
निसर्ग हा कधीच शब्दांत बोलत नाही; तो रंगांत, सुगंधांत आणि स्वरांत संवाद साधतो. पावसाच्या पहिल्या सरींनी धरतीने हिरवा शालू नेसला की सृष्टीतील प्रत्येक जीव नव्या उमेदीने जागा होतो. डोंगरदर्यांतून धावणारे धबधबे, पानांवर मोत्यांसारखे चमकणारे पावसाचे थेंब, फुलांभोवती घिरट्या घालणारे फुलपाखरू आणि दूरवरून कानावर पडणारे कुहू… कुहू…, पियू… पियू…’ किंवा ‘पेरते व्हा… पेरते व्हा…’ हे स्वर म्हणजे निसर्गाने छेडलेली सुरेल मैफलच. या सुरांमागे दडलेले असते कोकिळकुलातील पक्ष्यांचे एक विलक्षण, रहस्यमय अद्भूत जग.
बहुतेकांना कोकिळ म्हणजे फक्त मधुर आवाजात गाणारा पक्षी एवढीच ओळख असते. पण या कुलात चातक, पावशा, राखाडी पोटाचा कोकिळ, छोटी कोकिळ असे अनेक पक्षी आहेत. त्यांच्या जीवनपद्धती, प्रजननाची अनोखी रचना आणि पर्यावरणातील भूमिका पाहिली की निसर्गाचा प्रत्येक नियम किती सूक्ष्म आणि परिपूर्ण आहे याची जाणीव होते.
या पक्ष्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे परभृत प्रजनन. हे पक्षी स्वतः घरटे बांधत नाहीत. ते बुलबुल, कावळा, जंगल बॅबलर, वटवट्या यांसारख्या पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालतात आणि त्या पक्ष्यांकडूनच आपल्या पिल्लांचे संगोपन करून घेतात. प्रथमदर्शनी ही कृती विचित्र वाटली तरी लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत विकसित झालेली ही एक प्रभावी जैविक युक्ती आहे.

पावसाचा दूत चातक
चातक म्हणजे भारतीय लोकजीवनातील एक विलक्षण पक्षी. काळा-पांढरा रंग, डोक्यावर उठावदार तुरा आणि उडताना दिसणारा पांढरा पंखपट्टा यामुळे तो सहज ओळखू येतो. पावसाळ्याच्या उंबरठ्यावर त्याचा पियू… पियू… असा आवाज ऐकू येऊ लागला की शेतकरी हीच पावसाची चाहूल मानतात. म्हणूनच चातकाला अनेक ठिकाणी ‘पियू’ असेही संबोधले जाते. भारतीय साहित्यात चातकाला विशेष स्थान आहे. स्वाती नक्षत्रातील पावसाच्या एका थेंबाची वाट पाहणारा पक्षी अशी त्याची काव्यात्मक प्रतिमा आहे. प्रत्यक्षात तो फळे, अळ्या आणि कीटकांवर उपजीविका करतो. बुलबुल किंवा जंगल बॅबलरच्या घरट्यात अंडी घालून आपल्या पिल्लांचे संगोपन त्या पक्ष्यांकडून करून घेणे ही त्याची वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली आहे.

‘कुहू’चा सम्राट (भारतीय कोकिळ)
भारतीय उपखंडात सर्वाधिक परिचित असलेला पक्षी म्हणजे कोकिळ. नर संपूर्ण काळा आणि लाल डोळ्यांचा, तर मादी तपकिरी रंगाची, पांढर्या ठिपक्यांनी नटलेली असते. मार्च ते ऑगस्ट या प्रजनन काळात नराचे कुहू… कुहू… हे मधुर गीत संपूर्ण परिसराला मंत्रमुग्ध करून टाकते. कोकिळ अत्यंत चतुर पक्षी मानली जाते. ती कावळ्याच्या घरट्यावर बारीक लक्ष ठेवते. कावळीने अंडी घातल्यानंतर योग्य संधी साधून स्वतःची अंडी त्याच घरट्यात ठेवते. अनेकदा कोकिळेची पिल्ले कावळ्याच्या पिल्लांपूर्वी जन्म घेतात आणि त्यांचे संगोपन कावळीच करते. निसर्गातील ही बुद्धिमत्ता उत्क्रांतीचे अप्रतिम उदाहरण मानली जाते.
भारतीय संस्कृती, वेद, लोककथा आणि काव्यात कोकिळेला वसंत ऋतू, प्रेम आणि नवचैतन्याचे प्रतीक मानले गेले आहे. तिचा मधुर स्वर हा केवळ संगीत नसून ऋतू परिवर्तनाचा नैसर्गिक संदेश आहे.

