
पत्रकारिता हे केवळ एक क्षेत्र नसून ती एक मूल्यव्यवस्था आहे, हे जगणाऱ्या काही मोजक्या पत्रकारांपैकी अभय मोकाशी हे एक होते. ऐन तारुण्यात राजकीय संपादक म्हणून ज्यांच्या शब्दांनी मंत्रालयातील भिंती थरथरायच्या, त्या एका तत्त्वनिष्ठ योद्ध्याचा आणि गर्दीत रमणाऱ्या माणसाचा नुकताच एकाकी शेवट झाला. कर्करोग आणि ‘लिव्हर सिरोसिस’ यांसारख्या गंभीर आजाराने त्यांना ग्रासले होते. विडंबना अशी की ज्या माणसाने आयुष्यभर कधी सिगारेटला स्पर्श केला नाही की कधी मद्याचा घोट घेतला नाही, ज्याने आयुष्यभर इतरांना या व्यसनांपासून दूर राहायला सांगितले, त्याला या आजाराने अकाली मरण यावे? नियतीचा खेळ किती क्रूर असावा याचे हे ज्वलंत उदाहरण!
पण अभयजी आजाराने कधीच खचले नाहीत. गेले सहा महिने त्यांनी अतिशय सकारात्मकतेने या आजाराशी झुंज दिली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेकांचे फोन येत. प्रत्येकाला वैयक्तिकरित्या उत्तर देऊन ते थकून जात. म्हणून त्यांनी व्हॉट्सॲपवर “अभय्ज हेल्थ अपडेट” नावाचा एक ग्रुप तयार केला. दररोज स्वतःच्या प्रकृतीबद्दल एक माहिती पोस्ट करायचे. धीराचा माणूस होता तो. इतक्या वेदनेतही त्यांची विनोदबुद्धी शाबूत होती. बघा या काही पोस्ट, त्यांच्याच शब्दात:-
“Based on the numerous queries I get every day, I have prepared an FAQ.
1. How are you feeling?
Ans: What answer can one give, who has not been able to have food or water for six weeks, keeps vomiting and has lost 17 kg weight in as much time?
2. How long will you be in the hospital?
Ans: Either till I finish my money or till the hospital gets bored of me. Both may not be too far. (या वाक्यात केवढी वेदना दडली आहे, आज वाचले की रडू येते.)
3. Who is taking care of you?
Ans: The hospital staff.
4. I wish to come to see you.
Ans: Visitors are not allowed.
आणखी एक :–
A while ago, a visitor dropped in and I decided to pull my hair. The moment I did that my hair was uprooted, due to the effect of chemo. Good, soon I will have no hair to pull; I will try pulling the visitors’ hair.
हॉस्पिटलमध्ये येऊन कुणी त्यांना भेटू नये अशी त्यांची शेवटपर्यंत इच्छा होती. संसर्गाची भीती हे कारण होतेच, पण आणखीही एक होतं. अभयजींना त्यांच्या दाढीबद्दल अतोनात प्रेम. आयुष्यभर जोपासलेली त्यांची दाढी ट्रीटमेंटसाठी काढली गेली. आपल्याला या रूपात कोणी पाहू नये असे त्यांना मनोमन वाटायचे. तरीही काही लोक ग्रुपवर वारंवार हॉस्पिटलमधला फोटो मागायचे. मग ते चिडायचे. साहजिकच आहे. त्यांच्या काही हितचिंतकांनाही त्यांचा हॉस्पिटलमधला फोटो का हवा होता हे मलाही ना सुटलेले कोडे आहे. मी एकाला विचारले, तर म्हणाला, अरे लेटेस्ट फोटो नको का आपल्याकडे, आपण बातमीदारीतली लोक आहोत. सिंहाची आयाळ गेलेला फोटो मागण्यात काय बातमीदारी होती देव जाणे!
अभय यांच्या शब्दबाणांनी दुखावलेले बरेच जण आहेत. खुद्द मुंबईत तरी सर्वच पत्रकार त्याला कुठे मानायचे? अभयजींसारख्या लोकांना आपण पटकन “अहंकारी” असे विशेषण लावतो. विद्या विनयेन शोभते वगैरे वाक्येही जोडतो. फार खोलात कुणी जात नाही. माझा अनुभव सांगतो की अभय अहंकारी नव्हते. एखादी व्यक्ती जेव्हा निस्पृह, विद्वान आणि प्रामाणिक असते, तेव्हा तिला खोटेपणा सहन होत नाही. मुत्सद्दीपणा जमत नाही. जे मनात असते ते अभय स्पष्टपणे बोलायचे, मग समोरची व्यक्ती कोणीही असो.

