अनेकदा आपल्या मोबाईलवर आलेल्या कॉलवर आपण सहजपणे विश्वास ठेवतो. खासकरून बँक, गॅस़कंपनी, वीज कंपनी किंवा अशाच एखाद्या आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कंपनीतून कॉल आला, तर त्यावरून दिल्या जाणार्या सूचनांचं आपण विनाविलंब पालन करायला लागतो. कॉलवरचा माणूस मागेल ती माहिती देतो. मुळात या कंपन्या, आस्थापना अशी व्यक्तिगत आणि गोपनीय माहिती किंवा ओटीपी किंवा कार्डवरचे नंबर मागतात का, हाही विचार करत नाही. आयव्हीआर
(इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम ) वापरून फसवणूक करण्याचा हा प्रकार अनेकांना गंडवून जातो. ही फसवणूक नेमकी कशी होते, ते आपण या कथेच्या माध्यमातून समजून घेऊ.
दुपारची वेळ होती. एका मोठ्या आयटी कंपनीत वरिष्ठ इंजिनियर म्हणून काम करणारी मनीषा ऑफिसमध्ये जेवत होती. संगणकाच्या स्क्रीनवर नव्या मेल्सची नोटिफिकेशन दिसत होती. कंपनीतील जबाबदारीचे प्रोजेक्ट, सततच्या मीटिंग्ज आणि आठवड्यातून दोनदा हैद्राबाद-बंगळुरूचा प्रवास, यामुळे तिचा मोबाईल म्हणजे तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला होता. त्या दिवशीही सकाळपासून ती कामात व्यग्र होती. जेवण सुरू असतानाच मोबाईल वाजला. स्क्रीनवर अनोळखी नंबर दिसत होता.
हॅलो? मनीषाने फोन कानाला लावला. समोरून स्त्रीच्या गोड आवाजातला रेकॉर्डेड मेसेज सुरू झाला. ‘प्रिय ग्राहक, तुमचे मोबाईल सिमकार्ड पुढील तीस मिनिटांत बंद होणार आहे. सेवा सुरू ठेवण्यासाठी कृपया खालील सूचना पाळा. अधिक माहितीसाठी एक दाबा. सिमकार्ड बंद होण्यापासून थांबवण्यासाठी दोन दाबा…’ ते ऐकून मनीषा दचकली. आता काय? सिम बंद होणार? ती स्वतःशीच पुटपुटली. तिच्या मनात लगेच विचार सुरू झाले. अरे देवा, उद्या क्लायंट मीटिंग आहे. आजच टीमचा महत्त्वाचा मेसेज येणार आहे. फोन बंद झाला तर?
तिने घाईघाईने दोन नंबरचे बटण दाबले. त्यानंतर पुन्हा आवाज आला. आपले सिम व्हेरिफाय करण्यासाठी पुढील सूचना पाळा, ती महिला सांगत होती तशी तशी मनीषा बटणे दाबत गेली. अचानक तिच्या फोनची स्क्रीन काळी झाली. मोबाईल पूर्णपणे बंद झाला. अरे हे काय झालं? असे म्हणत मनीषा घाबरून जागेवरून उठली. तिने मोबाइलचे पॉवर बटण पुन्हा दाबले. पण काहीच प्रतिसाद येत नव्हते. हे आत्ता बंद व्हायचं होतं का? ती वैतागून म्हणाली. तिने घाईघाईने डबा बंद केला आणि ऑफिसखाली असणार्या मोबाईल दुकानाकडे धाव घेतली. तिथे एक तरुण मोबाईल दुरुस्त करत बसला होता. भाऊ, माझा फोन अचानक बंद झाला. प्लीज सुरू करून द्या ना, मनीषा त्याला म्हणाली. त्याने फोन हातात घेतला, तपासला आणि म्हणाला, मॅडम, सॉफ्टवेअरचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. थोडा वेळ लागेल. मनीषा त्याला म्हणाली, मला फोन आत्ताच हवा आहे.
ऑफिसची महत्त्वाची मीटिंग आहे. तो तरुण म्हणाला, मी प्रयत्न करतो. पण तुम्हाला फोन इथे ठेवावा लागेल.
