• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आयपीएलच्या क्षितिजावर नव्या पिढीचा उदय

प्रशांत केणी (खेळियाड)

marmik by marmik
April 18, 2026
in खेळियाड
0
आयपीएलच्या क्षितिजावर नव्या पिढीचा उदय

‘आयपीएल’च्या व्यासपीठावर आज महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे यांची फारशी छाप पडताना दिसत नाही. अगदी ट्वेंटी-२० विश्वविजेत्या खेळाडूंच्या कामगिरीतही सातत्याचा अभाव आढळतो आहे. पण ‘आयपीएल’च्या १९व्या अध्यायाच्या सुरुवातीला पुढची झंझावाती पिढी प्रखरतेने प्रकाशझोतात आली आहे.

 

ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकून एक महिना सरला… इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचा १९वा अध्याय सुरू होऊन त्यातील २५ टक्के सामने पार पडले आहेत… यातून काय सिद्ध होते आहे, तर या पिढीतल्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपेक्षा (जनरेशन बेस्ट) पुढच्या पिढीतले उदयोन्मुख तारे (जनरेशन नेक्स्ट) भारी पडत आहेत. अगदी ट्वेंटी-२० विश्वविजेते खेळाडूसुद्धा धावांसाठी झगडताना आढळत आहेत. हे पाहता भारतीय क्रिकेटचे भवितव्य उज्ज्वल असल्याची साक्ष मिळते.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ पहिल्या तिन्ही सामन्यांत पराभूत झाला. चौथ्या सामन्यात त्यांनी विजय प्राप्त केला. चेन्नईला पाच विजेतेपदांचे वैभवाचे दिवस दाखवणारा महेंद्रसिंह धोनी दुखापतीमुळे पहिले दोन आठवडे खेळू शकला नाही. तो खेळला तरी या हंगामात चेन्नई संघ पुढील हंगामापासून त्याच्याशिवाय खेळण्यास समर्थ असेल, याच जबाबदारीने तो संघात असेल. गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला जेतेपद मिळाल्याने रुबाबात आलेल्या विराट कोहलीने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध नाबाद ६९ धावांची खेळी त्याने साकारली. त्यानंतरही तो सातत्याने धावा करतो आहे. मग चर्चा होईल ती ‘मुंबईचा राजा’ रोहित शर्माची. रोहितने यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामाची झोकात सुरुवात केली. त्याने वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध ७८ धावांची खेळी उभारली. रोहितने मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची १५ वर्षेही साजरी केली. यंदा ‘रोहित २.०चा अविष्कार पाहायला मिळेल, अशी आशा होती. पण त्याच्यात सातत्याचा अभाव जाणवत आहे. तीच गत अजिंक्य रहाणेची. कोलकाता संघाचा हा कर्णधार वानखेडेच्या घरच्या मैदानावर उत्तम खेळला आणि मुंबईविरुद्ध ६७ धावा काढल्या. मग पुढील दोन सामन्यांत त्याने प्रत्येकी आठ धावा केल्या. मग लखनऊविरुद्धच्या (४१) सामन्यात त्याला पुन्हा सूर गवसला. सर रवींद्र जडेजा मागील हंगामापर्यंत चेन्नईचा अविभाज्य भाग होता. या हंगामात खेळाडू हस्तांतर प्रक्रियेद्वारे तो राजस्थान रॉयल्स संघात आला. पण चेन्नईविरुद्ध तो १८ धावांत २ बळी घेत तो चमकला. पुढे त्याच्याकडून लक्षवेधी कामगिरी झाली नाही. मनीष पांडे हा ‘आयपीएल’च्या पहिल्या हंगामापासून या वर्षीच्या १९व्या हंगामापर्यंत म्हणजे वयाच्या ३६व्या वर्षीपर्यंत खेळतो आहे. तो कोलकाता संघाचा भाग असला तरी त्याला खेळण्याची संधी मिळेल, असे वाटत नाही.
लखनऊचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये या वर्षी दिमाखदार कामगिरी बजावली. पण हे सातत्य त्याला ‘आयपीएल’मध्ये टिकवता आले नाही. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने टिच्चून गोलंदाजी करताना ९ धावांत २ बळी मिळवले. यापैकी एक होता, अभिषेक शर्मा आणि दुसरा ट्रॅव्हिस हेड. बेंगळुरू संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चेन्नईविरुद्ध तीन बळी मिळवले; पण बाकीच्या सामन्यात त्याची भेदकता दिसून आली नाही. दिल्लीकडून खेळणार्‍या केएल राहुलला पहिल्या दोन्ही सामन्यांत अपयशाचा धनी व्हावं लागलं. पण तिसर्‍या सामन्यात गुजरातविरुद्ध त्याने ९२ धावांची खेळी उभारली.

