• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आपण फक्त प्रेक्षक!

मर्मभेद

Marmik Team by Marmik Team
July 25, 2026
in इतर, मर्मभेद
0
आपण फक्त प्रेक्षक!

मा जी जगज्जेत्या अर्जेंटिनाचा एकतर्फी पराभव करून स्पेनने विश्वचषक उंचावला आणि फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे सूप वाजले. उत्कृष्ट लढतींनी गाजलेल्या या जागतिक महास्पर्धेचा थरार संपुष्टात आला आणि भारतात सोमवारच्या भल्या पहाटे साडे तीन वाजता पाचेक कोटी भारतीयांनी जबरदस्त खेळाचा आनंद लुटल्याच्या समाधानात डोळे मिटले… आता पुढची चार वर्षे पुन्हा क्रिकेट एके क्रिकेट खेळायला आपण मोकळे झालो…

फुटबॉल आणि क्रिकेट हे परस्परांशी तुलनाही होऊ शकणार नाहीत, असे दोन खेळ. क्रिकेट खेळणार्‍या देशांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सतत करत असते, पण आजही गांभीर्याने दखलपात्र क्रिकेट खेळणार्‍या देशांची संख्या दहाच्या आतच असेल. त्याचवेळी जगातला जवळपास प्रत्येक देश फुटबॉल खेळतो, फिफा या फुटबॉलच्या सर्वोच्च संघटनेत सदस्य देश आहेत २११. इथेच दोन्ही खेळांच्या विश्वचषकांमधली तुलना संपुष्टात यायला हवी!

फुटबॉल खेळणार्‍या देशांची संख्या इतकी अवाढव्य असल्यामुळेच ३२ देशांमधील सामन्यांच्या फॉरमॅटऐवजी यावेळी यंदा ४८ देशांच्या संघांचा समावेश करण्यात आला होता. तरीही त्यात भारताचा समावेश नव्हता, कारण फिफाच्या क्रमवारीत भारत १३८व्या स्थानावर आहे. आशिया खंडात आपला क्रमांक आहे २६वा. आपलं आजवरचं सर्वोत्तम स्थान १९९६ साली आपण गाठलं होतं, ते होतं ९४ वं. सर्वात वाईट कामगिरी २०१५ साली नोंदवली होती, तेव्हा आपण १७४व्या क्रमांकावर घसरलो होतो.
या सगळ्यातून काय स्पष्ट होते?

फुटबॉल भले जगात खेळाचा राजा असेल, भारतात त्याला काही स्थान नाही, आपल्या देशाने हा खेळ कधीही गांभीर्याने घेतलेला नाही. इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएल या खेळाला आपल्याकडे किती प्रतिसाद मिळतो किंवा बायचुंग भुतियासारखा फुटबॉलपटू आणि आयपीएलचा एखादा सीझन खेळून लुप्त झालेला एखादा क्रिकेटपटू यांच्या उत्पन्नात किती तफावत असेल, ते पाहा. त्यातून भारतात फुटबॉलची स्थिती काय आहे ते कळून जातं. म्हणूनच यंदा ही विश्वचषक स्पर्धा भारतातही पाहिली जावी यासाठी प्रक्षेपणाचे हक्क विकण्याचा प्रयत्न फिफाने केला, तेव्हा भारतातल्या प्रस्थापित क्रीडा वाहिन्यांनी, अगदी दूरदर्शनसारख्या सरकारी वाहिनीनेही त्यात फारसा रस दाखवला नव्हता. त्यात त्यांची चूक काय? आयपीएल नामक क्रिकेटच्या सर्कशीतले चिंटुकले सामने होतात तेव्हाही तब्बल ३० ते ६० कोटी प्रेक्षक ते पाहात असतात ते या देशात; फुटबॉलच्या विश्वचषकासाठी उर्वरित जगातला बहुतेक भाग टीव्हीला खिळून बसलेला असताना भारतात मात्र जेमतेम पाच कोटी प्रेक्षकच हा थरार पाहात होते, ही गोष्ट किती बोलकी आहे.

भारतासारख्या गरीब देशात फुटबॉलबद्दल ही अनास्था कशी, हा क्रीडातज्ज्ञांपासून समाजशास्त्रज्ञांपर्यंत अनेकांना पडणारा प्रश्न आहे. फुटबॉलमध्ये महासत्ता बनलेले अनेक देश गरीब आहेत. कारण हा खेळ क्रिकेटप्रमाणे महागडा नाही, त्याला गणवेश, संपूर्ण क्रिकेट किट असा सगळा सरंजाम लागत नाही. खास राखलेली खेळपट्टी लागत नाही. या खेळाला लागतं काय, एक मैदान आणि एक चेंडू. आप्रिâकेतल्या गरीब देशांमधले खेळाडू अनवाणी पायांनीच हा खेळ खेळतात. हा खेळ अधिकृतपणे ९० मिनिटांचा. क्रिकेटप्रमाणे पाच दिवस, एक दिवस किंवा अर्धा दिवस तो चालत नाही. स्थानिक पातळीवर तर जेवढा वेळ असेल तेवढ्यात खेळून मोकळं होता येतं. कुठेही दोन बाजूंना दोन गोल आखा आणि खेळा.