मनीषाने फोन तिथेच ठेवला आणि चिंतेत ऑफिसमध्ये परत आली. तिचे लक्ष कामात लागत नव्हते. ती सतत विचार करत होती. खरेच कंपनीने फोन केला असेल? की काहीतरी वेगळंच? तेवढ्यात तिची मैत्रीण वैशाली तिच्या केबिनमध्ये धावत आली. मनीषा, ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, काय झालं? तुझ्यासाठी तृप्तीचा फोन होता. कशासाठी? ती म्हणत होती, तू काही अडचणीत आहेस का?
मनीषा गोंधळली.
मी? नाही तर. इतक्यात वैशालीचा फोन पुन्हा वाजला.
वैशालीने स्पीकर ऑन केला.
हॅलो मनीषा, तृप्तीचा आवाज आला.
हो बोल ना.
अगं, तू ठीक आहेस ना?
हो… पण काय झालं?
तुझा मेसेज आला होता मला.
कसला मेसेज?
तू अडचणीत आहेस, तातडीने पैशांची गरज आहे असं लिहिलं होतं. तू दिलेल्या खात्यावर मी पंचवीस हजार रुपये पाठवले. क्षणभर मनीषाच्या पायाखालची जमीनच सरकली. काय? ती जोरात ओरडली.
हो गं, तू फोन उचलत नव्हतीस म्हणून मी काळजीत पडले.
तृप्ती, मी तुला कोणताही मेसेज पाठवलेला नाही.
काय? पण मेसेज तुझ्याच नंबरवरून आला होता.
ते ऐकून मनीषाच्या अंगावर काटा आला.
थांब, तो मेसेज मला पाठव,’ ती थरथरत्या आवाजात म्हणाली. दुसर्याच क्षणी वैशालीच्या फोनवर स्क्रीनशॉट आला. त्यामध्ये लिहिले होते, मी मोठ्या अडचणीत आहे. तातडीने पैशांची गरज आहे. कृपया खालील खात्यावर पैसे पाठवा, मनीषाच्या डोळ्यांत पाणी आले. हे काय चाललंय? ती मनाशी पुटपुटली.
ऑफिसमधील विशाल नावाचा सहकारी तिथे आला. काय झालं? त्याने विचारलं. मनीषाने घडलेला सगळा प्रकार सांगितला. विशाल काही क्षण विचारात पडला. तो म्हणाला, मनीषा, मला वाटतं तुझा फोन हॅक झाला आहे. ‘हॅक?’ हा शब्द ऐकून ती हादरून गेली होती. त्या आयव्हीआर कॉलमधून कुणीतरी तुझ्या फोनचा कंट्रोल घेतला असावा. मनीषा म्हणाली, पण मी फक्त त्यांनी दिलेल्या सूचना पाळल्या. विशाल म्हणाला, सायबर गुन्हेगार नेमकं हेच करतात. ते ऐकून मनीषाला रडू कोसळलं. माझ्यामुळे तृप्तीचे पैसे गेले, शांत हो, विशाल म्हणाला, ‘आधी काय काय झालं ते पाहू. इतक्यात दुसरा सहकारी विक्रम धावत आला. मनीषा, तुझ्या इंस्टाग्रामवरून मला एक लिंक आली आहे. कसली लिंक रे? काहीतरी इन्व्हेस्टमेंट साईटची. मला संशय आला म्हणून मी क्लिक नाही केलं. आता परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. मनीषाच्या फोनमधील कॉन्टॅक्ट्स, सोशल मीडिया सगळं कुणीतरी वापरत होतं. ती पूर्णपणे घाबरली होती.
विशालने लगेच त्याच्या मित्राला फोन केला. तो सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात काम करत होता. थोड्याच वेळात तो ऑफिसमध्ये आला. विशालने सर्व माहिती त्याला सांगितली. तो म्हणाला, हा आयव्हीआर प्रâॉड आहे. सायबर गुन्हेगार आधी रेकॉर्डेड कॉल करतात. मग भीती निर्माण करतात. ‘फोन बंद होईल’, ‘केवायसी बंद होईल’, ‘बँक खाते बंद होईल’ अशा गोष्टी सांगतात.
