• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘दक्षिण विजय’ कोसो दूर!

योगेंद्र ठाकूर (बेधडक)

marmik by marmik
May 22, 2026
in बेधडक
0
‘दक्षिण विजय’ कोसो दूर!
नुकत्याच पश्चिम बंगाल, आसाम या ईशान्येच्या दोन राज्यांत आणि तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या दक्षिणेतील तीन राज्यांत विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळात सत्तापरिवर्तन झाले. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांची पंधरा वर्षांची सत्ता जाऊन तिथे प्रथमच भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७९ वर्षानंतर भाजपला प्रथमच पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळाली आहे. पुरोगामी विचारांची सत्ता जाऊन प्रतिगाम्यांची सत्ता आली आहे. धर्मनिरपेक्षता संपून भाजपचा मतलबी हिंदुत्ववाद सुरू झाला आहे. जनसंघाचे एक संस्थापक  डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या बंगालमध्ये व्होटचोरीचा चिखल ओतून त्यात भाजपचे कमळ प्रथमच फुलले आहे. सध्या भाजप प्रणित एनडीएचे २२ राज्यांत सरकार आहे. उत्तरेकडील गायपट्ट्यात हिंदी आणि हिंदुत्वाच्या जोरावर भाजपने ध्रुवीकरण केल्यामुळे तिथे राज्यात सत्तेत आहेत. आता पश्चिम बंगाल जिंकल्यामुळे ईशान्येकडील राज्यांचा पट्टा देखील पूर्ण केला आहे. बर्‍याच राज्यांत भाजपने मोडतोड करून सत्ता मिळवली आहे.
दक्षिणेत मात्र अजूनही त्यांना यश लाभले नाही. कर्नाटकात काही काळ ते सत्तेत होते. हा अपवाद आणि सध्या आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारमध्ये आहेत. पुद्दुचेरी या केंद्रशासित राज्यात ए.आय.एन.आर.सी. या पक्षासोबत सत्तेत अल्प वाटा आहे. आज हे प्रादेशिक पक्ष एनडीएच्या गोंडस नावाखाली एकत्रित आहेत. भविष्यात या प्रादेशिक पक्षांना संपवून भाजप स्वतः सत्तेवर कधी व कशी येईल, हे त्या प्रादेशिक पक्षांना कळणार देखील नाही. सत्तेसाठी प्रादेशिक पक्षांचा शिडीसारखा वापर करण्यात भाजप पारंगत आहे.
राज्य         एकूण जागा  भाजप
तामिळनाडू     २३४            १
पद्दुचेरी        ३०               ४
केरळ          १४०              ३
एकूण          ४०४             ८
कर्नाटक       २२४           ६६
आंध्रप्रदेश     १७५             ८
तेलंगणा        ११९           ८
एकूण           ५१८         ८२
२०२४च्या लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशात भाजपने तेलुगू देशमबरोबर युती करून २५ पैकी ६ जागा लढवल्या होत्या. त्यात भाजपचे तीन खासदार निवडून आले. तेलंगणात १७ पैकी चार तर कर्नाटकात २८ पैकी १७ जागांवर भाजप विजयी झाला होता. तामिळनाडूत ३९ खासदारांपैकी एकही भाजपचा नाही. पुद्दुचेरीमध्येही एकही खासदार भाजपचा नाही. केरळात २०पैकी एकच खासदार भाजपचा आहे. म्हणजे दक्षिणेतील सहा राज्यांच्या एकूण १३० खासदारांपैकी फक्त २५ खासदार भाजपचे आहेत. तिथल्या एकूण ९२२ आमदारांपैकी फक्त ९० भाजपचे आहेत. हे आकडे दक्षिणेत भाजपची ताकद नाही, हे अधोरेखित करतात.
१९४७नंतर कर्नाटकात आत्तापर्यंत आलेल्या सरकारांमध्ये जास्त काळ काँग्रेसचीच होती. सध्या देखील २०२३पासून काँग्रेसचे सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदी आहेत. गेल्या ७८ वर्षांतील ५६ वर्षे कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर होती तर जवळजवळ १२ वर्षे जनता दल/जनता दल (देवेगौडा) पक्ष सत्तेत होता. कर्नाटकात भाजपला फक्त १० वर्षेच सत्ता मिळाली. कर्नाटकात भाजपला सत्तेत बसवण्यासाठी वाय.एस. येड्युरप्पा यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना दूर करून जनता दल (एस) पक्षाचे आयात नेते एस. आर. बोम्मई यांना २०२१मध्ये मुख्यमंत्री केले. परंतु त्यांची जादू काही चालली नाही. २०२३ साली भाजपची सत्ता जाऊन तिथे काँग्रेसची सत्ता आली आणि सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री झाले. कर्नाटक हे दक्षिणेकडील एकमेव राज्य, जिथे भाजपची डाळ थोड्या फार प्रमाणात शिजली. उर्वरित चार राज्यांत भाजपला हिंग लावून कुणी विचारीत नाही. सध्या कर्नाटकात भाजपचे ६६ आमदार आहेत.
