकीर्दीत १५४ देशांचा प्रवास झाला, त्यामुळे जगातील सर्व धर्म आणि अनेक भाषांचा सखोल अभ्यास असल्याचा त्याचा दावा होता. पण वास्तव याच्या अगदी उलट आहे. हा दहावी नापास भामटा मर्चंट नेव्हीत कधीही अधिकारी नव्हता. वयाच्या १७व्या वर्षीच वडिलांच्या माराच्या भीतीने तो घरातून पळून गेला होता. या काळात तो एखाद्या जहाजावर साधा कामगार म्हणून राहिला असण्याची शक्यता आहे. तिथेच तो काही भाषा आणि जुजबी भविष्य सांगायला शिकला. तब्बल २२ वर्षे गायब राहिल्यानंतर तो नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी या मूळ गावी पुन्हा प्रकटला. सुरुवातीला त्याने नाशिकला के. एल. पवार यांच्या करिअर अकॅडमीत आश्रय घेतला. तिथेच त्याने स्पर्धा परीक्षा देणार्‍या तरुणांना गाठून एमपीएससी पेपरफुटीचं मोठं रॅकेट चालवलं. इथूनच त्याची भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी आणि पोलिस यांच्यासोबतची पहिली अभद्र साखळी तयार झाली. पुढे त्याने स्वतःला भविष्यवेत्ता, अंकशास्त्रज्ञ आणि ब्रह्मांडशास्त्रज्ञ म्हणून प्रस्थापित केलं. वैज्ञानिक शब्दांचा भडीमार करून अंधश्रद्धेचं असं काही जाळं विणलं की, त्यात प्रशासनातले आणि राजकारणातले मोठेमोठे मासे अलगद अडकत गेले.
खरातने हे काळं साम्राज्य अत्यंत मोक्याच्या ठिकाणी उभं केलं. त्याचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेलं होतं. त्याने नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर या अत्यंत उच्चभ्रू परिसरात एक आलिशान कार्यालय थाटलं होतं. तिथूनच तो शहरातील बड्या प्रस्थांना आणि अधिकार्‍यांना भेटायचा. दुसरीकडे, सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात त्याने शेतजमीन घेऊन ‘श्री ईशान्येश्वर मंदिर’ आणि एक भव्य शाही फार्म हाऊसची उभारणी केली. २००९मध्ये त्याने ‘श्री शिवनिका संस्थान ट्रस्ट’ची अधिकृत नोंदणी केली. शिर्डीला जाणार्‍या मुख्य मार्गावरच हे संस्थान असल्याने तिथे कायम हाय प्रोफाईल भाविकांची वर्दळ असायची. सर्वसामान्य नागरिकांना मात्र तिथे प्रवेश पूर्णपणे वर्ज्य होता.
‘ओष्णोजल’, अघोरी विद्या आणि वासनेचा नंगानाच
खरातच्या भोंदूगिरीचा पाया हा केवळ फसवणुकीवर नाही, तर अत्यंत विकृत आणि हिडीस मानसिकतेवर आधारलेला होता. उच्चभ्रू आणि वयस्कर राजकीय नेत्यांना तसंच बड्या उद्योगपतींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो एक घृणास्पद शक्कल लढवायचा. ८ ते १० कामोत्तेजक गोळ्या पाण्यात, कफ सिरपमध्ये मिसळून तो त्याचे ‘ओष्णोजल’ तयार करायचा. हे पाणी प्यायल्याने लैंगिक शक्ती आणि आरोग्य सुधारतं, असा त्याचा दावा होता. हे तथाकथित अभिमंत्रित जल मिळवण्यासाठी अब्जाधीशांच्या आणि बड्या अधिकार्‍यांच्या महागड्या गाड्यांच्या रांगा या भोंदूच्या आश्रमाबाहेर लागायच्या. हे ‘ओष्णोजल’ नेण्यासाठी मूर्ख लोक शेकडो किलोमीटरवरून गाड्या पाठवत असत.
दुसरीकडे, त्याच्याकडे येणार्‍या महिलांचं तो अत्यंत अमानुष शोषण करायचा. कुटुंबात जाणीवपूर्वक फूट पाडायची, पती-पत्नीमध्ये संशयाचं विष पेरायचं आणि महिलांना मानसिकदृष्ट्या हतबल करून अंधार्‍या खोलीत न्यायचं, ही त्याची मोडस ऑपरेंडी होती. तो नवर्‍याला सांगायचा की मुलगा तुझा नाही आणि बायकोला सांगायचा की नवरा बाहेरख्याली आहे. २७-२८ वर्षांच्या एक उच्चशिक्षित तरुणीला त्याने ‘काळा खडा’ दिला आणि तिचे लग्न मोडल्यानंतर तिला गुंगीचं पाणी पाजून तिच्यावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केले. स्वतःला श्रीकृष्णाचा अवतार आणि त्या पीडित महिलांना मागील जन्माची राधा सांगून तो हे लैंगिक शोषण करत होता. पीडित महिलांना तो ‘परमेश्वराचा कोप’ होईल किंवा ‘तुझ्या नवर्‍याचा मृत्यू’ होईल अशी भीती घालून गप्प करायचा. स्वतःचे मूत्र महिलांना प्यायला लावण्यापर्यंत या नराधमाची मजल गेली होती.

