• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पांडबा मिसळ

सुधीर साबळे (पुणे तिथे खाणे...)

marmik by marmik
January 31, 2026
in खानपान, चला खाऊया!
0
पांडबा मिसळ

मिसळ हा जणू महाराष्ट्राचा राज्य पदार्थ.अन्य राज्यांसाठी बटाटेवडा किंवा खरंतर वडा-पाव आणि मिसळ या महाराष्ट्राच्या दोन स्वतंत्र खाद्य ओळखी आहेत. सिग्नेचर डिशेस. त्यात बटाटेवडा आलू बोंडा, आलू बडा वगैरे नावांनी इतर प्रांतांतही बनतो. मिसळ मात्र अस्सल मराठी. त्यात कोल्हापूरची वेगळी, पुण्याची वेगळी, नाशिकची वेगळी- कोकणातही कोकणी चवीची मिसळ मिळते. सगळ्यांचा दावा, आमचीच मिसळ ओरिजिनल आणि आमचीच सगळ्यात भारी. अतिशय जहाल प्रांतीय अस्मितेचा रस किंवा कट या चर्चेला झणझणीत बनवतो. मुळात, ज्या पदार्थाचं नावच मिसळ असं आहे, त्याच्यात आमचीच अस्सल असं म्हणणं गंमतीशीर आहे. असो. या सगळ्याचा खवय्यांना होणारा फायदा म्हणजे सगळीकडे नवनवीन चवीच्या मिसळी मिळत असतात आणि ग्राहकांना रुचिपालटाची संधी देत असतात.

मिसळीचा ‘शोध’ कोणी लावला असेल तो असो- पुण्यात अनेक प्रकारच्या, नानाविध चवींच्या मिसळी मिळत असतात. मिसळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सर्व शहरांच्या मिसळी तर इथे ‘ऑथेंटिक चवी’च्या मिळतात आणि पुण्यातच जन्मलेल्या, अनेक वर्षे पुणेकरांनी चाखलेल्या अस्सल पुणेरी मिसळीही मिळतात. यांचा काही एकच एक ढाचा नाही, बनवण्याची एकच एक पद्धत नाही. त्यामुळेच नवनवीन मिसळींचा रोज नव्याने उदोउदो होत असताना मिसळीच्या जुन्या हॉटेलांबाहेरही मोठ्या प्रमाणात खवैये रांगा लागून गर्दी करत असतात. शनिवारी-रविवारी हे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते.

अशीच एक जुनी आणि लोकप्रिय मिसळ हॉटेलात नाही, तर एका गाडीवर मिळते. ही मिसळ चवीतही वेगळी. सोन्या मारुती चौकातून फडके हौदाकडे जायला निघाल्यावर, रस्त्याच्या डाव्या बाजूला ‘पांडबा मिसळ’ची गाडी दिसते, तिला मिसळप्रेमींचा चौफेर गराडा पडलेला असतो. इथे गेले की ‘नो वेटिंग.’ तुमच्या समोरच तुम्हाला मिसळ तयार करून दिली जाते. विशेष म्हणजे मिसळ तयार करत असताना नारळाचा, आले, लसूण, पुदिना, कोथिंबीर यांच्या मिश्रणाचा मस्त सुगंध हवेत दरवळत असतो. मिसळीचा घास घेण्याआधी निव्वळ त्या सुगंधामुळेच इथे येणारा प्रत्येकजण एका क्षणात त्या मिसळीच्या प्रेमात पडतो. चव चाखल्यावर मग त्याची पावले आपोआपच नियमितपणे इकडे वळू लागतात, हे सांगायला नकोच.

३५ वर्षांपासून पुण्यात प्रसिद्ध असलेली ही मिसळ आता दिल्ली, पंजाबच्या खवय्यांच्याही ‘मस्ट ईट’ यादीत गेली आहे. मूळचे पोलादपूरचे असणारे पांडुरंग महाडिक हे या ‘पांडबा मिसळी’चे संस्थापक… ही त्यांची मिसळ म्हणून ‘पांडबा’ची मिसळ.

