
महिलांच्या संदर्भात अत्यंत किळसवाणे विचार मांडणार्या मनुस्मृतीच्या जोखडातून देश सुटू नये यासाठी चिवटपणे कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भलताच धोबीपछाड दिला. पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात राहुल यांनी मनुस्मृतीची लक्तरे टांगली आणि मुलींना व्यासपीठ दिलं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, रमाई, फातिमा शेख यांच्या पुण्यात मुलींना लैंगिक छळापासून काय काय आणि किती सोसावे लागते हे जेन झी मुलींनी जाहीरपणे सांगितले. पुरुषसत्ताक विचारसरणीचा बुरखा फाडून या पिढीने ‘इंडिया का नया चाप्टर’ सुरू केला आहे, ज्याचा पाया आहे ‘डरो मत’ हा मंत्र!
२२ ऑगस्ट रोजी पुण्यातील एसएसपीएमएस महाविद्यालय मैदानावर झालेला राहुल यांचा हा कार्यक्रम महाराष्ट्रातील तमाम जेन झींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणारा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देणारा ठरला. हे अभियान पेपर लीक, परीक्षा घोटाळे, शिक्षण व्यवस्था, रोजगार आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणारे आहे. जूनमध्ये राजस्थानमधील कोटा येथून त्याचा प्रारंभ झाला. त्यानंतर देहरादून आणि प्रयागराजला लाखो विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला होता. पुण्यातील कार्यक्रम जेन झी मुलींसाठी होता. भाजपची ट्रोल आर्मी आणि विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. मुलींच्या हॉस्टेलमध्ये जाऊन धमक्या देण्याचे प्रकार चर्चेत आले. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार पवन खेरा यांना यासाठी पुण्यात पत्रकार परिषद घ्यावी लागली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दडपणात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप झाला. मात्र काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता अशा एफआयआरला भीक घालत नसल्याचे सांगून पुण्यातील कार्यक्रमावर लक्ष केंद्रित केले गेले. भाजपच्या अडवणुकीनंतरही हा कार्यक्रम तुफान गर्दीत यशस्वी झाला. राहुल गांधींनी राजकारणाऐवजी मुलींच्या अनुभवांवर, सुरक्षेवर, शिक्षणावर, संपत्ती हक्कांवर आणि सामाजिक नियंत्रणावर संवाद साधला. अनेक मुलींनी व्यासपीठावर येऊन समस्या मांडल्या. सार्वजनिक वाहतूक, छळ, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा, पुरुषप्रधान व्यवस्था यावर त्यांनी देशाचे लक्ष वेधले.
पुण्यासारख्या सुसंस्कृत समजल्या जाणार्या शहरात मुलींची कशी छेड काढली जाते, ते मुलींनी सोदाहरण सांगितले. महाराष्ट्र सरकारने सरकारी शाळा संपवल्या आणि आमचे शिक्षण बंद झाले. खासगी शाळांमध्ये शिकण्याची आर्थिक क्षमता आपल्यात नाही, असे मुलींनी व्याकुळतेने सांगितले. राज्यातील भाजपचे सरकार सरकारी शाळा बंद करून जमिनी हडपण्याच्या डाव रचत आहे. त्यांना काही शाळा गौतम अदाणीला द्यायच्या आहेत. या निगरगट्टापुढे गरीब विद्यार्थ्यांच्या आक्रोशाचा काही परिणाम होईल अशी अपेक्षा करता येत नाही. त्यांनी शिकायला नकोच हाच केंद्रसत्तेचा उद्देश आहे. आदिवासी विद्यार्थ्यांवर किती अन्याय होतो ते या व्यासपीठावरून सर्वदूर पोहचले गेले. मुलींनी उपस्थित केलेल्या कित्येक प्रश्नांची रीघ या व्यासपीठावर होती. हे व्यासपीठ सबलीकरणाचा केवळ देखावा करणारे नव्हते, तर त्यांचा तो एल्गार होता. सभेच्या निमित्ताने जमलेल्या ५० हजारांवर मुलींच्या मनात कोणतेही भय नव्हते. काही दिवसांपासून कार्यक्रमस्थळी जाऊ नका म्हणणार्यांना तुडवणारा हा आवाज होता. भोजपुरी गायिका नेहा सिंग राठोड हिने मी प्रश्न विचारायला घाबरत नाही, तुम्हीही घाबरू नका असे मुलींना सांगितले. वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ‘तुमसा कोई झूठा और बेईमान नहीं है, किसी एक की बपौती हिंदुस्तान नही है, जब हिंदू मुसलमान खेले खून की होली, आबिद हसन बोले जय हिंद की बोली…’ हे गाणे ऐकवले. नेहाच्या गीतांनी मुलींना धाकड बनण्याची हिंमत दिली.

