पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. मोदी हे सर्वात मोठे दंगलखोर आहेत. त्यांचे भवितव्य अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही वाईट असेल. हिंसा घडवून काहीही साध्य केले जाऊ शकत नाही, अशी सडेतोड टीका त्यांनी केली.
- ममता बॅनर्जी बुधवारी हुगळी जिह्यातील शाहगंज येथील सभेत बोलत होत्या. त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीची सीबीआयने नुकतीच कोळसा तस्करी प्रकरणात चौकशी केली. या चौकशीच्या अनुषंगाने ममता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहांवर जोरदार हल्ला चढवला.
- त्यांनी मोदींसाठी ‘दंगलखोर’, ‘राक्षस’ यांसारख्या शब्दांचा वापर केला. काही दिवसांपूर्वी भाजपने तृणमूल काँग्रेसला ‘टोलाबाज’ म्हटले होते. त्यालाही ममता बॅनर्जींनी तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
- पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप हा राजकीय संघर्ष वाढला आहे.
मोदी-शहा देशभर द्वेष पसरवताहेत!
पंतप्रधान मोदी आणि गृह मंत्री शहा हे दोघे संपूर्ण देशभर असत्य आणि द्वेष पसरवत आहेत, असा बेधडक आरोप ममता यांनी या वेळी केला. राज्यातील विधानसभा निवडणुकीत मी गोलकिपर राहणार आहे. तुम्ही एकसुद्धा गोल करू शकणार नाहीत. सगळे शॉट गोल पोस्टच्या वरून जातील, असेही ममता यांनी भाजपला सुनावले.
सौजन्य : दैनिक सामना