आपल्या देशात कोणतीही परीक्षा ‘नीट’पार का पडत नाही?-रेहान तांबोळी, मालेगाव
नीटची परीक्षा नीट न घेणार्यांवर नीट कारवाई का होत नाही? ते नीट माहीत करून घ्या. आणि मगच नीट प्रश्न विचारा, नाहीतर नीटचे पेपर फोडणारे राहतील बाजूला आणि ‘इथे राहायचं तर नीट राहा… नाहीतर पाकिस्तान चले जाओ…’ (असं आम्ही म्हणत नाही आणि कोण म्हणेल ते आम्ही सांगणार नाही… का? तेही नीट समजून घ्या… रेहान मालेगावकर).
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनाला तुम्ही कसा प्रतिसाद दिला आहे संतोषराव? कोणकोणती उधळपट्टी थांबवली आहेत तुम्ही? -विनायक जोशी, पंढरपूर
आलिशान गाड्यांमधून फिरणं, रोज तेलकट तुपकट खाणं, ब्युटी पार्लरमध्ये जाणं, रोज सोनं खरेदी करणं हे सगळंच थांबवलं आहे आम्ही, कारण झोपच उडालीय. मग ही असली स्वप्नं तरी कुठून पडणार? आम्ही ठरवलंय, स्वप्नातही (तिथेच शक्य आहे म्हणा) उधळपट्टी करायची नाही. उगाच आपण देशद्रोही असल्याची स्वप्न पडायला लागायची.
आमचा गण्या म्हणतो, देशातल्या वरपासून खालपर्यंत सगळ्या सत्ताधार्यांनी घरातूनच काम म्हणजे वर्क फ्रॉम होम करायला सुरुवात केली, तर देशाला हवी आहे त्याच्या निम्मी बचत होईल. आणि हे सगळे फक्त घरी बसले, त्यांनी ‘काम’केलं नाही, तर पूर्ण बचत होईल. इस पर आप की विशेष टिप्पणी क्या है? – केतन शिवरकर, जिंतूर
नेते जे खातात, त्यातली चार शितं ज्या भुतांना मिळतात, ती शिताभोवती जमणारी भुतं नेत्यांना घरी बसून देतील का हो? हे नेत्यांनाही माहित आहे. म्हणूनच सात पिढ्या बसून खातील एवढं कमावूनही नेत्यांना रोज घराबाहेर पडावं लागतं, ते अशा भुतांना शितं मिळावी म्हणून, नाहीतर ही भुतं नेत्यांनाच खाऊन टाकतील.
आपली गुपितं शत्रूला कळू द्यायची नसतील, तर ती मित्रांनाही सांगू नका, असं कोणी तत्त्वचिंतक सांगतात- तुमचा मित्रांचा अनुभव काय आहे? – श्रीकांत ओक, ठाणे
आमचे मित्रच तत्त्वचिंतक आहेत. इतके की ते आम्हाला शत्रूची गरजच पडू देत नाहीत. आलं का लक्षात?
हार कर जीतनेवाले को व्होट चोर कहते है, हा लोकप्रिय संवाद कोणत्या सिनेमातला आहे हो संतोषराव? – फ्रॅंक मिरांडा, कल्याण
बहुतेक ‘बंगाल फाईल्स’ असावा, नक्की माहित नाही. कारण असा चित्रपट अजून कोणी बनवलेला नाही… जेव्हा कोणी बनवेल तेव्हा कोणी कुठे, कशी, कोणाच्या साथीने, किती आणि काय काय बनवाबनवी केली ते नक्की कळेल.
गाढवापुढे वाचली गीता, गाढव म्हणतं, कालचा गोंधळ बरा होता, ही म्हण मला नेहमी विचारात पाडते. गाढव तर गाढवच आहे, पण गाढवापुढे गीता वाचणार्याला काय म्हणायचं? – अमिता पाटकर, विठ्ठलवाडी
महामानव… महामानव म्हणायचं त्याला! कारण गाढवापुढे गीता वाचून काही उपयोग होत नाही हे सामान्य मानवाला माहित आहे. तरीही गाढवांपुढे गीता वाचून, गाढवांना मानवांप्रमाणे वागायला लावणारा एखादा महामानवच असू शकतो. (पण काही गाढवांना असं वाटतं की, मानवांपुढे गीता वाचून, मानवांना गाढवांप्रमाणे वागवतो तो महामानवच असतो- उत्तर कळत नसेल तर स्वतःला गाढव समजून परत वाचा… भावनाओं को समझो, बरोबर उत्तर कळेल).
माझी बायको गायला बसली की आमच्या घरातले डासही पळून जातात. तिच्या गाण्याच्या रेकॉर्ड काढून जगभरात विकल्या तर मी करोडपती होईन, असा विचार मनात आला आहे. तुम्हाला ही आयडिया कशी वाटते? – श्रीनिवास दातार, गिरगाव, मुंबई
हीच आयडिया आम्ही आमच्या बायकोला ऐकवली… तर बायको म्हणाली, ‘बायको गाते म्हणून काय झालं? ईडीवाले तुमच्या इशार्यावर काम करतात का? तुम्ही करोडो रुपये कमावले आणि हे ईडीवाल्यांना कळलं तर…ते नवर्यासकट उचलून नेतात.’ एवढं ऐकलं आणि तिथेच आम्ही आमची आयडिया गुंडाळून ठेवली… बाकी बायको तुमची… करोडपती तुम्ही होणार… राजकारणात असाल तर फक्त स्वतःचं पद आणि पक्ष बघून पाय पसरा, एवढंच आम्ही सांगू शकतो. (राजकारणाव्यतिरिक्त कोणी करोडो रुपये कमावू शकतो हे आम्हाला तरी पटत नाही म्हणून म्हटलं…)