राहुल गांधींनी पिंजरा तोडण्याची थीम वापरली. या देशातल्या ७० कोटी महिला या देशाची सर्वात मोठी ताकद आहेत. त्या अधिक संवेदनशील, करुणामय आणि भविष्यवादी असतात, हे सांगताना मनुस्मृती महिलांचे स्वातंत्र्य नाकारते आणि मोहन भागवत याच कुविचारांचे सूत्रधार असल्याचे राहुल यांनी अधोरेखित केले. भागवत यांनी दिल्ली गँगरेप प्रकरणानंतर बलात्कार, लैंगिक गुन्हे मुख्यतः ‘इंडिया’त होतात, भारतात फारसे होत नाहीत, असे उद्गार काढले होते, त्यांचे हे वक्तव्य महिलांप्रती हीन भावना ठेवणारे आहे. ‘बालपणात स्त्री पित्याच्या अधीन, तारुण्यात पतीच्या, पतीच्या मृत्यूनंतर पुत्रांच्या अधीन असावी; स्त्री कधीही स्वतंत्र नसावी’ हे नोंदवणार्या मनुस्मृतीच्या चिंधड्या उडवत राहुल म्हणाले की, महिला फक्त मुलगी, पत्नी किंवा आई या ओळखींपुरत्या मर्यादित नसाव्यात; त्या स्वतःच्या आहेत, कोणाच्या मालमत्ता नाहीत. हिंसाचार, सुरक्षेच्या नावाखाली नियंत्रण, मुलींची भ्रूणहत्या, छळ ही आकडेवारी लाजिरवाणी आहे. फक्त आठ टक्के महिलांकडे जमिनी हक्क असल्याचा उल्लेख करीत महिला आणि पुरुष विषमतेचा त्यांनी पर्दाफाश केला. जंतरमंतरवर जेन झींच्या आंदोलनात मुलींनी शिव्या दिल्यात म्हणून मोदींना सांस्कृतिक धक्का बसला. शिव्या देण्याची मक्तेदारी फक्त पुरुषांची आहे असे मोदींना म्हणायचे आहे का, असा सवाल विचारून मोदींनी कोणकोणत्या महिलांबद्दल आधी कोणकोणते अपशब्द वापरले याचा व्हिडिओ लावून राहुल यांनी मोदींचे सुसंस्कार चव्हाट्यावर आणले.
काँग्रेसचे अच्छे दिन…
राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाने तरुणांमध्ये नवचैतन्य संचारले हे नाकारता येत नाही. हा काँग्रेसचा राजकीय कार्यक्रम नसला तरी याचा खरा फायदा महाराष्ट्रातील मरगळलेल्या काँग्रेसला झाला आहे. एरवी महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते कधीच मैदानात दिसत नाहीत. त्यांच्यात एकी नाही. एकमेकांची जिरवण्यात वेळ घालवतात. जे काही करायचे आहे ते केवळ राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनीच करावे, आम्ही केवळ मलिदा खाऊ; नाही मिळाला तर ‘५० खोके, एकदम ओके’ हा मार्ग स्वीकारू, असे राज्यातील नेत्यांचे झाले आहे. नीट परीक्षेचे पेपर फुटले, महाराष्ट्रातील शेकडो शाळा बंद पडल्या, रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे, महागाईने कंबरडे मोडले,
इथेनॉलमुळे वाहने खराब होत आहेत, कितीतरी प्रश्न आहेत, ज्यांच्याविरोधात या पक्षातले कोणी संघटित होऊन मैदानात उतरले नाहीत. जिंकूनही अनेक महापालिका आपसातील भांडणामुळे भाजप-शिवसेनेला देण्यात आल्या.
स्वातंत्र्यलढ्यापासून एकेकाळी पुणे हे काँग्रेसचा गड होते. नव्या सहस्रकाच्या पहिल्या दशकापर्यंत इथे काँग्रेस सत्तेत होती. नेत्यांच्या मस्तीमुळे पुण्यात काँग्रेस थाळीतील चटणीपुरती शिल्लक राहिली. २०१४पासून इथे भाजपचे वर्चस्व राहिले आहे. जे लोक काँग्रेसमध्ये होते तेच चेहरे आता भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसतात. शनिवारच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसचे सर्व नेते एकत्र आले. ‘पुणे म्हणजे प्रेम’ हा संदेश राहुल गांधींनी दिला. पुणेकरांनी काँग्रेसवर प्रेम करावे इतके मैदान राहुल गांधींनी मारले आहे. आता काँग्रेसचे नेते कोणावर प्रेम करतात ते भविष्यात दिसून येईल.
अशी आहे मनुस्मृती!