तरीही भारतात तो लोकप्रिय का नसावा?

काही तज्ज्ञ म्हणतात की भारतीय मानसिकता सरंजामशाहीची आहे, तिच्यामध्ये क्रिकेटसारखा आरामदायी खेळच बसू शकतो. या खेळात गोलंदाज धावणार, फलंदाज बॅट हलवणार, मग ज्याच्याकडे चेंडू गेला तो पळणार. चेंडू परत आला की गोलंदाज त्याच्या रनअपवर चालत जाणार. मग तो धावू लागणार, असा सगळाच आरामशीर, सुशेगाद कारभार. फुटबॉलमध्ये सलग सतत धावणे, चपळाईने हालचाली करणे असा शारीरिक तंदुरुस्तीचा कस लागतो. इतकी धावपळ करण्याची आपली मानसिकता नाही. त्याहून गंभीर बाब म्हणजे गरीबांना तेवढं प्रथिनयुक्त पोषण उपलब्ध नाही, फुटबॉलमागे ऊर फुटेस्तोवर धावण्याची ताकद आणणार कुठून? आपल्या देशात आजही फुटबॉलचा खेळ प्राधान्याने मांसाहारी असलेल्या केरळ, ईशान्य भारत, गोवा आणि बंगाल याच राज्यांमध्ये लोकप्रिय आहे, हा निव्वळ योगायोग खचितच नसावा.

यावेळच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत पाच लाख लोकसंख्येचा केप व्हर्दे नावाचा देशही गाजला, जे शेवटपर्यंत खेळले, जिंकले ते सगळे देश आपल्याकडच्या एखाद्या शहराच्या, गावाच्या, उपनगराच्या किंवा फार फार तर एखाद्या राज्याच्या आकाराचे होते. त्या सर्वांना सामावूनही शिल्लक उरेल, एवढा विशाल भारत मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे ११ फुटबॉलपटू घडवू शकत नाही, याने अनेक जण खंतावले. ही चौवार्षिक खंत आहे. विश्वचषक स्पर्धा संपली की ही खंत आणि चुटपुटही संपून जाते. मग आपण क्रिकेटमग्न होतो आणि फुटबॉलमध्ये आपण कुठेच नाही, याची जाणीव चार वर्षांनी पुढच्या विश्वचषकाच्या वेळीच होते. ते काय फार मनावर घ्यायचं?
या वेळच्या विश्वचषकात आणखी एक इंटरेस्टिंग विषय पुढे आलेला आहे. या स्पर्धेचे इन्स्टाग्रामवर जगभरात जेवढे चाहते आहेत, त्यातले १० ते ११ टक्के चाहते भारतीय आहेत. आपल्यापेक्षा जास्त ‘फॉलोअर’ फक्त ब्राझील या फुटबॉलवेड्या देशाचेच आहेत. भारत फुटबॉल संघ किंवा खेळाडू बनवू शकत नाही इतक्यात, पण प्रेक्षकसंख्या तर वाढवू शकतो, हे लक्षात घेऊनच तर फिफाने यंदा भारतीय प्रेक्षकांना लुभावण्यासाठी अनेक प्रयत्न केले. फिफाच्या इन्स्टाग्रामवर मराठीत संदेश झळकले. याला कारण आहे आपल्या देशाचं अवाढव्य आकारमान आणि प्रचंड लोकसंख्या. या लोकसंख्येमुळेच जगातल्या सगळ्यांना आपल्याला ‘गिर्‍हाईक’ बनवायचे असते. त्या मालिकेत आता फिफाचीही भर पडली नसती तरच नवल.

अर्थात, जिथे मैदानं नाहीत, मुलांनी खेळायला बाहेर जावं अशी शहरांमध्ये परिस्थिती राहिलेली नाही, जिथे मुलांना पोषक आहार मिळण्याची बोंब आहे, अंगातून घामाच्या धारा वाहवणारे, दमसासाची परिसीमा पाहणारे खेळ खेळण्याची संस्कृती नाही, तो देश फार फार तर प्रेक्षकांच्या म्हणजे गिर्‍हाईकांच्या संख्येतच विश्वगुरू बनू शकतो!

Previous Post

ते ‘मुनी’ आणि आम्ही ‘वारकरी’

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.