वरुणराज भिडेही काहीसे असे होते, असे मी ऐकले आहे, मला त्यांच्याबरोबर काम करण्याचा काही अनुभव नाही, त्यामुळे ठामपणे नाही सांगू शकत. पण तेही विद्वान कॅटेगरीतील एवढे नक्की. पोकळ आणि तकलादू पण व्यवहारचातुर्य असलेल्या संपादकांपेक्षा समाजाने अशा विद्वानांचे माज खपवून घेतले तर बरे होईल असे वाटते. अभयजी भले फटकळ होते, पण सुमारांच्या गर्दीत ते कधी सामील झाले नाहीत.
ते मिड डे चे पोलिटिकल एडिटर होते, पण “पॉलिटिकली करेक्ट'” वागणे काही त्यांना जमले नाही. पुण्याच्या ‘मिड-डे’च्या न्यूजपेपर रूममध्ये घडलेला तो प्रसंग आजही अनेकांच्या स्मरणात आहे. एके दिवशी अभयजी आमची न्यूज मीटिंग घेत होते. पेपरच्या महिला सीईओ अचानक दार ढकलून आत आल्या. मीटिंगमध्ये व्यत्यय आला. अभयजींनी तेव्हा अतिशय शांतपणे पण ठामपणे त्यांना बाहेर थांबायला सांगितले. त्या ऐकेनात. त्या सीईओने आपले आणि आपल्या मैत्रिणींचे होळी खेळतानाचे वैयक्तिक फोटो अभयजींच्या हातात कोंबले आणि वर्तमानपत्रात छापण्याचा हट्ट धरला, तेव्हा अभयजींनी जे केले ती आजच्या ‘कॉर्पोरेट’ पत्रकारितेत अशक्य कोटीतील गोष्ट आहे. “हे वर्तमानपत्र लोकहितासाठी आहे, तुमच्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठी नाही,” असे ठणकावून सांगत त्यांनी त्या फोटोंचे तुकडे करून ते त्यांच्यासमोर कचऱ्याच्या डब्यात फेकले. संपूर्ण न्यूजरूम हादरली.
आजच्या काळात, जिथे पत्रकारिता अनेकदा व्यवस्थापनाच्या तालावर नाचते, तिथे एका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या तोंडावर “मी इथला बॉस आहे” असं म्हणणं आणि सत्तेच्या अहंकाराचे तुकडे करून ते कचऱ्याच्या डब्यात फेकणं, यासाठी केवळ हिंमत नाही तर अफाट नैतिक बळ लागतं.
अभय यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांनी काही लोकांना दुखावले असेलही. पण माणूस फार निर्मळ आणि प्रेमळ. फणसासारखा. वरून काटे आणि आत गोड. व्यवहारचातुर्य जवळ जवळ शून्य, पण तत्वांशी तडजोड कधीच नाही.
मी तेव्हा पुणे महानगरपालिकेच्या बातम्या द्यायचो. संध्याकाळच्या जनरल बॉडीमध्ये स्वाती निम्हणांनी पाषाण तलावाच्या आजूबाजूला पहाटे हातभट्ट्या चालतात अशी तक्रार केली होती. मिड डे सकाळी आठ वाजता छापायला जायचा. अभय म्हणाले, नुसती तक्रारीची बातमी देऊ नकोस. उद्या पहाटे जाऊन बघून ये आणि मुकुंदला (कै. मुकुंद भुते) बरोबर घे. पहाटे ३.३०ला निघा. निघताना मला फोन करा. थंडीचे दिवस होते. मी आणि मुकुंद थोडे वैतागलो. संपादक झोपणार दुलईत आणि आपण पहाटेला जाऊ दारूभट्टीवाल्यांचा मार खायला, मी मुकुंदाला म्हटले.
दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केल्यावर त्यांनी सांगितले, दोघे वेगवेगळ्या स्कूटर घेऊन निघा आणि जाताना मला सेनापती बापट रोडला रत्ना मेमोरियलच्या दारात भेटा. आम्ही गेलो. म्हणाले, मी पण येतो. म्हटले, सर तुम्ही कशाला येताय? तुम्हाला कोणी काही केले तर रे? माझे बातमीदार फिरणार रात्रीचे आणि मी घोरत पडायचे?” असे म्हणाले.