आंध्र प्रदेशात ७३ वर्षांत काँग्रेस ४६ वर्षे सत्तेवर होते. एन. संजीव रेड्डी, पी. व्ही. नरसिंहराव यांच्यासारख्या दिग्गज काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. १९८३ साली तेलगू देशम पार्टीच्या उदयानंतर तो पक्ष २३ वर्षे सत्तेवर होता. सर्वप्रथम चित्रपट अभिनेते एन. टी. रामाराव हे मुख्यमंत्री झाले, तर सध्या २०२४पासून चंद्रबाबू नायडू हे पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये भाजप सहभागी झाला आहे. भाजपचे फक्त आठ आमदार आहेत. पण प्रादेशिक पक्षाबरोबर मोट बांधून हातपाय पसरायला भाजप नेहमी तत्पर असते. आंध्र प्रदेशाच्या विभाजनानंतर तेलंगणा राज्याची निर्मिती झाली. तेव्हा २०१४ ते २०२३पर्यंत ९ वर्षे के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्रीय समितीची तिथे सत्ता होती. २०२३ साली काँग्रेसची सत्ता आली आणि ए. रेवंथ रेड्डी हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तेलंगणात १७५ आमदारांपैकी अवघे आठ भाजपचे आहेत.
केरळ राज्य हे देशातील सुशिक्षित राज्य आहे. इथे भाजपला अजिबात थारा नाही. हिंदी आणि हिंदुत्वाला येथे कुणी पुसत नाही. कधी काँग्रेस आघाडी तर कधी डावी आघाडी येथे सत्तेवर असते. जवळ जवळ सात वर्षे येथे राष्ट्रपती राजवट होती. तर ३८ वर्षे कम्युनिस्टांची राजवट होती. तर २३ वर्षे काँग्रेस सत्तेत होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत १० वर्षे सत्तेत आलेल्या पिनरई विजयन यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट आघाडीचा पराभव करून काँग्रेस आघाडीने पुन्हा केरळची सत्ता काबीज केली आहे. येथे भाजप नगण्य आहे. केरळात मुस्लीम लीग एकदा सत्तेत होता, पण प्रखर राष्ट्रवादी म्हणवणार्‍या भाजपला ते शक्य झाले नाही. केरळात हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन गुण्यागोविंदाने एकत्रित राहतात, हे विशेष.
द्रविड संस्कृती नसा-नसात भरलेल्या तामिळनाडू राज्यात भाजपला थारा नाही. प्रखर हिंदीविरोध, तामिळ भाषा आणि अस्मिता यावरच तामिळनाडूचे राजकारण गेली ६० वर्षे फिरत आहे. के. कामराज असेपर्यंत काँग्रेसचा तिथे बोलबाला होता. तामिळनाडूत (पूर्वाश्रमीचे मद्रास राज्य) १९५२ ते ६३ पर्यंत जवळ जवळ १२ वर्षे काँग्रेस सत्तेवर होती. नंतर द्रमुकचे अण्णा दुराई, एम. करूणानिधी व कालपर्यंत एम. के. स्टॅलिन यांनी एकूण २७ वर्षे राज्याची धुरा सांभाळली. द्रमुकमध्ये १९७७ च्या दरम्यान फूट पडली आणि अण्णा द्रमुकचा उदय झाला. तेव्हा एम. जी. रामचंद्रन यांनी १९७७ ते ८७ पर्यंत १० वर्षे राज्य केले. त्यानंतर जयललिता मुख्यमंत्री झाल्या. एकूण २५ वर्ष अण्णा द्रमुक सत्तेत होता. २०२६च्या निवडणुकीत सिनेकलावंत जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाने १०८ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. जोसेफ विजय हे मुख्यमंत्री झाले. एक प्रादेशिक पक्ष जाऊन नवीन प्रादेशिक पक्ष सत्तेवर आला. तिथे गेली ६२ वर्षे प्रादेशिक पक्षाचीच सत्ता आहे. राष्ट्रीय पक्षाला स्थान नाही. भाजपचे अस्तित्व अजिबात नाही. नाही म्हणायला या खेपेस एक भाजपचा आमदार निवडून आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळ संगमचा कार्यक्रम केला. संसदेत चोला संस्कृतीचे प्रतीक आणले. स्वतः दाक्षिणात्या पद्धतीचा पेहराव करीत तामिळनाडूतील देवालयात जावून पूजा-अर्चा केली, पण तामिळी मतदारांनी भाजपला धूप घातली नाही. तामिळी भाषा-अस्मिता-संस्कृतीला जपत प्रादेशिक पक्षांनाच पसंती दिली.
दक्षिणेतीलही सहा राज्ये म्हणजे उत्तरेकडील गायपट्टा नाही. इथे हिंदी भाषेचे अतिक्रमण चालत नाही. प्रखर हिंदुत्वाचे खोटे नाटक दक्षिणेतील लोकांना आवडत नाही. हिंदु-मुस्लीम वादाला इथे जागा नाही. सेक्युलर-संविधानाला मानणारा सुशिक्षित वर्ग असल्यामुळे भाजपच्या बेगडी हिंदुत्वाला ते मानत नाहीत. या राज्यातील हिंदू हे मुस्लीम-ख्रिश्चन समजाचा द्वेष करत नाही. हिंदू संस्कृती-परंपरा जपतो, पण तो खोटी हिंदुत्वाची माळ सतत जपत नाही. दक्षिणेत भाजपला मतांचे ध्रुवीकरण जमले नाही आणि जमणारही नाही. कारण दक्षिणेत धर्मापेक्षा भाषिक अस्मितेला तेथील मतदार प्राधान्य देतात. देशातील २२ राज्यांत भाजप काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी मित्रपक्षांबरोबर सत्तेत असला तरी दक्षिणेतील राज्यात सत्ता मिळवणे हे भाजपसाठी दिल्ली बहोत दूर है।
Previous Post

मनाचा ‘वेध’ घेणारे डॉ. आनंद नाडकर्णी

Next Post

हे देश चालवताहेत की देवळं?

Next Post
हे देश चालवताहेत की देवळं?

हे देश चालवताहेत की देवळं?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.