बालपणी वडील, तारुण्यात पती आणि वृद्धापकाळात मुलगे स्त्रीचे रक्षण करतात; स्त्री कधीही स्वातंत्र्यास पात्र नाही, असे सांगणार्या मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे जाहीर दहन केले. चवदार तळे सत्याग्रहच्या दुसर्या परिषदेदरम्यान घडले. आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ वर्णव्यवस्थेला (चातुर्वण्य) आणि जातीभेदाला धार्मिक व कायदेशीर आधार देणारा होता. त्यात शूद्र आणि अस्पृश्यांना जन्मजात कनिष्ठ, सेवक आणि अपवित्र ठरवले आहे. त्यांना वेद श्रवण, वाचन, शिक्षण, मालमत्ता, आंतरजातीय विवाह इत्यादी अधिकार नाकारले आहेत. स्त्रियांनाही स्वातंत्र्य नाकारले आहे. आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की, मनुस्मृती ही उच्च जातींसाठी ‘हक्कांचा अधिकारपत्र’ तर अस्पृश्यांसाठी ‘गुलामगिरीची बायबल’ आहे. जोपर्यंत हा ग्रंथ आणि त्यावर आधारित ब्राह्मणवादी विचारधारा पूज्य मानली जाईल, तोपर्यंत अस्पृश्यता आणि जातीय विषमता नष्ट होणार नाही.
या ग्रंथानुसार नीच वर्गातील जो मनुष्य उच्च वर्गाच्या मनुष्याची वृत्ती लोभामुळे स्वीकारून उदरनिर्वाह करील, त्याची सर्व संपत्ती राजाने हिरावून घेऊन त्याला तात्काळ हद्दपार करावे. ब्राह्मणांची सेवा करणे हेच शूद्रांचे मुख्य कर्म आहे. शूद्र धनसंचय करण्यास समर्थ असला तरी त्याने धन जमा करू नये. ज्या देशाचा राजा शूद्र वर्गाचा असेल, त्या देशात ब्राह्मणांनी निवास करू नये; कारण शूद्रांना राजा होण्याचा अधिकार नाही. राजाने सकाळी उठून तिन्ही वेदांचे जाणकार आणि विद्वानांची सेवा करावी आणि त्यांच्या सांगण्यानुसार कार्य करावे. ज्या राजाच्या राज्यात शूद्र न्यायाधीश असतो, त्या राजाचा देश चिखलात रुतलेल्या गायीप्रमाणे दुःख भोगतो. ब्राह्मणाची संपत्ती राजाने कधीही घेऊ नये, परंतु इतर जातींच्या व्यक्तींकडे त्यांचे वारसदार नसल्यास राजा त्यांची संपत्ती घेऊ शकतो. शूद्र अनादराने ब्राह्मणांच्या नावाचा व वर्णनाचा उच्चार करील, तर दहा बोट लांब लोखंडी छडी त्याच्या तोंडात ठोकून दिली जावी. शूद्र गर्वाने ब्राह्मणावर थुंकला, त्याच्यावर लघवी केली, तर त्याचे ओठ आणि लिंग कापले जावे आणि त्याने त्याच्या दिशेने अपान वायू सोडला (पादला), तर त्याचे गुदद्वार कापून टाकावे. शूद्र ब्राह्मणावर हात किंवा काठी उचलेल, तर त्याचा हात कापून टाकावा आणि शूद्राने रागात ब्राह्मणाला लाथेने मारले, तर त्याचा पाय कापून टाकावा. या पृथ्वीवर ब्राह्मणवधाइतके दुसरे कोणतेही मोठे पाप नाही. त्यामुळे राजाने ब्राह्मणवधाचा विचार मनातही आणू नये. शूद्राने अहंकारवश ब्राह्मणांना धर्मोपदेश केल्यास, राजाने त्या शूद्राच्या तोंडात आणि कानात गरम तेल ओतावे. शूद्राला जेवणासाठी उष्टे अन्न, अंगात घालायला जुने कपडे, अंथरण्यासाठी भाताचा पेंढा आणि फाटकी-तुटकी वस्त्रे दिली पाहिजेत. मांजर, मुंगूस, नीलकंठ, बेडूक, कुत्रा, घोरपड, घुबड, कावळा यापैकी कोणा एकाची हत्या करण्याचे प्रायश्चित्त हे शूद्राच्या हत्येच्या प्रायश्चित्ताएवढेच आहे. ब्रम्हदेवाने शूद्रांसाठी केवळ एकच कर्म निश्चित केले आहे, ते म्हणजे गुणगान करत ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्याची सेवा करणे. राजाने मोठ्या दक्षिणांचे अनेक यज्ञ करावेत आणि धर्मासाठी ब्राह्मणांना स्त्री, घर, शय्या, वाहन इत्यादी भोग साधक पदार्थ तसेच धन द्यावे. शूद्र लोक वस्तीच्या मध्यभागी घर बांधू शकत नाहीत. गाव किंवा नगराच्या जवळ कोणत्याही झाडाखाली किंवा स्मशान, डोंगर किंवा उपवनाजवळ वस्ती करून आपल्या कर्माने उदरनिर्वाह करावा. शूद्र महिलांनी लोखंडाचेच दागिने घालावेत. ब्राह्मणाचे नाव शुभ आणि आदरसूचक, क्षत्रियाचे नाव वीरतासूचक, वैश्याचे नाव संपत्तीसूचक आणि शूद्राचे नाव तिरस्कारसूचक असावे.

