• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

गंध नकोसा… विवेकाने टाळावासा…

वैभव भाल्डे (सु-गंध)

marmik by marmik
April 25, 2026
in विशेष लेख
0
गंध नकोसा… विवेकाने टाळावासा…

परवा पहाटे खाली फिरताना अचानक मोगर्‍याचा सुवास जाणवला, अंधारात पानांमध्ये दडलेली फुलं नेमकी दिसत नव्हती पण, त्यांची वर्दी जणू तो सुगंध देत होता. वर्षाच्या ठराविकच दिवसांत लाभणारं हे सुख खोलवर भरून घेण्यासाठी दीर्घ श्वास घेतले दोन तीन आणि त्याच लयीत पुढे सरकलो. किती व कसे आभार मानावे परमेशाचे त्या सुगंधाबद्दल आणि आपल्याला दिलेल्या गंध जाणण्याच्या शक्तीबद्दल असा विचार मनात घोळतच होता, नी एकदम कसल्यातरी खराब वासाने तो श्वासच क्षणभर रोखावासा वाटून गेला! विचारांना एकदम निराळीच दिशा मिळाली, देवाने फक्त सुवास घेण्याची शक्ती द्यायला हवी होती, हवंय कशाला ते खराब व नकोश्या वासांचं झेंगट?
एका नाण्याच्या दोन बाजू असाव्यात तसंच आहे, नाही का? मनाला सुगंधाच्या आठवणींने जसा दिलासा मिळतो, दुर्गंधीच्या नुसत्या कल्पनेनीही जीव मेटाकुटीला येतोच की. लहानपणी केलेले एसटी बसचे प्रवास हा एक मोठाच विषय आहे मंडळी; आपले आरक्षण असो वा नसो, बाकी गर्दी, त्या गर्दीचा संमिश्र वास हे सगळं आठवलं तरी काटा येतो अंगावर! पावसाळ्यात तर विचारूच नका. सगळ्या खिडक्या बंद असल्या की मुळात जीव गुदमरायचा त्यात भर म्हणून कोणी विडी ओढायला सुरुवात केली की संपलंच! तो जळकट ऊग्र वास नको नको वाटे.

तिच तर्‍हा साखर कारखाने रस्त्यात लागतात तेव्हाही होतेच की. रेल्वेत सुखाने झोपलो असलो तरी आंबुस खराब वासाने जाग आली की समजायचे ठराविक गावं आली! उसाच्या मळीचा तो जीवघेणा दुर्गंध संपेपर्यंत नाक दाबून बसावे लागते, गाडी पळवणे आपल्या हातात नसल्याचे फार जाणवते अशा वेळी. गावकुसाबाहेरचा एखादा उकिरडाही असाच नाही का? निरुपयोगी ठरलेल्या अनेक गोष्टी एकत्र पडून मग सडून नकोसा गंध पसरवतात नी ते घाणीचे साम्राज्य ओघानेच रोगराईही पसरवते. आपल्या ओल्या कचर्‍याचेच उदाहरण घ्या नं… जास्त राहिला की कुजायला लागतो आणि दुर्गंधी पसरवतो. साठलेल्या पाण्याचीही तिच तर्‍हा!! ह्या सगळ्याच नकोनकोशा गोष्टी वा त्यांचा दुर्गंध दूर करणे दरवेळीच शक्य नसले तरी नाक बंद करून त्या वासांपासून मुक्ती मिळवण्याचा विवेक लहानांपासून सर्वांमध्येच आपोआप असतोच, नाही का?

कचरा उचलल्यानंतर ती जागा स्वच्छ करून पुन्हा वापरण्यायोग्य होऊ शकतेच तसेच न रोखता येणार्‍या दुर्गंधीची तीव्रता कमी करण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी सुगंधाचा वापर नक्कीच होऊ शकतो. अगदी एखादी छान उदबत्ती लावणे असो वा सुगंधी फवारा मारणे असो! ह्या नकोशा वाटणार्‍या आणि कालांतरानी सर्वार्थाने त्रासदायक ठरणार्‍या दुर्गंधीसारखीच गत नकारात्मक विचारांची व मानसिकतेचीही करायला काय हरकत आहे मग?

नकोसे वाटणारे वा त्रासदायक ठरणारे विचार, व्यर्थ चिंता आणि काळज्या सगळं असंच बाजूला सारायचा विवेक वाढवायचा ठरवलं तर नक्कीच साधतं आपल्याला. पेल्यात खराब पाणी भरलेच जाऊ नये म्हणून आधीच तो चांगल्या पाण्याने भरलेला असावा, तसंच मनाचंही असावं असं सांगतात. सकारात्मक आणि आशादायी विचारांनी मन भरलेलं नि भारलेलं असलं नं की आपोआपच ही बाकीची घाण काढता पाय घेते. काय व किती साचवायचं आणि सांभाळायचं हा विवेक साधला की आपलंच जगणं सुसह्य होतं हे निर्विवाद!!

एकदा शाळेतल्या मुलांना शिक्षकांनी बंद पिशवीत हवे तेवढे बटाटे आणायला सांगितले. प्रत्येकाने कमीजास्त बटाटे ठेवले दप्तरात. हळुहळू मुलांना त्याचं ओझं तर वाटू लागलंच, पण दुर्गंधीने ते बटाटे नकोसे झाले. ज्यांनी भारंभार बटाटे जवळ ठेवले होते, त्यांची अवस्था तर जास्तीच बिकट झाली! तुम्ही आम्ही पण नकळत का होईना वागवत असतो का हो मग असे नकारात्मकतेचे, षड्रिपुंचे ओझे? मनाविरुद्ध घडलेल्या घटना, एखाद्याचे खटकलेले वागणे वा आपल्याच चुकीची मनाला लागलेली टोचणी अशा अनेक गोष्टींवर शक्य असेल ती विवेकी कृती करून त्यातून, त्या विचारांतून बाहेर पडणे वा हाताबाहेर असलेल्या गोष्टींकडे काही अंशी डोळेझाक करणे ह्यातच शहाणपणा असतो, नाही का? दरच वेळी दुर्गंधी निर्माण करणारी घाण आपण टाळू शकत नाही किंवा त्यापासून लगेच दूरही होऊ शकत नाही, पण आपले नाक बंद करण्याचा तात्पुरता उपाय तर असतोच नं, तसेच ही नकारात्मकताही आपल्यात न शिरू देण्याचा विवेक साधला तर आयुष्य जास्त सुंदर बनेल ह्यात शंका नको! काय हवंय हे भान व काय नकोय हा विवेक सदैव जागृत ठेवला की आपोआपच मनाला वळण लागते, नीरक्षीरविवेकी वृत्ती वरचढ ठरली की ही नकारात्मकतेची दुर्गंधी सहज सारता येते बाजूला.

Previous Post

आंब्राई

Next Post

राशीभविष्य (२५ एप्रिल ते १ मे २०२६)

Next Post
राशीभविष्य

राशीभविष्य (२५ एप्रिल ते १ मे २०२६)

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.