शिंदेंच्या भेटीने प्रकाशझोतात
या भोंदूबाबाचे राजकीय लागेबांधे सर्वपक्षीय होते. यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव अव्वल स्थानी येतं. खरात खर्‍या अर्थाने प्रकाशझोतात आला तो २०२२मध्ये शिंदेंच्या भेटीमुळे. या भेटीचं गुपित पहिल्यांदाच शिंदेंसोबत्ा हजर असलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच उघड केलंय. विखे पाटलांनी माध्यमांना सांगितले की, ‘शिंदे हे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून शिर्डीला आले होते. त्यांच्या मूळ दौर्‍यात खरातच्या आश्रमाचा कोणताही उल्लेख नव्हता. पण त्यांनी ऐनवेळी दौरा बदलला आणि थेट ईशान्येश्वर मंदिर गाठले. ते मुख्यमंत्री असल्याने मी पालकमंत्री म्हणून त्यांच्या स्वागताला गेलो होतो. पण आत मुख्यमंत्री आणि खरात यांची तब्बल ४५ मिनिटे पूजा सुरू होती आणि बाहेर मी स्वत:, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख ताटकळत वाट पाहत उभे होतो.’
शिंदेंना या बाबाच्या आश्रमात घेऊन जाण्याचं काम तत्कालीन मंत्री दीपक केसरकर आणि त्यांचे सिन्नरमधील सहकारी दीपक लोंढे यांनी केलं होतं. शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाहपासून ते विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेक बड्या राजकारण्यांसोबत अत्यंत निवांत चर्चाविनिमय करतानाचे खरातचे फोटो आहेत. त्याच्या भोंदूगिरीला एक राजकीय वलय प्राप्त झालं होतं. त्यामुळे कुणीही त्याच्या काळ्या कारनाम्यांना रोखत नव्हतं.

विखे पाटलांचे मौन
या संपूर्ण प्रकरणात विखे पाटलांनी दिलेली दुसरी प्रतिक्रिया संतापजनक आणि या प्रकरणात अत्यंत कार्यक्षम असल्याचा दावा करणार्‍या सरकारला उघडं पाडणारी आहे. विखे पाटील कॅमेर्‍यासमोर अत्यंत सहजपणे म्हणतात की, ‘शिर्डीमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला, तेव्हा मला त्याची पूर्वकल्पना होतीच. पोलिसांनी मला तशी कल्पना दिली होती.’ अहिल्यानगरचे पालकमंत्री असलेल्या विखे पाटलांना पूर्वकल्पना होती, तर मग त्यांनी त्याच क्षणी पोलिसांना खरातच्या मुसक्या आवळण्याचे थेट आदेश का दिले नाहीत? विखे पाटलांचं राजकीय प्रभावक्षेत्र असलेल्या श्रीरामपुरातील पत्रकार खेमनर यांनी वर्षभरापूर्वी बातमी छापल्यावर विखे पाटील कशाची वाट बघत गप्प होते? आता शंभरेक व्हिडिओ बाहेर आल्यावर आणि नराधमाला अटक केल्यानंतर केवळ संताप व्यक्त करण्याचा आणि कारवाईचे श्रेय घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न नाही का? मग सर्व काही माहिती असूनही कारवाई न करणारे विखे पाटीलही या गुन्ह्यात तितकेच जबाबदार नाहीत का? की सर्व गोष्टी विखे पाटलांच्या आवाक्याच्या बाहेरच्या होत्या? या प्रश्नांची उत्तर विखे पाटील आणि सरकारने, गृह खात्याने देणं गरजेचं आहे.

