
न लगे पाहावे अबद्ध वाकडे।
उच्चारावे कोडे नाम तुझे ।।१ ।।
नाही वेळ काळ पंडितांचा धाक।
होत का वाचक वेदवक्ते ।।२ ।।
वेदी जे प्रतिपाद्य कोठे न मिळे पाहता।
तैशी या अनंता ठेवू नामे ।।३ ।।
आपुलिया मना उपजे आनंद।
तैसे करू छंद कथेकाळी ।।४ ।।
तुका म्हणे आम्ही आनंदेचि धालो।
आनंदचि ल्यालो अलंकार ।।५ ।।
तुकोबारायांचा प्रस्तुत अभंग नामपर प्रकरणातील आहे. यात तुकोबाराय नामाचा महिमा सांगतात. वारकरी संप्रदाय प्रेमभक्तीचा पुरस्कर्ता आहे. तिचाच भाग म्हणजे नामस्मरण. आर्ततेने आणि प्रेमाने नामस्मरण करावं अशी संतांची भावना आहे. त्यामुळेच संतांनी अभंगातून नामस्मरणाची सुलभता आणि श्रेष्ठता वारंवार सांगितली आहे. संतकाळात वेदमंत्र उच्चाराला प्रतिष्ठा होती. त्यामुळे संतांनी वेदमंत्राच्या तुलनेत नाममंत्राची महती दाखवून दिली. प्रस्तुत अभंगातल्या पहिल्या दोन चरणात तुकोबाराय वेदमंत्र उच्चारण आणि नामस्मरण यातला फरक दाखवून देतात.
वेदमंत्र-उच्चारण करताना काटेकोरपणा पाळावा लागतो. शब्दाचीही चूक चालत नाही. ‘मंत्र चळे थोडा । तरी धडशी होय वेडा।।’ असं तुकोबाराय म्हणतात. त्याचबरोबर ‘मंत्रचळे पिसे लागते सत्वर।’ असंही तुकोबारायांचं प्रमाण आहे. नाममंत्र-उच्चारण करताना चूक झाली तरी चालते. प्रस्तुत अभंगाच्या पहिल्याच चरणात नाममंत्राची ही विशेषता तुकोबाराय सांगतात. ‘नलगे पाहावे अबद्ध वाकडे। उच्चारावे कोडे नाम तुझे ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. ‘अबद्ध ते फार तरले नामे।’ असं म्हणत त्यांनी अबद्ध म्हणजे कोणत्याही बंधनाशिवाय नामोच्चार केला तरी तो तरतो असं सांगितलं आहे. ईश्वराचं नाम उच्चारताना शब्दोच्चाराच्या अचूकतेची गरज नसून भाव महत्त्वाचा आहे. याबाबतीत वाल्या कोळ्याचं उदाहरण सतत दिलं जातं. वाल्या कोळी ‘राम’ न म्हणता ‘मरा’ म्हणत होता, तरी तो वंदनीय ठरला. ‘उफराटे नाम वाल्मिकी बोलला। तोही वंद्य केला नारायणे ।।’ असं तुकोबाराय म्हणतात.
वेदमंत्र उच्चारणात शब्दोच्चाराच्या अचूकतेबरोबर स्वराच्या अचूकतेचीही गरज आहे. आरोह-अवरोहात थोडाही बदल चालत नाही. ‘रागज्ञानघात चुकता होय वेळ।’ असं तुकोबाराय सांगतात. विठ्ठलाच्या नामस्मरणाला मात्र स्वराची गरज नाही. वेदोच्चारासाठी उदात्त, अनुदात्त आणि प्रचय अशा स्वरांच्या ज्ञानाची आवश्यकता असते. तालु, कंठ आणि मूर्धन्य इत्यादि सावयव स्थानांच्या वरच्या भागाच्या ठिकाणी जो अच् निर्माण होतो त्याला उदात्त म्हणतात, तर खालच्या भागाच्या ठिकाणी अच् निर्माण होतो त्याला अनुदात्त म्हणतात. अशा स्वरांची गरज नामोच्चाराला नाही. ‘हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त। प्रचुररहित पांडुरंग ।।’ असं तुकोबाराय सांगतात. पांडुरंगाचा नामोच्चार स्वररहित आहे.
नाममंत्राच्या उच्चाराला स्वराची गरज नाही.
नये जरी तुज मधुर उत्तर।
दिधला सुस्वर नाही देवे ।।१ ।।
नाही तयाविण भुकेला विठ्ठल।
येईल तैसा बोल रामकृष्ण ।।२ ।।
तुकोबाराय सांगतात की तुला मधुर स्वराने गाता येत नसेल तर त्याची काही गरज नाही. जसं येईल तसं रामकृष्ण बोललं तरी ते विठ्ठलाला प्रिय आहे.