ते नुसते आमच्याबरोबर पाषाणलाच आले नाहीत, तर सोबत कांचनगल्लीतील ऑफिसमध्ये आले. सकाळचे ७.३० झाले होते. डेस्क हेड डाँटो फ्रंट पेज शूट करायच्या तयारीत होता. अभयजींनी त्याला सांगितले, पहिल्या पानाची बातमी बदल आणि पाषाणच्या दारूभट्टीची बातमी पहिल्या पानावर घे. डाँटोने घड्याळाकडे पहिले, म्हणाला शक्य नाही. हा अभिजित बातमी लिहणार कधी, मी ती एडिट कधी करणार आणि पान कसे सोडणार आठच्या आधी. अभय म्हणाले, तू एडिट करूच नको. मी संपादक आहे, मीच लिहितो.
मिड डे यायच्या अगोदरचे माझे संपादक इंडियन एक्सप्रेसचे कै. प्रकाश कर्दळे. ते अभयचे पण गुरू होते. त्यांच्यासारखेच अभय पण खूप फास्ट बातमी टाईप करायचे. गोळीबंद लिहायचे. मला शेजारी बसवले. एकही प्रश्न विचारला नाही. मोजून पंधरा मिनिटांत बातमी सोडली, हेडलाईन दिली आणि बायलाईनमध्ये माझे नाव घातले. मी म्हणालो “सर माझे नाव कशाला, बातमी तर तुम्ही लिहिलीत. मला शक्यच नव्हते एवढ्या कमी वेळात लिहिणे.”
अभयजी म्हणाले, “जीबीमध्ये तू गेला होतास म्हणून बातमी समजली. आणि आता तुझे नाव छापून आले पाहिजे रे. आत्ताच जॉईन झालास ना? तुला सिद्ध करायचे आहे स्वतःला. आमचे काय रे झाले सगळे करून. डाँटो, लेलो इसका बायलाईन. लगाव बत्ती.”
“लगाव बत्ती” हा त्यांचा ठेवणीतला शब्द, एक्स्क्लुसिव्ह बातम्यांसाठीचा. कुणी अशी भन्नाट बातमी दिली असेल तर त्याच्यासाठी ऑफिसमधून बाहेर जाऊन एक्लियर चॉकलेट घेऊन यायचे. ते चॉकलेट असायचे एक रुपयाचे, पण ज्याला मिळायचे त्याला वाटायचे की जणू पुलित्झर मिळाले. भर मीटिंगमध्ये अफाट स्तुती करत हे एक्लियर प्रदान केले जायचे. अर्थात ज्याची बातमी हुकली असेल त्याची त्याच मीटिंगमध्ये सर्वांसमक्ष चंपी व्हायची. “बातमी चुकली की हे संपादक सर्वांसमोर मला घालून पाडून बोलतात,” असे पत्र एचआरला लिहिणारी पिढी तेव्हा पत्रकारितेत यायची होती. ‘मूर्ख, गाढव, बेअक्कल’ हे शब्दही सर्रास वापरले जायचे. त्या दिवशी जो राग यायचा, तो दुसऱ्या दिवशी एक्लियरने विरघळायचा. आज मागे वळून पाहतो तेव्हा विचार येतो, आज कोण संपादक बातमीदाराला इतकी माया लावेल? कोणता संपादक सकाळी चार वाजता रिपोर्टरबरोबर त्याच्या असाइन्मेन्टला जाईल, बातमी लिहील आणि वर पुन्हा बातमीदाराला क्रेडिट देईल?

त्यांच्या या अशा दिलदार स्वभावाने त्यांनी अनेक मित्र जमवले. काही टिकले, पण काही दूरही झाले. स्वतःला “अजातशत्रू” म्हणून मिरवायचे असेल तर जे व्यावहारिक चातुर्य लागते ते अभयकडे नव्हते. ते कुणाचीच भीडभाड ठेवायचे नाहीत. अगदी राजकीय नेत्यांचीही नाही, जरी तो नेता मित्र असला तरी त्याची राजकीय भूमिका चुकीची आहे असे वाटले की सडकून टीका करायचे. वाचक आणि नागरिक हा कायम केंद्रबिंदू राहिला त्यांचा लिखाणाचा. संपादकीय स्वातंत्र्याशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. टेन पर्सेंटचा फ्लॅट वगैरे तर लांब राहिला, पण साधी प्रेस क्लबची मेम्बरशिपही त्यांनी तत्वाच्या आड येते म्हणून नाकारली. त्यांनी लेखणीची धार आणि स्वतःचा स्वाभिमान कधीच गहाण ठेवला नाही. त्यांचे हे ‘तत्वनिष्ठ असणे’ हाच त्यांचा सर्वात मोठा गुण ठरला आणि दुर्दैवाने या व्यवस्थेत तोच त्यांचा ‘दोष’ ठरवला गेला.