५०० कोटींचं काळं साम्राज्य
खरातचा दरबार केवळ अंधश्रद्धेचा अड्डा नव्हता, तर तो एक कॉर्पोरेट
हनीट्रॅप आणि बदल्यांचा, पदोन्नतीचा मोठा बाजार होता. या दरबारात राज्याचे तब्बल नऊ मंत्री आणि तीन आयएएस अधिकारी नियमित हजेरी लावत असत, असं समोर आलंय. या राजकीय वरदहस्तामुळेच प्रशासकीय अधिकार्‍यांनी त्याच्यासमोर लोटांगण घातलं होतं. अधिकार्‍यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे निर्णय या बाबाच्या दरबारात घेतले जायचे आणि त्या बदल्यात जमिनींच्या स्वरूपात ‘गुरुदक्षिणा’ दिली जायची. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्या मते, कसारा भूसंपादनाचे काम पाहणारे उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांच्या पत्नीची खरातच्या मुलीसोबत एक एकर जमिनीची थेट भागीदारी आहे. दुसरीकडे, एसआयटीच्या चौकशीतून खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावे तब्बल ५२ सातबारे असल्याचे समोर आलंय. या मालमत्तांमध्ये नाशिकमधील पाच कोटींचा बंगला, १४० कोटींच्या जमिनी आणि सिन्नरमधील आलिशान फार्म हाऊसचा समावेश आहे. यावर अनेक तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांच्या नातेवाईकांची सामायिक नावं आहेत. ही ‘गुरुदक्षिणा’ नाही, तर भ्रष्टाचारातून मिळवलेली अमाप काळी माया भोंदूबाबाच्या माध्यमातून जमिनीत गुंतवण्याचं संघटित भ्रष्टाचाराचं रॅकेट आहे.

खरात, त्याची पत्नी कल्पना आणि मुलगी तृप्ती यांच्या नावे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत तब्बल ७५ भूखंड आहेत. यात नाशिकमधील पाथर्डी, आडगाव, मखमलाबाद, गौळाणे आणि सिन्नरमधील कुंदेवाडी, विंचूर, निमगाव तसंच अहिल्यानगरमधील शिर्डी व राहाता येथील मोक्याच्या जमिनींचा समावेश आहे. जमिनींच्या खरेदी-विक्रीसाठी तो ‘ओक्स प्रॉपर्टीज’ नावाचा मोठा व्यवसाय चालवत होता. या सर्व काळ्या धंद्यातून खरातने अवघ्या १५ वर्षांत ५०० कोटी रुपयांची अफाट माया गोळा केल्याचं आतापर्यंत समोर आलंय. हा आकडा सुरुवातीला २०० कोटींचा होता. ही काळी माया आणखी वाढू शकते. त्याच्याकडील मालमत्तेची ६४ पानांची यादी प्राप्तिकर विभागाच्याही रडारवर आलीय. शिर्डीतील ‘साई सिल्वर’ हे एक मंगल कार्यालय त्याने बेकायदा सावकारकीतून बळकावलं. त्याच्या आर्थिक दबावामुळे संबंधित कुटुंबातील २ ते ३ जणांनी आत्महत्याही केल्याचं म्हटलं जातंय. तो नेहमी खासगी विमानाने प्रवास करायचा. यावरून त्याच्या काळ्या पैशाची व्याप्ती लक्षात येईल.