वेटर ते मिसळीच्या दुकानाचे मालक…

पांडुरंग महाडिक हे मूळचे पोलादपूरचे. घरची परिस्थिती बेताची, त्यामुळे वयाच्या १३व्या वर्षी त्यांनी नोकरीसाठी पुणे गाठले आणि एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. महिनाभर काम केल्यावर पगार हातात पडायचा, त्यात घर चालायचे. तिथे त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळत होत्या. जिथे काम करू तिथून चार चांगल्या गोष्टी शिकायच्या, हा त्यांचा स्वभाव. त्यामुळे नोकरी वेटरची असली तरी चविष्ट खाद्यपदार्थ कसे बनवले जातात, त्याचं तंत्र त्यांनी बघून बघून आत्मसात केलेलं होतं. त्या बळावरच त्यांनी पहिला यशस्वी उपक्रम सुरू केला. वर्षातून काही दिवस हॉटेलला सुट्टी असायची, त्या काळात महाडिक सायकलवर फिरून बटाटेवडा, पोहे, सुकी मिसळ असे पदार्थ सोन्या मारुती चौकातील सोनारांना देत असत. महाडिकांकडच्या पदार्थांना पहिल्यापासून उत्तम चव. त्यामुळे हे ग्राहक ते पदार्थ पुन्हा पुन्हा मागवून घेत. पण हॉटेलमधलं काम सुरू झालं की या ऑर्डर पुरवायच्या कशा?

१९९१मध्ये सुकी मिसळ…

पांडबांनी १९९१ मध्ये मटकी, बटाटा भाजी, पोहे, शेवचिवडा याचे मिश्रण असणार्‍या सुक्या मिसळीच्या विक्रीला सुरुवात केली. ग्राहकांना तिची चव खूपच आवडली. पांडबा, आता मिसळीचा रस्सा पण तयार करा अशी फर्माइश ग्राहकांकडून यायला लागली. ग्राहक देवो भव म्हणून पांडबांनी आपल्या खास कोकणी चवीचा रस्सा तयार करण्याचे ठरवले. त्यातही त्यांनी धाडस केलं. मिसळीच्या रश्शामध्ये तेल सढळ हाताने टाकावं लागतं, तर्री आली पाहिजे, कट आला पाहिजे, अशी सर्वसाधारण समजूत आहे. पण, पांडबांनी अगदी फोडणीपुरते लागेल तेवढंच तेल वापरायला सुरुवात केली. बाकी सगळा स्वाद आले, लसूण, पुदिना, कडीपत्ता, ओला नारळ, चिंच, टोमॅटो, कांदा, यांच्या मिश्रणाचा. पांडबांच्या मसाल्यात चिंच आणि गूळ यांचं प्रमाण परफेक्ट. त्याची चव वेगळी लागते आणि हा रस्सा देखील लालजर्द नाही तर हिरवट रंगाचा दिसतो. या मिश्रणात ओला नारळ वापरला जातो, त्यामुळे त्याला तेल सुटतेच. त्यामुळे वरून वेगळे तेल टाकण्याची गरज पडत नाही असं पांडुरंग महाडिक सांगतात.

रस्सा हा मिसळीचा प्राण. मिसळीला तिची खास ओळख मिळवून देतो तो हा रस्साच. त्यामुळे रोजचा रस्सा एकाच चवीचा असला पाहिजे याची काळजी महाडिक घेत असतात. यांच्या मिसळीत बटाट्याची भाजी, मटकी, पोहे, शेव चिवडा आणि हिरवा रस्सा यांचा समावेश असतो. दालचिनी, लवंग, तमालपत्र, अशा खड्या मसाल्यांचे मिश्रण त्यांच्या वाटणात असल्यामुळे या मिसळीची लज्जत वाढते.

दोन पिढ्यांचा सहभाग

पांडबा मिसळ चालवण्यामध्ये पांडुरंग महाडिक यांच्याबरोबरच पत्नी विमल, मुलगा मंदार, सरिता, सागर, हर्षल यांचा सहभाग आहे. मिसळीचा व्यवसायात घरातलेच हात राबत असतात, त्यामुळे ३५ वर्षांत चव बदललेली नाही आणि लोकप्रियता सतत वाढतेच आहे. मिसळीतला शेव-चिवडाही पांडबाच तयार करायचे एकेकाळी. आता वयोमानामुळे त्यांनी हे काम आउटसोर्स केले आहे. मात्र आपण दिलेल्या स्पेसिफिकेशनचाच शेव-चिवडा तयार होतोय ना, याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. त्यांच्या पत्नी विमल या मिसळीच्या रश्शासाठी आवश्यक मसाला तयार करतात. मुलगा मिसळीची विक्री आणि बाकी तयारीकडे लक्ष देतो.