भारताचे ट्वेंटी-२० विश्वविजेते खेळाडू आज त्या लयीत क्वचितच दिसतात. या विश्वविजेतेपदात सिंहाचा वाटा उचलणारा संजू सॅमसन आता चेन्नई संघात सामील झाला आहे. तोही पहिल्या तीन सामन्यांत संघर्ष करीत होता. पण दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या चौथ्या सामन्यात त्याला सूर गवसला. त्याने नाबाद ११५ धावांची शतकी खेळी उभारत संघाचा विजयाचा दुष्काळ संपवला. भारताचा विश्वविजेता कर्णधार सूर्यकुमार यादव मुंबई संघाकडून खेळतो. दिल्लीविरुद्ध एकमेव अर्धशतक वगळल्यास त्याचीही बॅट तेजाने तळपलेली नाही. भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती या तिघांचे बळींचे रकाने पहिल्या काही सामन्यांत रिकामे होते. अष्टपैलू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करतो आहे. पण त्याला फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागांत अद्याप कर्तृत्व दाखवता आलेले नाही. याच संघातून खेळणार्‍या तिलक वर्माला अजूनही सूर सापडलेला नाही.
विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापर्यंत ज्याच्या बॅटमधून मोठी खेळी झाली आणि अंतिम सामन्यात चमकलेला अभिषेक शर्मासुद्धा सुरुवातीच्या काही सामन्यांत अपेक्षांची पूर्तता करू शकला नाही. पण पंजाब किंग्जविरुद्ध तो दर्जाला साजेसा खेळला. हैदराबादचे नेतृत्व करणारा ईशान किशनने बेंगळुरूविरुद्ध सलामीच्या सामन्यात ८० धावांची खेळी करीत छाप पाडली. पण पुढे त्याच्या कामगिरीतही चढ-उतार आढळले. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव हे सारेच विश्वविजयाचे शिलेदार संघर्ष करीत आहेत.

नव्या पिढीचे शिलेदार
नव्या पिढीच्या शिलेदारांपैकी सर्वाधिक चर्चा आहे, ती बिहारच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची. राजस्थान रॉयल्सने पहिले चारही सामने जिंकले. या विजयांत सूर्यवंशीचे योगदान महत्त्वाचे होते. चेन्नईविरुद्ध ५२ धावा, गुजरातविरुद्ध ३१, मुंबईविरूद्ध ३९ आणि बेंगळुरूविरुद्ध ७८ या त्याच्या पहिल्या चार खेळी. २५०पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने त्याने २००चा टप्पा गाठताना तब्बल १८ षटकार खेचले आहेत. त्याने जसप्रीत बुमरा, जोश हेझलवूड यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या गोलंदाजांचीही यंदा तमा बाळगली नाही. या सलामीवीराला यशस्वी जैस्वालकडून तोलामोलाची साथ मिळते आहे. सूर्यवंशी आणि जैस्वालची स्फोटक सलामी आयपीएलमधील सर्वच संघांसाठी डोकेदुखी ठरते आहे. जैस्वालने नाबाद ३८ धावा, ५५, नाबाद ७७ आणि १३ अशा पहिल्या चार खेळी साकारल्या.