चाकणकरांचा बुरखा फाटला
राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची संशयास्पद भूमिका हा या प्रकरणातील सर्वात संतापजनक आणि व्यवस्थेची लाज काढणारा भाग आहे. ज्या आयोगावर राज्यातील महिलांच्या रक्षणाची आणि न्यायाची जबाबदारी आहे, त्याच आयोगाच्या अध्यक्षा वासनांध, लंपट नराधमाच्या शिवनिका ट्रस्टच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य होत्याच, शिवाय त्याला आपला ‘गुरू’ मानत होत्या. त्या खरातच्या डोक्यावर छत्री धरताना, त्याचे पाय धुताना आणि त्याची पाद्यपूजा करतानाचे फोटो हा चाकणकरांच्या संवैधानिक पदाचा बुरखा फाडणारा प्रकार आहे. त्यांनी स्वतः अनेकदा खरातचा ‘पितृतुल्य गुरुमाउली’ असा जाहीर उल्लेख केलाय.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकरांच्या वागणुकीबद्दल पुराव्यांसह काही अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. अंधारे यांनी आरोप केला की, ‘ज्या बाईला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलं, ती बाई २ सप्टेंबर २०२४ रोजी सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिका कापून तंत्रविद्या करते.’ अनामिका हे करंगळीशेजारचं बोट सूर्य आणि शुक्र ग्रहांच्या मध्ये असतं आणि ती ऊर्जेचं मुख्य केंद्र मानली जाते. एखाद्या व्यक्तीला वशीभूत करण्यासाठी, मंत्रांचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि यशप्राप्तीसाठी याच बोटातून रक्त काढून जादूटोणा केला जातो, असं अघोरी शास्त्र सांगतं. चाकणकरांच्या सोशल मीडियावरील ९ सप्टेंबर आणि १२ सप्टेंबरच्या फोटोंमधील त्यांच्या बोटावरील बँडेज जानेवारीपर्यंत विविध फोटोंमध्ये दिसतं. यावरून हा अघोरी संशय अधिक बळावतो, अशी बाब अंधारे नजरेस आणून देतात. पण हा सगळा प्रकार आपल्याला बदनाम करण्याचा असल्याचा चाकणकरांचा दावा आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रात्री दोन वाजता पीडित महिलांना फोन करून धमक्या का देत होत्या? त्यांची नार्को टेस्ट व्हावी आणि त्यांचे खरातसोबतचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जावेत, अशी अंधारे यांची मागणी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर कार्याध्यक्ष रुपाली ठोंबरे यांनी खरातची हिंमत वाढवल्याबद्दल चाकणकरांना थेट ‘सहआरोपी’ करण्याची मागणी केलीय. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याची सरकारची खरोखरच इच्छा असेल, तर गृह खात्याला या मागण्यांकडे फार काळ कानाडोळा करता येणार नाही.

साध्या पत्रकाराने डोंगर हलवले!
हे प्रकरण आता समोर आलेलं नाही, तर वर्षभरापूर्वीच समोर आलं होतं. पण तेव्हा ते सत्तेच्या जोरावर आणि पोलिसांच्या संगनमताने दाबण्यात आलं. श्रीरामपूर येथील ‘खबरदार पुढारी’चे संपादक दत्तात्रय खेमनर यांनी खरातच्या काळ्या कारनाम्यांचा अत्यंत धाडसाने पर्दाफाश केला. ४ मार्च २०२५ रोजी त्यांनी आपल्या वर्तमानपत्रात खरातचा थेट नामोल्लेख टाळून ‘लिंगपिसाट भोंदू कॅप्टन बाबाची पोलखोल’ अशी एक खळबळजनक बातमी छापली. पण त्यावेळी याच चाकणकरांनी स्वतःच्या घटनात्मक पदाचा वापर करून आपल्याला फोनवरून धमकावल्याचं खेमनर यांनी सांगितलं. उलट खेमनर यांच्यावर ‘सुमोटो’ गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश आयोगाकडून श्रीरामपूर पोलिसांना देण्यात आले. दुसरीकडे खरातलाही बातमी दाबायची कशी हे चांगलं ठाऊक होतं. यावेळीही त्याने खेमनर यांना ५ कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस धाडली. बातमी छापल्यापासून वर्षभर खेमनर यांना मानसिक आणि कायदेशीर त्रास देण्यात आला. पण शेवटी सत्याचा आणि पत्रकारितेचा विजय झाला. एकटा माणूस व्यवस्थेला कसा हादरवू शकतो, हेच खेमनर यांनी दाखवून दिलं.