वेदमंत्रोच्चारासाठी वेळ आणि काळाचं बंधन आहे. वेदपठणासाठी ब्रह्ममुहुर्त म्हणजे सकाळची वेळ शुभ मानली जाते, संध्याकाळी वेदपठण टाळलं जातं. त्याचबरोबर ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होत असेल अशा वेळेही वेदपठण निषिद्ध आहे. पौर्णिमा, प्रतिपदा, अष्टमी आणि चतुर्दशी अशा तिथीलाही वेदपठण अशुभ मानलं जातं. शुभ-अशुभतेचे असे अनेक बारीक सारीक नियम आहेत.
नामोच्चारासाठी वेळेचं आणि काळाचं कोणतंही बंधन नाही. प्रस्तुत अभंगाच्या दुसर्या चरणात तुकोबाराय म्हणतात- ‘नाही वेळ काळ पंडितांचा धाक।’ किंवा ‘रागज्ञानघात चुकता होय वेळ। नाम सर्वकाळ शुभदायक ।।’ अशी तुकोबारायांची अनेक प्रमाणे आहेत. ‘काळ वेळ नाम उच्चारिता नाही।’ असं ज्ञानोबारायही हरिपाठात म्हणतात. त्यामुळे नामस्मरण आवडीप्रमाणे कुठेही आणि कधीही करता येतं.
वेदमंत्रासाठी शुचित्वाचं बंधन आहे. पहिलं शुचित्व जन्मजात आहे. जे जन्माने ब्राह्मणादी उच्चवर्णीय पुरुष आहेत त्यांनाच वेदमंत्राचा अधिकार आहे. दुसरं शुचित्व संस्काराचं आहे. उच्चवर्णीय पुरुषालाही मुंजीसाठी ठराविक वय झाल्यानंतरच वेदाचा अधिकार मिळतो. त्यासाठी वयपूर्तीनंतर मुंजीचा संस्कार आवश्यक आहे. त्याची वेळेत मुंज झाली नाही तरी वय उलटूनही त्याला वेदाचा अधिकार मिळत नाही. तो व्रात्य बनतो. त्याला व्रात्यस्तोम नावाचा विधी करावा लागतो आणि त्यानंतर तो मुंजीचा अधिकारी बनतो. थोडक्यात उच्चवर्णीय पुरुष म्हणून जन्म झाल्यानंतरही त्याला अनेक बाबींची पूर्तता करुनच वेदाचा अधिकार मिळवावा लागतो. तिसरं शुचित्व म्हणजे स्नानादी कर्म करण्याचं. वेदपठण करण्यापूर्वी स्नानादी कर्म आवश्यक आहे.
नाममंत्राचा अधिकार सर्वांना आहे. त्यात जन्मतः कोणताही भेदभाव तर नाहीच पण इतरही कोणता भेदभाव नाही. ‘ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही आहे अधिकार। बाळे नारीनर आदीकरोनी वेश्याही ।।’ असा तुकोबारायांचा अभंग आहे. यात शूद्रांबरोबर चांडाळ, बाळे, नारी आणि वेश्या यांचा समावेश केल्यानं नाममंत्रासाठी जात, वय, मौजीबंधनादी संस्कार, लिंग आणि आचरण असं कोणतंही बंधन नाही हे उघडपणे दिसतं. याच नामाच्या बळावर कथित नीच मानल्या गेलेल्या जातीतील्ा लोकही उच्चवर्णीयांना वंदनीय ठरलेले आहेत. ‘नीचिये कुळीचा उंचा वंद्य होय। हरीचे जो गाय गुणानुवाद ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. ‘नामधारकासी नाही वर्णावर्ण।’ किंवा ‘आणिका भजना विधी बोलिला निषेध। नाम ते अभेद सकळा मुखी ।।’ अशी यासंदर्भात अनेक संतवचने आहेत. त्याचबरोबर नामाला स्नानादी कर्माचीही गरज नाही. ‘म्हणोनि गोड सर्वभावे। अंघोळ न लगे तोंड धुवावे।’ असं तुकोबाराय म्हणतात तर ‘स्नान नाही संध्या नाही। यातीकुळ संबंध नाही ।।’ असं सावता माळी म्हणतात. निदसुरा म्हणजे अर्धवट झोपेत असतानाही नाम घेता येतं. ‘अशौच तो बाधी आणिका अक्षरा। नाम निदसुरा घेता तरे ।।’ असा तुकोबारायांचा सांगावा आहे.
वेदमंत्र उच्चारण गुरुच्या म्हणजेच पंडित-वेदवत्त यांच्या धाकात आणि त्यांनी घालून दिलेल्या काटेकोर नेमांच्या अधीन राहून करावं लागतं. नाममंत्रासाठी कोणाचाही धाक नाही. ‘नाही वेळ काळ पंडितांचा धाक। हो का वाचक वेदवक्ते ।।’ असं प्रस्तुत अभंगात तुकोबाराय म्हणतात. अशाच आणखी दोन अभंगात हीच तुलना तुकोबारायांनी केलेली आहे. त्यातील ‘मंत्रचळे पिसे लागते सत्वर।’ या अभंगातील काही चरण वर दिलेले आहेत. आता दुसरा अभंग पाहा.