ज्या माणसाने व्यवस्थापनाच्या अहंकाराचे तुकडे कचऱ्यात टाकले, त्याच माणसाला शेवटच्या काळात आर्थिक विवंचनेच्या गर्तेत ढकलून देणाऱ्या या व्यवस्थेला काय म्हणावे? त्यांचा संघर्ष आजाराशी जसा होता तसा आर्थिक परिस्थितीशीही होता. आजच्या काळात प्रामाणिकपणाला मोठी किंमत मोजावी लागते, याचा प्रत्यय त्यांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आला.
त्यांची पत्नी काही वर्षापूर्वी वारली. तिच्या उपचारांवर त्यांनी आपली छोटी पुंजी आणि तिचे दागिने कधीच खर्च केले होते. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांचे भाऊ, त्यांची मानसकन्या, जवळचे मित्र आणि काही हितचिंतक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी ‘क्राउड फंडिंग’ (लोकवर्गणी) करून निधी उभारण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांच्यावरील प्रेमापोटी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले, पण त्या प्रयत्नांनाही एक मर्यादा होती. आजाराचा अक्राळविक्राळ खर्च आणि उपचारांची व्याप्ती मोठी होती. त्यांच्या भावांचे कुटुंबच त्यांचा शेवटचा आधार ठरले. ज्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता, तिथून अपेक्षेप्रमाणे मदत मिळाली नाही. ज्यांच्या मुलाखती घेऊन अनेकांचे करिअर घडले, ज्यांच्या बातम्यांनी सत्तांतर घडली, त्यापैकी कोणीही त्यांच्या पडत्या काळात मदतीला धावून आले नाही. एकेकाळी त्यांच्या अवतीभवती असणारी राजकीय लोकांची गर्दी पांगली होती आणि उरला होता तो फक्त एकाकीपणा आणि मोजके जवळचे नातेवाईक. साधा झिरो टॅक्सचा उत्पनचा दाखला मिळवून सीएम फंडातून एक बिल चुकते करून घ्यायला त्यांच्या हितचिंतकांना यातायात करायला लागली.
तुम्ही अमुक तमुकला फोन का करत नाही असे विचारल्यावर म्हणायचे, मी कुणासमोर झोळी पसरणार नाही आणि तुम्ही पण कोणी तुमच्या पदाचा दुरुपयोग करून मला मदत मिळवून दिलेली मला चालणार नाही. “You are in a senior position and I would not like your reputation to be harmed”, हे उत्तर पाठवले होते त्यांनी मला.
मुंबईतील दोन पत्रकारांनी लीलावती किंवा जसलोकला फुकट ट्रीटमेंट मिळेल असे सांगितल्यावर म्हणाले, त्यापेक्षा माझा बोरिवलीतील वन रूमचा फ्लॅट विकून द्या. त्या पैशातून माझा इथला खर्च भागेल आणि तोवर लीलावती आणि जसलोकचा बेड एखाद्या घर नसलेल्या गरिबाला मिळेल. फ्लॅट असा तडका फडकी विकला जात नाही आणि बरे झाल्यावर राहणार कुठे? सामानाचे काय? या प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तरे नव्हती हे खरे आहे. पण माझ्यापेक्षा एखाद्या बेघर माणसाला फ्री ट्रीटमेंटची गरज जास्त आहे ना? माझ्याकडे माझे भाऊ आहेत काळजी घ्यायला, मग मी फुकटचा बेड घेऊन गरिबांवर अन्याय का करू? या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर तरी कोणाकडे होते? तत्त्वनिष्ठ योद्धा तो, समजावयाचे कसे?
“He should have done proper future planning and invested funds correctly,” हे वाक्य बोलायला खूप सोपे आहे. आयुष्यभर पत्रकारितेचे विद्यार्थी घडवत आलेला हा माणूस. सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हते त्यांना. बसने फिरायचे. कार नव्हती. कॉटनचा साधा झब्बा घालायचे… काय काय सांगायचं? पण का सांगितले त्याला कारण आहे- आयुष्यभर ज्याने लोकांचे प्रश्न मांडले, त्या अभयचे प्रश्न कोणी आणि कोठे मांडायचे? एका निष्कलंक आणि ताठ कण्याच्या पत्रकाराला शेवटच्या क्षणी मिळालेली ही वागणूक व्यवस्थेच्या कृतघ्नपणाचे दर्शन घडवते. अभयने समाजाबाबत आणि व्यवस्थेबाबत कुठलीच कटुता बाळगली नाही, पण एका प्रामाणिक पत्रकाराकडे आयुष्याच्या अखेरीस उपचारासाठी पुरेशी पुंजी नसावी, हे या व्यवस्थेचे अपयश आहे.
अभयजींचे जाणे हे केवळ एका पत्रकाराचे जाणे नाही, तर एका मूल्याचा अंत आहे