खंडणीचा गुन्हा की बलात्काराची तक्रार?
या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा नेमका कसा झाला, याविषयी प्रचंड संभ्रम आहे. सुरुवातीला बातम्या आल्या की, एका महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार केली आणि खरातला अटक झाली. पण या प्रकरणाचे धागेदोरे खरातने स्वतःला वाचवण्यासाठी दाखल केलेल्या एका खंडणीच्या गुन्ह्यात दडलेले आहेत. हा पर्दाफाश पोलिसांनी कोणतीही विशेष बुद्धिमत्ता किंवा इंटेलिजन्स वापरून झालेला नाही. खरातच्याच जमिनीच्या व्यवहारातील जितेंद्र जासूद (पुणे) आणि दिनेश परब (भायखळा) या दोन गुंतवणूकदारांनी त्याला धडा शिकवण्यातून तो झालाय.

हे दोघे २०१०पासून खरातच्या संपर्कात होते. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी खरातच्या केबिनमध्ये अत्यंत शिताफीने स्पाय कॅमेरे लावले. त्यांच्यात खरातचे महिलांसोबतचे ११० आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड झाले, जे एकूण प्रकाराच्या केवळ १० टक्के असल्याचं म्हटलं जातंय. या दोघांनी हे व्हिडिओ दाखवून आपल्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा खरातचा दावा आहे. स्वतःला कायद्यापेक्षा मोठा समजणार्‍या खरातने या दोघांना अडकवण्यासाठी २९ डिसेंबर २०२५ रोजी सिन्नरच्या वावी पोलिसांत खंडणीची तक्रार दिली. मॉर्फ केलेले व्हिडिओ दाखवून आपल्याला ब्लॅकमेल केलं जातंय, अशी तक्रार त्याने केली. पण हा डाव त्याच्यावरच उलटला. पोलिसांनी या खंडणीच्या गुन्ह्याचा गोपनीय तपास करताना मोबाईल आणि इतर उपकरणं जप्त केली आणि त्यातून ११० खर्‍या व्हिडिओंचा आणि महाराष्ट्राला हादरवून टाकणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्यामुळे याला आता महाराष्ट्राची एपस्टिन फाईल असं म्हटलं जातंय.

१२ मार्च २०२६ रोजी शिर्डीत एका युवतीने खरातचा शिपाई म्हणून काम करणारा संशयित नीरज जाधव याच्याविरोधात अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. नीरजच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये ३० ते ४० महिलांचे नंबर सापडले. यानंतर १३ मार्च २०२६ला खरात परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना लुकआऊट नोटीस जारी झाली आणि मुंबईतून गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ पातळीवरून एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले गेले. तसंच पोलिसांच्या हाती हे भक्कम पुरावे लागल्याची खात्री पटताच १७ मार्च २०२६ रोजी एका २७-२८ वर्षाच्या पीडित उच्चशिक्षित तरुणीने पुढे येत नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत बलात्काराची अधिकृत तक्रार दाखल केली. २०२२ ते डिसेंबर २०२५पर्यंत अत्याचार सुरू असल्याची नोंद या तक्रारीत होती. या अधिकृत तक्रारीनंतरच खरातला त्याच्या आश्रमातील शाही बंगल्यातून पोलिसांनी पकडण्याचा निर्णय घेतला.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने खरातला त्याच्या कर्मयोगी नगर येथील घरातून बुधवारी १८ मार्चला पहाटे पकडले. पोलिसांनी वेशांतर करून कॉलनीत ‘चोर आल्याची बतावणी’ करत गोंधळ निर्माण केला आणि शिताफीने घरात घुसून त्याला ताब्यात घेतले. सध्या एसआयटीकडे नाशिकमधील बलात्काराचा गुन्हा, शिर्डीतील धमकीचं प्रकरण आणि वावी पोलीस ठाण्यातील पाच कोटींच्या खंडणीचं प्रकरण अशा या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रित तपास आहे.