लखनऊ सुपर जायंट्सचा मुकुल चौधरी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात प्रकाशझोतात आला तो त्याने २७ चेंडूंत नाबाद ५४ धावांची खेळी उभारत संघाला जिंकून दिल्यामुळे. डेथ ओव्हर्समध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता त्याने दाखवून दिली. मुकुल हा झुंझुनू जिल्ह्यातील गुढा गोरजी या छोट्या गावातून पुढे आला आहे. राजस्थानमधील या गावातले अनेक रहिवासी भारतीय सैन्यदलात आहेत. पण मुकुलचे वडील दालिप चौधरी यांचे स्वप्न होते की त्यांचा मुलगा क्रिकेटपटू व्हावा. यासाठी त्यांनी स्वतःच्या करिअरच्या योजना बाजूला ठेवल्या. मग कर्ज घेतले, घर विकले आणि मुलाच्या क्रिकेटसाठी सर्वस्व पणाला लावले. मुकुलला चांगले क्रिकेट शिकता यावे म्हणून त्या जयपूरला पाठवले. अरावली क्रिकेट क्लबमध्ये त्याच्या गुणवत्तेला पैलू पाडण्यात आले. कार्तिक शर्मा आणि अशोक शर्मा हेसुद्धा याच क्लबमधून नावारूपास आले. २३ वर्षांचा अशोक हा गुजरात टायटन्सकडून खेळणारा राजस्थानचाच वेगवान गोलंदाज, जो वेगवान गतीसाठी ओळखला जातो. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ताशी १५४.२ किमी वेगाने चेंडू टाकून त्याने सर्वांना दखल घ्यायला भाग पाडले. लहानपणापासूनच त्याने टेनिस बॉल क्रिकेटमधून आपली वेगवान गोलंदाजीची छाप पाडली. अचूक
यॉर्कर आणि उसळत्या चेंडूंनी तो फलंदाजांना सतत अडचणीत आणतो. आता आयपीएलच्या व्यासपीठावर त्याला नाव कमावण्याची संधी मिळाली आहे.

उत्तर प्रदेशचा समीर रिझवी आता दिल्ली कॅपिटल्सचा महत्त्वाचा आधारस्तंभ झाला आहे. चेन्नई सुपर किंग्जने नाकारलेल्या रिझवीने पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे नाबाद ७० आणि ९० धावांची खेळी केली. मीरतच्या या तरुणाला सुरेश रैनाने हेरले. गांधीबाग अकादमीत तांकीब अख्तरच्या मार्गदर्शनाखाली तो घडला. २०२०मध्ये वडिलांच्या गंभीर आजारपणामुळे कुटुंबाची आर्थिक अडचण निर्माण झाली. पण रिझवीने क्रिकेट चालू ठेवत इथपर्यंत मजल मारली आहे.

तात्पर्य : ‘आयपीएल’मध्ये अगदी ‘छोडो कल की बातें, कल की बात पुरानी…’ असे थेट घडत नसले, तरी पुढच्या पिढीतले उदयोन्मुख तारे या क्षितिजावर प्रखरतेने चमकताना दिसत आहेत. ‘यत्र प्रतिभा अवसर प्राप्नोति’ हे ‘आयपीएल’चे ब्रीदवाक्य. म्हणजेच जिथे प्रतिभेला संधी मिळते. यंदाच्या १९व्या हंगामातही त्याचा प्रत्यय येतो आहे. पण २०२८च्या आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकात सध्याच्या विश्वविजेत्यांपैकी अनेकांचे धोक्यात असेल आणि ही नवी पिढी त्यांची जागा घेईल, हे निश्चित!

Previous Post

फटकारे बाळासाहेबांचे

Next Post

मुंबईची तहान भागणार का? गारगाई धरण की नि:क्षारीकरण?

Next Post
मुंबईची तहान भागणार का? गारगाई धरण की नि:क्षारीकरण?

मुंबईची तहान भागणार का? गारगाई धरण की नि:क्षारीकरण?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.