मनीषा आयटी अधिकारी असूनही इतकी भिरभिरली होती की ती सायबर तज्ज्ञाला म्हणाली, पण माझा फोन खरंच बंद झालाच की. तो म्हणाला, त्यांनी तुला काही विशिष्ट कमांड्स दाबायला लावल्या असतील. त्यातून कॉल फॉरवर्डिंग किंवा रिमोट अॅक्सेस सक्रिय झाला असावा.
मनीषा स्तब्ध झाली. म्हणजे त्यांनी माझा फोन ताब्यात घेतला?
हो. आणि आता ते तुझ्या नंबरवरून इतरांना फसवत आहेत. आता लगेच पोलिसांत तक्रार करा. जितका उशीर कराल तितकं नुकसान वाढेल. त्या क्षणी मनीषा सायबर पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली. पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांनी मेसेज कुठून पाठवले गेले, पैसे कोणत्या खात्यात गेले याचा माग काढला. दोन दिवसांनी पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले. ते वेगवेगळ्या शहरांमधून हे रॅकेट चालवत होते.
शहाण्या माणसांनी हे लक्षात घ्यायला हवं की मोबाईल कंपन्या किंवा बँका किंवा अशा कोणत्याही अधिकृत कंपन्या कधीही फोन करून ‘अर्ध्या तासात तुमचा फोन बंद होईल किंवा एखादी सेवा बंद होईल,’ अशा धमक्या देत नाहीत. सायबर गुन्हेगार लोकांच्या भीतीचा फायदा घेतात. गोड आवाज, तातडीची भाषा आणि तांत्रिक शब्द वापरून ते समोरच्या व्यक्तीला गोंधळवून टाकतात. त्यांच्या बोलण्याला भुलता कामा नये.
अशी घ्या काळजी
१) मोबाइलवर स्वयंचलित यंत्रणेच्या माध्यमातून आलेल्या फोनवर देण्यात येणार्या सूचनांचे पालन करण्याचे धाडस करू नका, त्यामधून फसवणूक होऊ शकते.
२) मोबाईल कार्ड बंद होणार आहे, त्यासाठी केवायसी अपडेट करावे लागणार आहे, असे मोबाईलवर येणारे मेसेज हे फसवणूक करणारे असतात, हे कायम लक्षात ठेवा.
३) मुळात आयव्हीआर यंत्रणेच्या माध्यमातून आलेले फोन घेऊच नका, ते लगेच कट करा, म्हणजे पुढचा त्रास होणार नाही.
४) तुमचे कार्ड बंद होणार आहे, असे जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर मोबाईल ़कंपनीच्या कार्यालयात जाऊन त्याची शहानिशा करा, मोबाईलवर कोणताही उद्योग करत बसू नका.
५) नेहमीच्या कामातून थोडा वेळ काढून सायबर साक्षर होण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे सायबर फसवणुकीच्या प्रकारापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकाल, हे लक्षात ठेवा.
६) आपल्याला अनोळखी नंबरवरून फोन आले तर त्यांना मी कोणतीही माहिती देणार नाही, याचे प्रशिक्षण आपल्या मेंदूला देऊन ठेवा, त्यामुळे आपण सायबर गुन्ह्यापासून स्वतःचा बचाव करू शकाल.
७) फोनवर सांगितलेल्या सूचना घाईघाईने पाळू नका.
८) कुठलेही बटण दाबण्यापूर्वी खात्री करा.
९) संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
१०) बँकेची महत्त्वाची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू नका.
११) गरज पडल्यास थेट कंपनीच्या अधिकृत सेवा केंद्राशी संपर्क साधा.
१२) फोन हॅक झाल्याची शंका आली तर त्वरित सायबर पोलिसांकडे तक्रार करा.
१३) फोनवर ट्रूकॉलर किंवा तत्सम सुविधा बसवा आणि त्यावर प्रâॉड म्हणून दाखवलेल्या नंबरवरून आलेले कॉल किंवा अनोळखी नंबरांचे कॉल स्वीकारू नका.
१४) एखादा कॉल महत्त्वाचा असू शकतो, असे वाटल्यास त्या नंबरवर एसेमेस पाठवून कोण कॉल करतंय याची खात्री करून घ्या.
१५) फ्रॉड किंवा स्पॅम कॉल करणारे नंबर तात्काळ ब्लॉक करून टाका.