ग्राहक शोधता येतात…

वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळी चाखणारा मिसळ शौकीन माणूस शोधत शोधत पांडबांच्या गाडीवर येतो, ही ३५ वर्षांतली त्यांची मोठी कमाई आहे, असं मंदार महाडिक सांगतो. प्रत्येकाला आपला व्यवसाय वाढवायची इच्छा असते, मात्र आम्हाला तसं करायचं नाही, म्हणूनच फ्रँचायझी देण्याचा देखील अजिबात विचार नाही, असंही मंदार सांगतो. तो म्हणतो, या व्यवसायात आमच्या दोन्ही पिढ्या काम करत आल्या आहेत. आम्ही दररोज जे तयार करतो, जे विकतो त्याकडे आमचे बारीक लक्ष असते. काही झाले तरी ग्राहकाची तक्रार येता कामा नये, याकडे आमचा कटाक्ष असतो. व्यवसाय वाढल्यावर त्यात काही उन्नीस बीस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पैसे मिळवण्यापेक्षा ग्राहकांना तृप्तता आणि समाधान द्यायला हवे, हे आमचे शेवटपर्यंतचे ध्येय राहणार आहे.

ग्राहक म्हणतात….

मिसळ हा माझा आवडता पदार्थ आहे. पांडबा मिसळ ही खासच आहे, कारण या मिसळीत तेल कमी असते. त्यांचा रस्साही वेगळा आहे, ही मिसळ दोन घास जास्तच खाल्ली जाते, असे अमित तुंगीकर हे नियमित ग्राहक सांगतात. खास ही मिसळ खाण्यासाठी आठवड्यातून तीन ते चार वेळा त्यांचे इथे येणे होते. अमित सांगतात, यांची गाडी शहराच्या मध्यवस्तीत आहे. पार्किंगला जागा नाही. त्यामुळे माझी गाडी घेऊन येता येत नाही. ही मिसळ खाण्याची हौस भागवण्यासाठी मी रिक्षा, बस यापैकी काहीही वापरून इथे येतो. कारण यांच्या मिसळीवर माझे प्रेमच आहे.

राहुल पंडित हे दोन वर्षांपूर्वी काही कामानिमित्ताने नाशिकवरून पुण्याला आले होते. तेव्हा त्यांनी पांडबा मिसळबद्दल ऐकलं आणि त्यांनी ही मिसळ शोधून पहिल्यांदा ती खाल्ली तेव्हा त्यांना ती खूपच आवडली. विशेष म्हणजे त्या मिसळीचा कोणताही त्रास झाला नाही. त्यामुळे कधी कधी काही कामाच्या निमित्ताने किंवा कधी कधी तर फक्त मिसळ खाण्यासाठी त्यांचे नाशिकवरून इथे येणे व्हायला लागले. आता पांडबा मिसळ ही सवय होऊन बसली आहे, असे राहुल यांनी संगितले.

सध्या ज्या ठिकाणी मिसळीची गाडी लागते, तिथे पूर्वी मध्य रेल्वेचे तिकीट आरक्षण केंद्र होते. काही काळापूर्वी ते बंद पडले. एकदा दिल्लीवरून काही अधिकारी आले होते. त्यानी पांडबा मिसळची चव चाखली होती. त्यामुळे आता जेव्हा जेव्हा ही मंडळी कामाच्या निमित्ताने पुण्यात येतात, तेव्हा वाट वाकडी करून मिसळ खाण्यासाठी इथे येतात. त्याच्याबरोबरच नोकरी-व्यवसाय करण्याच्या निमित्ताने विदेशात असणारी ‘पांडबाप्रेमी’ मंडळीही सुट्टीसाठी आल्यावर इथे आल्याशिवाय पुढे जात नाहीत. आठवड्यातून चार वेळा मिसळ खाण्यासाठी येणारे देखील अनेकजण असल्याचे पराग महाडिक सांगतात.

टेस्ट कायम ठेवणार….
पांडबा मिसळीवर लोकांचे प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे, ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. मिसळ खाण्यासाठी भविष्यातही अनेक ठिकाणांवरून लोक येतील. मात्र, त्यामुळे आपल्या चवीमध्ये आम्ही कोणताही फरक करणार नाही. आमची खास टेस्ट कायम राहील, याकडे लक्ष देणार आहोत, असं पांडबा मिसळची दुसरी पिढी सांगते आहे, ती ग्राहकांच्या या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या बळावरच.

Previous Post

मेरवान बंद झाले,एका काळाचा सुगंध हरवला…

Next Post

ट्रम्प बदलताहेत!

Next Post
ट्रम्प बदलताहेत!

ट्रम्प बदलताहेत!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.