पेरते व्हा… (म्हणणारा पावशा) शेतकर्यांचा नैसर्गिक हवामान दूत
उन्हाळ्याची तीव्रता शिगेला पोहोचलेली असते. आकाशात काळे ढग हळूहळू दाटू लागतात आणि अचानक जंगलातून किंवा झाडांच्या शेंड्यावरून एक आवाज घुमतो. पेरते व्हा… पेरते व्हा… ग्रामीण भागातील शेतकर्यांसाठी हा केवळ पक्ष्याचा आवाज नसतो, तर तो निसर्गाने दिलेला पावसाचा इशाराच असतो. हा आवाज असतो पावशा या विलक्षण पक्ष्याचा. इंग्रजीत कॉमन हॉक कक्कू किंवा ब्रेन फिवर बर्ड म्हणून ओळखला जाणारा हा पक्षी शिकर्यासारखा दिसत असल्यामुळे अनेकदा त्याची ओळख चुकते. पावशा हा देखील कोकिळ कुलातीलच एक सदस्य असून, त्याची जीवनशैलीही तितकीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो स्वतः घरटे बांधत नाही. इतर पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालून आपल्या पुढील पिढीचे संगोपन त्यांच्यावर सोपवतो. त्याचे अन्न प्रामुख्याने अळ्या, कीटक आणि विविध लहान जीव असल्यामुळे शेतीतील अनेक हानीकारक किडींचे नैसर्गिक नियंत्रण करण्यात त्याचा मोलाचा वाटा असतो.
राखाडी पोटाचा कोकिळ (छोटा पण चपळ प्रवासी)

कोकिळ कुलातील सर्वात लहान सदस्यांपैकी एक म्हणजे राखाडी पोटाचा कोकिळ. अवघ्या २३ सेंटीमीटर लांबीचा हा पक्षी भारत, श्रीलंका, चीन आणि दक्षिण आशियातील विविध भागांत आढळतो. त्याची पाठ राखाडी, पोट फिकट आणि पंखांवरील पांढरा पट्टा त्याची वेगळी ओळख निर्माण करतो. हा पक्षी लांब पल्ल्याचे नव्हे, तर ऋतूनुसार अल्प अंतराचे स्थलांतर करतो. उन्हाळ्यात उत्तर भारतात तर थंडी सुरू होताच दक्षिणेकडे त्याचा प्रवास सुरू होतो. वटवट्याच्या घरट्यात अंडी घालून तो आपल्या पिल्लांचा सांभाळ त्या पक्ष्याकडून करून घेतो. सतत ऐकू येणारा त्याचा पी… पीप… पी… असा आवाज जंगलातील शांततेलाही एक वेगळा लयबद्ध स्पर्श देतो.
छोटी कोकिळ (हिमालयातून येणारी सुरेल पाहुणी)
हिमालयाच्या कुशीत प्रजनन करणारी छोटी कोकिळ ही हिवाळ्यात दक्षिण भारत आणि श्रीलंकेकडे स्थलांतर करते. आकाराने भारतीय कोकिळेपेक्षा लहान असली तरी तिचे सौंदर्य आणि मधुर शीळ निसर्गप्रेमींना भुरळ घालतात. काही माद्या तांबूस रंगाच्या असतात, तर नर राखाडी रंगाचा दिसतो.
हीदेखील परभृत प्रजनन करणारी पक्षी आहे. स्थलांतराच्या प्रदीर्घ प्रवासात ती काही दिवस जंगलात थांबते, ऊर्जा साठवते आणि पुन्हा पुढील प्रवासाला निघते. निसर्गाने प्रत्येक जीवाला त्याच्या अस्तित्वासाठी किती अचूक क्षमता दिली आहे, याचे हे सुंदर उदाहरण आहे.
कोकिळ कुलाचे अस्तित्व धोक्यात का?
आज वाढते शहरीकरण, वृक्षतोड, रासायनिक शेती, हवामान बदल आणि नैसर्गिक अधिवासांचा होणारा र्हास यामुळे कोकिळ कुलातील अनेक पक्ष्यांचे जीवन संकटात आले आहे. मोठी झाडे कमी होत आहेत, त्यामुळे घरटी बांधणार्या यजमान पक्ष्यांची संख्याही घटत आहे. परिणामी या परभृत पक्ष्यांच्या प्रजननावरही परिणाम होत आहे.
पक्ष्यांचे स्वर हे केवळ निसर्गसंगीत नसून पर्यावरणाच्या आरोग्याचे निर्देशक आहेत. ज्या परिसरात विविध पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो, तो परिसर पर्यावरणदृष्ट्या समृद्ध असल्याचे मानले जाते. त्यामुळे पक्ष्यांचे संरक्षण म्हणजे केवळ एका प्रजातीचे संरक्षण नसून संपूर्ण परिसंस्थेचे जतन होय. पावसाच्या सरींसोबत कानावर पडणारे कुहू…, पियू… आणि पेरते व्हा…हे स्वर पुढील पिढ्यांनाही ऐकू यावेत, यासाठी वृक्षसंवर्धन, स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणपूरक विकास ही काळाची गरज आहे. निसर्गाने आपल्याला हे सुरेल दूत विनामूल्य दिले आहेत; आता त्यांचे अस्तित्व टिकविण्याची जबाबदारी मात्र आपली आहे. कारण पक्ष्यांचे गीत जिवंत असेल, तरच निसर्गाचे हृदय धडधडत राहील; आणि निसर्ग जिवंत असेल, तरच मानवाचे भविष्य सुरक्षित राहील.