वेदाचे गव्हार न कळे पाठका।
अधिकार येरा नाही लोका ।।१ ।।
विठोबाचे नाम सुलभ सोपे रे।
तारी एक सरे भवसिंधु ।।२ ।।
जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ।
येर तो सकळ मूढ लोक ।।३ ।।
तुका म्हणे विधिनिषेध लोपला।
उच्छेद या झाला मारगाचा ।।४ ।।
तुकोबारायांप्रमाणेच ज्ञानोबारायांनीही काही अभंगांतून वेदमंत्र आणि नाममंत्राची तुलना केलेली आहे. ‘अशौचाचिये जपो नये। आणिकाते ऐको नये। ऐशिया मंत्राते जग बिहे। याचे फळणे थोडे। परि क्षोभणे बहु। तैसा मंत्रराज नव्हे रे रे ।।’ असं ज्ञानोबाराय म्हणतात. अशुचिने जपू नये, इतरांनी (ब्राह्मणेतरांनी आणि स्त्रियांनी) ऐकू नये अशा मंत्राला (म्हणजे वेदमंत्राला) जग घाबरतं. या मंत्राचं फळ थोडं, पण राग जास्त आहे. याउलट नाममंत्र मात्र तसा नाही. ज्ञानोबारायांच्या या अभंगात सरळ सरळ वेदमंत्र आणि नाममंत्र यांची तुलना आहे. या अभंगाचा अर्थ लावताना काही अभ्यासकांनी मात्र ही तुलना जारण मारण मंत्रांची आणि नाममंत्राची असल्याचं सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी बरीच शाब्दिक कसरत केली आहे. अशुचि हे विशेषण मंत्रजपकर्त्याच्या स्थितीचे नसून मंत्राचेच आहे असा त्यांच्या मांडणीचा सूर आहे. वास्तविक पाहता संतांच्या इतर अभंगात आलेला अशुचि हा शब्द मंत्रजपकर्त्याच्या स्थितीचा सूचक म्हणून आलेला आहे, हे आपण पाहिलं आहे. त्यामुळे ज्ञानोबारायांच्या या अभंगातही वेदमंत्राच्या तुलनेतच नाममंत्राची श्रेष्ठता दाखवली आहे. या अभंगाच्या पुढच्या चरणात नाममंत्र ‘उत्तमापासून अंत्यजापर्यंत’ सर्वांना लाभदायक असल्याचं माऊली सांगतात. त्यामुळे हा संदर्भ जातीय भेदभाव करणार्या वेदमंत्राचाच आहे. जारणमारण मंत्रात संप्रदायिक गुप्ततेचा भेदभाव असला तरी जातीय भेदभाव नाही.
तुकोबाराय प्रस्तुत अभंगाच्या तिसर्या चरणात सांगतात की वेदाने जे प्रतिपाद्य केलेलं आहे त्या अनंताचं आम्ही आमच्या आवडीप्रमाणे नामस्मरण करू. आम्ही ज्या नावाने परमेश्वराचं स्मरण करतो ती नावे वेदात कोठेही सापडणार नाहीत. परमेश्वर हा वेद प्रतिपाद्य असला तरी त्याची वेदात न सापडणारी नावे आम्ही आमच्या आवडीने म्हणत राहू. त्यासाठी आम्हाला वेदवत्तäयांच्या आणि पंडितांच्या धाकात राहण्याची गरज नाही. शुची-अशुचीच्या बंधनांची आम्हाला जरुरी नाही. वास्तविक पाहता वेदात ज्या आद्यतत्वाचं प्रतिपादन केलेलं आहे तोच पांडुरंग आहे, पण पांडुरंगाचं नाव वेदात नाही. पांडुरंग, विठ्ठल, विठू, विठुराया, पंढरीराया, पंढरीनाथ, विठाई अशी त्या आद्यतत्वाला आम्ही आमच्या आवडीने दिलेली अनेक नावं आहेत. ती नावं मूळ वेदात नाहीत. याचा अर्थ ती नावं वेदबाह्य असतील पण त्या नावाने जे आद्यतत्व सूचित करायचं आहे, ते आद्यतत्व मात्र वेदबाह्य नाही. उलट तोच वेदार्थाचा सारभूत गाभा आहे अशी तुकोबारायांची भूमिका आहे. ‘ओम तत्सदिती सूत्रांचे जे सार। कृपेचा सागर पांडुरंग ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. ‘ओमतत्सदिति’ हे वेदाचे सूत्र असून त्या सूत्राचाही सारभूत गाभा म्हणजे पांडुरंगच आहे. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत सुरुवातीलाच ‘ओम नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ असं जे म्हटलं आहे त्यातील वेदप्रतिपाद्य आद्यतत्व म्हणजे विठ्ठलच आहे. या मांडणीचा उलगडा आपण पुढच्या आठवड्यातील भागात करू.
(क्रमश:)