एसआयटी नेमून काय साधलं?
सोशल मीडिया, मीडिया आणि विरोधी पक्षांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी २० मार्च रोजी रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. आता मुख्यमंत्री सांगत आहेत की, ‘विरोधी पक्षाचे कोण कोण नेते खरातकडे जायचे, याचे माझ्याकडे सर्वात जास्त पुरावे आहेत. विरोधकांनी राजकारण करू नये.’ एकप्रकारे मुख्यमंत्री या प्रकरणात विरोधी पक्षांना गप्प बसण्याची धमकीच देत आहेत. पण या आक्रमकपणातून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणार का, हा खरा प्रश्न आहे. कारण, ४ मार्च २०२५ रोजी पत्रकार खेमनर यांनी या प्रकरणाला वाचा फोडली होती. खरातपर्यंत पोचण्याचे सर्व पुरावे दिले होते. मग वर्षभर फडणवीस यांच्याच ताब्यात असलेलं गृह खातं काय करत होतं? अहिल्यानगरचे पोलीस, नाशिकचे पोलीस आणि नाशिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे काय करत होते? कारण चाकणकरांनी खेमनर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास, खबरदार पुढारी बंद पाडण्यासाठी प्रशासनाकडे पत्रापत्री केली होती. मग आता अत्यंत कार्यक्षमतेचे दाखले देत स्वतःची पाठ थोपटणारे गृहखाते आणि पोलीस हे वर्षभर खरातचे काळे कारनामे, महिलांचं शोषण सुरू असताना गप्प का होते? विखे पाटलांना वर्षभरापूर्वीच हे काळे कारनामे माहीत होते, त्यांचं काय करणार?
आता मुख्यमंत्र्यांनी तपासासाठी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केलीय. पण त्यानं काय साधणार हाही प्रश्नच आहे. यापूर्वी फलटणच्या डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात याच सातपुतेंच्या नेतृत्वात एसआयटी नेमली होती. त्या प्रकरणातही चाकणकरांवर आरोपीला पाठीशी घातल्याचे गंभीर आरोप झाले होते. त्या एसआयटीचं पुढे काय झालं आणि डॉ. संपदा मुंडेंना न्याय मिळाला का, हे अद्याप महाराष्ट्राला समजलेलं नाही. एसआयटी नेमून जवळपास पाच महिने लोटले, पण काहीच खबरबात नाही. त्यामुळे आता पुन्हा त्याच अधिकार्‍याकडे हा अत्यंत संवेदनशील तपास दिल्याने ही एसआयटी खर्‍या गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि मंत्रालयापर्यंतचे धागेदोरे शोधण्यासाठी आहे की यातील ३ आयएएस अधिकारी, ९ मंत्री आणि बड्या धेंडांना अभय देण्यासाठी आहे? असाही प्रश्न विचारण्यास वाव आहे.

केवळ खरातला अटक करून किंवा चाकणकरांचा राजीनामा घेऊन हे प्रकरण तडीस जाणार नाही. त्याला राजाश्रय देणार्‍या, महिलांच्या शोषणावर ५०० कोटींचे इमले बांधणार्‍या आणि एक वर्ष तपासात आडकाठी आणणार्‍या प्रत्येक राजकीय नेत्याच्या आणि प्रशासकीय अधिकार्‍याच्या मुसक्या आवळाव्या लागतील. अन्यथा, विरोधकांना, स्पर्धकांना ब्लॅकमेल करण्यासाठीच सध्याची ही सगळी उठाठेव सुरू आहे, हे अधोरेखित होईल.

Previous Post

आंब्राई

Next Post

महंगाई डायन खाये जात है!

Next Post
महंगाई डायन खाये जात है!

महंगाई डायन खाये जात है!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.